गंगाधर मुटे यांनी शुक्र, 17/06/2011 - 10:12 ह्यावेळी प्रकाशित केले.
प्रकाशीत:
(रानमेवा काव्यसंग्रहात प्रकाशित)
रूप सज्जनाचे - गझल
लेवून फ़ार झाले, हे लेप चंदनाचे - गझल - प्रसिद्ध कवी वऱ्हाडी झटकाकार श्री रमेश ठाकरे यांच्या आवाजात.
मी जेव्हा गझल हा काव्यप्रकार हाताळण्यास सुरुवात केली तेव्हा स्वाभाविकपणे 'शेती' हाच विषय गझल मध्ये घेऊन आलो. तेव्हा त्यावेळेसचे काही तत्कालीन गझलसम्राट माझ्या गझलेवर तुटून पडलेत. गझल हा "सभ्य" काव्यप्रकार असल्याने गझलेत शेती विषयाला स्थान असू शकत नाही. त्यामुळे माझी गझल ही गझल असल्याचेच त्यांनी नाकारले. माझ्या गझलेवर प्रतिसाद लिहिताना माझ्या गझलेला गझल न म्हणता ''रचना' म्हणण्यापर्यंत काहींची मजल गेली.
... आणि मला 'ती' 'तिचे डोळे. 'तिचे नाक' 'तिचा आकृतिबंध' 'तिची लकब' 'मोगरा' 'पारा' 'गुलाब' वगैरे विषय माझ्या काव्यप्रकारात मला मांडायचेच नव्हते. मी जन्मजात मुजोर असल्याने कुणाच्या दबावात येण्याचे मला काहीच कारण नव्हते. मी वेगवेगळे प्रयोग सुरूच ठेवले. अशातच अध्यात्म्याकडे किंचितशी झुकणारी "रूप सज्जनाचे" ही गझल लिहिली. त्यावरही सोशल मीडियावर वादंग झाला. त्याचे कारणही तेच की गझलेला 'असे' विषय वर्ज्य आहेत.
मी जर सुरुवातीच्या काळात घाबरून मागे हटलो असतो तर गझलेत शेती विषय आला असता किंवा नसता, हे देवच जाणे!
एका सार्वजनिक कार्यक्रमात सुप्रसिद्ध कवी, गीतकार, संगीतकार वऱ्हाडी झटकाकार श्री रमेश ठाकरे यांनी "रूप सज्जनाचे" या गझलेचे गायन केले
रूप सज्जनाचे - गझल !!३७॥
लेवून फ़ार झाले, हे लेप चंदनाचे
भाळास लाव माती, संकेत बंधनाचे
का हाकतोस बाबा, उंटावरून मेंढ्या
सत्यास मान्यता दे, घे स्पर्श स्पंदनाचे
दातास शुभ्र केले, घासून घे मनाला
जे दे मनास शुद्धी, घे शोध मंजनाचे
आमरण का तनाला भोगात गुंतवावे?
सोडून दे असे हे, उन्माद वर्तनाचे
अभये चराचराला, संचार मुक्त आहे
शत्रूसही निवारा, हे रूप सज्जनाचे
- 'गंगाधर मुटे 'अभय'
=÷=÷=÷=÷=
अकरा/पाच/दोन हजार दहा
(वृत्त - आनंदकंद )
(रानमेवा काव्यसंग्रह - प्रकाशन दि. १०.११.२०१०)
=÷=÷=÷=÷=
प्रतिक्रिया
फेसबुक लिंक
फेसबुक लिंक
https://www.facebook.com/gangadharmute/posts/pfbid0isr1K7EGTQ9QzpEmiqZcV...
शेतकरी तितुका एक एक!