![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
आयुष्यभर संसारात "दिवे" नाही लावता आले,
मग आजच भरमसाठ पणत्या लावल्याने
असा कोणता प्रकाश पडणार आहे?
प्रपंच्याच्या रहाटगाडग्यात "उजेड" नाही पाडता आला,
मग आजच भरमसाठ फ़टाके फ़ोडल्याने
असा कोणता गगनचुंबी "उजेड" पडणार आहे?
लक्ष्मीपुजनाचे विचारताय?
मग ऐका,
आता माझ्या घरात असलेली लक्ष्मी
"बॅंकेच्या मालकीची" आहे.
तीची पूजा केली काय नाही काय,
तिलाही तसा काय फ़रक पडणार आहे?
तिचा "मालक" तिची पूजा करेलच की!
शिवाय
माझ्यावाचून लक्ष्मीचे तरी
कधी काही अडले आहे काय?
आणि तरीही मला
"लक्ष्मीपूजन" करावेसे वाटते, पण;
माझे दैवत माझे श्रम आहे
आणि
लक्ष्मीदेवीला "श्रमाच्या घामावर" किंवा
"घामाच्या श्रमावर" प्रसन्न व्हायची
भलतीच अॅलर्जी दिसतेय.
* * *
शेतकऱ्यांचा राजा बळीराजा
बळीला पाताळात गाडल्याचा आनंदोत्सव
साजरा करणे म्हणजे दिवाळी!
बरोबर?
वर्षभर शेतीला लुटून मिळवलेल्या "संचयाची"
पूजा करणे म्हणजे दिवाळी!!
बरोबर??
नव्या खातेवहीची औपचारीक पूजा करून
नव्या दमाने शेतीला लुटण्यासाठी
नव्याने शस्त्र पाजवत नवा संकल्प
म्हणजे दिवाळी!!!
बरोबर???
एका दाण्याचे हजार दाणे झाल्यानंतर
त्यातून निर्माण होणारी बचत लुटून
त्यातूनच निर्माण होणाऱ्या
ऐश्वर्याचे ओंगळवाणे प्रदर्शन
म्हणजे दिवाळी
बरोबर????
शेतकर्याच्या कमरेला धडूतही शिल्लक राहाणार नाही,
अशा सरकारी धोरणांच्या हिरिरीने अमलबजावणीसाठी
लक्ष्मीपुत्रांनी मांडलेले भव्यदिव्य प्रदर्शन म्हणजे दिवाळी!!!!
बरोबर?????
बळीराज्याच्या "बरबादी का जश्न"
म्हणजे बलिप्रतिपदा
* * *
बळीराजाच्या डोक्यावर यंदा
निसर्गानेच "फ़ुलझड्या" चेतवल्यात
आणि
सरकार बळीराजाच्या बुडाखाली
"फ़टाके" फ़ोडायला निघालंय.
* * *
* * *
ईडा पीडा टळू दे
बळीचे राज्य येऊ दे
* * *
गरिबीचा क्षय म्हणून
तुमचे तुम्ही लावा दिवे
आणि करा आरास
आम्ही शोधतोय उकिरड्यावर
लेकरांसाठी घास
तसं हे आमचं बारमाही गार्हाणं
खणखणीत नसते कधीच नशीबाचं नाणं
सरून गेल्या आशा
मरून गेल्या इच्छा
तरीही मात्र म्हणावेच लागते....
.
.
.
सर्वांना दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा.......!!!!!!!!!!
- गंगाधर मुटे 'अभय'
*** **** **** **** **** ***
=====
प्रतिक्रिया
कविता मनाला लागली
मुटे साहेब कविता वाचल्यावर लक्ष्मीपुजण करु वाटले नाही हो.
यंदा काही भागात भयावह स्थिती
यंदा काही भागात भयावह स्थिती आहे हो.
लक्ष्मीच नाही तर काय दगडाचे पुजन करणार?
शेतकरी तितुका एक एक!
फेसबुक पोस्ट
!!!! #विनोदाचावार_सोमवार !!!!
फेसबुकवरील तमाम फुसक्या फटाक्यांना, चकव्या चकऱ्यांना, फॅन्सी फुलझाड्यांना, विनाबारुदीच्या टिकल्यांना, बिनावातीच्या सुतळी बॉम्बाना, गगनभेदी रॉकेटांना आणि मिणमिणत्या आकाश कंदिलांना दीपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
© गंगाधर मुटे
शेतकरी तितुका एक एक!
फेसबुक लिंक
फेसबुक लिंक
शेतकरी तितुका एक एक!
फेसबुक लिंक
शेतकरी तितुका एक एक!
कविता रद्दबातल ठरून कालबाह्य व्हावी
सात वर्षांपूर्वी लिहिलेली हीच कविता दर दिवाळीला जशीच्या तशीच्या चालत असते. शब्दाचा एक बदल सुद्धा करण्याची गरज पडत नाही... शेतकऱ्यांच्या आयुष्यात लवकरात लवकर दिवाळी यावी आणि ही माझी कविता रद्दबातल ठरून कालबाह्य व्हावी, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना!
शेतकरी तितुका एक एक!
पाने