Raosaheb Jadhav
updates its status
December 31, 2019 at 06:29pm
*कॅलेंडर...*
खरे तर असतो उभा मी
जुन्या-नव्याच्या सीमेवर
सरत्या वर्षाच्या शेवटी
आणि नव्या वर्षाच्या सुरुवातीला
पुन्हा एकदा...
आठवणींची साठवण केलेल्या,
हुकल्या-हुकवल्या,
टळल्या-टाळल्या
पूर्ण-अपूर्ण काही क्षणांसाहित
हिशोबाचे गणित जुळवण्यासाठी
सोबत घेतलेल्या तारीख,
वार, दिनांकांच्या नोंदी
अंगाखांद्यावर खेळवणाऱ्या
कॅलेंडरची तग धरून राहिलेली काही पाने
नजरेआड करत,
जेव्हा टांगतो खिळ्याला नवे कॅलेंडर
तेव्हाही असतो उभा मी
जुन्या नव्याच्या सीमेवर
पुढील काही दिवस, आठवडे
कदाचित महिनेही...
जे सोडू शकत नाही
तारखेसोबत लिहिताना जुना वर्षांक
सोबत असतानाही नव्याची...
वाढत राहतो गुंता कितीतरी काळ
जुन्या कॅलेंडरबाबतचा,
ज्याने सजवलेला असतो कोपरा घराचा
कोपरा मनाचा होत जाताना,
जो विकावा मूल्यहीन रद्दीच्या भावात
की जपावा मूल्यवान आठवणींचे गाठोडे म्हणून?
की लोटावा कचरा म्हणून स्वतःच,
इतरांनी कचरा समजण्याआधी?
होत नाही निर्णय...
आज पुन्हा एकदा
नवे कॅलेंडर टांगून खिळ्याला
चाळतोय मी पाने जुनी
काही चुकून सुटून जाऊ नये
या भीतीपायी
राहून उभा भिंतीलगत....
......
....
...
..
.
*^रावसाहेब जाधव^*