नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
‘आसवांचा पूर’
आवंदा आमदानी बरी वाटत व्हती. भरपूर पाऊस पडत व्हता. नदी नाले दुथडी भरून वाहत व्हते. तळे भरले व्हते. दुष्काळाचा डाग कवाच पुसून गेला व्हता. काळीआई पाणी पिऊन तृप्त झाली व्हती. अंगावर हिरवं लेणं ल्याली व्हती. पावसाचं थेंबभर पाणी तिच्या पोटात सपादत नव्हतं. रानाला उफाळे फुटले व्हते. झिलाव्याची रानं चिभाडली व्हती. शेतकरी निपळ्याची रानं निट करीत व्हते. उघड भेटली की, कांद्याचं रॉप लावीत व्हते. सगळीकडं कांद्याची लावणी चालली व्हती.
आज चांगलं फटाकलं व्हतं. बळीबा सावडीची माणसं घेवून, माळावर कांदे लावीत व्हता. सगळे हात चिखलात नाचत व्हते. पुढंसराकलं की, मागं हिरव्या रेषा उमटत व्हत्या. कामाची नुस्ती लगबग उठली व्हती. सावडी मुळं शेतीची कामं उरकत व्हती. आणि पैसा पण वाचत व्हता.
दुपार टळून गेली. सगळे जेवायला बसले कुणी निपळ्याला दोन पायावर बसून तर कोणी हातावर भाकर घेऊन जेवू लागले. रानात चटणी भाकर गोड लागत व्हती. माळावरचां ओढा खळखळत वहात व्हता. त्याचा आवाज कानात घुमत व्हता. जेवनं आटपून माणसं कामाला लागली. बळी रॉप उपटून देत व्हता आणि रोहिणी रॉप पोहोचवीत व्हती. तिच्या हाताला दम नव्हता. तेवढं रान लावून घ्यायचं व्हतं. सगळी माणसं धावत पळत काम करत व्हती.
अचानकच वातावरणात बदल झाला. आभाळ भरून आलं. अंधार पडल्या सारखं झालं. सगळं झाकाळून आलं बघता बघता टपोरे थेंब पडू लागले. काळ्याकुट्ट आभाळातून जणू पांढरे शुभ्र मोतीच गळू लागले. अचानक आलेल्या पावसानी माणसांची तारांबळ उडाली. अंगावर घोंगते घेऊन माणसं झाडाखाली पळाली. आभाळाचा गाळ झाला. रानातून पाणी निघालं. त्याव पावसाचे थेंब आनंदानी नाचत व्हते.
“अहो, लेकरं कुठं असतील ? लय काळजी वाटतीय. लेकरं घरी एकटीच हाईत.” काळजीच्या सुरात रोहिणी म्हणाली.
“अगं, पाऊस सुरु झाल्यापासून मी त्योच विचार करतोय. पण चित्रा’ पोरगी हुशार हाय. कळीत हाय. पोराला घेऊन घरी बसली आसंन” धीर देत बळी म्हणाला.
“कुणास ठावं ? पण किश्या लय आचपळ हाय.” असं म्हणून रोहिणी गप्प झाली. वर आभाळाकडं बघत म्हणाली, “पाऊस उघडंन असं वाटत नाय. अशातच चला. फिरून लय पाणी वाढण.”
“गड्यांनो ऽऽ! ह्यो काय उघडत नाय. पाणी वाढायच्या अगुदर गेल्यालं बरं व्हईल.” बळी म्हणाला.
“व्हय....व्हय ! पाणी लय लवकर येतय. अशातच घरला चला.” धोतार खोचत एक गडी म्हणाला.
“ह्यो रातभरबी लागून राहिन, आभाळाचा गाळ झालाय.” बळी म्हणाला आणि सगळ्यांनीच निघायची तयारी केली. पाट्या, घम्याले पाण्यानी भरले व्हते. ते रिकामे करून पसारा भरला. अंगातून पाणी गळत व्हतं. कापडं भिजून चिंब झाली व्हती. सगळे चिखल तुडवीत घराकडे निघाले.
दिस मावळायला गेला व्हता. पाऊस कोसळत व्हता. बळी बायकोला घेऊन घराकडं निघाला व्हता. लेकरांच्या ओढीनं चिखल तुडवीत व्हता. मनात अनेक शंका डोकावीत व्हत्या. विचारांच्या तंद्रीतच नवराबायको घराच्या ओढीनं पळत व्होते. रोहिणीचा जीव कासावीस होत व्हता. तिचं आईचं मन उचंबळत व्हतं. लेकरांना कधी पाहीन असं तिला झालं व्हतं. पिलांसाठी ती धावत व्हती.
गावकुसाची लेंडी दुथडी भरून वहात व्हती. लेंडीच्या नदीला भरपूर पूर आला व्हता. लाटा हुसळत व्हत्या. पाणी जुळून असल्यामुळं जोर होता. पाऊस पडत व्हता. समोरचं काहीच दिसत नव्हतं. बळी अन् रोहिणी नदीच्या काठावर बसले व्हते. नाकातोंडात पावसाचं पाणी शिरत व्हतं. रोहिणीला पोरांची काळजी वाटत व्हती. ती डोळ्यापुढून हलत नव्हती.
हळू हळू पावसाचा जोर कमी झाला. रोहिणी समोर पाहात व्हती. अचानक ती ताडकन उभी राहिली आणि क्षणभर स्तब्ध झाली. तिच्या मनाचा गोंधळ उडाला. तिची अवस्था बघून बळी तिकडे पाहू लागला. त्याच्या काळजाचा थरकाप उडाला. डोळे भरून आले. अंगावरून निथळनाऱ्या थेंबामध्ये डोळ्यातील आसवं मिसळून गेले. अंग थर थर कापू लागलं. चित्रा किश्याला घेऊन पलीकडच्या काठावर येऊन बसली व्हती. ती आई बापांची वाट पहात व्हती. त्यांना पहाताच रोहिणीला गहिवरून आलं ती रडू लागली. तीचं मन लेकरांसाठी ओढ घेऊ लागलं. पलीकडून चित्रानीही आई बाबांना पाहिलं त्यांनी अंगावरचे घोंगते टाकून दिले. आई बाबांना पाहून त्या चिमुकल्यांना आनंद झाला. किश्या आई साठी धाव घेऊ लागला. चित्रा त्याला अडवित होती.
“चित्रा ऽऽ!! किशोरला घेऊन घरी जा....... !! आम्ही पाणी ओसरल्यावर येतोत.” असं म्हणून रोहिणी त्यांना परत जायचं सांगत होती. बळी पण मोठ्याने ओरडून सांगत होता. पण पाण्याच्या आवाजात त्यांचा आवाज विरघळून जात व्हता. बळी त्यांना हाताने पालवून परत जायला सांगत होता. पण किशोर ऐकत नव्हता. चित्राने त्याला कडेवर घेतला व्हता. तो आईसाठी ओढ घेत होता.
आता झांजड पडू लागली. आईचं काळीज लेकरासाठी माशासारखं तडफडू लागलं.
“धनी, चला. हळू हळू ‘तीर’ गाठू. लेकरं केविलवाणी बघत्यात.” साडी खोचत रोहिणी म्हणाली.
नवऱ्याच्या हातात हात देवून रोहिणी निघाली. दुसऱ्या हातानी डोक्यावरची पाटी सावरीत व्हती. आईला येतांना पाहून बाल किशोरला आनंद झाला. तो आनंदानी टाळ्या वाजवू लागला. चित्राला मात्र काळजी वाटत व्हती. ती कळीत व्हती. “संभाळून या ऽऽ!!” म्हणून मोठ्याने ओरडून सांगत व्हती. बळी रोहिणीचा हात घट्ट पकडून पाण्यात शिरला. पाण्यातून वाट काढू लागला. हळू हळू पाणी वाढत व्हतं गुढ्घ्यावरून आता कंबरेला पाणी लागलं. पाण्याला ओढ होती. पाय सावकाश पुढं सरकवून टाकावा लागत व्हता.पायाखालची वाळू सरकत व्हती. पाण्याचा जोर वाढत होता. बळी आता धारेत आला. कंबरेच्या वर पाणी सरकू लागलं. रोहिणीला धरून बळी पुढं सरकत व्हता. अजून निम्म अंतर पार करायचं व्हतं. रोहिणी मोठ्या हिमतीने नवऱ्याच्या मागे चालत व्हती. आता तिचे पाय लटपटू लागले. छाती धड धडू लागली आणि त्याच वेळेस घात झाला. पायाखालची वाळू सरकली. खड्यात पाय गेला आणि रोहिणी होलगडली. तिचा तोल गेला. तिला बळी सावरत असतानाच पाण्याची लाट आली आणि दोघांनाही घेवून गेली.
“आई ऽऽ!! आई ऽऽ!!” म्हणून चित्राने किंकाळी फोडली. डोळ्या देखत आई बाबा पाण्यात वहात व्हते. किशोर भितीने थर थर कापत व्हता. तो मोठ्याने रडत व्हता.
“ताई, बघना ! आई, बाबा दूर गेले. त्यांना बोलवणा ! बाबा ऽऽ!! बाबा ऽऽ!! तुम्ही लवकर या !” असं म्हणून किशोर रडू लागला.
भावाला मिठीत घेवून चित्राने आक्रोश मांडला. डोळ्यात आसवांचा पूर दाटला. चिमुकल्यांचा आक्रोश पाहून काळजाचं पाणी पाणी होत होतं. लाटांवर आई बाबांची तरंगणारी अस्पष्ट आकृती तिला दिसत व्हती. तसा तिला भास होत होता.
आता सगळीकडे अंधार पसरला व्हता.
श्री. लक्ष्मण किसन दिवटे
बीडसांगवी ता.आष्टी जि. बीड
९०११३९४९०५
प्रतिक्रिया
काय बोलावे?
हार्दिक शुभेच्छा!
धन्यवाद
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!