नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
*तुमी गेल्यावर*
तुमी गेल्यावर
सावरलं मन
कापुस वेचता
व्याकुळलं मन
काळं सोयाबीन
आलं सोंगवण्या
कोणा सांगू आता
तुमच्या कहाण्या
ज्वारीच्या रानात
ऐकू ये ती हाक
तवा म्हणे तुमी
नीट छाती झाक
फवारता पीक
आठवली शिक
सावकार लोकं
मांग म्हणे भिक
पोरं पोरी म्हणे
माय रडू नको
दिनरात राबू
बैलं विकू नको
सासरा चुलता
पाहून हसते
हाणते आउत
आभाळ भरते
तुमी म्हणे तवा
शेती नाई विकू
खालच्या डुंगीत
लावू म्हणे चिकू
घरी दारी तुमी
आठवता लय
आरसा नेहमी
नांगरते सय
न्हालेल्या केसांना
आता बांधू कसे
रोज डोळ्याना ये
पावसाचे ठसे
वेणीच येईना
फुलं गळतात
शेजारीन बाया
रोज हसतात
आता तुमी गेला
रूते पायी काटा
रोज वावरात
दिसे जून्या वाटा
कळा अंगभर
विझल्या वाती
मरणाच्या काठी
उभी मी एकटी.
- आशिष वरघणे
रा. सिरूड त. हिंगणघाट जि.वर्धा
मो. ९३५९६७९०९३
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!