नमस्कार ! बळीराजावर आपले स्वागत आहे.


   पाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण

    दिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९  
    स्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद

    अग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा. 
    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

शेतीला लुटण्यासाठी शस्त्र पाजवणे म्हणजे दिवाळी?

गंगाधर मुटे's picture
शेतीला लुटण्यासाठी शस्त्र पाजवणे म्हणजे दिवाळी?

आयुष्यभर संसारात "दिवे" नाही लावता आले,
मग आजच भरमसाठ पणत्या लावल्याने
असा कोणता प्रकाश पडणार आहे?
प्रपंच्याच्या रहाटगाडग्यात "उजेड" नाही पाडता आला,
मग आजच भरमसाठ फ़टाके फ़ोडल्याने
असा कोणता गगनचुंबी "उजेड" पडणार आहे?

लक्ष्मीपुजनाचे विचारताय?
मग ऐका,
आता माझ्या घरात असलेली लक्ष्मी
"बॅंकेच्या मालकीची" आहे.
तीची पूजा केली काय नाही काय,
तिलाही तसा काय फ़रक पडणार आहे?
तिचा "मालक" तिची पूजा करेलच की!
शिवाय
माझ्यावाचून लक्ष्मीचे तरी
कधी काही अडले आहे काय?

आणि तरीही मला
"लक्ष्मीपूजन" करावेसे वाटते, पण;
माझे दैवत माझे श्रम आहे
आणि
लक्ष्मीदेवीला "श्रमाच्या घामावर" किंवा
"घामाच्या श्रमावर" प्रसन्न व्हायची
भलतीच अ‍ॅलर्जी दिसतेय.

* * *
बळीला पाताळात गाडल्याचा आनंदोत्सव साजरा करणे म्हणजे दिवाळी!
बरोबर?
वर्षभर शेतीला लुटून मिळवलेल्या "संचयाची" पूजा करणे म्हणजे दिवाळी!!
बरोबर??
नव्या खातेवहीची औपचारीक पूजा करून नव्या दमाने
शेतीला लुटण्यासाठी शस्त्र पाजवणे म्हणजे दिवाळी!!!
बरोबर???
शेतकर्‍याच्या कमरेला धडूतही शिल्लक राहाणार नाही,
अशा सरकारी धोरणांच्या हिरिरीने अमलबजावणीसाठी
लक्ष्मीपुत्रांनी मांडलेले प्रदर्शन म्हणजे दिवाळी!!!!
बरोबर????
* * *
बळीराजाच्या डोक्यावर यंदा निसर्गानेच "फ़ुलझड्या" चेतवल्यात
आणि
सरकार बळीराजाच्या बुडाखाली "फ़टाके" फ़ोडायला निघालंय.
* * *

गरिबीचा क्षय म्हणून 
गळफासाला अभय
भाजल्या कोंबडीला कुठे उरते 
विस्तवाचे भय?

तुमचे तुम्ही लावा दिवे आणि करा आरास
आम्ही शोधतोय उकिरड्यावर लेकरांसाठी घास
तसं हे आमचं बारमाही गार्‍हाणं
खणखणीत नसते कधीच नशीबाचं नाणं
सरून गेल्या आशा
मरून गेल्या इच्छा
तरीही मात्र म्हणावेच लागते....
.
.
.
सर्वांना दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा.......!!!!!!!!!!

                                                                 - गंगाधर मुटे 'अभय'
**********************************************************************

Share

प्रतिक्रिया

 • vinayak kadam's picture
  vinayak kadam
  मंगळ, 28/10/2014 - 21:49. वाजता प्रकाशित केले.

  मुटे साहेब कविता वाचल्यावर लक्ष्मीपुजण करु वाटले नाही हो.


 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  मंगळ, 28/10/2014 - 22:17. वाजता प्रकाशित केले.

  यंदा काही भागात भयावह स्थिती आहे हो.
  लक्ष्मीच नाही तर काय दगडाचे पुजन करणार? Sad

  शेतकरी तितुका एक एक!


 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  सोम, 05/11/2018 - 19:24. वाजता प्रकाशित केले.

  !!!! #विनोदाचावार_सोमवार !!!!

  फेसबुकवरील तमाम फुसक्या फटाक्यांना, चकव्या चकऱ्यांना, फॅन्सी फुलझाड्यांना, विनाबारुदीच्या टिकल्यांना, बिनावातीच्या सुतळी बॉम्बाना, गगनभेदी रॉकेटांना आणि मिणमिणत्या आकाश कंदिलांना दीपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

  © गंगाधर मुटे

  शेतकरी तितुका एक एक!


 • गंगाधर मुटे's picture
  गंगाधर मुटे
  मंगळ, 06/11/2018 - 11:56. वाजता प्रकाशित केले.

  शेतकरी तितुका एक एक!