कवितेची व्याख्या - कवितेची बाराखडी
जगाच्या पाठीवर सर्व चांगलेच असते. अर्थात सर्व कविताही चांगल्याच असतात. तरी पण चांगल्या कवितेला आणखी चांगले करणे मात्र सहज शक्य असते. चांगल्याला आणखी चांगले करायचे असेल तर ते मात्र सहज शक्य नसते. त्यासाठी परिश्रमाची आवश्यकता असते आणि परिश्रम घ्यायचे असेल तर त्यासाठी प्राथमिक माहितीचा स्रोत उपलब्ध असावा लागतो.
कविवर्य सुरेश भटांनी गजलेची बाराखडी लिहिली आणि महाराष्ट्रभर हजारो मराठी गझलकार उदयास आले. गजलेच्या तंत्र आणि मंत्रावर शास्त्रशुद्ध अधिकारवाणीने भाष्य करू शकेल, अशा शेकडो मार्गदर्शकांची फळी तयार झाली. कवितेच्या बाबतीत मात्र अशी कवितेची बाराखडी वगैरे उपलब्ध असल्याचे माझ्या अजून निदर्शनास आलेले नाही.
शेती साहित्य कसदार, रसदार आणि आणखी दर्जेदार निर्माण होण्यासाठी अशा प्राथमिक समकक्ष बाराखडीची गरज आहे, असे माझे मत झालेले आहे. म्हणून कविता कशी असावी, कविता कशी नसावी, कविता कशी लिहावी, कवितेची रचना, प्रारूप, आशय वगैरे कसा असावा, या संदर्भात शेती सारस्वतांचा एल्गार या व्हाट्सअप ग्रुप वर चर्चात्मक ऊहापोह करण्याचे ठरले आहे.
पहिल्या टप्प्यात कवितेच्या रचनात्मक अंगाच्या दृष्टीने आजवर जे काही लेखन झाले, स्फुट लेखन झाले, एकच दुकट वाक्यात सुद्धा काही मतप्रदर्शन झाले असेल तर त्याचा शोध घेऊन ते या ग्रुपवर त्याला जमेल तसे पोस्ट करावे आणि त्यावर चर्चा करावी, अशी सर्वांना आग्रहाची विनंती आहे.
पुरेशी माहिती उपलब्ध झाल्यानंतर त्याचा या ग्रुपवरिल सभासदांना उपयोग तर होईलच पण त्यासोबतच शक्य झाले तर सर्व माहिती आपण एखाद्या पुस्तकाच्या स्वरूपात सुद्धा कदाचित प्रकाशित करू शकू.
आपला स्नेहांकित
- गंगाधर मुटे
------------
1) कवितेची व्याख्या - संकलित
कविता, साहित्य जे अर्थ, ध्वनी आणि लय यासाठी निवडलेल्या आणि व्यवस्थित केलेल्या भाषेद्वारे अनुभवाची केंद्रित कल्पनाशील जाणीव किंवा विशिष्ट भावनिक प्रतिसाद जागृत करते.
2) कवितेची व्याख्या - संकलित
कविता हा साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे. कविता (मुख्यतः) छंदोबद्ध व रसबद्ध असतात. कवितेतून जीवन कळते, समजते व उमगते. कविता, ओव्या, अभंग किंवा श्लोक हे साहित्याचे माध्यम आहे. त्यामध्ये मनाच्या भावना, वस्तुस्थिती किंवा मनःस्थिती व्यक्त करता येते. भारतात कवितांचा इतिहास आणि कवितांचे तत्त्वज्ञान फार जुने आहे. कविता शब्दांनी खूप समृद्ध असतात.
3) कवितेची व्याख्या - संकलित
कवितेची व्याख्या करणे हे सौंदर्याच्या अमूर्त साराला पकडण्यासारखे आहे. ही साहित्याची एक शैली आहे जी पारंपारिक सीमांना आव्हान देते , ज्यामध्ये असंख्य शैली, रूपे आणि विषयगत शोधांचा समावेश आहे. कविता सरळ गद्याच्या मर्यादा ओलांडते, शब्द, लय आणि प्रतिमा एकत्र करून भावना, अनुभव आणि दृष्टिकोनांची एक छोटीशी रचना तयार करते.
=`=`=`=`=`=`=