नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


   पाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण

    दिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९  
    स्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद

    अग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा. 
    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

(बालकविता)...

(बालकविता)
बुद्धी दे...

आमच्या हिरव्या मळ्यात बाप्पा,
हळूहळू ये
आसनावर या आराशीतल्या,
विसावा तू घे ...धृ...

गाडीबीडी नको आणू
चिखलात जाईल फसून
शेवटी तुला उंदरावरच
यावे लागेल बसून...
वाट इथली बारीकशी
चालायाचे हाल
उंदरालाही सांग बाप्पा
सांभाळून चाल...
वाटेत कुठे थांबू नको
वेळेआधी ये...१...

डोंगर केले मोठेमोठे
झाडे लावली छान
निघते अन डोंगरावरून
नदी एक लहान...
माळा केल्या फुलांच्या बा,
बल्ब लावले चार
रस्तेबिस्ते करताकरता
दमून गेलो फार...
उजेडाला वीज मात्र
सोबत घेऊन ये...२...

मनातलं गुपित एक
सांगायचंय तुला
लहान आम्हा मुलांची
पाहून घे कला...
टॉवर केले मोबाईलचे
डोंगरावरती दोन
मोठ्या तुझ्या कानांना
केवढा लागेल फोन!...
अभ्यासाचे नको पुस्तक
सुट्टी काढून ये...३...

लाडू देऊ, मोदक देऊ
आणि देऊ दुर्वा
मात्र ठेव मळा आमचा
हसरा आणि हिरवा...
नाचू, गाऊ, आरती करू
खेळ सुद्धा खेळू
एक होऊ, एक राहू
शिस्त सारे पाळू...
धांगडधिंगा घालणाऱ्यांना
मात्र जरा बुद्धी दे...४...

*रावसाहेब जाधव*
महालक्ष्मी नगर, चांदवड,
जि. नाशिक 423101
9422321596

Share