![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
तपपूर्तीची वाटचाल : कव्हरस्टोरी
१२ वे अ. भा. म. शे. साहित्य संमेलन
शेती अर्थ प्रबोधिनी आणि शरद कृषी महाविद्यालय, यड्रावकर शिक्षण व उद्योग समूह जयसिंगपूर, यांच्या संयुक्त विद्यमाने १२ वे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन जयसिंगपुर येथे, दिनांक ८ व ९ फेब्रुवारी २०२५ रोजी पार पडले. वर्धा, नागपूर, गडचिरोली, मुंबई, पैठण, अलिबाग, आर्वी (ऑनलाईन दोन), रावेरी, मोझरी, मोहाडी अशी प्रादेशिक सर्वसमावेशकता जपत, गत ११ वर्षापासून सुरू असलेली शेतीनिष्ठ वास्तव जाणिवांची मालिका आपल्या तपपूर्ती पर्यंत येऊन पोहचली.
मोहाडी येथील ११ व्या संमेलनामध्ये, जो विचार प्रामुख्याने पुढे आला तो म्हणजे, आज अनेक क्षेत्रांनी विकासाच्या दृष्टीने कात टाकलेली असताना, शेती मात्र अजूनही अस्मानी-सुलतानी चक्रव्यूहात अडकलेली असून पारंपरिक शेतीस आता उद्योगधंद्याची जोड देण्याशिवाय पर्याय नाही आणि हे आपण यशस्वीपणे करू शकतो, हा कृतिशील विचार सह्याद्री फार्म आणि इतरही शेतकरी उद्योग आस्थापनांच्या यशस्वितेच्या उदाहरणातून सिद्ध झालेला आहे.
आजच्या काळात एखादी चळवळ सातत्याने तब्बल बारा वर्षे टिकवून ठेवणे, खरे म्हणजे दिव्यच आहे. त्यातही साहित्यिक क्षेत्रात, जिथे साहित्य हे आज बऱ्याच अंशी स्व ची बाधा झालेल्या अवस्थेत अडकून पडलेले असताना, दुसऱ्याचा विचार करण्यास किती आणि कुणाकडे वेळ असतो?, अश्या काळातही साहित्य चळवळ सातत्याने जनमानसात रुजत जात आहे. कल्पना विश्वात रमणाऱ्या आभासी शेतीसाहीत्याशी फारकत घेऊन खऱ्या अर्थाने, शेतीनिष्ठ शेतीसाक्षर वास्तववादी शेतीसाहित्य निर्मितीच्या प्रेरणा या चळवळीमधून घेऊन, शक्तिशाली सृजनशील वैचारिक बैठक असलेली साहित्यिकांची नवी पिढी घडविलेली आहे. या चळवळीमधून पुढे आलेल्या अनेक साहित्यिकांची पुस्तके प्रकाशित झालेली असून या साहित्यांची दखल विद्यापीठाने घेऊन विद्यापीठीय अभ्यासक्रमात सुद्धा समावेश झालेला आहे.
या चळवळीचे प्रणेते श्री. गंगाधर मुटे यांच्या म्हणण्यानुसार, ‘बोललेले हवेत विरून जाते आणि लिहिलेले कायम राहते’ ते लिखित दस्ताऐवज येणाऱ्या पिढ्यांकरिता मार्गदर्शकाची भूमिका बजावत असते. काळ कोणत्याही साहित्यिक चळवळीचे मूल्यमापन हे लिखित वाड्मयावरूनच करीत असते. त्या कसोटीवर ही चळवळ खरी उतरली आहे. कोणतीही चळवळ विचारावर चालत असते, तो विचार जेवढा वस्तुनिष्ठ, तर्कशुद्ध असेल तेवढा तो प्रभावित करून खोल मुरत जात असतो. तो विचार म्हणजे युगात्मा शरद जोशी यांनी शेती अर्थ व्यवस्थापनाचे दिलेले मॉडेल. हे मॉडेलमुळातच प्रत्यक्षरीत्या अनुभवाधारीत असून त्याची शास्त्रीय मांडणी वैज्ञानिक विचारावर आधारीत असल्यामुळे त्याची वस्तुनिष्ठता कुणालाही तपासून घेणे शक्य आहे. मराठी साहित्य विश्वात, शेतकरी साहित्य चळवळ आपले वेगळेपण जपून आहे आणि त्याची दखल विविध वर्तमानपत्रे, समाज माध्यमे घेत आहे, या चळवळीच्या विचाराला पाठिंबा देण्याकरिता संमेलनामधील विचारपिठावर उपस्थिती लावून गेलेल्या, बारा वर्षातील मान्यवरांची नावे जरी आपण पाहिली जसे, (मा. इंद्रजीत भालेराव, मा. रा.रं.बोराडे, मा. सुरेश व्दादशीवार, मा. डॉ. शेषराव मोहिते, मा. डॉ. अभय बंग, मा. डॉ. विठ्ठल वाघ, मा. मकरंद अनासपुरे, मा. राजेश राजोरे, मा. भास्कर चंदनशिव, मा. संजय राऊत, मा. वसुंधरा काशीकर, मा. सरोजताई काशीकर, मा. प्रज्ञाताई बापट, मा. मधुरा गडकरी, मा. तुळशीराम बोबडे, मा. विलास शिंदे, मा. डॉ. किशोर सानप, मा. भानू काळे, मा. नाना पाटेकर, मा. वामनराव चटप.) तरी, हा विचार आणि त्याची उपयुक्तता किती महत्त्वाचा आणि लाखो शेतकऱ्याचा जीवनात सन्मानाचे दिवस आणणारा आहे. हे उजागर झाल्याशिवाय राहत नाही.
आज शेतकरी आणि शेती व्यवसाय या बाबत समाजात काहीशी उपेक्षित भावना झालेली असून परिणामी शेतकरी मुलांना लग्नाकरिता मुली सुद्धा मिळत नाही. "शेतकरी नवरा नको गं बाई" अशी स्थिती, हा एक ज्वलंत विषय असून समाजाचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. शेती आणि शेतकऱ्याबाबत जनमानसात सन्मानाची भावना निर्माण व्हावी, शेती हा चेष्टेचा विषय न होता तो प्रतिष्ठेचा व्हावा. शेती आणि शेतकऱ्याचे आभासी, रमणीय, काल्पनिक चित्रण न होता ते वस्तुनिष्ठपणे वास्तववादी स्वरूपात समाजासमोर यायला पाहिजे, कारण साहित्य वाचनाने माणसाचे विचार बदलतात, समाजाचा दृष्टिकोन बदलत असतो. याच उद्देशाने गेल्या बारा वर्षापासून सुरू असलेली ही चळवळ आपल्या तपपूर्तीकडे वाटचाल करत असताना, बारावे संमेलन शेती, उद्योग, शिक्षण या बाबतीत विकसित असलेला समृद्ध भाग असलेल्या, पश्चिम महाराष्ट्रातील जयसिंगपूर येथे आयोजित होणे ही निश्चितच चळवळीची मोठी उपलब्धी आहे.
याही संमेलनाची सुरुवात गत अकरा वर्षातील प्रथेप्रमाणे, खास संमेलनाकरिता श्री. गंगाधर मुटे यांनी लिहिलेल्या "नमो माय भाषा जयस्तु मराठी" मराठी गौरव गीत आणि "अवनी वरती जो घाम गळवतो, त्या देवाला मी नमन करतो" या शेतकरी नमनगीताने मा. गणेश मुटे यांच्या संगीत संयोजनात, विवेक मुटे, तेजू कोपरकर, स्वरा पोहाणे, ज्ञानेश पोहाणे या कलाकारांनी अतिशय सुश्राव्य स्वरातील गायनाने संपूर्ण सभागृह भारावून टाकले.
संमेलनाच्या उद्घाटन सत्रात प्रास्ताविकामध्ये, एकूणच ही साहित्य चळवळ आणि संमेलनाबद्दल भूमिका मांडताना, मराठी शेतकरी साहित्य चळवळीचे प्रणेते तथा संमेलनाचे कार्याध्यक्ष श्री. गंगाधर मुटे यांनी, सर्वप्रथम गत ११ संमेलनाचा ओघवता आढावा घेऊन, या चळवळीची काळसुसंगत गरज भूमिका मांडून, ‘शेतकरी जे पिकवतो ते महाग असू नये आणि शेतकरी जे विकत घेतो ते स्वस्त असू नये’ अश्या विचित्र कात्रीत आज शेतकरी सापडला असून, शेती आणि शेतीव्यवसायाला सामाजिक आर्थिक राजकीय अश्या विविध स्तरांमधील प्रभावित करणाऱ्या अनेक बाबींचा सोदाहरणासह दाखला देऊन, आता विशेषतः साहित्यिकांनी आणखी सखोल विचार केल्यास, लेखणीला विविध विषय मिळू शकतात. साहित्यिकांनी या दिशेने विचार करण्याची गरज आहे आणि हे सगळे विचार करून मग आपलं साहित्य, पुढे नेण्याची गरज आहे, असे झाले तरच भविष्यात शेतीला काहीतरी भविष्य आहे, असे म्हणता येईल अशी आशा व्यक्त केली.
संमेलनाचे मुख्य संयोजक म्हणून ज्येष्ठ विधीज्ञ, अॅड. सतीश बोरूळकर यांनी, आपली भूमिका मांडताना, कोल्हापूर नगरीचा सामाजिक सांस्कृतिक राजकीय इतिहास उपस्थितांना अवगत करून देताना, इतिहासातील अनेक रोमहर्षक घटनांचे दाखले दिले. शिवाजी महाराज, बाजीप्रभू देशपांडे, पन्हाळा किल्ला, वारणेचा तह, राजर्षी शाहू महाराज यांच्या काळात झालेली, कोल्हापूर संस्थानाची वैचारिक जडणघडण, ग्रामोत्थानासाठी सहकाराची स्थापना, यासह अस्पृश्यता निवारण्या करिता केलेले ऐतिहासिक कार्य, पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेमध्ये याचा केलेला समावेश, या सर्वांना उजाळा देऊन, घटना समितीचे सदस्य देशभक्त निमशिंग कशीगावचे रत्नाप्पा कुंभार, समाजसेवक तात्यासाहेब कोरे, यांच्या कार्याला नमन करून, हे संमेलनस्थळ ज्या नाट्यगृहात ते या विभागाचे भाग्यविधाते सरकार महर्षी शामराव पाटील यड्रावकर या बाबत माहिती दिली.
संमेलनाचे स्वागताध्यक्ष, श्री.राजेंद्र पाटील यड्रावकर विधानसभा सदस्य, यांनी आपल्या मनोगतामध्ये युगात्मा शरद जोशीनी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ज्या अनेक चळवळी उभारल्यात, ज्यात प्रामुख्याने कापूस, ऊस, कांदा यावरील झालेल्या आंदोलनाची आणि त्याच्या यशस्वितेची, सर्व घटनांचा परामर्श घेऊन, सद्यस्थितीतील शेती व्यवसायापुढील आव्हानांना आपण शेतीबाबत आधुनिकतेचे धोरण अवलंबवूनच मात करू शकतो असे प्रतिपादित केले. शेतीव्यवसायाबाबत आज समाजात तरुणांची वाढत जाणारी नकारात्मकता, ही गंभीर बाब असून यावर विचार होणे आवश्यक आहे. कोणत्याही चळवळीची एकसंधता तिच्या प्रगतीकरिता आवश्यक असते परंतु आज चळवळीची शकले पडताना दिसत असून या बाबतही विचार करण्याची गरज आहे. जसे चळवळीचे, तसे साहित्यातही वेगवेगळे गट तट मतभेद हे चित्र बदलायला हवे, तेव्हाच समाजासाठी काही विधायक काम करणे शक्य होईल. आज शेती व्यवसाया बद्दल शेतकरी द्विधा मन:स्थितीत असून, शेती करू की नको अश्या परिस्थितीत, त्याला आधार देणं हे आपल्या सर्वाचे प्रथम कर्तव्य असून हे काम आपण सर्वजण आपापल्या परीने करू शकतो. ज्याला जे शक्य असेल ते त्यांनी करावं, ही सामाजिक कार्यकर्ता म्हणून, शेतकरी साहित्याचा वारकरी म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे, ती आपण करावी.अशी अपेक्षा व्यक्त केली.
संमेलनाचे उद्घाटक ज्येष्ठ शेतकरी नेते मा अॅड. वामनराव चटप यांनी, आपल्या उद्घाटकीय भाषणात सुरवातीलाच, ‘जेव्हा आम्ही शेतीचे अर्थशास्त्र शिकलो, तेव्हा लक्षात आले की, "भारतीय शेतकरी कर्जात जन्मतो, कर्जात जगतो आणि कर्जातच मरतो" या मागील कारणांची मीमांसा अतिशय परखड, धारदार वक्तव्यामधून करून देत असताना, शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य मिळालं पाहिजे म्हणून जे लिहायचं ते ते लिहा. ज्यांना बाजारपेठेत स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, याच्यासाठी जे जे लिहायचं ते लिहा, आणि रास्त भाव शेतीतल्या मालाला मिळाल्या शिवाय हा शेती धंदा फायद्याचा होऊ शकत नाही हेही प्रांजळपणे मांडा. जर धंदा फायद्याचा झाला नाही, तर एका दाण्याचे हजार दाणे करणारा शेतकरी आयुष्यात, शेतीत बचत आली नाही तर कर्ज फेडू शकत नाही आणि म्हणून किमान तुमच्या सगळ्या लेखणीतून हे काम या चळवळीच्या निमित्ताने होईल अशी अपेक्षा व्यक्त करून संमेलनाचे उद्घाटन झाल्याचे सूतोवाच केले.
संमेलनाध्यक्ष सरोजताई काशीकर, आपल्या अध्यक्षीय मनोगताची सुरुवात करताना म्हणाल्या की ‘साहित्य मला लिहिता आलं नाही पण शेतकरी साहित्य १९८० सालापासून मला जगता आलं, आणि हीच माझी एक जमेची बाजू आहे. माझ्या घरी, माहेरी शेती होती, ’मी कृषिशास्त्राची पदव्युत्तर पदवीप्राप्त असूनही शेतकऱ्यांचे खरे दुःख मला कळले नव्हते. कारण ते अभ्यासक्रमात कधी आलेच नव्हते, शरद जोशीच्या भाषणांमधून, साहित्यामधून त्याची जाणीव, जागृती झाल्याने, माझ्यासारख्या असंख्य शिकलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना स्वतःच्या शिक्षणाची लाज वाटायला लागली. त्यांच्या आंदोलनाला एक शिस्त होती अभ्यास होता, जो विषय मांडायचा आहे, ज्या करिता लढा द्यायचा आहे, त्या विषयाची ते आधी तयारी करून घ्यायचे. म्हणून शेतकरी संघटनेची आंदोलने शंभर टक्के यशस्वी होऊन परिमाणकारक ठरली. शरद जोशींनीच म्ह्टल्याप्रमाणे, आता आंदोलनाची दिशा बदलावी लागेल, रस्त्यावर उतरून नव्हे तर लेखणीमधून जनजागृती घडवावी लागेल. स्त्रियांमधील सृजनशीलतेचा दाखला देताना, स्त्रियांना अर्थनियोजनाची चांगली जाण असल्याबाबत सांगून, कोणत्याही क्षेत्रात त्या उत्कृष्टपणे परिणामकारक काम करू शकतात. परंतु आज संपूर्ण कुटुंबसंस्थाच मोबाईल इंटरनेट, टीव्हीच्या मोहमयी जाळ्यात अडकल्यामुळे, भास-आभासाच्या या खेळात कुटुंबाची वाताहात होत असून वेळीच चांगले-वाईट ओळखून कुटुंब संस्था वाचवण्याची गरज प्रतिपादित केली. आज सोबतीला तंत्रज्ञान आहे. तेव्हा आपण आपलं साहित्य जगांपर्यंत पोहचवू शकतो, नवीन पिढीला हे कळायला पाहिजे. त्यांच्या पर्यंत जायला पाहिजे. उदाहरणादाखल ‘उडता पंजाब’ सिनेमात दाखविण्यात आलेली शेतकरी तरुण मुलांमधील व्यसनाधीनता हे साहित्याचे विषय व्हायला पाहिजे. मा.अध्यक्षांनी एकूणच शेती, शेतकरी, शेतकरी संघटना, संघटनेचा प्रवास, शेती अर्थ विचार, बदललेल्या काळातील आव्हाने, साहित्यिकांची जबाबदारी आणि शेतकरी साहित्य चळवळ यावर अतिशय ओघवत्या शैलीत मार्मिक भाष्य केले.
संमेलनाच्या उद्घाटन सत्राचे सूत्रबद्धपणे संचालन प्रख्यात निवेदिका साहित्यिक प्रा. डॉ.. मनीषा रिठे यांनी केले. आपल्या सुप्त मनातील भाव-भावनांना वाट मोकळी करून देण्याकरिता कवितेसारखे दुसरे माध्यम नाही आणि याच सशक्त माध्यमातून, शेतकरी शेती समाज, केवळ शेती केंद्रित, ग्रामीण नागरी संवेदनांना व्यक्त करण्याकरिता, महाराष्ट्रातील विविध भागांमधून आलेल्या प्रतिनिधी मधील, तब्बल पन्नास कवींचे, कवीसंमेलन मा.गंगाधर मुटे यांच्या अध्यक्षतेखाली, प्रसिद्ध कवी अजित सपकाळ व कवी अंनत मुंडे यांच्या बहारदार निवेदनातून फुलत गेले. फक्त अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन, या व्यासपीठावरून सादर होणारा ‘शेतकरी गझल मुशायरा’ ही या चळवळीची मोठी उपलब्धी असून. गझल सारखी शिस्तबद्ध काव्यविधा जेव्हा, "कोणता लावू मलम कळत नाही ! खोल गेलेली जखम खपली धरत नाही!" अश्या प्रकारे जगाचा पोशिंद्याच्या मन:स्थिती बाबत व्यक्त होते, तेव्हा रसिकाला एका वेगळ्या अनुभूतीचा साक्षात्कार होतो. अश्या प्रकारे महाराष्ट्रातील विविध भागांमधून आलेल्या तब्बल पंचवीस गझलकारांचा सहभाग असलेला, प्रसिद्ध गझलकार दिवाकर जोशी परळी, यांचे अध्यक्षतेखाली आणि प्रसिद्ध निवेदक गझलकार श्री. बाळासाहेब गिरी नाशिक, यांच्या अभ्यासपूर्ण निवेदनातून, बहरत गेलेला अविस्मरणीय असा गझल मुशायरा, रसिकांच्या मनःपटलावर कोरला गेला.
या संमेलनामधील परिसंवाद ही एक बौद्धिक मेजवानीच असते. परिसंवादाचा मुख उद्देशच हा असतो की, संबंधित विषयाचे ज्ञान आणि समज सुधारण्यास सक्षम करणे. याही संमेलनामध्ये अनुक्रमे, ‘पश्चिम महाराष्ट्राची शेती तंत्र मंत्र’, ‘शेतीला वारंवार कर्जमुक्ती कशाला हवी’, ‘शेतीचा एकच आधारस्तंभ फक्त चौथास्तंभ’ असे शेतीकेंद्रित विषयावर आधारीत परिसंवादात मा. अनिल घनवट, मा. शैलजाताई देशपांडे, मा.गीता खांदेभराड, मा. सीमा नरोडे, डॉ. आदिनाथ ताकटे, मा.गंगाधर मुटे आदी मान्यवरांनी अनमोल मार्गदर्शन केले.
समारोपीय सत्रात संमेलनानिमित्त आयोजित विश्वस्तरीय लेखन स्पर्धेतील विविध लेखन प्रकारांमधील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. या संमेलनानिमित्त, पश्चिम महाराष्ट्रातील लोकजीवन, शेती, शेतकरी, शेती निगडित उद्योग प्रतिनिधींना पाहता आले, अभ्यासता आले. ही या तपपूर्ती संमेलनाची मोठी उपलब्धी होती.
- रवींद्र अंबादास दळवी
नाशिक