Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



व्यवस्था परिवर्तनाचा जनक : करोना माहात्म्य ||६||

करोना माहात्म्य ||६||
 व्यवस्था परिवर्तनाचा जनक
 
            देशातील शेतकऱ्यांनी शेती नाही केली तरी चालेल, देशात काही पिकलं नाही तरी आम्हाला काहीच फरक पडत नाही, आम्ही वाटेल ते अन्नधान्य आणि वाटेल तो शेतमाल वाटेल त्या किंमतीत बाहेर देशातून आयात करू, देशातल्या शेतकऱ्यांवाचून आमचे काहीही अडत नाही, अशी उद्दाम भाषा वास्तव जगात आणि सोशल मीडियात गेली काही वर्षे ऐकायला मिळत होती. तेव्हा मी त्यांना देशाच्या स्वावलंबनाचे व देशाच्या स्वयंपूर्णतेचे महत्त्व विशद करून सांगत असायचो. जर जागतिक पातळीवर आपत्कालीन स्थिती उद्भवली तर कोणताही देश अन्य कोणत्याही देशांना कोणत्याही वस्तूचा पुरवठा करणार नाही. अन्नाशी अशी प्रतारणा करणे म्हणजे चक्क उतमाज असून त्याचे फळ अन्नान्न दशेत होऊन उष्टे, खरकटे अथवा फेकलेले अन्न मिळणे दुरापास्त होण्याइतपत गंभीर फळ निसर्ग तुमच्या पदरात टाकू शकतो. उन्मत्तपणाला लगाम घालून देश स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रयत्न करणे हेच आपल्या हिताचे आहे, हे सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करत होतो. पण १७ वर्षे शाळा-कॉलेज आणि १८ पुस्तके-ग्रंथ वाचून मिळवलेल्या त्यांच्या प्रगाढ ज्ञानावर त्यांना एवढा भारी घमंड असायचा की माझ्या बोलण्यावर चिंतन वगैरे करणे तर दूरच पण साधे गांभीर्याने ऐकून घेण्याची सुद्धा त्यांची तयारी नसायची.

    आज अचानक स्थिती पालटली आहे आणि करोनाने त्यांच्या थोबाडात एवढी सणसणीत चपराक हाणली आहे की त्यांना त्यांच्या विचारांची फेररचना करायला सुद्धा संधी दिलेली नसल्याने त्यांच्या उद्दामपणावर गंडांतर आले आहे. अन्नान्न दशा होण्याचे दिवस उजाडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने आज त्यांची पुरती बोलती बंद झालेली आहे. पण आज बंद झालेली बोलती पुन्हा कधी उचंबळून येईल आणि त्यांना पूर्वपदावर नेऊन त्यांच्या उद्दामपणाला कधी सुगीचे दिवस येतील हे सांगणे आज तरी अवघडच आहे. मनुष्याचा स्वभाव काहीसा रबरासारखा असतो. ताणला गेला तर एकतर तुटतो किंवा नाही तर पूर्वपदावर तरी येतो. त्यामुळे त्याबद्दल आज तरी भविष्यवाणी करणे अवघड आहे. पण यानिमित्ताने करोनाची सणसणीत धोबीपछाड बसल्याने कालपर्यंत हवेत तरंगत असलेले उद्दाम खुशालचेंडू आता खाडकन जमिनीवर आपटून सरपटायला लागले आहे, इतके मात्र नक्कीच म्हणता येईल. 
 
            करोनाच्या रूपात ओढवलेल्या जागतिक संकटामुळे शेती व्यवसायावर काय काय परिणाम होतील, त्याविषयी भाकीत वर्तवणाऱ्यांचे सध्या मस्त पेव फुटले आहे. बुवाबाजी आणि भोंदूगिरीला विरोध करणारे स्वतःच बुवाबाजी व भोंदूगिरी करायला लागले आहेत. अनेकांच्या मते करोना पश्चात या जगामध्ये शेतीला फार उज्वल भविष्य असणार आहे. उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ चाकरी असे दिवस येतील असा एकंदरीत शेतकरी हितचिंतकांचा आणि काही शेती विशेषज्ञांचा देखील सूर दिसतो आहे. पण मला आज तरी त्यात अजिबात तथ्य जाणवत नाही. मुळात करोनाचेच भविष्य अजून स्पष्ट झालेले नाही. करोनाचे जेमतेम आगमन झालेले आहे.  त्याचे वास्तव्य या भूतलावर किती काळ असेल, काही महिन्याचे असेल की काही वर्षाचे असेल याचा सुद्धा अजून नीटसा उलगडा झालेला नाही. जगभरातील सर्व शास्त्रज्ञ, विशेषज्ञ करोनावर लस किंवा परिणामकारक औषधी तयार करण्यात अहोरात्र गुंतले असले तरी लस निर्माण करता येईल किंवा नाही याबद्दलही काहीही अंदाज बांधणे अवघड आहे. त्यामुळे करोनापायी भविष्यात येऊ घातलेल्या संकटाचा अंदाजच अधांतरी आहे. 

carona man          करोनाबद्दल सारीच अनिश्चितता असल्याने आणि कसलाच थांगपत्ता लागत नसल्याने करोनामुळे जागतिक पातळीवर काय काय संभाव्य परिणाम अथवा दुष्परिणाम होतील, याचे ठोकताळे बांधणे आज केवळ अशक्य आहे. करोना समूळ नष्ट होऊन नवीन निर्धोक जीवनशैली स्थापित होईपर्यंत जीवित हानी किती आणि आर्थिक हानी किती झालेली असेल, याचाही पक्का अंदाज घेणे आज अशक्य आहे. अशा स्थितीमध्ये शेतीच्या भवितव्याचे भविष्य वर्तवणे म्हणजे पोटात असलेल्या बाळाच्या आजीने कोडकौतुकाने बाळ पोटात असतानाच आमचा बाळ कसा चालेल, आमचा बाळ कसा बोलेल इथपासून तर बाळाचे लग्न कधी आणि कुणाशी होईल असे स्वप्नरंजित गोड गुणवर्णन करण्यासारखे आहे. या पलीकडे या भाकितांना आज तरी फारसा अर्थ नाही. अशी भाकिते स्वप्नसदृश्य असतात. ज्याला जे हवे असते पण आजवर मिळालेले नसते, तेच भविष्यात मिळणार आहे, असा ज्याचा त्याचा समज असतो आणि तसेच त्याचे आत्मकेंद्रित व स्वार्थलोलुप भाकीत असते. चोराला वाटते कि चोरीला सुगीचे दिवस येतील आणि सावाला वाटते की सावाला सुगीचे दिवस येतील. अशी भाकिते बुवाबाजीच्या पातळीवरील मनकवडी असल्याने अशा भाकितांचा तसा निसर्गचक्राशी फारसा काही संबंध नसतोच.

 
            तरी पण भविष्याचा वेध घेत काही ठोकताळे बांधत भाकीत वर्तवायचेच म्हटले तर करोना संकटपूर्व भारतीय शेती आणि करोनामुक्त झाल्यावर जाणवणारी भारतीय शेती मला जरा वेगळी दिसत आहे. त्यात दोन तऱ्हा संभवतात. जर करोना सहा महिन्याच्या आत नियंत्रित झाला तर सर्व क्षेत्रातील झालेली आर्थिक हानी भरून निघण्यासारखी असेल. हानी भरून निघायला लागणारा कालावधी व्यक्तीनिहाय, वर्गनिहाय वेगवेगळा असेल, इतकाच काय तो फरक असेल. पण जर करोना नियंत्रित व्हायला काही वर्ष लागलीत आणि प्रचंड जीवितहानी झाली तर अर्थकारण, राजकारण आणि समाजकारण या तिन्ही क्षेत्रात प्रचंड उलथापालथ होण्याची शक्यता आहे. करोनासंकट हेच मुळात अकल्पित आणि अनाकलनीय आहे, ज्या संकटाची कधी कल्पना केली नव्हती असे संकट मानवजातीसमोर उभे टाकले आहे. हे संकट जसे अकल्पित आणि अनाकलनीय आहे तितकेच त्याचे संभाव्य परिणाम सुद्धा अकल्पित आणि अनाकलनीय ठरण्याची शक्यता आहे.
 
            संपूर्ण क्रांती, समाज परिवर्तन, व्यवस्था बदल अशी नानाविध स्वप्ने अनेकांनी आजवर बघून परिवर्तनासाठी चळवळी उभारल्या होत्या. चळवळी संपल्या पण परिवर्तनाची स्वप्ने केवळ स्वप्नेच उरली होती; तीच स्वप्ने करोना प्रत्यक्षात उतरवण्याची शक्यता आहे. जुने मोडकळीस आल्याशिवाय आणि जुने मोडून सपाट झाल्याशिवाय नवनिर्मितीचा पाया रचता येत नाही. जुनी व्यवस्था मोडकळीस आणण्याची क्षमता कोणत्याच चळवळीला दाखवता न आल्याने व्यवस्था बदल होण्याऐवजी केवळ जुन्याच व्यवस्थेची थोडीफार डागडुजी होण्याइतपच यश सर्व क्रांतिवादी चळवळींना मिळालेले होते. पण जुनी व्यवस्था मोडकळीस आणण्याचीच नव्हे तर पार नेस्तनाबूत करून टाकण्याची क्षमता करोनामध्ये आहे, इतके मात्र आजही स्पष्ट दिसते आहे. माणसाच्या येरेगबाळेपणामुळे जर करोनाला पूर्णशक्तीनीशी लीला करण्याची संधी मिळाली तर व्यवस्था परिवर्तनाचा जनक ठरण्याची पुरेपूर क्षमता करोनात नक्कीच आहे.
 
            जर यदाकदाचित तसे झालेच तर करोना संकट पश्चातचे जग कसे असेल? ते जसे असायचे तसे असेल पण आज आपण म्हणतो तसे नक्कीच नसणार आहे. व्यवस्थेत कितीही बदल अथवा स्थित्यंतर होऊ द्या, व्यवस्था नेहमीच एका सदोष अवस्थेतून दुसऱ्या सदोष अवस्थेत पदार्पण करत असते. त्यामुळे व्यवस्था परिवर्तन झाले तरी ते आपोआपच कुणाच्या तरी फायद्याचे किंवा कुणाच्या तरी नुकसानीचे नसणार आहे.  जुनी व्यवस्था नेस्तनाबूत झाल्यानंतर ज्याची ज्याची नव्याने पायाभरणाची क्षमता असेल, कौशल्य असेल, हिंमत असेल तेच कर्तबगार लोक व्यवस्थेची नव्याने पायाभरणी करणार आहेत आणि येणारा काळही त्यांचाच असणार आहे. काळाच्या प्रवाहासोबत स्वतःला जे स्वतःच घडवून घेतात तेच काळाच्या प्रवाहात टिकून पुढे निघून जात असतात, हे त्रिकालाबाधित सत्य कोरोनापश्चातच्या जगातही कायमच राहणार आहे. नाकर्त्याना अनुकूल अशी दुनिया कधीही नव्हती. संधिसाधूंना चिरकाल लाभप्रद अवस्था कोणत्याच व्यवस्थेत प्राप्त होत नाही. "दे रे हरी पलंगावरी" वाल्यांचा जमाना कालही नव्हता, आजही नाही आणि उद्याही नसणार आहे. 

            करोनामुळे विश्रांती करण्याची सवड सर्वांना सारखीच मिळालेली आहे. सर्वांनाच आपापल्या स्वगृही पलंगावर यथेच्छ लोळायला समान संधी आहे. आई, वडील किंवा बायको घरात असल्याने नको त्यांचे फोन येऊन वैताग न येण्याची सुखद संधी असल्याने आपापले डोके शांत आणि ताजेतवाने ठेवण्याची संधीही सर्वांना एकसमानच आहे. करोनाने माणसामाणसात अजिबात भेदाभेद केलेला नाही. या विश्रांतीपूर्ण सवड असलेल्या काळात जो चिंतन, मनन, पठण, अभ्यास आणि तंत्राचा सराव करेल आणि नव्या दमाने नवे कौशल्य प्राप्त करून स्वतःला सिद्ध करण्याइतपत पात्र बनवेल अशाच कर्तबगारासाठी येणारा काळ पायघड्या अंथरून त्यांची वाट बघत बसलेला असेल; हेच आणि इतकेच भाकीत सरतेशेवटी खरे ठरण्याची शतप्रतिशत खात्री आहे.

 
            पण; हे सर्व जर तर आहे. उद्याची काहीच चांगल्या शक्यतेची खात्री नसेल तर आहे त्या खेळाची मोडतोड करून खेळखंडोबा होण्याचे स्वप्न बघणे फारसे लाभदायी ठरत नाही. त्यापेक्षा जे आहे तेच नीट व्यवस्थित करून त्यातूनच चांगल्या सक्षम पर्यायांचा शोध घेण्यातच जास्त समजूतदारपणा आहे. अनायासे उसंत मिळालेलीच आहे तर तिचा सदउपयोग करून स्वतःला अधिक चांगले घडवण्याचा प्रयत्न करणे जास्त हितकारक आहे. शिवाय या करोना संकटातून जो वाचेल-जगेल त्याच्यासाठीच उद्याचे जग असणार आहे. जो गेला त्याच्यासाठी हे संपूर्ण जगच संपलेले असणार आहे.
 
अंतिम सत्य हेच असते की, भविष्य-बिविष्य काही नसते
जो जातो त्याच्यासाठी ही, सृष्टीच संपलेली असते
 
            त्यामुळे स्वस्थ जगावे, मस्त जगावे. स्वतःही जगण्याचा प्रयत्न करावा आणि इतरांनाही जगविण्याचा प्रयत्न करावा. स्वप्न बघायचेच असेल आणि भविष्य वर्तवायचेच असेल तर करोनाला जितके लवकर भूतलावरून हद्दपार करता येईल, त्यासाठी आपली वर्तणूक कशी ठेवावी याचे स्वप्न बघावे. शासन, प्रशासन आणि शेजाऱ्याला कसा सहकार्याचा हात देता येईल, याचा विचार करून करोना माणसाच्या मानगुटीवर बसण्याआधीच त्याचा नायनाट करण्याचे प्रयत्न करण्यातच याक्षणी तरी मानवतेचे सौख्य सामावले आहे.
 
- गंगाधर मुटे आर्वीकर
दि. २५/०४/२०२०
(क्रमशः)
=============
टीप : हा लेख आपण माझ्या नावासकट किंवा माझ्या नावाशिवाय किंवा तुमचे नाव घालून कुठेही शेअर किंवा कॉपी करून पेस्ट करू शकता.
=============
 
या लेखमालेतील इतर लेख http://www.baliraja.com/carona इथे उपलब्ध आहे.

 

करोना

Share