![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
1. जगवा राव......
स्मार्ट सीटी बनवताना स्मार्ट शेती बी बनवा राव
उगण्यापुरती जागा अन् पेर्ता माणूस जगवा राव...धृ...
वाफस्याला वाफ्यावाफ्यात वाय-फाय पेरू आम्ही
दबला दाना कोंबाळण्याला थोड़े खत पुरवा राव......1...
शिकून झाले धड़े सारे पेरता पेरता पिकवण्याचे
विकता विकता विकायचीही अक्कल थोड़ी शिकवा राव....2...
काळी माती हुंगणाऱ्या चेहरे पांढरे ढगांचेही
नको तिथं बरसणाऱ्या ढगास गावी अडवा राव.....3...
उशाखालच्या धरणाचा घसासुद्धा होतो कोरडा
पाणी थोड़े सिंचनातले वावरात माझ्या जिरवा राव....4...
नावहीन या वेदनेचे बदलणार हे गाव आता
पाझरणारी खडकी वेदना मनामनात मुरवा राव....5...
***************************************************
2.मी बोडकाच आहे.....
असो टोप्या कितीही, मी बोडकाच आहे...
नजरेत समाजाच्या मी मोड़काच आहे....धृ....
अश्रूत भिजणारा संसदेत रडतो कांदा
भोग वाहे कपाळी जो सडकाच आहे....1
चोचा मारुन ज्यांनी लुटले मांस सारे
कळेना कावळयांना मी हाडकाच आहे.....2
उन्मळुन पडताना आधार घाव होतो
कुऱ्हाड़ झेलणारा मी ओन्डकाच आहे....3
बदली माणूस रंग निघता हात उषाचा
समज ठरे खोटा की मी लाड़काच आहे....4
पेरले विचार थोडे मातीत माणसांच्या
उगण्यास भरोसा पण जो थोडकाच आहे....5
जगणे जाळताना जाणीव पेटली ही
कन्हण्यात दिसे मला तो भडकाच आहे....6
**************************************
रावसाहेब जाधव (rkjadhav96@gmail.com)
७०, महालक्ष्मी नगर,
एस.टी.स्टँड मागे. चांदवड
जि.नाशिक (९४२२३२१५९६)
प्रतिक्रिया
सर्व वाचकान्ना धन्यवाद!
रावसाहेब जाधव (चांदवड)
वाचकांनी प्रतिसाद नोंदवल्यास मार्गदर्शन मिळेल
तरी मार्गदर्शनपर प्रतिसादाची अपेक्षा
रावसाहेब जाधव (चांदवड)
लेखनाचा विषय
लेखनाचा विषय : मा. शरद जोशी
(लेखन शरद जोशी या व्यक्तीमत्वाशी निगडीत व अधोरेखीत करणारे असावे)
पाने