संमेलनातील कवीची निवड : कार्यपद्धती
कोणत्याही साहित्यिकाला साहित्यकृती सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळावे ही त्या साहित्यिकाची अपेक्षा अत्यंत रास्त आणि वाजवी अशीच आहे याबद्दल दुमत असल्याचे कारण नाही परंतु मराठी शेतकरी साहित्य संमेलनात कवी, गझलकाराची निवड करताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो, त्याविषयी थोडेसे...
१) कोणत्याही साहित्य संमेलनात फार तर ३०-४० कवींना संधी दिली जाऊ शकते परंतु सद्यस्थितीत मराठी भाषिक प्रदेशात कवींची संख्या प्रचंड आहे म्हणजे इतकी की साहित्य संमेलन अखिल भारतीय राज्यस्तरीय असले तरीसुद्धा त्या कवी संमेलनातील कविंचा कोटा पूर्ण करण्याकरिता एका वॉर्डातील कवी सुद्धा पुरेसे ठरतील. अशा स्थितीत कवींची निवड करणे अत्यंत अवघड होऊन जाते. स्वाभाविकपणे व्यासपीठ राज्यस्तरीय असल्याने आणि संमेलनही राज्यस्तरीय असल्याने त्यामध्ये सहभाग मिळावा अशी अपेक्षा असणाऱ्या साहित्यिकांची संख्याही खूप मोठी असते. अशा अवघड स्थितीत कवी-गजलकारांची निवड कशी करावी यासाठी शेतकरी साहित्य चळवळीने काही मोघम निकष तयार केलेले आहेत.
२) शेतीची दुर्दशा, शेतीमधील वास्तव आणि शेतीमधील समस्यांच्या सोडवणुकीचे पर्याय व मार्ग याविषयी किमान जाणीव असणारा साहित्यिकच त्याच्या साहित्यामध्ये योग्य तो परिणाम साधू शकतो असे शेतकरी साहित्य चळवळीला वाटते, त्यामुळे लेखन वास्तवाशी सुसंगत असावे अशी अपेक्षा असते.
३) कोणत्याही साहित्यिकाने व्यासपीठावर आपली कलाकृती सादर करण्याची मनीषा बाळगण्यापूर्वी किमान एक वेळा तरी मराठी शेतकरी साहित्य संमेलनात रसिक म्हणून यावे आणि मराठी शेतकरी साहित्य चळवळ काय आहे, तिची दिशा काय आहे, अपेक्षा काय आहे, कार्यपद्धती काय... आहे हे समजून घ्यावे अशी अपेक्षा असते. एकदा कोणताही साहित्यिक शेतकरी साहित्य चळवळीशी जुळला तर भविष्यात त्याला व्यासपीठावर संधी मिळणारच असते.
४) शेतीशी आणि शेतकरी साहित्य चळवळीशी साहित्यिक कटिबद्ध असावा, अशी अपेक्षा असते. कुठल्या ना कुठल्या माध्यमातून,कृतीतून, सहकार्यातून त्याने शेतकरी साहित्य चळवळीला फूल ना फुलाची पाकळी योगदान दिलेले असावे, अशी ही अपेक्षा असते.
५) शेतकरी साहित्य चळवळीच्या माध्यमातून वर्षभर अनेक उपक्रम राबविले जातात, त्यामध्ये सहभाग नोंदविणाराला झुकते माप दिले जाते.
६) सद्यस्थितीत शेतकरी साहित्य संमेलनाला ऐकवणाऱ्याची नव्हे तर ऐकणाऱ्याची म्हणजे रसिकांची प्रचंड उणीव भासत आहे. त्यामुळे कोणताही साहित्यिक आधी ऐकणारा म्हणजे रसिक असावा, त्यानंतर तो ऐकवणारा असावा... अशी अपेक्षा असते.
७) कवी संमेलन किंवा गजल मुशायऱ्यात भाग घेण्यासाठी नोंदणी केली जात नाही. साहित्य संमेलनात एक रसिक प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहण्यासाठी प्रतिनिधी नोंदणी केली जाते. मात्र कवी आणि गझलकार निवडताना या प्रतिनिधी नोंदणी केलेल्या प्रतिनिधी मधूनच कवी/गझलकारांची निवड केली जाते. जो उत्तम रसिक व विद्यार्थी असतो फक्त तोच शेतकरी साहित्य चळवळीचे दृष्टीने उत्तम साहित्यिक असतो., असे शेतकरी साहित्य चळवळीचे मत आहे.
८) सर्व जिल्ह्यांना/विभागांना तसेच महिलांना प्रतिनिधित्व करण्यासाठी योग्य संधी देण्याचा आमचा प्रयत्न असतो. सत्राची वेळ आणि सहभागी कलाकारांची संख्यामर्यादा लक्षात घेता नोंदणी केलेल्या सर्वांची निवड होणे अशक्य आहे. ज्यांची कवीसंमेलन/गझल मुशायरा यासाठी निवड झाली नाही त्यांनी रसिक म्हणून संमेलनाला उपस्थित असावे अशी आमची विनंती आहे. स्टेजवर संधी मिळणार असेल तरच मी येणार, रसिक म्हणून येणे माझे काम नव्हे, अशा स्वभावाच्या व्यक्तींना तसेच .मला व्यासपीठावर संधी मिळणार असेल तर मी प्रतिनिधी नोंदणी करणार नाहीतर प्रतिनिधी नोंदणी करणार नाही व संमेलनात येणार नाही अशा स्वभावाच्या व्यक्तींना आसपास सुद्धा फिरकू द्यायचे नाही हे शेतकरी साहित्य चळवळचे अधिकृत धोरण आहे. यानंतरही हाच निकष कायम असेल.
९) शेतकरी मराठी साहित्य संमेलनाचे स्वरूप आपापल्या कौशल्यगुणांचं, प्रतिभेचं प्रदर्शन मांडून वाहवा मिळवू पाहणाऱ्या हौशा-गौशा-नवश्यांचा जमाव एवढेच केवळ मर्यादित न राहता साहित्यिकांना कल्पनाविस्ताराठी बौद्धिक मेजवानी देणारे प्रशिक्षण शिबीर ठरावे आणि यातून लेखणीच्या माध्यमातून शेतीची दुर्दशा थांबवून शेतकर्याच्या आयुष्यात सुखाचे व सन्मानाचे दिवस खेचून आणण्याइतपत शक्तिशाली सृजनशील साहित्यिकांची नवी पिढी जन्माला यावी, अशी अपेक्षा आहे.
,
१०) ११ व्या अ. भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलनाविषयी बोलायचे झाले तर निवड प्रक्रिया पूर्णपणे आटोपली असून आता कुणालाही त्यात नव्याने समाविष्ट करून घेणे केवळ अशक्य आहे. त्यामुळे "मला संधी मिळेल का" अशी संबंधितांनी कृपया विचारणा करू नये. याउलट आमचा आग्रह आहे की त्यांनी संमेलनात एक गुणग्राहक रसिक म्हणून अवश्य उपस्थित रहावे आणि शेतकरी साहित्य चळवळीचे कामकाज समजून घ्यावे.
.
प्रतिनिधी सहभाग शुल्क : शुल्काची रक्कम इच्छेनुसार पण अनिवार्य
या.. संमेलनाला.... आपले स्वागत आहे!
- गंगाधर मुटे
संस्थापक अध्यक्ष
अ. भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ
प्रतिक्रिया
*प्रतिनिधी नोंदणी हाऊसफुल*
शेतकरी तितुका एक एक!