नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
भोंडला, हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा
हा उपहासात्मक उखाणा अशाच मानसिकतेतून सर्रास वापरला जायचा.
ग्रामीण जनतेचे दळणवळणाचे एकमेव साधन म्हणजे रेंगीबैल, छकडा, दमनी वगैरे. गावाला जोडणारे पक्के रस्ते उपलब्ध नसल्याने ग्रामीण माणसांचा संचारही मर्यादित असायचा. पावसाळाभर गावाचा संपूर्ण जगाशीच संपर्क तुटायचा, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरू नये. इलेक्ट्रिक, टेलिफोन किंवा तत्सम साधने गावात पोचायची होती. टीव्ही, संगणकाचे नामोनिशाण नव्हते. गावात दिसलाच तर एकट-दुकट रेडियो दिसायचा. गावातील एखादा तरुण नोकरी करायला शहरात गेला की शहरातून गावाकडे परतताना हमखास काखेला रेडियो लटकवून आणि रस्त्याने गाणी वाजवतच गावात प्रवेश करायचा. लग्नामध्ये हुंडा म्हणून गोफ, घड्याळ, अंगठी, सायकल आणि रेडियो ही वरपक्षाची सर्वात मोठी मागणी समजली जायची. स्वाभाविकपणे मनोरंजनाची काहीच साधने उपलब्ध नसल्याने पारंपरिक सण साजरे करून त्यातूनच मनोरंजनाची गरज पूर्ण केली जायची.
जी अवस्था दळणवळण व मनोरंजनाची; तीच वैचारिक देवाणघेवाणीची. सभा, मेळावे, परिसंवाद याचे लोण गावापर्यंत पोचलेच नव्हते. चालायचेत ते केवळ तमाशे, गोंधळ, जलसे, हरिनाम सप्ताह किंवा कीर्तन-प्रवचने. हरिनाम सप्ताह किंवा कीर्तन-प्रवचने या प्रकारातला सर्वात मोठा दोष असा की हे वनवे ट्रॅफिक असते. त्यात चर्चेला वगैरे काहीच स्थान नसते. एकाने सांगायचे आणि इतरांनी ते भक्तिभावाने श्रवण करायचे. आपल्या सुखद:खांना व्यक्त करण्याचे व्यासपीठच उपलब्ध नसल्याने ग्रामीण जनतेची केवढी घुसमट त्याकाळी झाली असावी, याचा अंदाज आता सहज बांधता येऊ शकतो.
निदान पुरुष मंडळींना मारुतीच्या पारावर किंवा चावडीवर बसून गप्पा तरी करता येत होत्या. भावना व्यक्त करायला संधी मिळत होती; पण महिलांचे काय? त्यांना ना पारावर बसून गप्पा मारण्याची अनुमती, ना सुखदु:खाला व्यक्त करण्यासाठी एखादे व्यासपीठ उपलब्ध. त्यामुळेच महिलाप्रधान सण अतिशय जिव्हाळ्याने साजरे केले जात असावेत आणि त्यानिमित्ताने ग्रामीण महिला मनोरंजन आणि एकीमेकीचे क्षेमकुशल व्यक्त करण्यासाठी अथवा जाणून घेण्यासाठी या सणांचा वापर व्यासपीठासारखा वापर मोठ्या खुबीने करून घेत असाव्यात.
अशाच काही महिलाप्रधान सणापैकी भुलाबाईचा उत्सव हा एक सण. आश्विन शु.१० ते कोजागरी पौर्णिमेपर्यंतचा काळ “आश्विनच्या भुलाया” म्हणून साजरा केला जातो. काही भागात याला गुलाबाई, हादगा म्हटले जाते तर काही भागात भोंडला. या काळात मातीच्या बाहुल्या/भुलाया मांडून दररोज नित्यनेमाने गाणी म्हटली जातात. खिरापत वाटली जाते. त्यानंतर जसजसा काळ बदलत गेला तसतसे या सणांचे महत्त्वही कमी होत गेले.
पण त्या काळी छोट्या-छोट्या बालिकांपासून जख्खड म्हातार्या महिला सुद्धा यामध्ये गाणी गायनासाठी सहभागी होत असायच्या. त्या पैकी काही गाणी ऐकताना माझ्या अंगावर काटा उभारायचा. तर काही गाणी ऐकून मन खूप-खूप उदास व्हायचे. काही गाणी मनाला चटका लावून जायची तर काही गाणी ऐकताना कुतूहलमिश्रित प्रश्नचिह्न निर्माण व्हायचे.
सोन्याचे मंदिर, सोन्याचा कळस या धर्तीवर घराचे छत सोन्याचे असेल तर ते समजण्यासारखे होते, पण घराला चक्क सोन्याची पायरी? उलगडा व्हायचा नाही म्हणून मग खूप कुतूहल वाटायचे.
भुलाबाईच्या गाण्याला तत्कालीन सामाजिक साहित्याचा आविष्कारच म्हणावे लागेल. साहित्य हा समाजाचा आरसा असतो असे म्हणतात; परंतू थोरा–मोठ्या कवी/लेखकांच्या साहित्यात तत्कालीन वास्तव प्रामाणिकपणे उतरलेलेच नसावे. त्या काळात संतकवी देवास भजण्यात गुंग, त्यांचे बहुतांश काव्यवैभव/प्रतिभा देवाचे गूण गाण्यात खर्ची पडली असावी. कवी हा तर मुळातच कल्पनाविलासात रमणारा प्राणी. वास्तववादी लेखन केले तर आपल्या काव्याला साहित्यिक दर्जा मिळणार नाही, या भयाने पछाडलेला. त्यातल्या त्यात कवी हे बहुतांश पुरूषच. त्यामुळे आपल्या दुखा:ला कोणीच वाली नाही हे बघून महिलांचा कोंडमारा झाला असावा. महिला विश्वाच्या सुखदु:खाचे लेखक, कवी किंवा गीतकारांनी नीट शब्दांकन केले नाही म्हणून आमच्या मायमाउल्या स्वतःच पुढे सरसावल्या असाव्यात आणि कदाचित त्यामुळेच अपरिहार्यपणे महिलांनी प्रस्थापित काव्याला फाटा देऊन स्वतःचे काव्यविश्व स्वतःच तयार केले असावे. कवी, गीतकार आणि संगीतकाराची भूमिका त्यांनीच चोख पार पाडली असावी आणि मग त्यातूनच आकारास आले असावे हादगा, भोंडला, भुलाबाईचे गाणे. या गीतामध्ये साठवलेली आहेत महिलांची अपार दु:खे. प्रकट झाली आहे साताजन्माच्या असहायतेची कारुण्यता. स्पष्टपणे प्रतिबिंबित झाली आहे अबला म्हणून आयुष्य कंठताना वेळोवेळी झालेली कुचंबणा आणि मिळालेली हीनत्वाची वागणूक. त्यासोबतच अधोरेखित झाली आहे अठराविश्व दारिद्र्य लाभलेल्या संसाराचा गाडा हाकलताना झालेली दमछाक व ससेहोलपट अगदी ठळकपणे.
वरील गीतात आईच्या घराला सोन्याची पायरी आहे असे म्हटले आहे. मग याला काय म्हणावे? कल्पनाविलास की अतिशयोक्ती? माहेरच्या बढाया की वास्तवता? मला मात्र यामध्ये एक भीषण वास्तविकता दिसते. ती सासुरवासीन जेव्हा सांगावा धाडण्यासाठी त्या पाखराला तिच्या माहेरगावी पाठविण्याचा बेत आखते तेव्हा तिचे माहेरघर पाखराला ओळखता यावे यासाठी तिच्या आईच्या घराची ओळख, खाणाखुणा सांगणे क्रमप्राप्तच ठरते. नेमकी येथेच तिची गोची झाली असावी. तिच्या आईच्या घराचे कवेलू, छप्पर, भिंती आणि दरवाजे हे नक्कीच सांगण्यायोग्य नसावे. खरं आहे ते सांगण्यासारखं नाही आणि खोटंही बोलायचं नाही अशी स्थिती जेव्हा जेव्हा उद्भवते तेव्हा अतिशयोक्तिपूर्ण कथन करून वेळ मारून नेणे, हाच तर मनुष्यस्वभाव आहे. “जेव्हा एखाद्याकडे सांगण्यासारखे काहीच नसते तेव्हा तो बढाईचा आधार घेत असतो” हेच तर त्रिकाल अबाधित शाश्वत सत्य. मग तिने सोन्याची पायरी सांगितली त्याचा वेगळा अर्थ कसा घेणार?
त्यावरी (पायरीवर) बसजो, शिदोरी सोडजो म्हणजे काय? निरोप घेऊन जाणार्या पाखराला सोबत नेलेली शिदोरीच खाण्यास सांगायला ती विसरत नाही. का? उत्तर अगदी सोपे आहे, पाखराला तातडीने जेवायची व्यवस्था आईच्या घरी होऊ शकेल अशी परिस्थिती आईचीही नाही, हे तिला पुरेपूर ठाऊक असावे. तसे नसते तर तिने सोबत शिदोरी कशाला दिली असती? आईचे गाव लांब आहे, तेवढी मजल गाठेपर्यंत रस्त्याने भूक लागेल हा उद्देश असता तर मध्येच वाटेवरच्या एखाद्या विहिरीवर किंवा नदीवर बसून शिदोरी खायला सांगितले असते. आईच्या घरी पोचल्यावर पायरीवर बसून सोबतचीच शिदोरी खावी जेणेकरून पाहुणा उपाशी नाही याचे समाधान आईला लाभेल व आईकडे पाहुण्याला तातडीने जेवू घालायची व्यवस्था नसेल तरी तिची या फटफजितीपासून सुटकाही होईल, असा कयास बांधूनच तिने पाखराला नेमकी सूचना दिली, हे उघड आहे.
आता हे गीत बघा. या गीतामध्ये एका सुनेला लागलेली माहेरची ओढ आणि सुनेला जर माहेरा जाऊ दिले तर शेतीत कष्ट करणारे दोन हात कमी होतील, या भितीने त्रेधातिरपट उडालेल्या कुटुंबातील उर्वरित सदस्यांची हतबलताच दिसून येत आहे.
नुकतेच लग्न होऊन सासरला नांदायला आलेल्या सुनेला तिच्या माहेरची आठवण होते, आईच्या आठवणीने जीव व्याकूळ झालेला असतो. तिकडे आईला सुद्धा लेकीची आठवण होऊन गहिवरलेले असते म्हणून मायलेकीची गाठभेठ करून देण्यासाठी बाप लेकीला घेण्यासाठी आलेला असतो. बाप घ्यायला आलेला बघून आनंदाने उल्हसित झालेली सून सासूला हळूच पण भीत-भीत विचारते.
माहेराला जायची रीतसर परवानगी सूनबाई मागते आहे हे बघून सासू थोडी भांबावते. तिच्या समोर अनेक प्रश्न उभे राहतात. एक तर काहीना काही पैसा लागेलच जो घरात नाहीच. दुसरे असे की शेतीत कष्ट करणारे दोन हात पण कमी होणार. म्हणून ती सुनेला म्हणते.
कारलीच्या बियाणाची लागवड करून माहेराला जाण्याचा सल्ला सुनेला मनोमन पटतो. ती बेगीबेगी लागवड उरकते आणि पुन्हा सासूला विचारते.
एक वेळ मारून नेता आली. कारलीचे बी लावून झाले पण आता पुढे काय? पुन्हा सासूबाई शक्कल लढवते.
सून पुन्हा काही दिवस कळ काढते, बियाणे अंकुरून वेल निघेपर्यंत बियाला पाणी घालते, वेलीचे संवर्धन करते आणि मग वेल निघालेला बघून पुन्हा एकदा आपल्या सासूला विचारती होते.
सासूसमोर पुन्हा तोच यक्षप्रश्न. इकडे आड तिकडे विहीर. नाही म्हणता येत नाही आणि पाठवायला गेले तर संसाराचं अर्थशास्त्र कोसळते. कौटिल्याची अर्थनीती कळायला अर्थतज्ज्ञ किंवा अर्थमंत्रीच लागतो या सुशिक्षित समाजातील गोंडस समजुतीला उभा छेद देणारी एका अशिक्षित सासूची वर्तणूक. मग तिथून पुढे नवनवीन युक्त्या लढविणे सासूचा नित्यक्रमच बनून जातो.
कारलीला फूल लागले की माहेराला जायला मिळणार या आशेने सून मात्र आलेला दिवस पुढे ढकलत असते.
कारलीचा वेल मांडवावर गेलाय. वेल फुलांनी बहरून गेली. पण नशिबाच्या वेलीला बहर येईल तेव्हा ना.
आता प्रतीक्षेची घडी संपली. कारलीला कारले लागलेत. आता तरी परवानगी मिळायला हवी की नाही?
आता कष्ट फळांस आले. कारली पण कारल्याने लदबदून गेली. पण कारली बाजारात नेऊन विकल्याखेरीज पैसा कसा येणार? म्हणून पुन्हा सासू सुनेला अगदी समजावणीच्या स्वरात सांगते
कारलीला कारले लागलेत, कारली बाजारात गेली. आता मात्र नक्कीच परवानगी मिळणार अशी सुनेला खात्री आहे, म्हणून ती म्हणते
कारली बाजारात गेली आहे. शेतीत पिकवलेला माल बाजारात जाणे, हा शेतीतील कष्ट फळांस येणारा परमोच्च बिंदू. खरे तर हे गीत यापुढे आनंदाच्या क्षणांकडे वळायला हवे. एवढ्या मेहनतीने पिकविलेली कारली बाजारात जाणे हा कष्टाचे फळ पदरात पडण्याचा क्षण. शेतकर्याच्या घरात लक्ष्मी येण्याचा एकमेव मार्ग म्हणजे शेतीत घाम गाळून पिकविलेला माल विक्रीस जाणे. माल विकायला बाजाराकडे गेलेला घरधनी घराकडे येताना लक्ष्मी घेऊन परतायला हवा. सोबत काहीना काही भातकं, खाऊ वगैरे आणायला हवा. पण इथून पुढे या गीतात तसे काहीच होत नाही. याउलट गीताच्या याच कडव्यापासून गीत विचित्र वळण घेते. निदान आतापर्यंत तरी कुठलाही खाष्टपणा न दाखविणार्या सासूचा स्वभाव इथूनच बदलायला लागतो. आजपर्यंत घरात एकमेकाशी गोडीगुलाबीने वागणारी माणसे आता नैराश्याच्या भावनेतून एकमेकांशी फटकून वागताना दिसत आहे. घरात चिडचीडपणा, उदासीनता वाढीस लागलेली दिसत आहे.
नेमकं झालंय तरी काय? कारली मातीमोल भावाने तर नाही खपली ना? की कारलीच्या खरेदीला कोणी घेवालच मिळाला नाही? मनुष्यजातीचा स्वभाव त्याच्या आर्थिक स्थितीनुसार बदलत असतो हे समीकरण अर्थतज्ज्ञांच्या अर्थशास्त्रात बसत नसले तरीही तेच सत्य असावे. कारण या गीताचा शेवट नेमके तेच अधोरेखीत करून जातो.
आतातरी आपल्याला माहेराला जायला मिळणार की नाही या विचाराने ग्रस्त झालेली सून परत एकदा सासूला विचारती होते. सासूला खूश करण्यासाठी तिला तिच्या आवडीची कारलीची भाजी करून खाऊ घालते.
पण आता आर्थिक विवंचनेने ग्रासलेल्या घरातली सारी कहाणीच बदललेली असते. परिस्थितीसमोर निरुत्तर झालेली सासू चक्क सुनेसोबत त्रोटक स्वरूपात बोलायला लागते. तिची भाषा बदलते, भाषेची ढब बदलते आणि शब्दफेकीची तर्हाही बदलते.
अगं सूनबाई, माझी ना नाही पण एक शब्द मामंजीला पण विचारून घे ना. असे म्हटले असते तर ते समजण्यासारखे होते पण सासूची आता तशी सहज आणि सौदार्हपूर्ण बोलीभाषाच बदललेली दिसत आहे कारण "मला काय पुसते, बरीच दिसते" हे वाक्य वाटते तेवढे सहज नाही. या वाक्यात उद्वेग, उबग, क्लेश, चिडचिड, ग्लानी आणि फटकळपणा ठासून भरला आहे.
मात्र तरीही "सासर्याकडूनच परवानगी घ्यायची होती तर इतके दिवस तुम्ही कशाला उगीच बहाणे सांगत राहिल्या" असा प्रतीसवाल सून करीत नाही. सासूची इच्छा प्रमाण मानून सून आता सासर्याला विचारायला जाते.
पण सासरा तरी वेगळं बोलणार? सुनेला माहेरी पाठवायचे म्हणजे निदान तिला जाण्यापुरता तरी घरात पैसा असावा की नाही? नसणारच. म्हणून तर तोही आपल्यावरची जबाबदारी दुसर्यावर ढकलून मोकळा होतो.
आता शेवटला पर्याय. तिची माहेराला जाण्याची हक्काची मागणी कोणीच समजून घेतली नाही. पण आता परवानगी देण्याचे अधिकार थेट नवर्याच्याच हातात आले आहे. तिच्या व्याकुळतेची तीव्रता नवर्याला तरी नक्कीच कळलेली असणार, असे तिला वाटते. तिला खात्री आहे की आता नक्कीच जायला मिळणार. बस्स एवढ्याच तर आशेपायी ती नवर्याला विचारायला जाते.
पण प्राणप्रियेच्या प्रश्नाला नवरा उत्तरच देत नाही. नवरा काय म्हणतो हे गीतात लिहिलेच नाही. गीताचा दोन ओळीत थेट शेवटच करून टाकला आहे.
पीएचडी, डी.लिट मिळवून किंवा वेदपुराण, कुराण, बायबल, कौटिल्य, चाणक्य किंवा हजारो पानांचे अर्थशास्त्राचे पुस्तक वाचूनही जेवढे गाव, गरिबी आणि शेतीचे अर्थशास्त्र समजून घेता येत नाही त्यापेक्षा जास्त वास्तववादी अर्थशास्त्र ह्या एका गीतात सामावले आहे, याची मला खात्री आहे.
प्रतिक्रिया
रूणझुन पाखरा
रूणझुन पाखरा जा माझ्या माहेरा
माझ्या का माहेरी सोन्याची पायरी
त्यावरी बसजो शिदोरी सोडजो
माझ्या का मातेला निरोप सांगजो
तुझ्या का लेकीला बहू सासुरवास
होते तर होऊ दे औंदाच्या मास
पुढंदी धाडीन … गायीचे कळप
पुढंदी धाडीन … म्हशीचे कळप
.
गंगाधर मुटे
…………………………………..
आजकाल या गाण्याचा शेवट गोड करण्यासाठी
तुझ्या का लेकीला बहू सासुरवास
ऐवजी
सुखी आहे मयना आईला सांगजो
असा बदल करून गायला जाते अशी माहीती मिळाली.
…………………………………………………………….
शेतकरी तितुका एक एक!
वैदूदादा,वैदूदादा
भोंडला,हादगा आणि भुलाबाईची गाणी: महिलांच्या व्यथा. भाग-३
घरात म्हातारा बिमार झालाय. म्हणुन वैद्याला बोलावतांना त्याला फ़ी म्हणुन खुट्याची म्हैस देण्याचा वायदा करणे म्हणजे काय? नगदी फ़ीच का देवू नये? न देण्यायोग्य वस्तु देण्याची भाषा ही अप्रत्यक्षपणे उधार मागायची (गोड शब्दात) भाषा आहे. ती आजतागायत वापरात आहे.
वैदूदादा,वैदूदादा घरावरी चाल गा, चाल गा
बुढ्याचे मचले हाल गा, हाल गा
माही सासू म्हणते गा, म्हणते गा
तुले खुट्याची म्हैस देते गा, देते गा.
(संकलन : गंगाधर मुटे)
अवांतर : मचणे हा प्रमाण भाषेतील शब्द आहे का?
नसल्यास पर्यायी शब्द काय आहे?
शेतकरी तितुका एक एक!
कमळे कमळे
कमळे कमळे : हादग्याची गाणी
कमळे कमळे दिवा लाव
दिवा गेला वार्यानं
कमळीला नेलं चोरानं
चोराच्या हातातुन सुटली
बाजेखाली लपली
सासुबाईंनी देखली
मामांजीनी ठोकली…
संकलन - आश्विनी डोंगरे
शेतकरी तितुका एक एक!
काळी चंद्रकळा
काळी चंद्रकळा : हादग्याची गाणी
काळी चंद्रकळा नेसु कशी?
गळ्यात हार घालू कशी?
ओटीवर मामांजी जाऊ कशी?
दमडिचं तेल आणु कशी?
दमडीचं तेल आणलं
सासुबाईंचं न्हाणं झालं
वन्सन्ची वेणी झाली
भावोजींची दाढी झाली
मामांजींची शेन्डी झाली
उरलेलं तेल झाकुन ठेवलं
लांडोरीचा पाय लागला
वेशीबाहेर ओघळ गेला
त्यात हत्ती वाहून गेला
सासुबाई सासुबाई अन्याय झाला
दुध्-भात जेवायला वाढा
माझं उष्ट तुम्हीच काढा.
संकलन : आश्विनी डोंगरे
..................................
शेतकरी तितुका एक एक!
श्रिकन्ता कमळाकन्ता
श्रिकन्ता कमळाकन्ता : हादग्याची गाणी
श्रिकन्ता कमळाकन्ता अस कस झाल
अस कस वेड माझ्या कपाळि आल
वेडियाच्या बायकोने केल्या होत्या करन्ज्या
तिकडुन आला वेडा त्याने निरखुन पाहिले
होडि होडि म्हणुन त्याने पाण्यात सोडले
श्रिकन्ता कमळाकन्ता …
वेडियाच्या बायकोने केल्या होत्या शेवया
तिकडुन आला वेडा त्याने निरखुन पाहिले
अळ्या अळ्या म्हणुन त्याने टाकुन दिले .
श्रिकन्ता कमळाकन्ता …
वेडियाच्या बायकोने केले होते लाडु
तिकडुन आला वेडा त्याने निरखुन पाहिले
चेण्डू म्हणुन त्याने खेळाय्ला घेतले
श्रिकन्ता कमळाकन्ता …
वेडियाचि बायको झोपली होति पलन्गावर
तिकडुन आला वेडा त्याने निरखुन पाहिले
मेली मेली म्हणुन त्याने जाळुन टाकले
श्रिकन्ता कमळाकन्ता …
संकलन - केदार जाधव
............................................
शेतकरी तितुका एक एक!
लोणी खाल्लं कोणी
लोणी खाल्लं कोणी : हादग्याची गाणी
नणंदा भावजया दोघी जणी
घरात नव्हतं तिसरं कोणी
शिंकाळ्यातलं/शिंक्यावरचं लोणी
खाल्लं कोणी खाल्लं कोणी
तेच खाल्ल वहिनींनी वहिनींनी….
आता माझा दादा येईलग येईलग
दादाच्या मांडीवर बसीनग/बसेनग
दादा तुझी बायको चोरटी चोरटी
असू दे माझी चोरटी चोरटी
दे काठी लाबं पाठी विसल्या
गुलाबाई माहेरच्या गोष्टी
संकलन - अरुंधती कुळकर्णी
...................................................
शेतकरी तितुका एक एक!
शिवाजी अमुचा राजा
शिवाजी अमुचा राजा : हादग्याची गाणी
शिवाजी अमुचा राजा
त्याचा तो तोरणा किल्ला
किल्ल्यामधे सात विहिरी
सात विहिरींमधे एक एक कमळ
एक एक कमळ तोडीले
भवानी मातेला अर्पण केले
भवानी माता प्रसन्न झाली
शिवरायाला तलवार दिली
तलवार… घेऊनी आला…( इथे चाल बदल)
हिंदुंचा राजा तो झाला
हिंदुनी त्याचे स्मरण करावे
हादग्यापुढे गाणे गावें.
……………………………..
संकलन - आश्विनी डोंगरे
शेतकरी तितुका एक एक!
श्री गणराया
श्री गणराया : हादग्याची गाणी
आधी नमुया श्री गणराया
मंगलमुर्ती विघ्न हराया
मंगलमुर्ती उंदरावरी
सत्ता त्याची इंद्रावरी
इंद्र हा स्वर्गीचा राजा ( चाल बदल)
झुलती हत्तीच्या फौजा
वरुण चाकर इंद्राचा
पाऊस पाडील हस्ताचा
पड पड पावसा थेंबोथेंबी
थेंबोथेंबीच्या हळव्या लोंबी
हळव्या लोंबी आणुया,
तांदुळ त्याचे कांडुया
मोदक्-लाडु बनवुया
गणरायाला अर्पुया….
………………………………
संकलन - आश्विनी डोंगरे
शेतकरी तितुका एक एक!
ऐलमा पैलमा
ऐलमा पैलमा : हादग्याची गाणी
ऐलमा पैलमा गणेश देवा
माझा खेळ मांडूदे, करीन तुझी सेवा
माझा खेळ मांडिला वेशीच्या दारी
पारवत गुंजे गुंजावाणी
गुंजावाणी —च्या सारविल्या टिका
आमच्या गावच्या भुलोजी बायका
एविनी गा तेविनी गा (हे चाल बदलून)
कांदा चिरू बाई तांदूळ घ्या
आमच्या आया, तुमच्या आया
खातील काय दुधोंडे
दुधोंड्याची वाजली टाळी (हे म्हणताना टाळी वाजवायची)
आयुष्य दे रे वनमाळी
माळी गेला शेता भाता
पाऊस पडला येता जाता
पड पड पावसा थेंबोथेंबी
थेंबोथेंबीच्या आडव्या लोंबी
आडव्या लोंबती अंगणा
अंगणा तुझी सात वर्ष
भोंडल्या तुझी बारा वर्ष
अतुल्या मतुल्या
चरणी चातुल्या
चरणीचे धोंडे
हातपाय खणखणीत गोंडे
एकएक गोंडा वीसावीसाचा
सार्या नांगर नेसायचा
नेसा ग नेसा बाहुल्यांनो
अडीच वर्ष पावल्यांनो
संकलन : शिरीष ‘मायबोलीकर’
शेतकरी तितुका एक एक!
कृष्ण घालितो लोळण
कृष्ण घालितो लोळण : हादग्याची गाणी
कृष्ण घालितो लोळण
आली यशोदा धावून
काय रे मागतोस बाळा
तुला देते मी आणून
‘आई मला चंद्र दे आणून, त्याचा चेंडू दे करून’
“असलं रे कसलं बाळा, तुझं जगाच्या वेगळं”
कृष्ण घालितो लोळण
आली यशोदा धावून
काय रे मागतोस बाळा
तुला देते मी आणून
‘आई मला साप दे आणून, त्याचा चाबूक दे करून’
“असलं रे कसलं बाळा, तुझं जगाच्या वेगळं”
कृष्ण घालितो लोळण
आली यशोदा धावून
काय रे मागतोस बाळा
तुला देते मी आणून….
संकलन : शिरीष ‘मायबोलीकर’
..............................................
शेतकरी तितुका एक एक!
या या भुलाबाई
या या भुलाबाई : हादग्याची गाणी
(१)
या या भुलाबाई, आमच्या आळी,तुमच्या आळी
तुमच्या अंगात हिरवी चोळी
हिरव्या चोळीवर बसला मोर,बसला मोर,
बसल्या मोरावर सांडले दाणे
भुलोजी राणे घरी नाही,घरी नाही.
(२)
या या भुलाबाई, आमच्या आळी,तुमच्या आळी
तुमच्या अंगात लाल चोळी
लाल चोळीवर बसला मोर,बसला मोर,
बसल्या मोरावर सांडला बुक्का
भुलोजी अप्पा घरी नाही,घरी नाही.
संकलन-गंगाधर मुटे
.........................................................
शेतकरी तितुका एक एक!
एकच पापड भाजला
एकच पापड भाजला : हादग्याची गाणी
एकच पापड भाजला,भाजला
चुलीमागे ठेविला,ठेविला
सासुबाईने पाहीला,पाहिला
कोरा कागद लिहिला,लिहिला
झुनझुन गाडी जुंतली,जुंतली
त्यात मैना बैसवली,बैसवली
काऊन मैना कोमावली,कोमावली
माहेराला पाठवली,पाठवली.
संकलन-गंगाधर मुटे
.......................................
शेतकरी तितुका एक एक!
भुलाबाईचे सासरे कसे?
भुलाबाईचे सासरे कसे?
भुलाबाई भुलाबाई सासरे कसे गं सासरे कसे?
कचेरीत बसले हे वकील जसे गं वकील जसे
भुलाबाई भुलाबाई सासू कशा गं सासू कशा?
कपाळभर कुंकू पाटलीन जशा गं पाटलीन जशा
भुलाबाई भुलाबाई भासरे कसे गं भासरे कसे?
हातामध्ये घडी मास्तर जसे गं मास्तर जसे
भुलाबाई भुलाबाई जाऊ कशी गं जाऊ कशी?
हातामध्ये लाटणं स्वंयपाकीन जशी गं स्वंयपाकीन जशी
भुलाबाई भुलाबाई दीर कसे गं दीर कसे?
डोळ्यावर गॉगल डॉक्टर जसे गं डॉक्टर जसे
भुलाबाई भुलाबाई नणंद कशी गं नणंद कशी?
हातामध्ये घडी मास्तरीन जशी गं मास्तरीन जशी
भुलाबाई भुलाबाई पती कसे गं पती कसे?
जटातून गंगा वाहे शंकरजी जसे गं शंकरजी जसे
भुलाबाई भुलाबाई आपण कशा गं आपण कशा?
शंकराच्या मांडीवर पार्वती जशा गं पार्वती जशा
भुलाबाई भुलाबाई मुल कसे गं मुल कसे?
वाकडया सोंडाचे गणपती जसे गं गणपती जसे
संकलन : गंगाधर मुटे
.....................................................................
शेतकरी तितुका एक एक!
फेसबुक लिंक
फेसबुक लिंक
https://www.facebook.com/gangadharmute/posts/3764285616929432/
शेतकरी तितुका एक एक!
पाने
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
पाने
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
आज सर्वाधिक वाचन
पाने
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 1 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहे.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण