नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
गाई गेल्या राना समृध्द लोकसंस्कृतीचा नैसर्गिक खजिना
ललित लेखनातील एक प्रभावशाली नाव, म्हणजे मूर्तिजापूर येथील रवींद्र जवादे हे होय.सृजन साहित्य संघाचे संस्थापक अध्यक्ष आणि संवेदनशील कवी म्हणून परीचित असलेल्या,रवींद्र जवादे यांचा *गाई* *गेल्या* *राना* हा तिसरा ललितलेख संग्रह आहे.रानातून भरल्या पोटाने हिरव्या चाऱ्याचे पांढरे दूध करुन वासरांच्या भुकेचा प्रश्न सोडवायला आलेल्या गाई,समाधान आणि तृप्ततेने घरी परततात,त्याच तृप्ततेने एक विलक्षण समाधान रवींद्र जवादे यांचा संग्रह वाचतांना मिळते.
स्वतः एक संवेदनशील कवी असल्याने गाई गेल्या रानाचे ललित पदयमय आणि अधिक सौंदर्यात्मक झाले आहे. एक विलक्षण लयबध्दता हा ललितबंध वाचतांना जाणवत राहते.बरे लेखनाचे विषय कोणते?तर अगदी तुम्ही आम्ही जीवन जगतांना सहजतेने अनुभवलं ते..मग वाचक त्यात गुंतल्याशिवाय कसा राहिल,नाही का?गाव,माणसं,जत्रा,उरुस,देवी देवता,परंपरा,श्रध्दा अंधश्रध्दा,गरीबी,कधी प्राण्याची तर कधी माणसाची तर कधी अकल्पीताच्या दहशतीचा थरार,कधी एखादं प्रसन्न चित्र तर कधी प्रचंड वैफल्य थोडक्यात काय तर,मानवी जीवनाचे जेवढे रंग आहेत तेवढे शब्दबध्द करण्याचा लेखकाने प्रयत्न ज्या सहजतेने केला आहे तो वाखाणण्यासारखा आहे हयात शंका नाही.
गाई गेल्या राना हया लेखात बिबटयाने लचके तोडलेल्या गाईच्या कणवेपासून,पाणी पिऊन तृप्ततावलेल्या गाईचे परतणे आणि एखादया नागाने गाईला दंश करणे अशा प्रसंगातून गाईच्या जीवनातील कारुण्यगंध ओतला आहे तर कधी मरण मागत खंगत जाणाऱ्या वासराच्या ओढीने आठवड्यापासून वाट चुकलेली गाय घरी परत येणाच्या प्रसंगातील शहारासुद्धा जीवंत केला आहे.
हे सर्व अनुभवसिध्द लेखन असून प्रत्यक्ष हे जीवन जगल्याशिवाय ,पाहिल्याशिवाय,अनुभवल्याशिवाय ते लेखन सत्यात उतरत नाही हया जाणीवेतून रवींद्र जवादे यांनी सत्यानुभवाला लेखनात गुंफले आहे हे लक्षात येते.
पाऊस रुप्याचा येतो मध्ये धुंद पावसाचे वर्णन करतांना ,'इकडे बहिणीच्या डोळयातही फुलू लागतात रक्षाबंधनाची प्रेमळ स्वप्न! येत्या राखीला येणाऱ्या ओवाळणीचं अवघड गणीत करण्यात मुली गुंग झालेल्या.' अशा वर्णनातून श्रावणात येणारे संस्कृतीदर्शक सणवार नात्याची वीण नात्यासोबत जोडलेला व्यवहार असे अनेक रंग रवींद्र जवादे हयांनी टिपले आहेत असे आपल्या लक्षात येते.सांज ये गोकुळी सारख्या तरल ललितबंधात सामुहिकरित्या क्रिकेट पाहणारे मुले सचिन आऊट झाल्यावर कशी हिरमुसून जात हे वाचतांना स्वतःच्या बालपणात डोकावल्याचा भास झाल्याशिवाय राहत नाही.
गावात आजही नेमक्या मोजक्या ठिकाणी मुक्तपणे फिरणाऱ्या वळूचे वर्णन गावआक्या हया लेखात वाचायला मिळते. त्या गावअाक्याचं करुण मरण चटका लावून जाणार असतं कारण हा जीव तसा कुणाचाच नसला तरी सर्व गावाचा असतो ही जाणीव हा लेख वाचतांना रवींद्र जवादे यांनी करुन दिली आहे. रानात नाचला मोर हया लेखातील 'मोराचे देखणेपण कधीकधी त्यांच्या जीवावर बेततं' हया वाक्यातील गर्भीत इशारा फार विलक्षण आहे असे मला वाटते. आजच्या दुषीत समाजाच्या नजरा व सौंदर्यवान तरूणी हयांच्या अर्थाने ही सुचना घेणे कधीकधी आवश्यक ठरते असे मला वाटते.
घनरानी साजना हया ललितलेखात अल्लड तरुणीचे प्रेम,त्यांची गुंतवून टाकणारी कथा,आपलेसे वाटणारे संवाद हयातून एक निरभ्र प्रेमाची स्वच्छ जाणीव रवींद्र जवादे यांनी करुन दिलेली आहे.तर कधी घर अबोलसे माझे सारख्या लेखात राहत्या घराशी माणसाचा कसा जिव्हाळा असतो त्याचे ललितरम्य वर्णन वाचायला मिळते. चांदणवेळा,सर्पलाग अशा लेखातून ग्रामीण जीवणातील रम्यता आणि गुढता एकाचवेळी अधोरेखीत झालेली दिसते. तर दिन दिन दिवाळीत आपल्या जगण्यातली अाणि पाहण्यातली दिवाळी किती विलक्षण असते मात्र आपण लेखकाच्या नजरेतून पाहत तिचा आनंद घेत नाही असे वाचकांना जाणवल्याशिवाय राहत नाही.रंगबावरा दिवस होळीचा वाचतांना शाब्दीक रंगाची मनसोक्त उधळण लेखकाने केली असल्याचे लक्षात येते.
धरणाच्या काठावर,सांजभयाच्या काठावर मधील निसर्ग त्यातील पशु पक्षी इत्यादी वर्णने तपशीलवारपणे करत रवींद्र जवादे एखादया कसलेल्या चित्रकाराप्रमाणे शब्दातून सजीव चित्र उभे करतात. तोच अनुभव रानात वाजली शीळ वाचतांना येतो. निसर्गाचे आणि रवींद्र जवादे हयांचे अतुट नाते आहे हयाचा प्रत्यय त्यांच्या लेखनातून येत जातो. ऋतूराज येत रानी,आंबा मोहरू आला,पळसरंग,वैशाखसखा गुलमोहर असे लेख वाचतांना त्यांचे नैसर्गिक भान,निसर्गाची जाण आणि शब्दावर असलेले प्रभुत्व लक्षात येतेच.
गाई गेल्या राना हा संग्रह खरे तर ग्रामीण जीवनाचा आरसा आहे. जगण्यातील आणि निसर्गातील सुक्ष्म बारकाव्यांचे तपशीलवार वर्णन आणि सजीव अनुभूती ही हया संग्रहाची जमेची बाजू आहे. कधी गडद दु:खाने अस्वस्थता वाढविणे तर कधी साध्या सोप्या लहान आनंदातून मनाला प्रसन्नता देणाऱ्या हया ललितलेख संग्रहाचे मुखपृष्ठ अरवींद शेलार यांनी काढले आहे. शब्ददीप प्रकाशनची ही निर्मिती खरोखरच लक्षणीय असून बाबाराव मुसळे हयांची प्रस्तावना आणि अशोक कोतवाल हयांचे मलपृष्ठ लेख संग्रहाची शोभा वाढवतात.एकंदर ललित प्रदेशात रवींद्र जवादे हयांची असलेली ओळख आणखी गडद करणारा हा संग्रह आहे. वाचक त्याचे नक्कीच स्वागत करतील हया सदिच्छेसह शुभेच्छा!
किरण शिवहर डोंगरदिवे
वॉर्ड न 7, समता नगर मेहकर
ता मेहकर जि बुलडाणा पिन 443301
मोबा 7588565576
■■■
◆गाई गेल्या राना
◆रवींद्र जवादे
◆पृष्ठे-१००
◆किंमत-२२० रुपये.
◆शब्ददीप प्रकाशन,मूर्तिजापूर
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे स्वागत
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
पाने