Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......

YFPCL


अधिक माहितीसाठी 
http://yugatma.sharadjoshi.in/  
येथे भेट द्या.



कवितेची जन्मकथा- विठ्ठल वाघ ह्यांची तिफन

लेखनविभाग: 
कवितेचे रसग्रहण

कवितेची जन्मकथा : विठ्ठल वाघ ह्यांची 'तिफन'
कविता हा प्रकार खरं म्हणजे माणसाच्या अगदी बालपणापासून सोबत करत असतो. पाळण्यात अंगाई गीत ऐकत झोपण्यापासून सुरू झालेला हा प्रवास जीवन भर आपल्या कळत न कळत सुरू असतो, कधी कविता कधी गाणी... भाषेचे बंधन नाही... काव्याचा तीळमात्र संबंध नसलेले लोक गावातील भजन ओव्या अभंग ह्यात रममाण होत असतात किंवा बारी ह्यात बेहोष होत गात असतात किंवा दादा कोंडकेच्या गाण्यापासून ते ग्रेसच्या ती गेली तेंव्हा पाऊस निनादत होता किंवा या जन्मावर ह्या जगण्यावर ऐकणारे लोक काव्य प्रेमीच असतात हे समजून घेतले पाहिजे. माझा काव्याचा नेमका संदर्भ कधी आला ते सांगणे कठीण कारण पहिलीत जाण्याच्या आधीही माझ्या कानावर बिनाका गीत माला किंवा जळगाव आकाशवाणी वरील आपली आवड मधील गाणी पडत असत. एखाद्या रविवारी गावाबाहेर वाहणाऱ्या स्वच्छ ओढ्याच्या काठाने कपडे घुण्यासाठी घेऊन बादली, व्हील साबण थोडासा निरमा वॉशिंग पावडर घेऊन दोन तीन लेकरांना घेऊन फिरणाऱ्या कष्टकरी आणि स्वावलंबी लोकांचा तो काळ होता. आमचे वडीलही कधी बधी आमची अशी दिंडी घेऊन निघत त्यावेळी आमच्या तीन भावाच्या पैकी कुणा एकाच्या हातात रेडिओ असे त्यावर बऱ्याच वेळा ऐकलेलं काळ्या मातीत मातीत हे गाणं मनात असच रुतून राहील. इयत्ता 9 वी मध्ये आल्यावर पद्य विभागात ते गाणं कविता म्हणून भेटल आणि विठ्ठल वाघ ह्या माणसाचं नाव माहीत झालं. मराठीला पिंपरकर म्हणून शिक्षक होते ते विठ्ठल वाघ ह्यांच्या बद्दल खूप सांगत. त्याच्या अकोल्याच्या घरावर एका बाजूला विठ्ठल आणि दुसऱ्या बाजूला वाघाचे चित्र आहे असे त्याकाळी ऐकत असे मात्र पुढे वयाचे बंधन विसरून काव्य क्षेत्रातील ही दिग्गज हस्ती माझ्या साठी काव्य प्रांतातील दिशादर्शक मित्र झाली. त्यांच्या घरी बराच वेळा गेलो. बांगड्याच्या काचेच्या तुकड्या पासून तयार झालेला मोर दिसला पण विठ्ठल आणि वाघाचे चित्र काही दिसले नाही.
सरांच्या योद्धा ह्या महत्वाकांक्षी खंडकाव्याची निर्मिती मी थोडीफार जवळून अनुभवली मात्र मला खरी उत्सुकता होती ती काळ्या मातीत मातीत ह्या गाण्याच्या म्हणजेच तिफन ह्या कवितेच्या निर्मितीची जन्मकथा समजून घेण्याची, आणि मग शेवटी सरांना फोन लावला आणि विचारले, "सर तुमच्या एखाद्या कवितेची जन्मकथा सांगा ना मला." अगदी काहीही आढेवेढे न घेता सर बोलले, “तरंग कवितेची गोष्ट आहे अकोला खामगाव रोड वर एका निवांत दुपारी एका तळ्यात एक वाळलेल झाडाचं पान पडलं आणि त्यात तरंग उठले आणि माझ्या मनात ओळ निर्माण झाली सार कसं सामसूम...!" मी सरांना पुन्हा बोललो, "सर तिफन बद्दल सांगा ना काही" त्यावर विठ्ठल वाघांनी जी तिफण ह्या कवितेची जन्मकथा सांगितली ती आवर्जून ऐकण्यासारखी आहे हे निश्चित. विठ्ठल वाघ हे पेशाने प्राध्यापक आणि शेतीमातीचा गंध जाणणारे आणि जपणारे कवी , त्यांचे मेव्हणे मुंबई येथे बँकेत एका मोठ्या पदावर कार्यरत असताना एकदा अकोला जिल्ह्यातील वाशीम (त्या वेळी वाशीम जिल्हा झाला नव्हता तर तो अकोला जिल्ह्यातील एक तालुका होता) भागातील रिसोड ह्या गावी तपासणीसाठी आले. तेंव्हा त्यांनी विठ्ठल वाघांना सोबत चालता का असे विचारले. इतर विशेष काम नाही, आणि बँक अधिकाऱ्यांच्या सोबत एक वेगळा अनुभव येईल म्हणून कवी विठ्ठल वाघ त्यांच्या सोबत गेले. तेथील एका शेतात प्रत्यक्ष फिल्डवर इन्स्पेक्शन साठी गेल्यावर शाखाधिकारी आणि अधिकारी ह्यांच्या कार्यालयीन गप्पा सुरु असताना विठ्ठल वाघ काळ्या मातीचे आणि त्या मातीत राबणाऱ्या कष्टकऱ्यांचे निरीक्षण करत होते. मूळ पिंड शेतीमातीचा आणि हिरव्या राना बद्दल अत्याधिक जिव्हाळा जोपासणारी व्यक्ती शेती मातीत रमणार नाही तर नवलच नाही का ? अशातच मंद वारा आला जवळच कोठेतरी पाऊस पडला होता त्यामुळे भिजलेल्या मातीचा सुगंध दरवळला. बघता बघता एक जोरदार सर समोरच्या रानात कोसळू लागली. मातीची नांगरून ठेवलेली ढेकळ मातीत विरघळू लागली. ज्या ढेकळातून थोड्या वेळा पूर्वी चालतांना ठेच लागली तर रक्त निघावे अशी स्थिती होती तीच ढेकळ भिजल्यामुळे लोण्याप्रमाणे मऊशार झाली आहेत असे कवीमनास वाटू लागले. ही अशी जाणीव होत असतानाच डोळ्यापुढे आपल्या गाव खेड्यात नांगरणी वखरणी करणारा शेतकरी बाप उभा राहिला. बापासोबत लहानपणी शेतात फिरतांना घेतलेला शेतकामाचा अनुभव सजीव होऊ लागला. खरे म्हणजे कोणत्याही कवितेच्या निर्मितीची बीजांकुरे त्या कवीच्या काळजात खूप आधी पेरलेली असतात असे मला नेहमीच वाटत आले आहे. तर धुऱ्या जवळ उभ्या असलेल्या बोरी किंवा बाभळीची झाड त्यांचे शेताच्या कुपाकुपाजवळ पडलेले धारदार तीक्ष्ण काटे, ह्या कुपातून चालणारा नांगर तेंव्हा गावात एकदा ट्रॅक्टर आला तर सारा गाव ट्रॅक्टरने होणारी नांगरणी पाहायला जमा व्हायचा त्यामुळे 99 टक्के नांगरणी ही बैल जोडीच्या मदतीने होत असे, पायात वेदना देत घुसणारे काटे, थकलेले शरीर आणि थकूनही चालत राहणारी बैलजोडी हे सर्व कवीला आठवत गेले असले पाहिजे. आणि हे सर्व कष्ट कशासाठी तर उद्या फुलून येणाऱ्या हिरव्या शेतासाठी, त्या हिरव्या समृद्धीच्या ओढीनं भारतातील शेतकरी पायात टोचणारे काटे, त्या पायांना होणाऱ्या जखमा,त्यातून वाहणारे लाल रक्त ह्या कशाचीही पर्वा न करता कष्ट आणि कष्ट करत राहतो. बरं हे कष्ट तरी किती करायचे ? तर मन आणि भावना मारून फक्त राबत राहायचे. पेरणीच्या दिवशी घरात एखाद्याच मरण झालं तर पेरणी होईस्तोवर प्रेत झाकून पेरणी करण्याचे अनेक उदाहरण आपण वाचतो आणि ऐकतो इतकं भावनाशून्य झाल्याशिवाय हे हिरवे स्वप्न फुलत नाही हेच खरे. अशीच एक भावना म्हणजे मातृत्वाची भावना होय. शेतात आपल्या भिकेला लागलेल्या शंकराला त्याच्या सोबत राबत कष्टत शेतजमीन कसण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या पार्वतीला सर्वात जास्त लळा असतो तो आपल्या लेकराचा ... मात्र ह्या मातीत राबताना स्वतःच मन मारून ती आपल्या लेकराला बाजूला ठेवते त्याच्यासाठी एक झोका बांधून मन त्याच्याकडे शरीर नवऱ्याच्या मागे झुरत असते, झिंजत असते ह्या संकल्पनेला आणखी वेदनेचा गडद रंग देताना कवींनी ही झोळी काटीला म्हणजे बाभळीच्या झाडाला बांधल्याचा उल्लेख केला आहे. बाभूळ म्हणजे काटेरी झुडूप, ज्याचे काटे वेदनादायी असतात आणि महत्वाचे म्हणजे ह्या झाडाची सावलीही पडत नाही. म्हणजे शेवटी ते लेकरू माय पासून दूर उन्हातच असते, फक्त त्या माऊलीला समाधान असते ते त्या पोकळ सावलीचे, ही गडद वेदना शेतीमातीचा रंग आणि गंध ह्या शिवाय कृषक संस्कृती मधील दैन्य, अपार कष्ट, निसर्ग ह्या सगळ्याचा परिपाकातून तिफन कवितेची रुजवण विठ्ठल वाघ ह्यांच्या मनात झाली. वऱ्हाड बोली भाषेतील गोडवा शब्दात उतरला आणि एक अस्सल वऱ्हाडी बाज घेऊन भारतीय शेतकऱ्याच्या दैन्य आणि श्रमिक जीवनाच चित्रण करणारी कविता मूळ वऱ्हाडी भाषेतून पुढील रुपात जन्मास आली.
काया मातीत मातीत तिफन चालते तिफन चालते
ईज नाचते थयथय ढग ढोल वाजवते
तिफन चालते
नंदी बैलाच्या जोळीले सदाशीव हकालते
वटी बांधून पोटाले पाराबती उनारते
वटी पोटाले बांधते झोयी काटीले टांगते
झोयी काटीले टांगते त्यात तानुलं लळते
त्यात तानुल लळते ढग बरसते
तिफन चालते
काकरात बिजवाई जसं हांसर चांदनं
धरतीच्या आंगोपांगी लाळानौसाचं गोंदनं
सरीवर सरी येती माती न्हातीधुती होते
तिचा कस्तुरीचा वास भूल जीवाले पाळते
भूल जीवाले पाळते वाट सांजीले पाहेते
मैना वाटूली पाहेते राघू तिफन हानते
राघू तिफन हानते ढग बरसते
तिफन चालते
वला टाकती तिफन शितू वखर पाहेते
पानी भिजल ढेकूल लोनी पायाले वाटते
काया ढेकलात डोया हिर्व सपन पाहेते
डोया सपन पाहेते काटा पायात रुतते
काटा पायात रुतते, लाल रगत सांडते हिर्व सपन फुलते
हिर्व सपन फुलते ढग बरसते
तिफन चालते
लोकगीताच्या चालीवर आणि वऱ्हाडी बोलीची गोडी, विठ्ठल वाघाच्या पहाडी आवाजातील मार्दव आणि सादरीकरणाची अलौकिक किमया ह्या जोरावर ही कविता लवकरच महाराष्ट्रात सर्वत्र लोकप्रिय झाली. आगळी शब्दकळा, प्रतिभेचा लयबद्ध आविष्कार, जिवंत अनुभव विश्व ह्यामुळे ही कविता ओळखली जाऊ लागली. लोकगीताचा साज आणि लोकलयीचा बाज ह्यामुळे ही कविता शेतकऱ्यांना आणि रसिकांना आपली वाटू लागली. काटीला टांगलेल्या झोयीत रडणार लेकरु, पायात रक्त काढणारा काटा, उन्हा तान्हात शेतात राबणारे शंकर पार्वती सकळ शेतकरी जीवन कासावीस करणारे होते. तर त्याच वेळी काकरात बिजवाई जस हासर चांदण ह्या ओळी शिशिरातील चांदण्याची उधळण करणाऱ्या ठरल्या. कष्टमय जीवनात एकमेकांत गुंतलेले राघू मैनाची जोडी वाघांनी अजरामर केली. विदर्भातील वातावरण विदर्भातील प्रतीक, प्रतिमा अश्यामुळे विदर्भातील शेतकरी दाम्पत्य समोर उभे राहत असले तरी ह्या कवितेतील दुःख हे संपूर्ण भारतीय शेतकऱ्यांचे होते.. मुंशी प्रेमचंद ह्यांच्या गोदान मधील होरी ह्या शेतकऱ्यांपासून साहेबराव करपे ह्या 19 मार्च 1986 रोजी शेतकऱ्यांची आत्महत्या म्हणून नोंद झालेल्या विदर्भातील।शेतकऱ्यांचे जीवघेणे दुःख ह्या कवितेतून विठ्ठल वाघ ह्यांनी मांडले. असं काहून होत अशीन साहेबराव ह्या कवितेतून शेतकरी आत्महत्येवर बोलत उघडपणे समाज, शासन ह्या व्यवस्थेवर निर्भीडपणे कोरडा ओढण्याचे कामही पुढे विठ्ठल वाघांनी केले. 1981 मध्ये प्रकाशित अरे संसार संसार ह्या चित्रपटात अशोक सराफ, रंजना, कुलदीप पवार, मोहन गोखले, रिमा लागू अशी तगडी अभिनय जुगलबंदी मराठी सिनेरसिकांनी अनुभवली संगीतकार अनिल अरुण ह्यांनी संगीतबद्ध केलेले राजा ललकारी अशी घे किंवा विठू माऊली तू माऊली जगाच्या अश्या अविस्मरणीय आणि अप्रतिम गण्यासह लोकांना सर्वात जास्त आवडले ते गाणे म्हणजे काळ्या मातीत मातीत तिफन चालते हे होय. अकोल्यातून देवकीनंदन गोपाला हा श्रीराम लागू अभिनीत गाडगेबाबा ह्यांच्या जीवनावरील निर्मिती डॅडी देशमुख ह्यांची, त्यांच्या सोबत अर्थात विठ्ठल वाघ होतेच, राजदत्त ह्यांनी दिग्दर्शित केलेल्या ह्या चित्रपटाचे काही हिशेब नेऊन देण्यासाठी विठ्ठल वाघ मुंबईला राजदत्त ह्यांच्याकडे गेले. त्यावेळी ते पुणे येथे गेल्याचे समजले तेंव्हा राजदत्त ह्यांना भेटायला म्हणून ते पुण्याला गेले. विठ्ठल वाघ गेले तेंव्हा राजदत्त आणि प्रसिद्ध ग्रामीण कथाकार शंकर पाटील ह्यांची चर्चा सुरू होती. अरे संसार संसार चित्रपटाचे लिखाण सुरू होते. त्यांच्यासाठी हा एक महत्वाकांक्षी चित्रपट होता. विठ्ठल वाघांना दत्ताजी (राजदत्त) ह्यांनी, "वाघ सर, तुमची काळ्या मातीत ऐकवा एकदा पाटलांना कुठ adjust झाली तर पाहू." असे म्हणून कविता गायला लावली. सर्व महाराष्ट्राला भुरळ पाडणारी ती कविता शंकर पाटलांनी शांतपणे ऐकली आणि ते उद्गारले, 'अरे बाबा, हे गाणं तर ह्या चित्रपटाचं थीम सॉंग होईल, अगदी ह्या चित्रपटाचा आत्मा होईल हा, पण एक अडचण अशी आहे की ही कविता आहे वऱ्हाडी आणि आपल्या चित्रपटाची पार्श्वभूमी आहे कोल्हापुरी..." त्यावर राजदत्त ह्यांना विठ्ठल वाघ ह्यांची, त्यांच्या प्रतिभेची आणि बोलीभाषेच्या अभ्यासाची जाणीव असल्यामुळे ते अगदी सहज बोलले , "मग, त्यात काय अवघड वाघ सर तुम्हाला ह्यांचे व्याकरण दृष्ट्या कोल्हापुरी भाषेत रूपांतर करून देतील." त्यानंतर संपूर्ण कोल्हापुरी बाजाचे काळ्या मातीत मातीत असे रूपांतर विठ्ठल वाघ ह्यांनी तयार केले आज बहुतांश ठिकाणी मी वर दिलेली मूळ कविता अनेकांना माहितीही नसल्याने पुढील काव्यच लोकांना मूळ काव्य आहे असे वाटते.
काळ्या मातीत मातीत तिफन चालते
ईज थयथय नाचते ढग ढोल वाजवितो
सदाशिव हाकारतो नंदी बैलाच्या जोडीला
संग पारवती चाले ओटी बांधून पोटाला
सरीवर सरी येती माती न्हातीधुती होते
कस्तुरीच्या सुवासानं भूल जिवाला पडते
भूल जिवाला पडते वाट राघूची पाहते
राघू तिफन हाणतो मैना वाटुली पाहते
झोळी झाडाला टांगून राबराबते माउली
तिथं झोळीतल्या जीवा व्हते पारखी साउली
अभिषेकात घामाच्या आसं देवाचं पूजन
पिकं हालती डोलती जनू करती भजन
गव्हां-जोंधळ्यात तवा सोनंचांदी लकाकते
जशी चांदी लकाकते कपाशी फुलते
चालं ऊनपावसाचा पाठशिवणीचा खेळ
लोनी पायाला वाटती मऊ भिजली ढेकळं
काळ्या ढेकळात डोळा हिर्वं सपान पाहतो
डोळा सपान पाहतो काटा पायांत रुततो
काटा पायांत रुतता लाल रगात सांडतं
लाल रगात सांडतं हिर्वं सपान फुलतं

सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल ह्यांनी स्वरबद्ध केलेल्या ह्या गाण्याला संगीतबद्ध करण्या आधी संगीतकार अनिल अरुण ह्यांनी राजदत्त ह्यांच्या सांगण्यावर विठ्ठल वाघ ह्यांच्या कडून हे काव्यगायन प्रत्यक्ष ऐकले आणि विठ्ठल वाघांनी लावलेल्या चालीची गती थोडी धीमी करत चाल कायम ठेवली. म्हणजे रूढार्थाने ह्या कवितेचे, गाण्याचे, आणि चालीची सर्वस्वी श्रेय विठ्ठल वाघांनाच जाते असे म्हणावे लागेल. ह्या गाण्यामुळे कुलदीप पवार, अशोक सराफ अश्या अभिनेत्यांच्या छान, फार छान अश्या प्रतिक्रिया त्यावेळी विठ्ठल वाघांना मिळाल्या एका कवितेसाठी हा त्या काळात फार मोठा आदर होता. पुढे राघू मैना साठी विठ्ठल वाघांनी गीत लेखन केल्यावर त्या चित्रपटात नाना पाटेकर, अशोक सराफ, निळू फुले ही स्टार कास्ट दिसली. आपल्या एका मुलाखतीत आपल्या गायलेल्या गाण्यात आपले आवडते गाणे काळ्या मातीत मातीत आहे असे जेष्ठ गायिका अनुराधा पौडवाल ह्यांनी आवर्जून सांगितले. शेती आणि माती मधील सृजनशील काव्याची निर्मितीसाठी विठ्ठल वाघ ह्यांची कविता ओळखली जाते आणि त्यातही काळ्या मातीत मातीतचा क्रमांक फार वरच आहे हे निश्चित. सरीवर सरी येती माती न्हाती धुती होते ही संकल्पना कवीला रिसोड सारख्या ग्रामीण भागात फिरताना होते, तर सदाशिव हाकालते नंदी बैलाच्या जोडीले, किंवा पराबती ऊनारते ह्यासाठी शेतात राबणारे मायबाप आणि मनावर गडदपणे बिंबविलेल्या संस्कृतीतील भोळा आणि गरीब समजला जाणारा शंकर हा देव आणि त्याला त्याही परिस्थितीत साथ देणारी पार्वती ह्यांची प्रतिमा आठवावी लागते. कधी सर्व भावना बाजूला ठेऊन अगदी लेकराला बाभळीला झोका बांधून ठेवणारी शेतकऱ्यांची बायको समोर येते. तर कधी आपलाच पाय काट्यामुळे रक्तबंबाळ झाल्याची सल ओली करावी लागते. शेतातील बियाण्याकडे पाहताना शिशिरातील प्रसन्न चांदणे आठवावे तर भिजल्या मातीच्या सुगंधाने कस्तुरीचा भास व्हावा. भिजलेल्या ढेकलात लोणी आठवावे आणि धरतीवर हिरवे पीक वाढणे म्हणजे धरतीन अंगावर काढलेल गोंदण म्हणणे, ह्या गोंदणाची सर आज मशिनच्या आधारे अंगावर काढलेल्या टॅटू ला येऊ शकत नाही किंवा ट्रॅक्टरच्या आधारे होणाऱ्या नांगरणी वखरणीला सर्जा राज्याच्या संगे मायेने लागणारा लळा आढळत नाही. कालानुरूप शेतीच्या अनेक संदर्भात बदल झालेत मात्र बदलले नाही ते शेतकऱ्यांचे जीवन, त्याच्या जीवनातील दैन्य, त्याच्या जीवनातील अपार आणि कवडीमोल ठरणारे कष्ट.... काहीच बदलले नाही का? होय बदलले पण बदलले फक्त एकच... आधी निसर्गाचा हा पुजारी जीवात जीव आहे तोवर कष्ट आणि दैन्य उपसत परिस्थितीशी लढायला आता तो मनाने इतका खचत चालला आहे की कीटक नाशकांचा वापर तो पिकांतील किड्याना मारण्यासाठी कमी आणि स्वतःचे जीवन संपविण्यासाठी जास्त करू लागला आहे. ह्याला आपण सर्व ह्या व्यवस्थेचे घटक म्हणून जबाबदार आहोत असे मला वाटते. विठ्ठल वाघाच्या तिफन कवितेचे गारुड आजही मराठी मनावर कायम आहे ह्याचा सर्वार्थाने मराठी कवी म्हणून आनंद होत असताना विठ्ठल वाघांनी मांडलेले शेतकऱ्यांच्या जीवनातील दैन्य आज तीन तप उलटूनही जसेच्या तसे आहेत ह्याची आंतरिक सलही मनात आहे हे नमूद करणे गरजेचे वाटतेच.

किरण शिवहर डोंगरदिवे
वॉर्ड न 7, समता नगर मेहकर
ता मेहकर जि बुलडाणा पिन 443301
मोबा 7588565576

Share

प्रतिक्रिया