नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
विषय : विश्वस्तरीय - आंतरजाल लेखन स्पर्धा २०१६
गद्यलेखन स्पर्धा – विभाग :- ड) मागोवा
प्रती,
श्री. गंगाधर मुटे,
संस्थापक अध्यक्ष
अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ
नमस्कार,
दुसरे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन दिनांक २०-२१ फेब्रुवारी २०१६ रोजी नागपूर येथे अतिशय झोकात आणि उत्साहात पार पडले ह्यात शंकाच नाही. तुमचे, तसेच सर्व सहकाऱ्यांचे मी रविंद्र कामठे हार्दिक अभिनंदन करतो. तुमचे करावे तितके कौतुक थोडेच आहे. सर्वांची नावे घेणे योग्य नसल्यामुळे माझा हा अभिप्राय सर्वांपर्यंत पोहचवावा ही अपेक्षा.
हा सलग दुसरा साहित्य सोहळा म्हणजे शेतकरीवर्गासाठी व सर्वसामन्य माणसासाठी शेतकरी साहित्याची एक पर्वणीच होती असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
माझ्यासारख्या शहरी माणसाच्या नजरेतून मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचा घेतलेला हा मागोवा..........
जेष्ठ साहित्यिक, जेष्ठ पत्रकार आणि शेतीतज्ञ ह्यांची अध्यक्ष, प्रमुख अतिथी आणि उद्घाटक लाभणे ह्यातच ह्या संमेलनाचे यश दिसून येते. मान्यवरांनी ह्या निमित्ताने मांडलेले विचार अतिशय प्रगल्भ होते व सर्वसामन्य माणसाला विचार करायला लावणारे तर होतेच तसेच अतिशय मार्गदर्शक असे होते.
ह्या संमेलनात – आपण प्रकाशित केलेली पुस्तके – मा. शरद जोशी विशेषांक “शेतकऱ्यांचा सूर्य”, गंगाधर मुटे लिखित काव्यसंग्रह – “नागपुरी तडका”, व प्रातिनिधिक शेतकरी काव्यसंग्रह – “कणसातील माणसं”, हे सर्वसामान्य माणसासाठी साहित्यक मेजवानीच म्हणावे लागेल. शेतकरी साहित्य चळवळीच्या अथक परिश्रमाचे झालेले हे चीजच आहे. संमेलनाचे बोधचिन्ह – नांगराच्या फाळाला लावलेली लेखणी त्याचेच हे फलित आहे असे मला जाणवले.
ह्या संमेलनाची आणखी एक जमेची बाजू म्हणजे, आपण आयोजित केलेल्या वेगवेगळ्या विषयांवरील परिसंवाद हे होत. उदा. आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि शासकीय धोरण | मराठी साहित्यावर शेतकरी चळवळीचा प्रभाव | शेतकरी आत्महत्या; कारणे व उपाय | शेतकरी आत्महत्या पत्रकारितेच्या नजरेतून | शेतीसाहित्यातील ग्रामीण स्त्रीचे स्थान. सर्वच परिसंवाद उल्लेखनीय झाले. वक्ते, विचारवंत तसेच त्या त्या विषयातील तज्ञांनी मांडलेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा, त्यांचे प्रश्न, सरकारचे धोरण, निसर्गाचे कालचक्र, शेतकऱ्यांचे अर्थकारण, त्यावर चालणारे राजकारण, विविध कारणे मीमांसा, उपाय व सर्वात कळीचा विषय म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या, ह्यावर झालेली चर्चा अगदी संयुक्तिक तर होतीच पण मार्गदर्शक होती व पुढील वाटचालीस प्रेरक अशीच होती.
शेतीकरी गझल मुशायरा आणि शेतीकरी कवी संमेलन ... हा प्रयोग म्हणजे मनोरंजांतून विचार मंथन असाच वाटला. एका पेक्षा एक उत्तोमोत्तम गझलांचे व कवितांचे सादरीकरण, शेतकरी ह्या विषयवरील साहित्याने घेतलेली दखल खूप काही सांगून जाते. प्रचलित कवी आणि नवोदित कवी ह्याची अतिशय उत्तम सांगड आपण ह्या निमित्ताने घालून एक नवीन पायंडा घालून दिलात त्यासाठी आपले आभार. भविष्यात शेतकरी दुर्लक्षित राहणार नाही ह्याची ग्वाही ही कवी मंडळी देऊन जातात, कारण आजवरचा सिद्धांत आहे की काव्यात जी ताकद आहे ती कुढल्याही शस्त्रात नाही.
“तुला कसला नवरा हवा” ही नाटिका तर मनोरंजांतून उपस्थितांच्या डोळ्यात अंजन घालणारी होती. शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न, त्यांच्यावर चाललेले राजकारण आणि शेतकऱ्यांच्या भावी पिढ्यांच्या मनातली तळमळ ज्या प्रगल्भतेने व्यक्त केली गेली त्या सर्व कलाकारांचे, दिग्दर्शकाचे आणि लेखाचे मन:पूर्वक अभिनंदन. एक अभिनव असा हा प्रयोग. अतिशय संयुंक्तिक वातावरणात आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे विशेष कौतुक आणि आभार.
आपण मला ह्या संमेलनास आमंत्रित करून जो काही मान-सन्मान दिलात, तसेच मला शेतकरी कवी संमेलनात माझी “हक्क जगण्याचे वंचित होते” ही कविता सादर करण्याची संधी व त्या कवितेस आंतरजाल स्पर्धेत – पद्यकविता सदरात –मानपत्र देऊन पुरस्कृत केलेत आणि माझ्या सहा कविता आपण “कणसातील माणसं, ह्या प्रातिनिधिक शेतकरी काव्यसंग्रहामध्ये समाविष्ट करून मला साहित्यिक प्रतिष्ठा देऊन उपकृत केलेत, ह्या साठी मी आपला खूप खूप आभारी व ऋणी आहे.
मला स्वत:ला हे संमेलन खूप काही देऊन आणि शिकवून गेले. खूप सारे शेतकरी, साहित्यिक आणि कवी मित्र मिळाले व शेतकरी साहित्य चळवळीशी स्नेह्बद्ध होऊन धन्य जाहलो.
खासकरून मुटेसर मला तुमचा खूप अभिमान आहे. मी तुमचे फार कौतुक करतो आहे असे वाटेल पण त्याला इलाज नाही. तुमच्या सारख्या एक शेतकऱ्याने अशी एक साहित्य चळवळ चालवावी आणि भल्या भल्यांना तोंडात बोटे घालयला लावेल अशी त्याची योजना, आखणी, नियोजन व संमेलन, सलग दुसऱ्यांदा घडवून सहज यशस्वी करून दाखवावे ह्याला तोड नाही. निंदक तर असावेतच पण समर्थकही असले की पुढील कार्यास नवे बळ आणि उमेद मिळते असे मला वाटते. दोन दिवस फक्त शेती, शेतकरी आणि शेतकऱ्यांचे विषय आजवर आयुष्यात कधी अनुभवलेच नव्हते, ते ह्या शेतकरी साहित्य संमेलनामुळे अनुभवले आणि कृतकृत्य झालो.
जसा आपला एक घास सीमेवरील जवानांसाठी अडतो तसाच आपल्या ह्या शेतकरी बांधवांसाठीही अडला पाहिजे ह्याची जाणीव प्रकर्षाने आज मला झाली.
हीच ह्या संमेलनाची फलश्रुती आहे.
मी पाहिलेही शेतकरी साहित्य संमेलन अनुभवले आहे. त्यामुळेच आपल्या ह्या अतिशय संवेदनशील उपक्रमास एक कवी म्हणून जोडलो गेलो आहे हे अगदी स्पष्टपणे नमूद करतो.
कवी होण्याआधी मी एक संवेदनशील माणूस आहे व भारताचा सुजाण नागरिक आहे. भारत मुख्यत्वे शेतीप्रधान देश समजला जातो परंतु ह्याच भारतात शेती विषयावर जो तो आपापल्या सोयीनुसार बोलत असतो व लिहित असतो. त्यामुळेच मला माझ्या ह्या विषयातील शिथिल झालेल्या संवेदनांना जागे करण्याची एक संधी आपल्या शेतकरी साहित्य संमेलनामुळे मिळाली असे प्रकर्षाने जाणवले.
दोनही शेतकरी साहित्य संमेलनाचा आढावा घ्यायचा झाला तर सध्या ऐरणीवर असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचाच विषय व त्या संदर्भातील विविध विषयांवरील चर्चा, कारणे, उपाय इत्यादी गोष्टींवर खूप सखोल परिसंवाद झाले व ते होतही राहीतील त्यात शंकाच नाही.
आपल्या ह्या संमेलनाची वाटचाल तसेच शेतकरी संघटनेने शेतकरी चळवळीचे रुजवलेले बीज व संघटनेचे प्रणेते आदरणीय कै. श्री. शरद जोशींचे शेतीविषयक अर्थशास्त्र अगदी योग्य दिशेने मार्गक्रमण करत आहे ह्यात वादच नाही. संमेलनाची उपलब्धी म्हणालात तर आपण शेती आणि शेतकरी ह्यांच्या विषयातील खूप सारे प्रश्न शोधून काढले व ते सर्वसामन्य माणसे, साहित्यिक तसेच माध्यमापर्यंत पोहचवण्याचे अतिशय उपयुक्त असे कार्यही केले आहे. त्यास तोड नाही.
परंतु, प्रश्न हे नेहमीच आपल्याबरोबर त्याचे उत्तर घेवून येतात व ती उत्तरे आपल्याला शोधावी लागतात हे आता आपल्याला सगळ्यांना जाणीवपूर्वक प्रयत्नांमधून समोर आणावयाचे आहे. माझ्या मते हे कार्य आपले मराठी शेतकरी साहित्य संमेलन नक्कीच अतिशय प्रगल्भपणे व सचोटीने करू शकेल असे मला वाटते.
मी काही शेती आणि शेतकरी विषयातील फार मोठा अभ्यासक अथवा तज्ञ, किंव्हा साहित्यिक नाही, तरीही जेंव्हा दोन दिवस वेगवेगळ्या विषयांवरील चर्चासत्र आणि परिसंवाद अतिशय प्रामाणिकपणे ऐकतो तेंव्हा माझ्या मनातल्या खोलवर दडलेल्या संवेदना जाग्या होतात आणि माझ्या लेखणीला त्याचा मागोवा घेण्यास भाग पाडतात.
आपला शेतकरीवर्ग हा अतिशय भावनिक आहे. त्याला सध्याच्या काळात सहानभूती अथवा मदतीची अपेक्षा अजिबात नाही. तो फक्त त्याच्या हक्कासाठी लढतो आहे आणि त्यातच त्याची गळचेपी विविध मार्गांनी सरकारी वल्गनांनी व योजनांनी केली जात आहे. प्रत्यक्षात त्याच्या पदरी फक्त निराशाच पडते आहे. त्यावर बदलेले निसर्गचक्र त्याच्या आर्थिक व उत्पादित क्षेत्रावर घाला घालून त्याचे कंबरडे मोडते आहे असे मला वाटते.
मुळात शेतकरी हा जरी वंचित असला तरी तो त्याच्या क्षेत्रात अगदी निष्णांत आहे म्हणूनच आजवर आपण गेले हजारोवर्षे रोज दोन वेळेचे अन्न खाऊ शकतो. ह्याची जाणीव त्याला स्वत:ला नाही हीच खरी खंत आहे. तेच काम आपले हे शेतकरी साहित्य संमेलन करून देत आहे. हेच तर खरे ह्या संमेलनाचे फलित आहे असे मला अगदी प्रकर्षाने वाटते.
ह्या दोन वर्षात शेतकरी संमेलनाने एक वेगळी दिशाच मार्गक्रमित केली आहे असे वाटते, त्याचे कारण ह्या संमेलनाशी जोडल्या गेलेल्या विविध क्षेत्रांमधील जाणकार व तज्ञ मंडळी आहेत. तरीही अजून खूप काही करावायचे व साध्य करायचे बाकी आहे असे मला ह्या निमित्ताने येथे नमूद करावेसे वाटते आणि आपणही माझ्या मताशी सहमत असाल असे वाटते.
शेतकरी साहित्य संमेलन हे बहुरंगी, बहुआयामी व बहुक्षेत्रीय असावे असे वाटते. एकंदरीत कुठल्याही योजनेस जर अल्पसंतुष्टपणा आला तर ती संकल्पना नष्ट होते आणि हे होऊ नये म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रातील विचारवंतांचे विचार, मते अथवा सूचना लक्षात घेऊन पुढील मार्गक्रम आखावा असे व्यवस्थापन शास्त्र सांगते. अर्थात आपण अल्पसंतुष्ट आहात किंव्हा ह्याचा विचार केला नाही असे मला म्हणावयाचे नाही.
जर आपण शेती हा एक व्यवसाय आहे असे ठरवले व त्यानुसार कुठल्याही व्यवसायास लागणारे शास्त्रोक्त व्यवस्थापन त्यास जोडले तर मिळणारे निकाल हे निश्चितच समाधानकारक असतात असे जगभर सिद्ध झाले आहे. सध्याच्या युगात पारंपारिक शेतीस आता आधुनिक शेतीची जोड मिळाली आहे. त्यानुसार आपल्या संमेलनात त्याचा विचार होऊन त्यासंदर्भातील सखोल माहिती आणि अभ्यासवर्ग समाविष्ट करण्याची तसेच शेतीमधील तज्ञ व विचारवंतांची गरज आपल्या आहे. हे शेतकरी साहित्य संमेलन अजून व्यापक तसेच सर्वसमावेशक कसे करता येईल ह्या दृष्टिकोनांतून आयोजकांनी विचार करण्याची नितांत गरज आहे. आपण तो नक्कीच केला असेल. तरीही मला माझे विचार आपल्याशी असलेल्या आपुलकीच्या भावेनेतून मांडावेसे वाटले एवढेच.
ह्या संदर्भातील काही विचार मी आयोजक समितीपुढे मांडतो आहे. हे विचार आपणास पटतील अथवा ते प्रत्यक्षात आणता येतील असे स्वप्न मी पाहत नाही. फक्त विचार स्वातंत्र्याची मुभा घेऊन हे विचार आपल्यापर्यंत पोहचवण्याची माझी सुप्त इच्छा ह्या निमित्ताने प्रदर्शित करतो आहे. आपणा स्वतः शेतकरी आहात व ह्या विषयातील जाणकारच नाही तर प्रगल्भ विचारवंत व साहित्यिकही आहात. ह्या सर्व गोष्टींचा विचारही केला असेल त्यातीलच काही विचार तुम्हीं शेतकरी संमेलनानिम्मित जगासमोर आणलेही आहेत ह्यात शंकाच नाही.
मागील दोनही संमेलनाचा मागोवा घेऊन त्यामधील अनुभवातून, आपल्या चळवळीचा एक शुभचिंतक व अप्रत्यक्ष कार्यकर्ता म्हणून मला माझे काही विचार मांडावेसे वाटतात. मी एक शहरी माणूस आहे व मला शेतकरीवर्गाशी जिव्हाळा व आपुलकी आहे. माझे हे विचार आपण ह्याच भावनेतून घ्याल ह्याची मला खात्री आहे.
विचार खालील प्रमाणे...
संमेलनाच्या आयोजनाबद्दलचे काही सुधारित विचार ...
१. शक्य असेल तर संमेलन साधारण तीन दिवसांचे असावे.
२. शक्य झाल्यास एखाद्या कृषी विद्यापीठात आयोजित केले गेले तर बरेचसे प्रश्न सुटू शकतात.
३. परिसंवाद / चर्चेत शक्य झाल्यास कृषी विद्यापीठ तसेच कृषीतज्ञ आणि प्राध्यापक व अध्यापकांचा समावेश करावा.
४. संमेलनास जर कृषीविद्यापीठाचे कुलगुरू अध्यक्ष अथवा प्रमुख पाहुणे लाभण्यासाठी प्रयत्न करावा.
५. कृषीक्षेत्रामधील नामवंत संस्थाना निमंत्रित करून त्यांचा व्यासपीठावर सन्मान करावा. उदा. शेती अवजारे, खते, बी बियाणे, शेती मालाची साठवण, वितरण, विपणन इत्यादी.
६. संमेलनात जर शक्य झाल्यास कृषीविषयक प्रदर्शन भरवावे. जेणे करून शेतकरी वर्ग त्याकडे आकर्षित होईल व संमेलनाची उपस्तिथी वाढेल.
७. साहित्य क्षेत्रामधील नामवंत, जेष्ठ व कृषिविषयक अध्यापंकाना परिसंवाद आणि चर्चा सत्रात सहभागी करावे.
८. शक्य झाल्यास सरकारातील राज्य कृषी मंत्री अथवा आमदार, खासदार यांना निमंत्रित करावे व त्यांच्या कडून योग्य त्या योजनांचा पाठपुरावा करावा. एक प्रकारे दबाव गट तयार करावा. शेवटी राजकारण्यांना वेगळे ठेवून काहीच साध्य न होण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या पदरात काही योजना पाडून घेता येतात का ते पाहावे.
९. प्रशासकीय अधिकारी, सनदी अधिकारी यांनाही संमेलनाचे निमंत्रण देवून योग्य त्या विषयांवरील चर्चा सत्रात व परिसंवादात समाविष्ट करावे.
१०. प्रसार माध्यमे आणि जाहिरातदार संस्थाना संमेलनाचाच एक भाग करून घ्यावे.
११. सर्वात शेवटी वेळेचे नियोजन अतिशय काटेकोरपणे करावे. जेणे करून शक्य तेवढे विषय समाविष्ट करता येतील.
कृपया ,माझे हे विचार मी अगदी प्रांजळपणे व संमेलनाच्या हितासाठी मांडत आहे हे लक्षात घ्यावे. वरील विचारांपैकी बहुतेक गोष्टी आपण संमेलनात राबवताच तरीही माझ्या कडून एक छोटासा प्रयत्न.
परिसंवाद अथवा चर्चासत्राबाद्द्ल काही विषय...
१. पारंपारिक शेती आणि आधुनिक शेती व काळाची गरज
२. ठिबक सिंचन योजना.. परिणाम आणि फायदे.
३. कृषीतंत्र आणि कृषिमित्र
४. प्रशासकीय यंत्रणा आणि विविध सरकारी योजना व त्यांची माहिती/
५. शेतीचे व्यवस्थापन एक मुलभूत गरज
६. शेतीची अवजारे व त्यांचे उपयोग
७. शेती विमा व त्याचे फायदे
८. शेतीविषयक मनुष्यबळ व्यवस्थापन
९. शेतमालाची साठवण आणि वितरण व विपणन व्यवस्था.
१०. हवामान खाते आणि शेतकरी
११. शासकीय कायदे आणि त्यांची अंमलबजावणी
१२. शेतकरी आत्महत्येचे मूळ कारण व त्यावरील कायमचे उपाय.
१३. सहकारातून शेती
१४. शेतमालाच्या भावांचे अर्थकारण व नियोजन
असे काही विषय व इतर काही विषयांवरील त्या त्या विभागातील तज्ञ व जाणकारांकडून शेतकऱ्यांस मार्गदर्शन घडवून आणावे असे वाटते.
शेती साहित्य, शेतकरी कवी संमेलन, शेतकरी गझल, शेतीविषयक नाटिका, विविधगुण दर्शन इत्यादी ह्या साहित्य संमेलनाचा अविभाज्य भागच असतील. परंतु वेळेचे नियोजन करून वरील विषयांची जर आपण ह्या संमेलना निमित्त मांडणी केली तर हे शक्य होऊ शकेल असे वाटते.
अर्थात हे माझे विचार आहेत आणि कुठल्याही प्रकारे ते आयोजकांवर बंधनकारक नाहीत. तसा मला कुठलाही अधिकार नाही. माझा सहभाग फक्त कवी संमेलना पुरता होता व राहील त्यामुळे खरे पाहता मला फार लिहिण्याचा अथवा सूचना करण्याचा अधिकार नाही. तसेच खासगी नोकरी मुळे मी पूर्ण वेळ ह्या चळवळीत सहभागी होऊही शकत नाही. तरीही अप्रत्यक्षपणे आपल्या ह्या उपक्रमास माझी काही मदत आपल्या कार्याचा मागोवा घेऊन करता यावी म्हणून हा छोटासा प्रयत्न समजावा.
मी हा मागोवा केवळ आपल्या आत्मीयतेपोटी व शेतकरी विषयावरील कळकळीपोटी लिहित आहे ह्याची नोंद घ्यावी.
माझे काही चुकले असेल तर मला कृपया क्षमा करावी. मला व्यक्त होण्याची संधी दिलीत त्याबद्दल आपला आभारी आहे.
अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य चळवळीच्या पुढील वाटचालीस माझ्या अनंत शुभेछ्या.
आपला स्नेहांकित,
रविंद्र कामठे, पुणे
सपूर्ण नाव: रविंद्र किसनराव कामठे
पत्ता: प्लॉट नं. ६, स्वाती सोसायटी
“गुरुसद्न”, धनकवडी,
पुणे – ४११०४३
संपर्क भ्रमणध्वनी - +९१ ९८२२४ ०४३३०
विरोप पत्ता (ई-मेल) – ravindrakamthe@gmail.com
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
खूप छान! कामथे सर
खूप छान! कामथे सर
पाने