नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
"मनाच्या आरशावर प्रेम करायला लावणारा नितीन देशमुख यांचा 'प्रश्न टांगले आभाळाला' गझल संग्रह"
'प्रश्न टांगले आभाळाला…' हा नितीनदादा देशमुख यांचा पैंजण आणि बीकॉज वसंत इज कमिंग सून नंतर चा तिसरा कवितासंग्रह आहे.
"जळणाऱ्याला विस्तव कळतो बघणार्याला नाही
जगणाऱ्याला जीवन कळते पळणाऱ्याला नाही"
जीवन विषयक सर्वकष दृष्टिकोन सांगणाऱ्या याच गझलने संग्रहाला खास नितीन दादा स्टाईलने सुरुवात करून दिली आहे. या गझल मधील प्रत्येक शेर जीवन निष्ठा सांगतो. ही गझल मराठी गझल रसिकांच्या काळजावर कायमची कोरल्या गेली आहे. प्रत्येक माणसाला संघर्ष चुकलेला नाही… संघर्ष करताना जो माणूस डगमगतो त्याच्या डोक्यात चिंता घर करते एकदा का चिंतेने मेंदूचा ताबा घेतला की हा तणाव ही चिंता माणसाला पोखरून टाकते… त्यामुळे जीवन समरात पुढे काय होईल? कसे होईल? ही चिंता करण बसल्यापेक्षा आपण आलेल्या परिस्थितीशी दोन हात करण्याची वृत्ती सदैव ठेवली पाहिजे. जगण्याचा हाच खरा बाणा आणि लढाऊ वृत्ती पुढील शेर शिकवतो.
"कोण हारतो कोण जिंकतो चिंता हवी कशाला
चिंता याची बघणाऱ्याला लढणाऱ्याला नाही"
नितीन दादांचे असे शेर केवळ जगणे शिकवत नाहीत तर जगायला प्रवृत्त करतात… सोबतच आपल्याला कशासाठी लिहायचे आहे याचे उत्तर ही गझल लिहत्या हातांना देते. एक वेगळ्याच प्रकारचा 'प्रयत्नवाद' हा गझलसंग्रह मांडतो. 'मानव' केंद्र स्थानी ठेवून समभाव जपतो. बुद्धिवादी, पुरोगामी आणि समतावादी दृष्टिकोन या संग्रहातील गझलांचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणावे लागेल. याचे उत्तम उदाहरण असलेला शेर बघा...
"ताऱ्यामधले अंतर सोडा माणसातले मोजा
जवळिकतेची गरज माणसा ग्रहताऱ्याला नाही"
त्यांच्या गझल मधील वास्तवाचा स्पर्श अत्यंत प्रभावी आहे. वास्तववाद आणि मानवतावाद या दोन्हीचा समन्वय साधून एक वेगळाच काव्य विचार ज्याला आपण गझलियत म्हणू शकतो तो मांडण्यात नितीन दादा यशस्वी झाले आहेत.
'प्रश्न टांगले आभाळाला' मधील एकंदरीत सर्व गझलांमध्ये तरलता आणि सहजता कमालीची जपली गेली आहे. मराठी गझल जेव्हा शृंगार मांडते तेव्हा त्यातल्या नजाकतीची खरी अनुभूती घ्यायची असेल तर आपल्याला या गझल संग्रहाचा संदर्भ आवर्जून घ्यावाच लागेल…
"उगाच घेते नाव सखे तू माझे का प्रेमाने
डाळिंबाच्या ओठावरती कडुनिंबाचे गाणे
घर हृदयाचे तिने सोडले असे वाटले तेव्हा
मधमाशांच्या पोळ्यामधुनी मकरंदाचे जाणे"
या शेरांमध्ये येणारी प्रतिकं मराठी गझलच्या वैभवात भर घालणारी आहेत. नेमक्या शब्दात आपले म्हणणे मांडता येणे हे कवीसाठी अत्यंत महत्त्वाचे असते. त्यांच्या एका छोट्या बहारातील गझल मधील काही शेर पहा...
"मी जरी संपलोच गाताना
गीत माझे कुणीतरी गावे"
अभिव्यक्तीची ही पातळी या गझल संग्रहाला वेगळीच उंची प्राप्त करून देते. वरील शेरात आलेला 'गीत' हा शब्द मला अत्यंत महत्त्वाचा वाटतो. हा शब्द मानवतेचा समग्र विचार प्रतिबिंबित करतो. नव्या जाणिवा मांडतो. केवळ हटके खयाल मांडून 'प्रतिभा साधन' हा संग्रह करत नाही. कलेपुरती (अप्रत्यक्ष) कला जोपासना करून काळजावर बिंबवले जाणारे लेखन करता येत नाही. त्यासाठी आवश्यक असलेल्या साधनेसाठी ते जीवनाच्या अनंत पैलू सोबत तसेच त्यांच्या गझल मध्ये येणाऱ्या सौंदर्य प्रतिकांशी आत्मसमर्पित होऊन ते समरस होतात. सोपे सरल आणि साधे लिहिण्यासाठी ही खरी साधना महत्त्वाची असते.
"तू समर्पणाची व्याख्या मी निर्मळ भक्ती झालो
मी गाभारा मोक्षाचा तू मुर्ती आरस्पानी"
"क्षितिजात विरघळावा लाजून शुक्रतारा
बिलगून चांदणी मग माझ्या समीप यावी"
'सौंदर्याची आत्मप्रचिती ज्याला होते तोच अस्सल काव्य निर्माण करू शकतो.' ही अनुभूती वरील शेर वाचून येते. या गझल सार्वत्रिक स्वरूपाच्या आहेत हे या संग्रहाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.
मानव विकासाचे नवेनवे टप्पे वेगाने गाठत असला तरी काहीतरी मागे राहत आहे का? हे तपासण्याची वेळ आली आहे. तंत्रज्ञानाच्या आधुनिक क्रांती मध्ये 'माणूस' मागे राहता कामा नये. माणूस मागे राहिला तर जगणे असह्य होऊन जाईल.
"ते जुने सोडून बाळा तू नवे घर बांधले
या नव्या घरट्यात होतो कोंडमारा सारखा"
हा कोंडमारा एका जुन्या पिढीची व्यथा मांडतो आहे. उतारवयातील घालमेल अचूकपणे नितीन दादांनी मांडतांना नव्या पिढीला सूचक इशारा दिला आहे. पुढे काय भविष्य वाढून ठेवले आहे याची कल्पना आजच्या पिढीला असली पाहिजे. कोणत्याही प्रकारचा कोंडमारा वाईटच असतो. तणावग्रस्त लोकांची संख्या वाढत असल्याच्या काळात माणसाला गोंजारण्याचे काम साहित्यिकांनी करायला हवे.
वेगळा काढेन मी विस्तवातुन गारवा
उघडले हृदयातले श्रावणाचे दार मी
न्या मला गाडायला माणसांच्या अंतरी
प्राशुनी टाकेन मग तेथला अंधार मी
नितीन दादांची गझल ही अशा शेरांच्या माध्यमातून ही जबाबदारी पार पाडत आहे. वाङमयीन मूल्याचा विचार केला तर 'विस्तवातुन गारवा' वा 'अंधार प्राशन करणे' या सशक्त खयालांनी या गझल संग्रहाला श्रीमंत केले आहे.
मानवी जीवनात अनेकदा हव्यासापोटी नातेसंबंधाचे संदर्भ सुद्धा गरजेनुसार वापरले जातात… कट कारस्थान रचले जातात. म्हणूनच अनोळखी शत्रूंपेक्षा ओळखीचे शत्रू घातक असतात.
"किल्ल्यामधेच शत्रू पोसून ठेवले मग
मजबूत या तटांचा उपयोग काय सांगा"
किंवा
"वाऱ्यावरी कशाला खोटाच आळ घेता
घरच्याच वादळाने खचले मकान आहे"
हे शेर गृहकलहापुरता मर्यादित ठेवता येत नाहीत. या शेरांची व्यापकता वेगळ्या पद्धतीची आहे. काही महत्त्वाच्या आंतरीक मुद्द्यांवर हे शेर बोट ठेवतात... त्यामुळेच ज्याप्रमाणे जीवनात सजगता महत्वाची आहे ती काव्यातही जपली गेली पाहिजे. 'घरोघरी मातीच्या चुली' अशी म्हण प्रचलित आहे. आपले घर आपण आधी सांभाळले पाहिजे हे सजगतेने हा संग्रह सांगतो. त्याच वेळी तुम्हाला तुमच्या सामाजिक जबाबदाऱ्यांची जाणीव सुद्धा हा संग्रह करून देतो.
'प्रश्न टांगले आभाळाला' या गझल संग्रहा मधील त्यांच्या काही प्रसिद्ध रचना वगळून जर या संग्रहाकडे पाहिले तर खरा 'नितीन देशमुख' आपल्याला आणखी ठळकपणे उजळून दिसतो. मूल्यमापनाचा हा निकष कदाचित चुकीचाही असू शकतो याची मला जाणीव आहे.
"जीव पेरला मातीमध्ये पत्थर छातीवरती
प्रश्न टांगले आभाळाला उत्तर मातीवरती"
त्यांनी प्रश्न जरी आभाळाला टांगले असले तरी या प्रश्नांच्या तळाशी गेलो तर त्यांची नाळ मातीत खोलवर रुजली असल्याचा प्रत्यय या संग्रहात जागोजागी येतो. उदाहरणादाखल त्यांचा एक शेर पहा,
"एवढा ही फार मोठा तू 'नित्या' झालाच नाही
चार मतले चार गजला गर्व वेड्या माजतो का?"
या मक्त्याच्या शेरात 'नित्या' हे संबोधन अत्यंत सूचक आहे. ते मातीशी बांधिलकी सांगते. मित्र परिवारात मित्रांचे नाव घेण्याची एक आपुलकीची वेगळी पद्धत असते. त्याचेच द्योतक हा शेर आहे. 'प्रश्न टांगले आभाळाला…' हा गझल संग्रह वर्तमान कालीन चिंतन मांडतो. नितीन दादांच्या गझलेतून वैदर्भीय गंध येत असला तरी या गझल प्रादेशिक नाहीत तर त्या प्रादेशिक सीमा ओलांडून काळजातून काळजाचा प्रवास करणाऱ्या आहेत.
"मायच्या पोटात होते वाढ केवळ
जन्मल्यावर माणसाची झीज होते…"
असे शेर मराठी गझलेला सर्वांगाने समृद्ध करतात. त्यांच्या शेरांमध्ये खयालांच्या मांडणीतला सूक्ष्मपणा कमालीचा वाखाणण्याजोगा असतो.
"आपण या दुनियेचे होण्यासाठी पाउल टाकू
आपण झालो जगताचे की मग जग होते सखये"
किती सुंदर आणि कल्पक विचारसरणी या शेरात आली आहे. मानवी प्रवृत्तीला विधायक करण्याचे सामर्थ्य त्यांच्या शेरांमध्ये आहे… ते आपल्याला चिकित्सक विचार करायला लावतात. नितीन दादांची गझल सामाजिक भान जपतांना सिस्टीमचा फोलपणा चपखलपणे उघड करते...
"निघतात संसदेतुन गाडी भरून स्वप्ने
रस्त्या मध्येच जाती का विरघळून स्वप्ने"
हा शेर सर्वच राजकीय पुढाऱ्यांना आरसा दाखवतो… त्यांचा सामाजिक आशयाचा असाच एक अप्रतिम शेर पहा...
"मोठा दादा शिकला आणिक घरीच बसला आता
उगाच देते आई माझ्या दप्तर पाठीवरती…"
या शेरातल्या विद्यार्थ्याचा निरागस प्रश्न आपल्या देशाच्या व्यवस्थेला निवृत्तरीत करून टाकणारा आहे. नुकतेच देशात नवीन शैक्षणिक धोरण जाहीर करण्यात आले होते त्या धोरणाला हा शेर गंभीर इशारा आजच देतो आहे. हा शेर बेरोजगारीची सामाजिक समस्या मांडतांना आजच्या शिक्षण पद्धतीमधील मर्यादा स्पष्टपणे मांडतो. नितीन दादांची समाजाकडे पाहण्याची सूक्ष्म निरीक्षण शक्ती अफाट आहे. म्हणून त्याची गझल सामाजिकता मांडतांना अभिव्यक्तीची उंच पातळी गाठते...
"पाहून या विषारी नजरा सभोवताली
बाबा म्हणे कशाला मुलगी वयात आली"
हा शेर आपण कोणत्या समाज व्यवस्थेकडे वाटचाल करत आहोत आपली सामाजिक व्यवस्था कशी ढासळत आहे हे प्रभावीपणे टिपतो. तुम्हाला माणूस म्हणून जगायला भाग पाडतो.
गझल हा वृत्तबद्ध काव्य प्रकार आहे. दोन मिसऱ्यां मध्ये राबता अतिशय महत्त्वाचा असतो. हा कसा निभवायचा याचे आणि कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त मोठा आशय ताकदीने कसा मांडता येऊ शकतो याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे 'प्रश्न टांगले आभाळाला'. तुम्ही आत्मबलाला मजबूत करण्यासाठी अध्यात्माचा सहारा घेऊ शकता बुद्धीला विवेकशील बनवण्यासाठी विज्ञानाचा सहारा घेऊ शकता. "प्रश्न टांगले आभाळाला"तुम्हाला ही दोन्ही अनुभूती देतो. कवी मनाने कलावंत असतो त्याला सारे जगच चित्रमय दिसते शब्दांच्या माध्यमातून तो जिवंत चित्र रसिकांपुढे उभे करतो त्याच्या मनातला चित्रकार अशावेळी जागा होतो रंगाऐवजी शब्दातून तो चित्र रेखाटतो…
"कारणे मजबूत होती मी तुझ्यावर भाळण्याची
एवढ्या सुंदर फुलाला सांग कोणी टाळतो का"
म्हणूनच इतके सहज शेर काळजात घर करतात. ह्या संग्रहातील प्रत्येक गझल नितीन दादांच्या मनाचा मोठेपणा अधोरेखित करते. हा मोठेपणा इतका प्रभावी आहे की, त्याला वेगळ्या पद्धतीने सांगण्याची आवश्यकताच उरत नाही याचे मला भान आहे.
"उलट्या घड्यास सांगा आहे रिता बरा तू
भरल्या घड्यास झाला अभिमान खास हल्ली"
रिते राहण्यातला मोठेपणा त्यांची गझल जपत असल्यामुळे त्यांच्या शेरांमध्ये अहंकाराचा गंध येत नाही. मला वाटते हे एखाद्या साहित्यिकांसाठी अतिशय महत्त्वाची बाब आहे. माणूस हा शेवटी माणूसच असतो. प्रत्येक माणसात गुणदोष आणि मी मीपणा असतोच त्याची प्रामाणिक कबुली सुद्धा त्यांची गझल देते.
"असतात अंश काही अपुल्यात मी पणाचे
असते खरी परीक्षा जयघोष वाढल्यावर"
यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतर माणसाची खरी परीक्षा असते. प्रश्न टांगले आभाळाला हा आभाळाच्या उंचीचा गझल संग्रह असूनही मातीशी नाते सांगणारा आहे. ही या संग्रहाची सर्वात जमेची बाजू आहे. भावसौंदर्या सोबत विचार सौंदर्य त्यांच्या प्रत्येक शेरांमध्ये असते असे म्हटल्यास अतिशयोक्ती नक्कीच होणार नाही… प्रश्न टांगले आभाळाला हा माणसाला वस्तुस्थितीचे दर्शन घडवतो त्याचा पुढील शेर बघा...
"तू उत्खनन कशाला करतोस कायद्यांचे
देशास पारदर्शी जर संविधान आहे"
वरील शब्दांमध्ये प्रत्येक शब्द भावपूर्ण आहे अलंकृत शब्दांची कास न धरताही प्रत्येक शब्द अलंकृत झाला आहे. ही किमया 'प्रश्न टांगले आभाळाला' आणखी प्रवाही बनवते. माणसाच्या अनेक अव्यक्त भावना आणि वेदना प्रभावीपणे या संग्रहात नितीन दादांनी मांडल्या आहेत.
"ती म्हणाली नेहमी तुज हासताना पाहु दे
मी 'नितिन' कोठून आणू हासणारा सारखा"
आणि
टांगली बातमी हवेला कुणी
कुजबुजू लागले गाववाले नितिन
दोन मनांची एकरूपता मांडताना नितीन दादांचे शेर प्रेमातल्या भावनाच्या विविध पैलूंना हात घालतात. "प्रश्न टांगले आभाळाला"या गझल संग्रह मध्ये नितीन दादांचे अनेक शेर 'प्रेम' या भावनेला उत्कटपणे मांडतात… प्रेमाचे खरे स्वरूप दाखवताना त्यांच्या शेरांमध्ये सक्ती दिसत नाही तर आसक्ती दिसते. त्यात आक्रमकता दिसत नाही तर आर्तता दिसते. म्हणूनच या संग्रहात प्रेमातील खरी पूर्तता दिसते. त्यात वासनेला थारा नाही. शरीर सौंदर्य मांडण्याच्या पलीकडे मनाचे आंतरिक सौंदर्य हा संग्रह मांडतो. नव्याने मराठी गझल लिहू पाहणाऱ्यांना कोणती जबाबदारी पार पाडायची आहे याचे भान हा गझल संग्रह देतो..
नितीन दादांची गझल वैश्विक आहे तिला संकुचितपणाचा लवलेश नाही. साहित्य क्षेत्रातील राजकारण वगैरे गोष्टीत ती अडकत नाही. "कवितेने गझलेने वा चळवळींनी माणसं जोडली जावी ती दुखावल्या जाऊ नये माणूस केंद्रबिंदू असलेली साधी सोपी सरळ परंतु काव्यात्मकतेने भरलेली अशी कविता असावी"असे प्रामाणिक मत त्यांनी मांडले आहे. समाजातील आधुनिक भोंदूगिरी बद्दल ते म्हणतात,
"चाणाक्ष माणसांनी इतकेच फक्त केले
सोयीनुसार त्यांनी निर्माण भक्त केले"
एखादे श्रद्धास्थान असावे मात्र तुमची श्रद्धा डोळस असावी. हे प्रतिपादन त्यांचा हा शेर करतो. हा शेर साहित्यक्षेत्रातील कंपुगिरी वर सुद्धा अप्रत्यक्षरीत्या बोट ठेवतो. अशा शेरातून त्यांनी कंपुगिरीवर प्रहार केला आहे. साहित्यक्षेत्रातील कंपुगिरी त्यांना मान्य नाही. यामुळे साहित्य क्षेत्राची वाटचाल अधोगती कडे होण्याचा धोका निर्माण होतो.
एखादी साहित्य विधा रचण्यामागे प्रत्येकाची धारणा अतिशय महत्त्वाची असते. जे चलनी आहे ते लिहत बसल्यापेक्षा विचार रुजवून तो फुलवण्याचे मौलिक कार्य हा गझल संग्रह करतो. या संग्रहातील गझल वाचतांना एक विचार प्रक्रिया वाचकांच्या मनात सुरू होते. त्यांचे शेर मंथनातून आल्यामुळे चिंतन करायला भाग पाडतात. आपण जेवढे खोलवर जातो तेवढा नवा अर्थ आपल्याला मिळतो. आशयाचे विविध कंगोरे त्यांच्या शेराला असतात. वेगवेगळ्या वाचकाला वेगवेगळी अनुभूती त्यांचे शेर देतात. त्यामुळेच हा संग्रह बहुआयामी बनला आहे. एक नवा विद्रोह घेऊन हा संग्रह आला आहे.
"लोक दाखवतील तुजला निरनिराळे चेहरे
तू मनाच्या आरशावर प्रेम केले पाहिजे"
मनाच्या आरशावर प्रेम करायला लावणारा हा गझल संग्रह आहे. माणूसपण रुजवण्याचे औदार्य हा संग्रह पार पाडतो. सोप्या शब्दात वाचकांशी संवाद साधतो. शब्द सौंदर्यानी नटलेली सोज्वळ, निर्मळ आणि सुंदर कलाकृती म्हणजे 'प्रश्न टांगले आभाळाला' आहे.
'प्रतिमा पब्लिकेशन पुणे' यांनी हा गझल संग्रह प्रकाशित केला आहे. मुद्रित शोधनाच्या काही किरकोळ बाबी त्यांना टाळता आल्या असत्या. असो संग्रहाला समर्पक मुखपृष्ठ सरदार जाधव यांनी दिले आहे. सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांची पाठराखण या संग्रहाला लाभली आहे. या संग्रहात क्यू आर कोड चा केलेला कल्पक उपयोग अत्यंत आवडला. तंत्रज्ञानाशी सांगड घातल्या गेल्यामुळे नितीन दादांच्या काही रचना यू ट्यूब वर पाहता येतात. रसिकांसाठी ही पर्वणीच आहे.येत्या काळात मराठी साहित्य विश्वात हा प्रयोग रूढ होऊ शकतो. संग्रहातील 'निसटलेले मोती' हा विभाग दर्जेदार झाला आहे. तसेही गझल मधील प्रत्येक सुटा शेर हा स्वतंत्र कविता असतोच. हे एकेक सुटे शेर खूप सुंदर आहेत. त्यापैकी एक शेर बघा...
"मी माझ्या आईच्या पायापाशी असतो
म्हणुन कुणाचा दोष कराया शिकलो नाही"
मराठी साहित्यविश्वातील समीक्षकांनी ह्या संग्रहाची योग्य दखल घ्यावी असे वाटते. केवळ मराठी गझल पुरते मर्यादित या संग्रहाला ठेवता येणार नाही. 'प्रश्न टांगले आभाळाला' मानवी संवेदनांना नव्या पद्धतीने मांडतो. या गझल संग्रहामधील आशयाचा आवाका अत्यंत व्यापक आहे. एका लेखामध्ये तो निश्चितच मांडता येणार नाही. "प्रश्न टांगले आभाळाला"गझल संग्रह मानवतेच्या उद्धारासाठी वाचणार्या प्रत्येक माणसाला एक जबाबदारी सोपवतो. नुसते जबाबदारी सोपवून मोकळे होत नाही तर तुम्हाला ती पार पाडण्याची आंतरिक शक्ती सुद्धा देतो. ती वैश्विक जबाबदारी त्यांच्याच शेरात मांडून मी रजा घेतो...
"मी रक्ताचेच चार नमुने मिसळुन घेतो आता
हिंदू मुस्लिम सिख ईसाई शोधा ज्याचे त्याने"
"प्रश्न टांगले आभाळाला"
गझलकार : नितीन देशमुख
प्रकाशक : प्रतिभा पब्लिकेशन पुणे.
शब्दांकन : ……. निलेश कवडे अकोला मो. 9822367706
प्रतिक्रिया
खुपच छान समिक्षण
खुपच छान समिक्षण
प्रवेशिकेचे स्वागत
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
पाने