अनेक दिवसापासूनची एक इच्छा होती की, कोट्यवधी शेतकरी असलेल्या या विशालप्राय देशात किमान काही हजार शेतकरी मंडळी एकाच व्यासपीठावर एकत्र येऊन शेती या विषयावर त्यांनी आपसात चर्चा केली पाहिजे. आपल्या सुखदु:खात एकमेकाला समरस केले पाहिजे. शेतीत आयुष्य व्यतीत केल्यानंतर आलेल्या अनुभवांची आपसात देवाण-घेवाण केली पाहिजे. नवनवे तंत्रज्ञान अवगत करताना आणि त्याचा आपल्या शेतीत वापर करताना येणार्या अडचणी सोडवून घेण्यासाठी आपसात विचारविनिमय झाला पाहिजे.
शेतकरी संघटनेच्या अगदी सुरुवातीच्या काळापासून एक कायमची खंत व्यक्त केली जात आहे की, जगाच्या इतिहासातील एवढी मोठी शेतकरी चळवळ, ज्या चळवळीच्या मेळाव्यांनी व अधिवेशनांनी गर्दीचे सर्व उच्चांक मोडले. ज्या चळवळीने लाखापेक्षा जास्त महिलांना एकत्र आणण्याचा विस्मयकारक चमत्कार घडवून आणला, इतिहासानेही तोंडात बोटे घालावी, असे आंदोलन यशस्वी करून दाखवले; त्या चळवळीला प्रसारमाध्यम आणि साहित्यक्षेत्रात मात्र फारशी चमकदार कामगिरी करून दाखवता आली नाही. या चळवळीला पूरक असे दर्जेदार साहित्यसुद्धा थोडाफार अपवाद वगळता फारसे काही निर्माण झाले नाही.
मुळातच शेतकरी समाज मुका आहे. त्याला स्वतःला व्यक्त होण्याची संधीच मिळत नाही. आर्थिकस्थितीने पुरेपूर परावलंबी असल्याने इतरांना जे रुचेल तेच बोलण्याखेरीज त्याला पर्याय उरत नाही. त्याला बोलण्यापूर्वी पहिल्यांदा परिणामांचा विचार करावा लागतो. कर्ज देणे थांबवेल म्हणून सावकार किंवा बॅंकाच्या विरोधात बोलू शकत नाही. उधारीवर किराणा मिळणे बंद होईल म्हणून व्यापार्यांच्या विरोधात बोलू शकत नाही. ७/१२ चा उतारा मिळायला त्रास जाईन म्हणून प्रशासनाच्या विरोधात बोलू शकत नाही आणि पुढार्यावाचून तर बरेच काही अडते, मग त्यांच्या विरोधात बोलायची तो कशी काय हिंमत करू शकेल? अन्यायाने कितीही मर्यादा ओलांडल्या तरी..... त्याला त्याच्या मनातली खदखद जिभेवर आणताच येत नाही. सर्वांना रुचेल असेच बोलणे, हीच परिस्थितीची गरज असल्याने त्याला स्वतःची अशी भाषा उरतच नाही.
परिणामांची तमा न बाळगता एखाद्याने स्वतःला व्यक्त करायचे ठरवलेच तर तसे व्यासपीठच उपलब्ध नाही. शेतकर्याकडे जो कोणी येतो तो त्याला ऐकवायलाच येतो, त्याचे ऐकायला कोणीच येत नाही. कृषिविभागाच्या किंवा राजकीय पक्षाच्या मेळाव्यांत तो केवळ श्रोता असतो. कागदावर लिहून पाठवले तर गैरसोयीचे असल्याने वृत्तपत्रही शेतकर्यांचे मनोगत छापण्याची हिंमत दाखवत नाही. पुस्तक लिहायचे तर छपाईचा खर्च परवडण्यासारखा नाही. रेडियो-टीव्ही यांना तर एकंदरीतच शेती या शब्दाची ऍलर्जी आहे. मग शेतकर्याने व्यक्त व्हायचे तरी कसे? अभिव्यक्ती व्यक्त करताच येत नसेल तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य असून-नसून काय उपयोगाचे?
पण आता या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. शासन, प्रशासन आणि समाज यांनी नव्हे तर नियतीने व नव्या तंत्रज्ञानाने ती संधी शेतकर्यांना उपलब्ध करून दिली आहे. इंटरनेटने आता अल्पशा खर्चात अगदी दुर्गम प्रदेशातील आम माणसाला सुद्धा थेट जगाच्या नकाश्यावर आपली छाप सोडण्याची नामी संधी मिळवून दिली आहे. अगदी नाममात्र खर्चात आता इंटरनेटच्या माध्यमातून करोडो शेतकरी, जाती-पाती, धर्म-पंथ, स्त्री-पुरूष, देश-प्रांत या सर्व भेदाभेदाच्या सीमा ओलांडून एकाच वेळी एकाच व्यासपीठावर एकत्र येणे सहज शक्य झाले आहे.
तंत्रज्ञानाने गरूडझेप घेतली आणि सूर्य-चंद्र, मंगळ-अमंगळ तारे मनुष्याच्या टापूत यायला सुरुवात झाली. मात्र या कृषिप्रधान देशातला बहुसंख्य शेतकरी आणि एकूणच शेती हा विषय अडगळीत पडला आहे. विकासाच्या आणि प्रगतीच्या व्याख्येचे संदर्भ आणि अर्थ बदलत आहेत. शासनाच्या चुकीच्या आणि शेतकरी विरोधी धोरणामुळे शेती हा विषयच फारफार मागे ढकलला गेला आहे.
मंगळ कह्यात आला, कक्षेत तारका
भैरू अजून खातो, कांदा न भाकरी
शेतकर्यांच्या अनेक पिढ्या उलटून गेल्या पण आमचा भैरू मात्र अजूनही कांदा-भाकर खाऊनच आला दिवस ढकलत आहे. त्याच्या न्याहारीचा 'मेनू' बिघडल्या घड्याळाच्या काट्यासारखा आहे त्याच स्थितीत स्थिर असून त्यात काही फारसा बदल घडत नाहीये. हे चित्र बदलण्याची सक्त गरज आहे. शेतकर्यांच्या जीवनातले नैराश्य संपून चैतन्य निर्माण होण्यासाठी आणि शेतकर्याच्या आयुष्यात सुखाचा व सन्मानाचा दिवस उजाडण्यासाठी प्रयत्न होण्याची नितांत आवश्यकता आहे.
शेतीचे यतार्थ चित्रण करणारे आणि परिवर्तनाला भाग पाडणारे साहित्य निर्माण झाले पाहिजे, असे आपल्याला वाटते. पण आपण म्हणतो की आम्ही मात्र लिहिणार नाही. ते इतरांनी लिहिले पाहिजे. आमचे आयुष्य जगलो आम्ही, आमच्या हालअपेष्टा भोगल्या आम्ही, आंदोलनात उतरलो आम्ही, तुरुंगाची हवा खाल्ली आम्ही, लाठ्यागोळ्या झेलल्या आम्ही आणि आम्ही म्हणतो की आम्ही लिहिणार नाही. ते कुणीतरी लिहावे. हे कसे शक्य आहे? हे कदापि शक्य नाही. शेतकरी चळवळीचा विचार पुढे नेणारी साहित्यनिर्मिती शेतकरी चळवळीमध्ये काम केलेला आंदोलक जेवढ्या प्रभावीपणे करू शकेल तेवढ्या प्रभावीपणे चळवळीबाहेरचा साहित्यिक करू शकणार नाही मग तो कितीही मोठ्ठा प्रभावशाली साहित्यिक असू देत. आपली अनुभूती आपणच साकारायलाच हवी. अस्सल आणि अभिजात लेखन करायला लेखनशैलीची गरज भासत नाही. बोबडेबोल जरी अस्सल आणि अभिजात असेल तर त्यात जिवंतपणा असतो व तो जिवंतपणाच त्या लेखनाला परिणामकारकता प्रदान करतो. लेखन करणे ही एक कला असते, हे मान्य; पण लेखनात कलाकौशल्य वगैरे वापरल्याने ते लेखन कलाकृतीकडे झुकते आणि मग ती कलाकृती वास्तविकतेपासून फारकत घेण्याची दाट शक्यता असते. कला ही कला असते आणि वास्तव हे वास्तव. त्यामुळे फारसा विचार करायची गरज नाही. जसे लिहिता येईल तसे आणि जसे जमेल तसे लिहायचा प्रयत्न शेतकर्यांनी करायलाच हवा.
म्हणून मित्रांनो..... या,
"पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न" असे ब्रिदवाक्य असलेले बळीराजा डॉट कॉम (
www.baliraja.com) हे संकेतस्थळ तुमच्यासाठीच आहे. येथे तुम्ही तुमच्या मनातल्या भावना स्पष्टपणे चितारू शकता. कविता, लेख लिहू शकता. इतरांच्या लेखनावर परखडपणे प्रतिक्रिया नोंदवू शकता. अगदी चारपाच ओळीचा मुद्दा किंवा मनोगत सुद्धा व्यक्त करू शकता. शेतकरी म्हणून जीवन जगताना आलेले अनुभव कथन करू शकता. आजवरच्या वेगवेगळ्या आंदोलनाविषयीची माहिती लिहू शकता. आंदोलनाचे तुमच्याकडे काही फोटो असल्यास ते प्रकाशित करू शकता.
प्रवेश कसा घ्यायचा, सदस्यत्व कसे घ्यायचे, मराठीत कसे लिहायचे या विषयीची सर्व माहिती बळीराजा डॉट कॉम (
www.baliraja.com) वर उपलब्ध आहे.
म्हणून काळ्याआईच्या कष्टकर्यांनो.... या,
शेतीच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण इथे थोडीशी धडपड करूया....!!
गंगाधर मुटे
----------------------------------------------------------------------------------------------
प्रतिक्रिया
उत्तम !!
उपेक्षितांना हे व्यासपीठ उपलब्ध करुन दिल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.
धन्यवाद डॉक्टर साहेब.
आपण पहिले सदस्य आणि पहिले प्रतिसादक ठरले आहे.
बळीराजा डॉट कॉमतर्फे आपले खूप खूप अभिनंदन.
उत्तम प्रकल्प!
मुटेसाहेब, आपला हा प्रकल्प उत्तमच आहे हे नि:संशय!
हे संकेतस्थळ बहरो,प्रसिद्ध पावो आणि बळीराजाच्या उपयोगी पडो अशी सदिच्छा व्यक्त करतो.
धन्यवाद देव साहेब.
या कामी आपले मोलाचे सहकार्य लाभेल याची आम्हास खात्री आहे.
अतिशय उत्तम प्रकल्प अभिनंदन!
अतिशय उत्तम प्रकल्प
अभिनंदन!
धन्यवाद राजे.
धन्यवाद राजे.
अभिनंदन...
मुटे काका,
अतिशय उत्तम प्रकल्प. पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा .
धन्यवाद योगेश. पुढील वाटचालीत
धन्यवाद योगेश.
पुढील वाटचालीत तुमचापण हातभार लागावा, हि विनंती.
अभिनंदन आणि शुभेच्छा !
शेतकर्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल हार्दिक अभिनंदन !!
हा उपक्रम प्रचंड यशस्वी होईल हा माझा ठाम विश्वास आहे !
शुभेच्छा !!
माझ्या मनाची स्पंदने >>
मन वढाय वढाय...
मुटेकाका अतिशय छान आहे
मुटेकाका अतिशय छान आहे प्रकल्प. शेतकरी बंधूंना इथे मार्गदर्शन लाभो हीच सदिच्छा.
- पिंगू
अभिनंदन.......!
बळीराजा संस्थळ उत्तम बनले आहे. बळीराजा संस्थळासाठी हार्दिक शुभेच्छा.........!!!!
-दिलीप बिरुटे
स्वागत
स्वामी संकेतानंदजी, पिंगूजी, प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सर
बळीराजा डॉट कॉमवर आपले स्वागत आहे.
एक चांगला उपक्रम
एक चांगला उपक्रम हाती घेतलाय आपण!
हार्दिक शुभेच्छा!
बळीराजा डॉट कॉमवर आपले स्वागत
बळीराजा डॉट कॉमवर आपले स्वागत आहे प्रशांतजी.
या उपक्रमाचे यशापयश मात्र आपणा सर्वांवर अवलंबून आहें.
अभिनंदन आणि शुभेच्छा...
अश्या एका व्यासपीठाची खरेच गरज होती. मुठेसाहेबांनी ती जाणुन पाऊले उचलली यासाठी अभिनंदन आणि या प्रकल्पाला घवघवीत यश मिळावे, तो सुरु करण्यामागील सर्व उद्दिष्टांची पुर्ती व्हावी अशी शुभेच्छा.
प्रसन्न केसकर
मुटेकाका हार्दिक अभिनंदन.
मुटेकाका हार्दिक अभिनंदन.
प्रसन्नजी, बाळासाहेब बळीराजा
प्रसन्नजी, बाळासाहेब
बळीराजा डॉट कॉमवर आपले स्वागत आहे.
अभिनंदन
एक चांगला प्रयत्न.
स्वागत आहे
श्री गिरधर पाटील साहेब,
बळीराजा डॉट कॉमवर आपले स्वागत आहे.
आपल्या या क्षेत्रातील जेष्ठतेचा नक्कीच फायदा होईल, अशी खात्री आहे.
अभिनन्दन
मुटे साहेब याना सप्रेम नमस्कार.
आपला हा उपक्रम अतिशय चान्गला असुन सामान्य शेतकर्याला आपन हे हक्काचे व्यासपीथ मिलवुन दिले त्याबद्दल आपले हार्दिक अभिनन्दन सर...
पाने
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
लोकप्रिय लेखन (वाचनसंख्या)
पाने
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
आज सर्वाधिक वाचन
पाने
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 7 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण