नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
पलाट साडेबाराचा - आगरी गझल
भानगरींना कारन झाला,पलाट साडेबाराचा
शिरकोचा म्होटा घोटाला,पलाट साडेबाराचा
कंचे व्यावारान दलाली,आवरि नय गवनार कवा
डिलींग मधला म्होटा गाला,पलाट साडेबाराचा
धा मजल्याचा टॉवर झाला,गावाचे त्या बाजूला
मिनी चरवला पयला माला,पलाट साडे बाराचा
लाईट ,पानी ,रस्ता सगला कॉलनीन रहानार्यांना
आमचे दारासमोर नाला,पलाट साडेबाराचा
चिकन्,मटन्,न दारुमच्छी,बायेरचे मित्रांसाठी
खोपटान ठेवू बापाला,पलाट साडेबाराचा
जमिन नाही,पलाट नाही,किती किती मी सहन करु?
तरास आपापले जिवाला,पलाट साडेबाराचा
धरुन ''कैलास'' या जगानी,बाप कुनाला बनेवला
व्हता कुनाचा,लाभ कुनाला,पलाट साडेबाराचा.
-- डॉ.कैलास गायकवाड.
====================================================================
आगरी भाषा बळीराजास कदाचित नवी असेल्,परंतु आजही महाराष्ट्राच्या बर्याच भागात ही भाषा बोलली जाते.माझा जन्म् , शिक्षण्,बालपण्,आणि आता व्यवसाय सुद्धा याच आगरी बहुल भागात करत आहे.त्यामुळे या भाषेचे मातृभाषेइतकेच महत्व माझ्या जीवनात आहे. प्रस्तुत गझल भाषेतील क्लिष्टते मुळे कदाचित समजायला कठीण जाईल्,परंतु बहुतांशी वाचकांस समजू सुद्धा शकेल.
गझलेची पार्श्वभूमी न सांगता ,गझलेचे शेर कदाचित आपणापर्यंत पोचणार नाही,म्हणून मी थोडक्यात हे सांगतो.
नवी मुंबई वसविण्यासाठी,महाराष्ट्र शासनाने,''सिडको'' महामंडळाची स्थापना केली. या महामंडळा ने,ठाणे,रायगड जिल्ह्यातील शेतकर्यांच्या जमिनी,रु.१६,०००/- प्रती एकर या दराने १९७०-१९७६ या काळात संपादित केल्या.शेतकर्यांच्या प्रखर आंदोलनानंतर व ५ शेतकरी हुतात्मे झाल्यानंतर भाव वाढवून ४०,०००/- प्रती एकर इतका करण्यात आला.उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत असलेल्या शेतकर्यांनी जमिनी गेल्यावर्,आपल्याच जनिनीवर बांधण्यात येणार्या इमारतींवर मजूरकाम्,मुकादमाची चाकरी,किंवा बांधकामाला,बांधकाम साहित्य पुरवण्याची कामे घेवून आपला चरितार्थ चालवला. मात्र या शेतकर्याचा चांगला फायदा तेव्हा झाला,जेव्हा शासनाने,या विकसित जमिनी पैकी १२.५ % टक्के जमीन विकसित भूखंडांच्या स्वरुपात शेतकरी पुनर्वसन योजने अंतर्गत शेतकर्यास परत देण्याची योजना जाहीर केली. आजच्या घडीला अश्या १००.०० चौमी भूखंडाचा बाजारभाव साधारणतः १ कोटी रुपये इतका आहे.परंतु दलाल्,भूमाफिया,बाबूशाही,बिल्डर या चौकडीच्या विळख्यात शेतकरी वा त्याच्या वारसास नाममात्र फायदा झाला आहे. अश्यातच शेतकर्याच्या व त्याच्या मुला/नातवांच्या हातात पैसा खुळखुळू लागल्याने,दारु,बारगर्ल्स्,हळदी/लग्नात अमाप खर्च करणे या छानछोकीत्,शिक्षण आणि आरोग्य या बाबींकडे दुर्लक्ष झाले.कित्येकजण दुर्धर आजारांचे बळी ठरले.
माझ्याशी चर्चा करत असताना एका पत्रकाराने,तुम्ही या बाबी गझलेतून का नाही मांडत? असा मला सवाल केला होता....आणि मी त्या आवाहनास प्रतिसाद म्हणून आगरी गझल लिहावयास सुरुवात केली आहे.ज्याचे प्रथम पुष्प सविनय सादर.
- डॉ.कैलास गायकवाड.
====================================================================
शब्दार्थ
शिरको= सिडको महामंडळ
कंचे= कोणते
आवरि= एवढी
म्होटा= मोठा
पलाट = प्लॉट
चरवला = चढवला
पयला= पहिला
सगला= सगळं
बायेरचे= बाहेरच्या
व्यावारान = व्यवहारात
खोपट= झोपडं
गवनार= मिळणार
कवा= केव्हा
व्हता = होता
=================================================
प्रतिक्रिया
अप्रतिम शेतकरी गझल.
जबरदस्त झालीय ही गझल.
काय म्हणू? मराठी गझल की आगरी गझल; शेतकरी गझल की शेतकरी गीत?
काहीही म्हटलं तरी चालेल. त्याने काहीही फरक पडणार नाही.
पण शेतकर्याच्या व्यथा प्रतिभासंपन्न आणि ताकतवार लेखनीने जोरकसपणे रेखाटणारा एक भुमिपुत्र शेतकर्यांना आज गवसला आहे, हे मात्र नक्की.
डॉक्टर गायकवाड साहेब, अभिनंदन आणि पुढील लेखनास खूपखूप शुभेच्छा.
पाने