Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



शेती, शेतकरी आणि गझल - अ‍ॅग्रोवन

दि. १०/०५/२०१५ च्या अ‍ॅग्रोवनच्या अंकात श्री कमलाकर देसले यांची मुलाखत प्रकाशित झाली. त्या मुलाखतीतील काही मुख्य अंश...

"विषय वैविध्याचा विचार करता आजची गझल खूप दर्जेदार आहे. गंगाधर मुटे नावाचे विदर्भातील कवी गझल सारख्या विलक्षण काव्य प्रकारातून शेती , शेतकरी , त्यांचे प्रश्न , शेतकर्‍यांचे शोषण , शासकीय धोरण असे विषय सातत्याने लिहून गझल या प्रकाराची वेगळीच ओळख निर्माण करताहेत. फक्त शेती आणि शेतकरी हा विषय किती वेगळ्या प्रकारे गझलेतून मांडता येतो हे गंगाधर मुटे यांची गझल वाचल्यावर कळते."

- कमलाकर देसले
----------------------------------------------------
नव्या जगातला खरा कुबेर शेतकरी असायला हवा.

1) आपला लेखन प्रवास...

मी कुणब्याचा मुलगा . माझे वडील आत्माराम (बाबा) डोंगर देसले हे शेतकरी. झोडगे ता. मालेगाव ( नाशिक) हे आमचे गाव . आमच्याकडे चारपाच एकर शेती , आणि तीही कोरडवाहू . आम्ही ज्या गावात रहातो त्या भागाला ' माळमाथा ' असे म्हटले जाते.आमचे गाव उंचीवर म्हणजे माथ्यावर आहे. म्हणून माळमाथा . पावसाचे प्रमाण फार नाही. अधून-मधून दुष्काळ ठरलेला. माझ्या लहानपणी पडलेले दुष्काळ मला स्पष्ट आठवतात. पैकी सर्वात भयानक दुष्काळ बहात्तरचा . या काळात घरातील धान्य संपले होते. ज्वारी - बाजरी उसनवार मिळायची , पण देणार्‍याकडेच संपली म्हटल्यावर कसे मिळणार धन्य ? सरकार रेशन दुकानावर ' अडगर ' नावाची निकृष्ट लाल ज्वारी शेतकर्‍यांना पुरवत होते. बेचव अशी ती अडगरची भाकरी नको वाटायची , पण पोट भरण्यासाठी खावी लागायची. मध्येच कधी बाजरीची भाकर मिळाली की अमृत मिळाल्याचा आनंद व्हायचा. वडील शेतीसोबत शिलाइकाम करत. आई घरकाम आणि शेतात जायची . चार भाऊ दोन बहिणी असा मोठा परिवार .
श्रम हाच आई-वडिलांचा श्रीराम होता. बाबांना वाचायची खूप आवड होती.आई निरक्षर आहे , पण प्रतिभावंत आहे.जात्यावर पहाटे पहाटे खंडी-खंडी दळण दळतांना ती अहिराणी भाषेतल्या ओव्या गायची.

अस्तुरी जलम देव घालून चुकना
सकाय उठूनी बैल घानीले जुपना

स्त्रीच्या वेदनेचा उद्घोष करणार्‍या अशा अनेक अर्थपूर्ण आणि वाङयीन मूल्य असणार्‍या ओव्या ती गायची. ( असे काहीतरी आपण वाङ्ग्मयीन मूल्य असणारी कविता आपण गातो हे आईच्या गावीही नसायचे.) दुपारी जेव्हा ती दळायची तेव्हा आम्ही तिच्या मांडीवर डोके ठेवून पाहुडायचो. जात्याची लयबद्ध घरघर नि आईच्या गळ्यातून ओवी ऐकायचो . आईच्या ओव्यांची लय नकळत मनात , हदयात कशी झिरपली कळलेच नाही. १९८५ साली जेव्हा कविता सुचू लागली तेव्हा कळले की कवितेचा अनुग्रह आईकडून आपल्याला मिळाला आहे. आणि वाचनाचा अनुग्रह बाबांकडून .

नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयात दरवर्षी होणार्‍या साहित्यिक मेळाव्याला मी जावू लागलो. सटाण्याच्या साहित्यायन संस्थेच्या एक दिवशीय साहित्य समेलनाला मी अनेक वर्ष नियमितपणे जात आलो. या दोन संस्थांनी लिहिणारा म्हणून मला ओळख दिली. नाशिक मेळाव्यात कुसुमाग्रजांसारखा महाकवी सहजपणे समोर बसून आम्हा नव्यांच्या कविता ऐकायचे. शाबासकी द्यायचे . हे आठवले तरी खूप भरून येते. प्राचार्य म.सू.पाटील यांनी सटाण्याच्या समेलनात कविता ऐकल्यानंतर पाठीवरून हात फिरवून ' तू छान लिहितोस , पण छान लिहिण्याला शेवट नसतो . कवितेला जीवनाची साधना समजून लिही.' असे सांगून आजपर्यंत आणि इथून पुढे पुरेल इतके बळ दिले . मी लिहू शकतो हा विश्वास दिला . आणि मी अखंडपणे लिहिता राहिलो. चेतश्री प्रकाशनाचे वा. रा. .सोनार यांनी माझ्या ' ज्ञानिया तुझे पायी ' हा अभंगांचा संग्रह काढला. त्याला गो. नी. दांडेकरांनी आशीर्वाद लिहिलेत. अनुष्टुभ , कवितारती सारख्या दर्जेदार अंकातून कविता छापून आली. मला माझा सुर गवसत होता. कविवर्य खलील मोमीन यांचे खूप मोलाचे मार्गदर्शन मला कवितेच्या प्रवासात लाभले. डॉ. तुषार चांदवडकर यांच्या कुसुमाग्रज प्रकाशनातर्फे ' काळाचा जरासा घास ' हा गझल संग्रह प्रकाशित झाला. गझल नवाज भीमराव पांचाळे यांसी प्रस्तावना या संग्रहाला लाभली आहे. कवितेला जीवनदर्शनाची साधना समजून सतत लिहत आहे. तत्वज्ञान , संत साहित्य मला आवडते. वैचारिक गद्य मी सतत लिहत असतो.

2 ) मराठी कवितेची, गझलेची सद्यस्थिती, वाटचाल या विषयी काय सांगाल? आपले आवडते कवी, गझलकार यांच्या विषयी..

काळ ही सर्वात प्रवाही घटना आहे. काळासोबत सर्व काही बदलत असते. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. साहित्यालासुद्धा हा नियम लागू पडतो. प्राचीन साहित्य , मध्ययुगीन साहित्य आणि अर्वाचीन साहित्य यात कालौघात बदल होत गेले. संतांची कविता , पंतांची कविता , शाहीरांची कविता हे सगळे बदलाचे टप्पे आहेत . केशवसुतांनी आणि त्यांच्या समकालीन कवींनी कवितेला आधुनिक केले. विषय आणि अभिव्यक्ती या दोन्ही अंगाने कविता विकसित होत गेली. तीचे हे विकसित होणे आजही चालू आहे. विकासाच्या प्रक्रियेत नवे शिरते तसे सनातन असे चांगले कायम शिल्लक राहते.

कविता आजही मोठ्या प्रमाणात लिहिली जाते आहे. शिक्षणातून ( पाठ्यपुस्तकातून ) हळूहळू वृत्तकविता तिचे व्याकरण गायब होते आहे. ही फार नुकसानकारक गोष्ट आहे. पुढे पुढे पाठ्यपुस्तकातून छंदोबद्ध कविता तिचे व्याकरण जर शिकवले गेले नाही तर नव्या लिहिणार्‍यांना कवितेचे अंकुर कसे फुटतील ? स्वाभाविक आणि प्राकृतिक प्रेरणेने कवितेचे वृत्त , छंद जीवंत रहातीलच. छंदोबद्ध , वृत्तबद्ध कविता लिहिली जाईलच. पण तिचे प्रमाण कमी असेल . कवितेच्या सृजनशीलतेसाठीतरी पाठ्यपुस्तकातून छंद , वृत्त हद्दपार होवू नयेत .

अलीकडे मुक्तछंद या प्रकारात कविता लिहिण्याचे प्रमाण वाढले आहे. शिवाय दर्जेदार मुक्तछंद लिहिला जातो आहे. नव्या प्रतिमाविश्वासह नवे कवी सकस कविता लिहीत आहेत. मात्र दुर्बोधतेमुळे कवितेचा आस्वाद घेणेही कमी होतांना दिसते आहे. कविवर्य सुरेश भट यांनी खांद्यावर घेतलेली गझलेची पालखी मात्र अनेक समर्थ खांदे पुढे नेत आहेत. वेगळा विचार म्हणजे ' खयाल ' हा गझलेचा आत्मा असतो. शिवाय तो अपरिहार्यपणे तंत्रात अभिव्यक्त व्हावा लागतो. या दोनही निकषावर आजची गझल अतिशय दर्जेदार आहे. अवघ्या दोन ओळींच्या शेरात ग्रंथभर आशयाचा स्फोट करण्याची क्षमता गझलेच्या सुट्या शेरात असते. विषय वैविध्याचा विचार करता आजची गझल खूप दर्जेदार आहे. गंगाधर मुटे नावाचे विदर्भातील कवी गझल सारख्या विलक्षण काव्य प्रकारातून शेती , शेतकरी , त्यांचे प्रश्न , शेतकर्‍यांचे शोषण , शासकीय धोरण असे विषय सातत्याने लिहून गझल या प्रकाराची वेगळीच ओळख निर्माण करताहेत. फक्त शेती आणि शेतकरी हा विषय किती वेगळ्या प्रकारे गझलेतून मांडता येतो हे गंगाधर मुटे यांची गझल वाचल्यावर कळते.

माझे आवडते कवी खूप आहेत . ज्यांच्या कवितेत माउली ज्ञानोबांसारखे ' विश्वाचे आर्त ' आहे . आणि ज्यांच्या कवितेत तुकोबांच्या अभंगातील ' बुडता हे जन न देखवे डोळा ' नंतर येणारा खराखुरा ' कळवळा ' आहे असे सर्व कवी मला आवडतात. रमेश इंगळे उत्रादकर हे एक प्रातींनिधिक नाव मी आदराने घेईन . कवी खलील मोमीन , डॉ. श्रीकृष्ण राऊत , नितीन देशमुख , सतीश दराडे , प्रशांत वैद्य , किशोर मुगल ,हेमंत जाधव , वीरेंद्र बेडसे , रावसाहेब कुवर , मारोती मानेमोड , वैभव कुलकर्णी , रूपेश देशमुख , अमित वाघ , प्रशांत पोरे, नि:शब्द देव , शुभानन चिंचकर , गोंविंद नाईक , जनार्दन म्हात्रे ,योगिता पाटील , पूजा फाटे , पूजा भडांगे , शर्वरी मुनीश्वर , राजीव मासरूळकर , गौरवकुमार आठवले , लक्ष्मण जेवणे , प्रफुल्ल भुजाडे , विद्यानंद हाडके, नितीन भट , प्रकाश मोरे , अरुण सोनवणे असे अनेक उत्तमोत्तम गझल लिहिणारे हात गझलेचे उज्ज्वल भविष्य घडवित आहेत.

3) सद्यस्थितीत शेतीसमोर, ग्रामीण भागा समोर कोणते प्रश्न उभे राहिलेत असे आपल्याला वाटते ?

सातत्याने येणारे दुष्काळ , अवकाळी पाऊस , शेतकर्‍यांच्या उभ्या पीकाचे होणारे लाखोंचे नुकसान, निसर्गातील नुकसानकारक बदलांचे वेध न घेवू शकणारी असमर्थ यंत्रणा , शेतीमालाला न मिळणारा हमी भाव , उपजावू शेतीचे होणारे बीनशेतीकरण , वसाहतीकरण, शेती आणि शेतकर्‍याच्या उरावर बसलेला भूमी अधिग्रहण कायदा , शेतकर्‍यांच्या आत्महत्या अशा कितीतरी समस्या शेतीसमोर आणि ग्रामीण भागासमोर आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्याच्या साठीनंतरही शेती आणि शेतकर्‍यांच्या संदर्भात हे प्रश्न असावेत याहून स्वातंत्र्याची चेष्टा नाही.

4 ) प्रश्नांवर कोणते उपाय आपण सुचवाल ?

शिक्षण आणि जाणीव जागृती झाल्याशिवाय प्रश्न सुटत नाहीत. " सैद्धांतिक ज्ञान हाच मुक्तिरथाचा पाया आहे . " असे कार्ल मार्क्स म्हणतो. कुठलीही गोष्ट जेव्हा स्वच्छपणे कळलेली असते तेव्हा त्यामागील भय संपते. शेतकर्‍यांच्या बाबतीत सांगायचे तर त्याच्यासाठी सर्वच गोष्टी अनिश्चित आहेत. पावसाची , बाजारभावाची, निसर्गाची कशाकशाची खात्री नाही. काहीही होवू शकते. या अनिश्चिततेच्या सावटाखाली शेतकरी सतत वावरत असतो. कवी ग्रेस म्हणतात ते ' भय इथले संपत नाही ' या कवितेचा आशय शेतकर्‍यांना अधिक तीव्रतेने लागू पडतो. भयाच्या बुडाशी फक्त अज्ञान आहे. अज्ञान आहे याची जाणीव सुद्धा खूप शुभ घटना आहे. त्यामुळे त्या अंधारातून प्रकाशाकडे जावेसे वाटण्याची इच्छा तरी होईल. शेतीचाच माल जेव्हा व्यापार्‍याच्या हातात जातो तेव्हा त्याचे मूल्य कोसळत नाही. कारण व्यापार्‍याला बाजाराचे नियम कळतात. त्याच्याकडे माल सांभाळणारे प्रचंड स्टोरेज असते. बाजाराचे नियम कळणे . हवा तसा भाव मिळेपर्यंत माल सांभाळण्याचे तंत्र हातात असणे , योग्य वेळी बाजाराचा अंदाज कळणे , त्यानुसार माल मोकळा करणे किंवा दाबून ठेवणे हे सर्व बाजाराचे नियम शेतकरी ज्या दिवशी समजून घेईन म्हणजे त्याला आपल्या क्षेत्रातले वितरण तंत्र कळेल . त्यादिवशी तो स्वतंत्र आणि स्वावलंबी होईल. आस्मानी आणि सुलतानी दोनही सत्ता शेतकर्‍याच्या ताब्यात नाहीत , पण शेती तंत्राविषयी नवी ऊपयुक्त माहिती , नवी बाजार नीती , व्यापारी मनोवृत्ती थोडीतरी कळायला हवी शेतकर्‍याला . त्याने हे सगळे जाणून घ्यावे. अन्न धान्याची निर्मिती तो मुबलक करतो खरा , पण उपवाशी तोच रहातो . हे भयंकर नाही का ? शेतकरी हा इथला ईश्वर आहे. त्याला शेतमाल निर्माण करता येतो , तसा सांभाळता यायला हवा. आणि योग्य वेळी तो वितरीत करता यायला हवा. यासाठी शेतकरी नव्या ज्ञानाने समृद्ध हवा. शेतीविषयक ज्ञानानेच शेतकरी स्वतंत्र होईल आणि समस्यामुक्त होईल. ' सत्तेला विठ्ठल समजून त्याने फक्त एक आषाढी वारी मंत्रालयावर न्यावी .' असे आमचे एक कथा लेखक मित्र मनोहर विभांडीक सांगतात . त्यांच्या या विचारात तथ्य आहे. भोळ्या शेतकर्‍याच्या वारीची दिशा वळायला हवी. पंढरपूरचा नाही तर सत्तेचा विठ्ठल शेतकर्‍यांचे कल्याण करू शकतो. सत्तेच्या छाताडावर शेतकरी नावाच्या नव्या भृगुने लाथ मारायला हवी. माझ्या एका गझलेतला एक शेर आहे.

सत्तेच्या छाताडावर हे कुणीच मारत नाही ;
गळफास तुझ्या घेण्याने रे कुणी शहारत नाही..

5) सद्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत तरुण शेतकऱ्यांना काय सल्ला दयाल?

महात्मा फुले म्हणतात तेच खरे आहे. ' विद्येविणा मती गेली '. नवे ज्ञान , नवे तंत्र , नवी बाजारनीती याविषयी जर तरुण शेतकरी जागरूक झाला तरी बरेच प्रश्न कमी व्हायला मदत होईल. हार न मानता आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जायला हवे. व्यसन आणि आत्महत्या यापासून सांभाळायला हवे . निवडणुकीच्या राजकरणात सत्तेची निवड डोळसपणे करावी . नव्या जगातला खरा कुबेर शेतकरी असायला हवा. या संदर्भात माझी एक शेतकर्‍यांच्या संदर्भातील गझल अशी आहे.

नको तुकोबा शेत सोडुनी निघून जावुस ;
तुझी पंढरी जळतांना तू नकोच पाहुस ..

तुझ्या मळ्याचा असा उन्हाळा बघता बघता ;
चिल्यापिल्यांच्या डोळ्यांमधला रडेल पाउस ..

भले करावे सत्तेने हा नियम संपला ;
म्हणून नाही भाव उसाला जळला कापुस ...

बिना दुधाचे थाने हे तुज कळेल केव्हा ?
तू सत्तेच्या वांझ म्हशीला नकोच पाळुस ..

कुरूप काळ्या समर्पितेशी लाव लग्न , पण -
नको देखण्या प्रश्नांना तू कुंकू लावुस ...

- कमलाकर आत्माराम देसले
झोडगे ता. मालेगाव ( नाशिक)
----------------------------------------------------

Share