नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती :संभ्रावस्था आणि वास्तविकता
डॉ.आदिनाथ ताकटे, मृद पदार्थविज्ञानवेत्ता
विभागीय कृषि संशोधन केंद्र,सोलापूर
सध्या सेंद्रिय शेती हा परवलीचा शब्द झाला आहे. वरिष्ट पातळीवरील शासकीय अधिकारया पासून ते खालच्या कृषि सहाय्यकापर्यत आणि शेतकरी सुद्धा सेंद्रिय शेती विषयी सतत बोलताना दिसतात,तसेच काही बिगर कृषि पदवीधर ज्यांना शेती विषयी तांत्रिक माहिती नाही,ते सुद्धा सेंद्रिय शेतीवर व्याख्याने देऊ लागले आहेत.ही सर्व मंडळी सेंद्रिय शेतीच्या एकाच बाजूने बोलतात,परंतु त्याच्या मर्यादा किंवा परिणाम याविषयी मात्र खोलात शिरून बोलताना दिसत नाही,तसेच ज्याला ते सेंद्रिय शेती,नैसर्गिक शेती म्हणतात,ती शास्त्रशुध्द पद्धतीची नसते.त्यामुळे अशिक्षित बळीराजा मात्र पुरता गोंधळा आहे आणि अनावधानाने तो या सेंद्रिय शेती प्रचारकर्त्याच्या मागे चालला आहे.हे चित्र जर वेळीच बदलले नाही तर भविष्यात गंभीर दुष्परिणामांना तोंड द्यावे लागेल याची वेळीच दखल घेणे गरजेचे आहे.तेव्हा जैविक तंत्रज्ञान आणि रासायनिक खतांचा वापर यातील समज–गैरसमज आपण दूर करून घेणार आहोत.
सेंद्रिय शेती ही भारतीय राज्यकर्त्यांनी आवडती संकल्पना,त्याला सेंद्रिय प्रचारकांनी अविरतपणे मोहीम राबवून खत पाणी घातले आणि शेतकऱ्यांमध्ये संभ्रवस्था निर्माण केली. एकूण जागतिक कृषी क्षेत्राच्या ३-४ टक्क्यापेक्षा जास्त क्षेत्र सेंद्रिय शेतीखाली नाही आणि आधुनिक शेतीच्या सर्व रोगांवर एकच इलाज म्हणजे सेंद्रिय शेती अशी वल्गना करण्यात येत आहे. २०११ मध्ये ३.८ दशलक्ष टन सेंद्रीय उत्पादन झाले होते त्यात घसरण होऊन २०१४ मध्ये १.२४ दशलक्ष टनावर आली..या उत्पादनासाठी ग्राहक ३०-४० टक्के अधिकचे पैसे मोजायला तयार असले तरी बाजारपेठेमध्ये ती कोठेतरी कोपर्यासतच दिसून येतात.त्यामुळे सेंद्रिय शेती मध्ये देश गतीने पुढे घेऊन जाण्याअगोदर व खर्चिक चुका करण्याअगोदर सेंद्रिय शेतीच उद्देश व शास्त्रीय विश्लेषण करण्याची मोठी गरज आहे.
आपल्याला माहीतच आहे कि भारतीय शेतीची परंपरा ही फार जुनी आहे.हे कृषि पाराशर, वृक्षसंहिता, अथर्ववेद इत्यादी प्राचीन ग्रंथावरून स्पष्ट होते.प्रचीन काळापासून ते रासायनिक खतांचा वापर सुरु होई पर्यत,जनावरांच्या शेणापासून तयार झालेले शेणखत,शेतीतील पिकांचे उरलेले अवशेष तसेच विविध प्रकारच्या पेंडी यांचा वापर करून भारतीय शेतकरी पारंपारिक पद्धतीने विविध अन्नधान्याचे उत्पादन घेत असे.
रासायनिक खतांचा १९६० सालापासून भारतीय शेतीत वापर सुरु झाला,त्यानंतर अधिक उत्पादन देणाऱ्या अन्नधान्याच्या संकरित जातींच्या शोधामुळे खऱ्या अर्थाने हरितक्रांतीची बीजे रोवली गेली आणि भारत देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला.या मध्ये डॉ.एम.एस. स्वामीनाथन यांचा फार महत्वपूर्ण सहभाग होता.
शुध्द सेंद्रिय शेती हा शब्द प्रयोग आकर्षक आहे.परंतु व्यवहारात असलेल्या शेतकर्यांना किफायतशीर होण्याइतके अधिक उत्पादन व गुणवत्तापूर्ण शेतीमाल काढण्यासाठी काळाची पावले ओळखून केवळ सेंद्रीय शेतीच्या मागे न लागता सेंद्रिय,जैविक व रासायनिक खतांचा संतुलित प्रमाणातच वापर केला पाहिजेत.त्यासाठी माती –पाणी परिक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे.
रासायनिक खतांचा वापर आणि संकरित जातीमुळे पिकांचे हेक्टरी उत्पादन वाढले.त्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांची आर्थिक बाजू बळकट होत गेली आणि अधिक उत्पादनाच्या हव्यासापोटी रासायनिक खतांचा भरमसाठ वापर शेतीत होऊ लागला आणि त्यातच वाढलेल्या सिंचन सुविधा यामुळे पिकांना भरपूर पाणी देण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला.दरम्यान भरपूर रासायनिक खतांचा वापर आणि भरपूर पाणी म्हणजे भरपूर उत्पादन असा गोड गैरसमज शेतकर्या मध्ये पसरू लागला.सेंद्रिय आणि जैविक खतांच्या वापराकडे हळू हळू दुर्लक्ष होत गेले आणि तिथेच शेतकरयानच्या नष्टचर्याला सुरुवात झाली.जमिनी नापीक आणि क्षारपड होऊ लागल्या,अर्थातच जमिनीची उत्पादनक्षमता घटल्यामुळे पिकांचे हेक्टरी उत्पादन घटू लागले.आज उस या नगदी पिकांचे महाराष्ट्रातील हेक्टरी उत्पादन ७० ते ८० टनापासून २० ते २५ टना पर्यंत खाली घसरले आहे.सिंचना खालील लाखो हेक्टर जमिनी या खारवट व चोपण झाल्या आहेत.या सर्वाच्या एकत्रित परिणामामुळे आज शेती फायदेशीर राहिलेली नाही आणि दिवसेंदिवस शेती बद्दलची आत्मीयता नष्ट होत चाललेली आहे.
शेतकरयांच्या मनामध्ये सेंद्रिय शेती, रासायनिक शेती या बद्दल बरीच संभ्रमावस्था आहे यामध्ये रासायनिक खतांचा वापर न करणे म्हणजे सेंद्रिय शेती.सेंद्रिय पदार्थामुळे प्रदूषण होत नाही.सेंद्रिय पदार्थामुळे पिकांची प्रत सुधारते.सेंद्रिय पदार्थामुळे कीड/ रोग येत नाही.सेंद्रिय शेतीमुळे खर्चाची बचत होते.रासायनिक खताने जमिनी खराब होतात आणि सेंद्रिय खताने सुधारतात.सेंद्रिय खते पिकाला लागणारी सर्व अन्नद्रव्ये पुरवू शकतात.सेंद्रिय पदार्थामुळे जमिनी दिवसेंदिवस सुधारत जातात.सेंद्रिय पदार्थांचा अमर्याद वापर केला तरी चालतो.अशा प्रकारचे अनेक समज–गैरसमज शेतकार्यांमध्ये आहेत.हे समज–गैरसमज दूर करण्याचा व सेंद्रिय शेतीची वास्तविकता सांगण्याचा प्रयत्न सदरील लेखात केला आहे.
• रासायनिक खतांचा वापर न करणे म्हणजे सेंद्रिय शेती.
फक्त रासायनिक खतांचा वापर न करणे म्हणजे सेंद्रिय शेती असा शेतकार्यांमध्ये गैरसमज आहे.सेंद्रीय शेती करणारे काही लोक रासायनिक खते न वापरता फक्त सेंद्रीय खते वापरतात.परंतु रोग/कीड नियंत्रणासाठी मात्र ते रासायनिक कीटकनाशके/बुरशीनाशके यांचा वापर करतात.रासायनिक खतांपेक्षा कीटकनाशके/बुरशीनाशके,तणनाशके इत्यादी अधिक घातक असतात.शेतकरी बंधूनो,एक लक्षात घ्या,रासायनिक खते जमिनीत टाकल्यावर त्याचे शेवटी सेंद्रिय पदार्थातच रूपांतर होत असते. उदा.युरिया खतामधून नत्र मिळतो.नत्र वनस्पतीने शोषल्यावर त्याचे अमिनो आम्ल आणि नंतर प्रथिनांमध्ये रूपांतर होते. तसेच स्फुरद आणि पालाश हे सुद्धा वनस्पतीने शोषून घेतल्यावर त्याचे वाढ वर्धके आणि संप्रेरके यात रूपांतर होते आणि ही सर्व सेंद्रिय पदार्थ आहेत.
•सेंद्रिय पदार्थामुळे प्रदूषण होत नाही.
सेंद्रिय पदार्थामुळे प्रदूषण होत नाही असा गोड गैरसमज शेतकरयानमध्ये आहे.शेतकरी बंधुनो,सेंद्रिय पदार्थ कुजत असताना कार्बन मोनाक्साईड,सल्फर डाय आँक्साईड या सारखे विषारी वायू बाहेर पडतात.तसेच सेंद्रिय पदार्थ जास्त प्रमाणात वापरल्यास विहिरी,नदी यांचे पाणी रंगीत दिसते.त्याला विशिष्ट प्रकारचा वास येतो.अशा प्रकारे सेंद्रिय पदार्थांच्या अमर्याद वापरामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होऊ शकते,त्यामुळे सेंद्रिय पदार्थामुळे प्रदूषण होत नाही हा सुद्धा गैरसमज आहे.
•सेंद्रिय पदार्थामुळे पिकांची प्रत सुधारते.
सेंद्रिय पदार्थामुळे पिकांची प्रत सुधारते हे तत्त्वतः सर्वच बाबतीत खरे नाही.सेंद्रिय उसापासून गुळ तयार केला तर तो पातळ होतो.त्यामध्ये स्टार्च,गम,मेण यासारखे सेंद्रिय पदार्थ जास्त येतात,त्यामुळे त्याची प्रत बिघडते.रासायनिक खते दिलेल्या उसापासून साखर तयार केली किंवा सेंद्रिय खते दिलेल्या उसापासून साखर तयार केली तरी साखरेतील मूळ घटकात काहीही फरक पडत नाही हेच दिसते.उलट सेंद्रिय उसापासून साखर तयार केली असता त्यात अशुद्ध पदार्थाचे प्रमाण जास्त येते आणि साखर शुध्द करण्यासाठी साखर कारखान्यात मोठ्या प्रमाणावर गंधक हे रसायन वापरावे लागते.त्यामुळे सेंद्रिय उसापासून साखर तयार केली तर त्यात गंधकाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढते.अशा प्रकारे सेंद्रिय साखरेचा उद्देश मात्र सफल होत नाही.म्हणजेच सेंद्रिय पदार्थामुळे सर्वच उत्पादनाची प्रतवारी सुधारते असे म्हणणे चुकीचे ठरते.
•सेंद्रिय पदार्थामुळे कीड/ रोग येत नाही.
सेंद्रिय पदार्थामुळे कीड/ रोग येत नाही असा एक गैरसमज शेतकरयानमध्ये आहे. शेतकरी बंधुनो सेंद्रिय पदार्थामुळे पिकात अंशत: प्रतिकार शक्ती नक्कीच येते यात काहीही दुमत नाही,परंतु सेंद्रिय पदार्थांच्या अतिवापरामुळे किडींचा प्रादुर्भाव वाढल्याचीच उदाहरणे आहेत.सेंद्रिय पदार्थाच्या अमर्याद वापरामुळे सुत्रकृमिंचा प्रादुर्भाव वाढतो, तसेच जमिनीतील वाळवी आणि हुमणी यासारख्या किडींचा सुद्धा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढतो.म्हणूनच सेंद्रिय पदार्थामुळे कीड/ रोग येतच नाही असे म्हणणे संयुक्तिक वाटत नाही.
•सेंद्रिय शेती म्हणजे झिरो बजेट शेती
सेंद्रिय शेतीचे काही प्रचारक मंडळी सेंद्रिय शेती/नैसर्गिक शेती, झीरो बजेट शेती असे म्हणतात,परंतु सेंद्रिय शेतीची संकल्पना त्यांना पूर्णपणे अवगत असल्याचे दिसत नाही.सेंद्रिय खतांमध्ये अन्नद्रव्यांचे प्रमाण हे फारच कमी असल्याने त्यांची गरज भागविण्यासाठी ते मोठ्या प्रमाणावर वापरावी लागतात.उदाहरण द्यावयाचे झाल्यास सुरु उसासाठी को.८६०३२ या जातीसाठी शिफारशीत मात्रा ३००:१४०:१४० नत्र:स्फुरद:पालाश किलो प्रति हेक्टरी आहे.म्हणजेच एवढी अन्नद्रव्ये मिळतील इतक्या मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय खत वापरणे गरजेचे आहे.या सर्वाचा खर्च तसेच वाहतूक खर्च हा रासायनिक खतांपेक्षा जास्त होतो,त्यामुळे सेंद्रिय शेतीला झीरो बजेट शेती म्हणणे योग्य ठरणार नाही.
•रासायनिक खताने जमिनी खराब होतात आणि सेंद्रिय खताने सुधारतात.
सेंद्रिय खताने जमिनी सुधारतात यात काहीही दुमत नाही, परंतु रासायनिक खताने जमिनी खराब होतात यात तथ्य नाही.कारण रासायनिक खतात असे काय आहे,कि त्यामुळे जमिनी खराब होतात? युरीयामध्ये ४६% नत्र असते आणि उरलेला ५४% कार्बन डायआँक्साईड असतो.सुपर फॉस्फेट मध्ये १६% स्फुरद, १२% गंधक,२१% कॅल्शियम आणि फोस्फोरिक आम्ल असते.यातील गंधक आणि फोस्फोरिक आम्ल क्षारांचे विघटन करण्यास उपयोगी पडते.त्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो आणि जमीन मऊ बनते.म्युरेट ऑफ पोटँश(एम ओ पी )यात ६०% पालाश आणि ४०% क्लोराईडस् असतात.क्लोराईडस् पाण्यात विरघळून निचरयावाटे बाहेर जातात त्यामुळे त्याचा जमिनीवर काहीही दुष्परिणाम होत नाही.अशाप्रकारे रासायनिक खतांमुळे जमिनी खराब होतात हे म्हणणे योग्य होणार नाही.या सर्व बाबींचा विचार करता,जमिनी खराब होण्यासाठी रासायनिक खतांना दोष देणे योग्य नाही. रासायनिक खतांच्या असंतुलित वापरामुळे पीक उत्पादनावर परिणाम होऊ शकतो,परंतु रासायनिक खतांमुळे जमिनी खराब होतात असे म्हणणे योग्य नाही.
•सेंद्रिय पदार्थांचा अमर्याद वापर केला तरी चालतो
सेंद्रिय खतांमध्ये अन्नद्रव्यांचे प्रमाण हे फारच कमी असते.सूक्ष्म अन्नद्रव्ये सुद्धा अतिशय कमी प्रमाणात असतात,त्यामुळे पिकाला लागणारी सर्व अन्नद्रव्ये ती पुरवू शकतील असे नाही.सेंद्रिय पदार्थाचा अमर्याद वापर केला तर तांबे आणि मँग्नीज सारखी अन्नद्रव्ये जमिनीत मुबलक प्रमाणात असूनही पिकाला उपलब्ध होत नाहीत,त्यामुळे त्याची कमतरता पिकाला जाणवते.
•सेंद्रिय पदार्थामुळे जमिनी दिवसेंदिवस सुधारत जातात
सेंद्रीय पदार्थामुळे जमिनी दिवसेदिवस सुधारतात असा एक गैरसमज शेतकरयामध्ये आहे,शेतकरी बंधुनो एक लक्षात घ्या,आपल्याकडील तापमान जास्त असल्याने सेंद्रिय पदार्थांचे विघटन फार जलद गतीने होते.त्यामुळे ती जमिनीत जास्त टिकून राहत नाहीत तसेच पिकाने शोषून घेतलेल्या अन्नद्रव्यांची भरपाई न केल्यास जमिनीची सुपिकता कमी कमी होत जाते.त्यामुळे योग्य प्रमाणात आणि योग्य प्रकारची खते वापरली तरच जमिनीच्या सुपिकतेत सुधारणा होईल आणि उत्पादकता टिकून राहील.
सेंद्रिय शेतीची वास्तविकता
सेंद्रिय माल पिकविणाऱ्या शेतकरयानां खात्रीची बाजारपेठ मिळत नाही,त्यामुळे त्यांच्या वाढीला मर्यादा आहेत.शहरी बाजारपेठेपुरती सेंद्रिय शेतमालाची मागणी,केवळ उच्चभ्रू, जास्त उत्पन्न गटातील लोकांपुरतीच मर्यादित झालेली दिसते.शहरी बाजारपेठेत जितक्या प्रमाणात आणि ज्या सात्यत्त्याने सेंद्रिय मालाचा पुरवठा व्हायला हवा त्यात सध्या अनेक मर्यादा आहेत. भारतात २०११ मध्ये ३०८ दशलक्ष सेंद्रिय मालाचे उत्पादन झाले होते.त्यात २०१४ मध्ये घसरण होऊन ते १.२४ दशलक्ष टनावर आले आहे.
भारता मध्ये सेंद्रिय मालाबाबतीत लोकांच्या मनात शेतीमालाच्या उत्पादनाच्या वेस्टनावर सेंद्रिय शेतीचे लेबल लावलेले असते.परंतु त्यातील ९० टक्के उत्पादने ही रसायनाचा वापर करून घेतलेली असतात. बाजारपेठेचे सर्वेक्षण केले असता असे दिसून येते कि सेंद्रिय उत्पादने म्हणून विकला जाणारा शेतमाल ३०-४० टक्के रसायनांचा वापर करून घेतलेली असतात, परंतु ही बाब झाकून ठेवली जाते.
आयएआरआय ने केलेल्या अभ्यासामध्ये महत्वपूर्ण निरीक्षणे सेंद्रिय शेतमालाबाबतीत नोंदविली गेली.दिल्लीच्या मार्केट मध्ये सेंद्रिय नावाने विकल्या जाणाऱ्या उत्पादनामध्ये रासायनिक अवशेष दिसून आले आहेत आणि पारंपारिकरित्या घेतलेल्या उत्पादनामध्ये तुलनेने कमी अवशेष दिसून आले आहेत. खते व शेती निविष्टा समुहाच्या भारतीय संघाने असे दाखवून दिले आहेत कि, शासनाने सेंद्रिय शेतीला दिलेले रु.२५००० कोटीचे अनुदान वाया गेलेले आहे,कारण सेंद्रिय शेतीचे चुकीचे दावे करण्यात आलेले आहेत.
प्रक्रिया न करता पशुजन्य खताचा वापर सेंद्रिय शेतीमध्ये केल्यामुळे जीवाणूंचा संसर्ग होतो.अमेरिकेतील रोग नियंत्रण व प्रतिबंधक उपाय केंद्राने केलेल्या अभ्यासानुसार मुक्त कोबडी संगोपनामध्ये बंदिस्त कुक्कुट पालनापेक्षा ८ टक्के अधिक सॅलमोनेचा प्रादुर्भाव दिसून आला
नैसगिक अन्न व सेंद्रिय अन्नाचे उत्साही प्रचारक अपाश्चरीकृत दुध पिण्याबद्दल जगभर मोठा प्रचार करत आहेत,परंतु यातून घातक जीवाणूजन्य रोग पसरण्याची शक्यता संभवते.अमेरिकेतील अनेक राज्यातील तज्ञ या पद्धतीला मोठ्या प्रमाणात नियंत्रित करत आहेत. अचानक येणारी आपत्ती टाळण्यासाठी यापासून भारताने धडा घ्यावयास हवा.
मॅकगील विद्यापीठ व मिनिसोटा विद्यापीठाने २०१२ मध्ये सयुंक्तरित्या केलेल्या ३४ पिकांवरील अभ्यासात,असेंद्रिय पिंकापेक्षा सेंद्रिय पिकांच्या उत्पादनात आमूलाग्र घसरण झाल्याचे दिसून आले आहे. विशेषतः शेतपिकांमध्ये महत्वाच्या अन्नद्रव्याची कमतरता जाणवल्याने उत्पादनामध्ये २५ टक्के घट झाल्याचे निदर्शनास आले आहे.
रासायनिक शेतीचे दुष्परिणाम :
या शेती प्रकारामध्ये पिकांची खतमात्रा हि पूर्णपणे रासायनिक खतातूनच दिली जाते,यात कोणत्याही प्रकारचे सेंद्रिय खत वापरले जात नाही.रोग आणि कीड नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशके आणि बुरशीनाशके यांचाच वापर केला जातो तसेच तण नियंत्रणासाठी सुद्धा रासायनिक तणनाशकांचाच वापर केला जातो. रासायनिक खते हि पिकाला वापरल्यास लवकर उपलब्ध होतात. पिकाला लागणारी सर्वच प्रमुख, दुय्यम आणि सुक्ष्मअन्नद्रव्ये आपण रासायनिक खतामधून देऊ शकतो.त्यामुळे पिकांची उगवण चांगली होते,नंतरची वाढ हि जोमदार होते आणि भरघोस उत्पादन मिळते.
या पद्धतीत सेंद्रिय पदार्थांचा वापर करत नसल्याने जमिनीतील सुक्ष्म जीवाणूंची संख्या मात्र कमी होते.जमिनीत रासायनिक खते टाकल्यावर त्याचे विघटन करून पिकाला उपलब्ध करून देण्याचे काम जमिनीतील सुक्ष्मजीवाणू करत असतात.त्यांचीच संख्या कमी झाल्याने /कार्यक्षमता मंदावल्याने काही कालावधीनंतर रासायनिक खते भरपूर टाकूनही पिके त्याला प्रतिसाद देत नाहीत. तसेच सेंद्रिय पदार्थांच्या अभावी जमिनीच्या भैातिक गुणधर्मावर दिवसेंदिवस विपरीत परिणाम होतो आणि जमिनीची उत्पादन क्षमता दिवसेंदिवस कमी होत जाते. अशा प्रकारे रासायनिक शेतीत सुरवातीला जरी प्रचंड उत्पादकता मिळत असली तरी जमिनीची सुपिकता आणि उत्पादकता मात्र टिकून राहत नाही म्हणूनच रासायनिक शेती करणे धोक्याचे आहे.
आजतागायत कोणत्याही कृषि विद्यापीठाने अशा रासायनिक शेतीची शिफारस केलेली नाही.कोणत्याही पिकाची पूर्व मशागत करताना शेणखत,कंपोस्टखत किंवा हिरवळीचे पिक घ्यावे अशीच शिफारस केलेली आहे.बऱ्याचदा शेतकरी फक्त रासायनिक खतांचाच वापर करताना दिसतात.त्यामुळेच जमिनीची उत्पादकता घटत गेली आहे आणि कृषि विद्यापीठाच्या रासायनिक खतांच्या शिफारशीमुळे जमिनी खराब झाल्या असे निराधार आरोप केले जात आहेत.
या सर्व समस्याचे निराकरण करताना आणि घडलेल्या चुकांचे परिशीलन करताना अपुऱ्या ज्ञानाच्या आधारे रासायनिक खतांवर या सर्व समस्याचे खापर फोडले गेले. सर्व पातळीवरून आज रासायनिक खतांच्या वापरला दोष दिला जात आहे. यामुळे सध्या संभ्रमाची अवस्था निर्माण झाली आहे.केवळ रासायनिक खतांमुळे खरोखरच हे संकट कोसळले कि काय, हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.प्रत्येक जण आपल्या परीने या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करीत आहे.यातच सेंद्रिय नैसगिक शेतीचा प्रसार करणार्यांनी वेगळ्याच प्रवाहात शेतकरयाना अडकविण्याचा प्रयत्न चालविला आहे.
शेतकरी बंधुनो एक लक्षात घ्या,आपली पूर्वीची पारंपारिक शेती हि सेंद्रिय शेतीच होती आणि त्यातील तत्वे निश्चीतच जमिनीला,पर्यावरणाला आणि मानवाला हितकारक होती.परंतु सध्याच्या जागतिकीकरणाच्या प्रवाहात गुणवत्ते बरोबरच अधिक उत्पादनालाही अग्रक्रम दिला तरच आपण स्पर्धेत टिकून राहू शकू यासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा,जलसिंचनाचा योग्य वापर करून आपण जास्त उत्पादना बरोबरच चांगल्या गुणवत्तेचाही माल तयार करू शकू.
यासाठी रासायनिक खतांचा वापर पूर्णपणे बंद न करता त्याबाबत संयम पाळला,सेंद्रिय व जैविक तंत्रज्ञानाची जोड दिली तसेच हिरवळीच्या खतांचा वापर वाढविला तरच आपले उद्दिष्ट साध्य होऊन शेतीतील वाढणाऱ्या समस्यांची तीव्रताही आपण काही अंशी कमी करू शकतो,परंतु त्यापूर्वी रासायनिक खताबद्दलचे काही गैरसमज दूर होणे अत्यावश्यक आहेत
*******************************************************************
कार्यालीन पत्ता:
डॉ.आदिनाथ ताकटे,
मृद शास्त्रज्ञ,
विभागीय कृषि संशोधन केंद्र,सोलापूर ४१३००२.
मो.९४०४०३२३८९
email: aditakate@gmail.com
घरचा पत्ता/पत्रव्यवहारासाठीचा पत्ता:
डॉ.आदिनाथ ताकटे,
२,अक्षत अपार्टमेंट,गरुड बंगल्यामागे,
रंगभवन-सातरस्ता मार्ग,
सोलापूर -४१३००३
मो.९४०४०३२३८९
email: aditakate@gmail.com
.
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
चांगला लेख! पण काही प्रश्न
चांगला लेख!
पण काही प्रश्न आहेत. नंतर विचारेन