नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
शेतकऱ्यांच्या जीवनाचा सातबारा: पिंडपात
सुखदेव ढाणके यांच्या दर्जेदार कवितांची मेजवानी देण्याचे काम विष्णू जोशी यांनी आपल्या काव्याग्रह प्रकाशना मार्फत केले आहे. सुखदेव ढाणके या प्रतिथयश कवीच्या काव्यातील कथा ही शेतकऱ्यांची व्यथा मांडणारी आहे.
उणारून जीव केला संवसार उभा
लेकरांच्या पंखावर स्वार केले नभा
स्वतः कष्ट करून संसाराचा गाडा ओढणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांच्यासाठी मात्र सोनेरी दिवसाच्या स्वप्न प्रत्येक शेतकरी बाप पाहतो. ह्या बापाच्या खांद्याला खांदा देत दुष्काळाच्या काळात जन्मूनही माहेरी लाडाची लेक असलेली माय कसा संसार करते ते सांगताना कवी म्हणतात,
बापाच्या दो हाताची माय बळकट मूठ झाली
ह्या ओळी मधून मायने बापाला दिलेली साथ किती लाख मोलाची असते हे दिसून येते तर,
अशाच एका प्रहराला
जाते तिचे मुके झाले
तिच्यासह ओवी मेली
अस्तित्वाचे धुके झाले
अशा ओळीतून अंगावर सर्रकन काटा येतो, आई गेलेल्या दुःखाने पोरके झालेली प्रत्येक व्यक्ती सैरभैर होऊन स्वतःच्या आईची आठवण करते हे प्रचंड सामर्थ्य कवींच्या शब्दाचा आहे, कवी किती मोठ्या प्रतिभाशक्तीचे धनी आहेत याची जाणीव रसिकाला होते. आई-बाबा प्रमाणेच कृषक समाज हा बैलांचा कायम ऋणांकीत आहे तोच धागा पकडून बैल आणि नको कोरी झुल अशा सुंदर कविता पिंडपात मध्ये आहेत. बाप आणि बैल या कवितेत तर दोघांच्याही कष्टाचे वर्णन आढळते, तर खुंट्यावरच मरु कवितेमध्ये,
दोर असा कापू नको
खाटकाला विकू नको
खुंट्यावरच मरु दे
मातीत अंती झरू दे
अशी आर्त विनवणी बैलांच्या वतीने कवींनी केलेली आहे. माझ गाव: काल आज आणि उद्या ह्या कवितेत जगरहाटी प्रमाणे बदलत गेलेल्या गावाचे वर्णन अस्वस्थ करून जाते. कृषक संस्कृतीतील शेतकऱ्यांचे दुःख पिंडपातच्या पानापानावर कवींनी मांडले आहे.
आली मळणीत खोटं
नाही आकणीत दाणा
झाले कुटार जिण्याचे
त्यास ढोरही खायी ना
अशाप्रकारे शेतकऱ्यांचे जीवन त्यांच्या हाल-अपेष्टा कवींनी जवळून पाहिल्या आहेत. म्हणूनच त्यांच्या कविता प्रभावीपणे काळजास भिडतात. पावसा, ढगातल्या माय बापा, ओल्या सुक्या दुष्काळाचे अशा कवितांमधून पावसाची आर्त वाट पाहणारा बळीराजा समोर उभा राहतो. दंतकथा ह्या कवितेतून लोप पावत चाललेली ग्रामीण संस्कृती आणि नष्ट होत चाललेला सर्व धर्म समभाव ह्याची आठवण देत कवी म्हणतात,
एकादशी करी रोजा
ईद दिवाळीच्या घरी
शिरखुर्म्याची वाटी
पुरणाच्या पोळीवरी
वरील शब्दचित्रण आपण अनुभवलेले असले तरी आज ती एक दंतकथा वाटते ही खंत मांडताना ह्याच कवितेत कवी म्हणतात,
वर्तमानाच्या दाढेत
झाला भूतकाळाचा चोथा
चरचरीत सत्याची
उरे आज दंतकथा
अश्याप्रकारे शेतकरी व ग्रामीण जीवन मांडत असताना कवीने प्रमाण शब्द वापरून कविता रसिकाच्या अधिक जवळ पोहोचतील ह्याची काळजी घेतली आहे. ग्रामीण जीवन मांडायचेचे म्हणजे ग्रामीण बोलीभाषा वापरली पाहिजे असा अट्टहास न धरता आपली शैली आपली बोली आपली वृत्ती व प्रवृत्ती कायम ठेवत कवितेतील शब्द सौंदर्य कोठेही कमी न पडू देता आशयाच्या अंगाने कविता अधिक खुलवते नेण्याचे काम सुखदेव ढाणके यांनी या संग्रहात केले आहे. आपल्या दैन्या बद्दल कवीच्या कवितेतील शेतकरी कुणावरही आगपाखड करत नाही. रक्तरंजित क्रांती आणि परीवर्तनाची भाषा करत विळ्या कोयत्याना तलवारीत बदलत नाही. तर आपली व्यथा आणि वेदना मांडून समाजानेच संवेदना जागवावी ह्या विचारातून कर्माच्या बळावर नियतीशी लढून टिकून राहणारा बळीराजा आपल्याला या ठिकाणी दिसतो. अगदीच अपवाद म्हणून सर्व व्यवस्थेवर रोष प्रकट करताना कवी म्हणतात,
अनुदानाचे टवाळ गाणे पॅकेजचा पोकळ ढोल
सुखात माती काळवणाऱ्या हरामाचे नरडे सोल
अश्या प्रकारे कवी व्यक्त होत असताना व्यवस्थेवर प्रश्न चिन्ह ठेवतो. शेवटी काही मुक्तकातून तर
लाज द्रौपदीची कोण, लाल मायीचा राखे
तिच्या भरोश्याचा कान्हा दुःशासनाला सामील
अशा ओळींमधून स्त्रियांवरील अत्याचाराला आता कोणी वाली राहिला नाही असे कवी म्हणतात. धर्म-कर्म संस्कृती परंपरा इत्यादी अनेक अवडंबरच्या अत्याचाराला स्त्री रोज बळी जात आहे हे दाहक वास्तव कवींनी मांडले आहे.जेष्ठ चित्रकार श्रीधर दादा अंभोरे ह्यांचे आकर्षक साजेशे आणि बोलके मुखपृष्ठ, विष्णू जोशींची प्रकाशक म्हणून मेहनत व आशयघन अनुभव सिद्धते सह दिव्य प्रतिभेचा सुखदेव ढाणके यांचा शब्दविष्कार ह्याचा परिपाक म्हणजेच पिंडपात हा संग्रह होय कवीला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा!
किरण शिवहर डोंगरदिवे
वॉर्ड न 7, समता नगर मेहकर
ता मेहकर जि बुलडाणा पिन 443301
मोबा 7588565576
पिंडपात
कवी सुखदेव ढाणके
काव्यग्रह प्रकाशन वाशीम
प्रतिक्रिया
काव्यसंग्रहाचे खुप छान
काव्यसंग्रहाचे खुप छान समीक्षण केले किरणभाऊ.
प्रवेशिकेचे स्वागत
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
पाने