नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
साहेब....
अनैसर्गिक हवेच्या
कृत्रिम हवाबंद डब्यात बसून
कळत नसतात साहेब मातीच्या वेदना !
त्यासाठी चालावं लागतं मातीवर
अनवाणी पायांनी राजरोस !!
होवू द्यावा लागतो त्वचेला
धुळीचा जंतूसंसर्ग तळपत्या उन्हामंदी !!
सदानकदाचा दुष्काळ सोसावा लागतो
वसान पडलेल्या खेड्या गावामंदी !!
भेगाळलेल्या भूईचा
जवा भरुन येतो ना ऊर
डोळ्यांत दाटतो साहेब
तवा अश्रूंचा पूर...
जपावं लागतं पऱ्हाटीच्या फुलाला
अन् गव्हाच्या अंकुरणा-या कोंबाला
पोटच्या पोरावाणी रातंदिन....
साहेब
कित्येकजण...
कास्तकारांच्या अगणीत पिढ्या...
खपल्यात या मातीसाठी
तरी अजूनई नाई आले बघा
कास्तकारांचे अच्छे दिन ।।
साहेब
घोटभर पाण्यासाठी अन्
रोजच्या जगण्यासाठी
मरावं लागतं हरघडीला कुढत कुढत
पाठ अन् पोट एक झालेलं तान्हुलं
मायच्या छातीले बिलगते कन्हत कन्हत !!
साहेब
बिसलरीचं पाणी पिणारे तुम्ही
तुम्हाला कशी कळणार अश्रूंची चव??
तुमच्या लाल फितीच्या कारभारातून उमटत असते
फक्त नि फक्त कागदावरच कणव !!
भाकरीच्या चंद्रकोरीसाठी साहेब
जवा मेटाकुटीला येतो ना श्वास
तवा आमच्या अंगच्या घामाला बी येतो
अत्तराचा वास !!
म्हणून म्हणतो साहेब
कधी चालून बघा मातीवर
अनवाणी पायांनी....
शेती मातीशी निगडीत पाखरं
बघताहेत तुमच्याकडं
आशाळभूत नजरांनी....
आशाळभूत नजरांनी.....
©अनिकेत जयंतराव देशमुख (अनु)
रा- गोपालखेड , पो- गांधीग्राम ,
ता. जि. अकोला 444006
mo-9689634332
©Copyright - Aniket J. Deshmukh
Email Id :- anudesh25488@gmail.com
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने