नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
जगणं म्हणजे निखळ बुजगावण्यागत जगणं नाही त्यात मानवी भावभावनेसह काहीएक मात्रेत अवखळ आडवळणे येत जातात त्यात माणूस घडत-बिघडत जातो. कोण कोणत्या मार्गावर जाऊन घडेल अन कोण बिघडेल याची शाश्वती नसतेच. मात्र ज्यांची नाळ एका मोठ्या परंपरेशी जोडली गेलेली असते त्यांची घडण्याची सुद्धा एक परंपराच पहायला मिळते. तोच धागा घेऊन विणले जाते ते भलेमोठे वंशपरंपरागत जगण्याच्या रीतीचे जरतारी प्रमाणशीर पटच..! त्याच पटावरील काही लोकांची गाथा अन व्यथा आपल्याला नजरेस पडते; त्या गाथेची अन व्यथेची सरमिसळ आपल्या जाणिवा जागृत करते.
आपल्या आजूबाजूला नाना तऱ्हेची लोक असतात. ज्याची त्याची वागण्याची-वागवणुकीची, जगण्याची, नितीमुल्यांची एक वेगळीच शैली आढळते. फुलांच्या बहरण्याच्या काळाला कुणीही माजुरडेपण म्हणणार नाही; ती त्याची नेहमीची रीतच..! केवढ्या ऐटीत अन दिमाखात फुल फुलतात मात्र सोयीस्करपणे जो तो ज्याच्या त्याच्या स्वार्थासाठी त्यांचा उपभोग घेतात. कारण बहुतेकांना वाटतं की ती सुंदर फुललेली फुल आपल्यासाठीच आहेत; तशीही ती कोमेजून जाणारच आहेत मग तोडली तर हरकत काय? तर काहीच नाही. पण काही गोष्टी कोमेजून जाणारच आहेत मग त्यांचं ताजेतवानेपन आपण आपल्या स्वार्थासाठी उपभोगायचं हीच वृत्ती बहुतेकांकडे आढळते. कदाचित याच धर्तीवर विचार करता लक्षात येते की, माणसांना आपल्या आजूबाजुच्या माणसांचही बहरुन येणं रुचत नाही तर मग इतरांच काय..!
आपल्या भवताली शेतकरी नावाची जमात उराशी आलेली मरगळ दूर सारून कायम अतोनात कष्ट उपसत असतात. या शेतकरी नावाच्या जमातीलाही शोषणाच्या जाचातून सदोदित मार्गक्रमण करावं लागतं. काही बांडगुळांच्या शोषणाच्या वृत्तीतून हे दिसून येते. मात्र तरीही शेतकरी जमात तगून आहेच. या सगळ्यांत शेतकरी नावाची जमात स्वार्थी लोकांशी झगडत त्यांची जगण्याची रीत कायम जपून असल्याचं दिसून येत. भाजील्यापासून ते ग्राहकाच्या हातातील धान्याच्या दाण्यापर्यंतच्या विक्रीदरम्यान आजच्याही व्यवहारवादी भवतालात एक शिल्लक माप ग्राहकाला गेल्याचं त्याला खंत वाटत नाही मात्र ग्राहक म्हणून समोर येणारी व्यक्ती बहुधा ज्या तर्हेने व्यवहार करते तो अगदीच लाजीरवाणा पाहायला मिळतो; अर्थात काहीएक अपवादांसह. साहजिकच याचा परिणाम त्या शेतकऱ्यांवर होतो.
काही माणसं वागण्या-बोलण्याचं तारतम्य न बाळगता स्वतःला उच्चशिक्षित वगैरे काहीतरी भंपक पदव्या जोडून गुर्मीत वावरतात आणि खालच्या पातळीचा व्यवहार शेतकऱ्यांसोबत करताना दिसतात. शेताच्या बांधापासून ते सरकारी, निमसरकारी, खासगी ऑफिसपर्यंत ज्या पद्धतीची वागणूक शेतकऱ्यांना मिळते ती विसरून तरीही शेतकरी त्याच्या जगण्या-वागण्याच्या पातळीत तारतम्य ठेऊन जगतो-वागतो ही त्याची जगण्याची रीत फारच थोड्या लोकांना कळते.
ज्या भावात मार्केट चालते त्याच भावाच्या अपेक्षेत आपला माल ग्राहकांना विकणारा शेतकरी आणि दुसऱ्या बाजूला मिळेल तेवढं लुबाडणाऱ्या लोकांमध्ये फार मोठा जमीन-आस्मानचा फरक आहे. त्यामुळेच तर शेतकरी जमात पाठीचा कणा ताठ ठेऊन जगू शकते पण त्यांना जगू दिल जात नाही. त्यांच्या वाट्याला साधे अपमानजनक शब्दही आले तरी त्यांच पित्त खवळते. नाही पचवत कुणाचे विखारी शब्द यातच स्वाभिमान जागृत असल्याचं लक्षात येते. स्वतःच्या कक्षेत स्वतःच राज्य हाकणारा शेतकरी हा कायम राजाच आहे मात्र लुबाडणुकीची नानाविध अस्त्र त्याच्यावर कायम प्रहार करत आलेत याच कारणाने तो बळी'चा बकरा ठरताना आपल्याला दिसतो. इंग्रजीत एक म्हण आहे "The king can do no wrong" हे जेव्हा वाचलं तेव्हा वाटलं हे वाक्य कदाचित फक्त शेतकऱ्यांसाठीच आहे. शेतकऱ्याच्या जगण्या-वागण्यात एक ऐट असते जी की कुण्या ऐऱ्या-गैऱ्याच्या जगण्यात नसते; बाकीच्यांत असतो तो केवळ घमंड अन त्यासोबत माजुरडेपणा अर्थात काही अपवाद वगळताच.
जगण्याची अशी पारंपारिक रीत शेतकऱ्यांच्या हरेएक पिढीत झिरपत आलीये मात्र काहीजण त्याला कमकुवतपणा समजतात हा त्यांचा फार मोठा गोड गैरसमजच म्हणावा..! जगण्याच्या प्रवाहात ज्यांना माणसाशी माणुसकीने वागता आलं नाही त्यांनीच माणुसकीचे भलेमोठे फलक झळकावलेले आपल्याला पाहायला मिळतात मात्र ज्यांनी ती गोष्ट जपलीये ते मात्र नामानिराळेच राहिलेत. त्या माणसांना कुठल्या फलकाची गरजच भासली नाही ते जगण्याची एक रीत अन ऐट कायम ओलावत आल्याचं नजरेस पडते. ते कायम वाढीस लागो या आशेसह.
- कृष्णा जावळे.
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
शेतकरी तितुका एक एक!
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयाशी मिळतेजुळते वाटत नाही.
पाने