नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
हरवलेल्या पोळ्याच्या आठवणी
आपले मातीचे नाते तुटले
हे मान्य करणे शक्य नसते आपल्यासाठी
किती सहज, बदलत गेला काळ
आपण बदललो हे लक्षात न येता.
खुंट्यालगतच्या ट्रॅक्टरचा लळा लागावा
इतकं यंत्रमय होऊन गेलो आपण..
रस्ते सामसूम नसतात कधीही
गोठ्यातल्या जीवघेण्या शांततेसारखे..
बैलगाडीच्या चाकाची गती थांबली तरीही
जीवनाचे कालचक्र आमर्याद वेगाने धावते आहे
रस्त्यांवर कधीही न थांबण्यासाठी...
आठवतो का माणूस भोळा
नात्यांचा झाला चोळामोळा,
खेड्यातील मजुरांची रांग न थांबता
धावत असते शहराकडे
मुंग्यांच्या अखंडित रांगेप्रमाणे
सर्व गाव खेड्यातील संबंध तोडून
माणसासोबतचे आणि प्राण्यांसोबतचेही,
नातलगासारखा बैल हसायचा रडायचा
पोळ्याचा दिवशी सालगड्या सारखा सजायचा
झुल अंगावर धन्याच्या मायेची ओढून...
पूर्वीच्या पोळ्याच्या आठवणी
मारूतीच्या पाराभोवती हरवलेल्या
शिंगाची बेगड, गळ्यातील घुंगुरमाळा
ह्यांचे उमटत राहतात निनाद
विस्मरणाच्या बाजारातून
आता बैल मिरवणुकीत दिसत नाहीत
आता तोरणाखालून बैल चालत नाहीत
वाहनाच्या गजबजलेल्या रस्त्यावरची वर्दळ
देते ग्वाही मातीशी नाळ तुटल्याची
पाळीव प्राण्यांच्या दुधातील घट्टपणावर
ठरते त्यांची उपयुक्तता
बछड्यांची उपासमार पाण्यात मिसळून
निसर्गदत्त मातृत्वाला शापग्रस्त करत...
माणूस प्राणी नाते सैल
कुत्री महाग स्वस्त बैल
शाडूच्या मातीच्या बैलांचे पुजन करावे
म्हणून पर्यावरण संरक्षक करतात आक्रंदन
खपाटीला पोट लागलेल्या खंगलेल्या बैलांच्या
शिंगाला पाटी अडकवून....
हरवला बैलांचा पोळा
विसरला मायेचा मोळा
किरण शिवहर डोंगरदिवे
वॉर्ड न 7 समता नगर मेहकर
ता मेहकर जि बुलडाणा
मोन 7588565576
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे स्वागत
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!