अकरा भूमिपुत्रांनी शिकवला धडा
हरिश्चंद्र राजा, तारामती राणी
डोंबाघरी भरी पाणी, डोंबाघरी पाणी..
मृदंग झांजांचा कल्लोळ आणि गाणाऱ्यांची सामूहिक बेसूरता ओलांडून अर्थ असा भिडला, की गळ्यातला आवंढा गिळेना.
आणीबाणीचा काळ अजून चालू होता. भूमिहीनांना दोनअडीच एकर जमिनीची वाटणी चालली होती. माझ्या जमिनीच्या पश्चिमेला दहाबारा घरांना मिळालेल्या जमिनी पडून राहिल्या होत्या. महाळुंग्याच्या शिवळे पाटलांच्या जमिनी कित्येक आदिवासींना मिळालेल्या, रिकाम्याच पडल्या होत्या. हे प्रकरण मला काही समजेना. खरे म्हणजे जमीन मिळाल्यानंतर नवभूधारकांनी उत्साहाने जमीन कसायला लागले पाहिजे होते. जमिनीचे फेरवाटप झाले, जमीन नसणाऱ्यांना जमिनी मिळाल्या म्हणजे ग्रामीण दारिद्र्याचा प्रश्न सुटतो असे आम्ही कित्येक वर्षे ऐकत, घोकत होतो आणि या जमिनी हाती आलेल्यांना त्याचे काहीच कौतुक नव्हते.
कुणी म्हणाले, जमीन मिळाली तरी औते पाहिजेत, बैल पाहिजेत, बियाणे पाहिजे, खतं पाहिजेत, नुसती जमीन घेऊन काय करता? अकलूजला का कुठे कुणी पुढाऱ्यांनी नवा प्रयोग केला. नवभूधारकांना त्यांच्या जमिनी नांगरून, पेरून द्यायच्या. मी मनात विचार केला, पाचपंचवीस नवभूधारक एकत्र झाले, थोडीफार पैशाची सोय झाली, तर सामूहिक शेती जमणार नाही का? खेडच्या प्रांत अधिकाऱ्यांनी दावडीच्या नवभूधारकांची गाठ घालून दिली. अडचण कोणतीच नव्हती, जुना मालक थोडा कटकट्या होता; पण कायद्याने त्याचे काहीच चालण्यासारखे नव्हते. मामलेदारांनी स्वत: येऊन जमिनीच्या सीमा काढून दिल्या. एकूण अकरा भूमिहीनांना सलग जागी जमीन मिळाली होती. अकरा घरच्यांची बैठक बोलावली. निम्मेअधिक चावडीवर आले. सगळ्यांनी सामूहिक शेती करायची. सगळ्यांची जमीन सामूहिक मानायची. माझा हा तुकडा असे म्हणायचा कोणालाच अधिकार राहणार नाही. नाही तर विहिरीची जागा ज्याच्या जमिनीवर लागेल, तो विहीर खणून झाल्यावर म्हणायला लागायचा- मला नाही तुमच्या सामूहिक शेतीतसामील व्हायचे. व्हा माझ्या जमिनीच्या बाहेर; म्हणजे मग सगळेच मुसळ केरांत जायचे. शेतीचे नाव ठरले, 'अकरा भुमिपुत्र'.
एक एक गमतीची गोष्ट लक्षात आली. या अकरापैकी तीनच खऱ्या अर्थाने भूमिहीन होते. त्यांच्या घरचे पुण्या-मुंबईला नोकरीत होते. त्यांना शेती नावावर झाली यात आनंद होता. वेगवेगळ्या पुढाऱ्यांना भेटून त्यांनी जमीन मिळावी याकरिता पैसा खर्चही केला होता; पण जमीन कसण्यात त्यांना मनातून काहीही उत्साह नव्हता. माझ्यासमोर, अधिकाऱ्यांसमोर जमीन कसण्याबाबत आपल्या उत्साहाचे प्रदर्शन करण्यात मात्र त्यांची अहमहमिका चाले. बँकेकडून कर्ज मिळवायची व्यवस्था मी खेटे घालून घालून करून आणली. बरोबर अकरापैकी फक्त एकच भुमिपुत्र; बाकीचे सगळे घरच्या कामासाठी गुंतलेले. एकोणिसाव्या शतकातील मिशनऱ्यांच्या धाटणीवर मी स्वतःलाच धीर देत होतो. आपल्यावर विश्वास ठेवण्यासारखे आपण प्रत्यक्षात काय करून दाखवले आहे? त्यांनी निरुत्साह दाखवावा हे साहजिकच नाही, योग्यही आहे. काम उभे राहील तस तसा त्यांचा विश्वास वाढेल.
जमीन डोंगराच्या कपारीत उतरणीवर, बांधबंदिस्तीचे मोठे काम करणे जरूर होते. संबंधित खात्याच्या मंडळींनी काम करून देणे कबूल केले. अट एक-कामाकरिता रोजावर लावायची माणसे जागेवर उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आमची. मी आनंदाने कबूल केले. तालुक्याच्या गावाहून दावडीला आलो. दोन चार भुमिपुत्र भेटले. त्यांना निरोप दिला, दोनचार दिवसांत आपण शेतीवर राहायला जायचे. प्रत्येक नवभूधारकाच्या घरातली दोन माणसे तरी राहायला आली पाहिजेत. बांधबंदिस्तीचे काम आपणच केले तर पदरचा खर्च करावयाच्या ऐवजी मजुरी मिळेल. जे गैरहजर राहतील त्यांना वेगळा भार द्यावा लागेल.
ठरलेल्या दिवशी सकाळी उजाडता उजाडता दावडीला गेलो. कोणत्याच घरचे कोणीच सापडेना. तास दोन तासांत चार घरातली नऊ माणसं हाती लागली. त्यांना माझ्या जीपमध्ये घालून त्यांच्या जमिनीवर नेले. जमिनीवर अफाट दगडगोटे गोळा करायला सुरुवात झाली. दगड लावून घेऊन पहिल्यांदा रात्रीकरिता आडोशाच्या भिंती करून घ्यायला सुरुवात झाली. संध्याकाळी कंदिलाच्या प्रकाशात सगळ्यांनी भाकऱ्या खाल्ल्या.
मायदेशी परत आल्यापासून आयुष्याला काही दिशा सापडते आहे असं वाटलं. जेवण झाल्यावर दोन तरुणांनी गावात जाऊन उद्या सकाळी प्रत्येक घरच्या दोघादोघांना गोळा करून आणण्याची हमी देऊन गावाकडे प्रस्थान ठेवले. एक दोन तशीच सटकली. आम्ही सहा जण दगडांच्या रचलेल्या भिंतींच्या आडोशात डोंगरातील वाऱ्याच्या भणभणाटात रात्र काढली. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत नवीन कोणीच आले नाही. गावातल्या कोणत्या तरी मर्तिकाची बातमी लागली. राहिलेले भूमिपुत्रही लगबगा गावाकडे जाऊ लागले. अशाच प्रकारची पुनरावृत्ती होऊ लागली. तेव्हा मी सगळ्यांना एकदा विचारले, "तुमची अडचण तरी काय आहे? तुम्हाला शेती करायची आहे की नाही? नसेल करायची तर मला मोकळे करा."
"वा, वा! असं कुठं झालंय? तुम्ही गेला म्हणजे सगळंच कोसळलं बघा. मग तर आम्हाला तोंडात मातीच घालावी लागेल अन् तो मालक आम्हाला आता जगू देईल का? साहेब, असं करू, जरा बेताबेतानंच घेऊ, मालकाला एकदम चिडवणं बरं नाही..." वगैरे, वगैरे, वगैरे.
माझ्या एकूण प्रकरण लक्षात आलं. एव्हाना हजार दोन हजार मी पदरचे खर्चून बसलो होतो. अकरापैकी एकालाही जमीन कसण्याची आणि कष्ट करण्याची इच्छा नव्हती. बिगर शेती उत्पन्नाचे साधन असतानाही भूमिहीन म्हणून नावे नोंदवून त्यांनी जमीन मिळवली होती. माझ्यासारख्या शहरी माणसापुढे भूमिहीनतेचे करुण नाटक करून दाखवायचे कौशल्य त्यांना जमले होते. गावकऱ्यांपढे त्यांचे नाटक चालत नव्हते. त्यांना जमीन कसायची नव्हती. पुढेमागे खरीददार सापडला तर विकून दोन पैसे करायचे होते आणि जमले तर हस्तांतरित जमिनी म्हणून त्या कदाचित परतही मिळवायच्या होत्या.
....पण यात त्यांचे कुठेच चुकत नव्हते. चुकत माझेच होते. बँकेच्या कर्जाचे प्रकरण करतानाच माझ्या लक्षात आले होते. विहिरीचा खर्च करून, पाण्याची सोय करून शेती करायची म्हटले तर कोणतेही पीक काढले तरी बँकेच्या कर्जाची परतफेड या जन्मी शक्य नव्हती. दरवर्षी चांगले पीक येईल असा हिशेब केला तरी खर्च फिटत नव्हता. ही काय गंमत आहे. याचा उलगडा मला स्वतःला त्या वेळी झाला नव्हता.
गावकऱ्यांना ते कळलं होतं. भुमिपुत्रांनाही ते कळलं होतं; पण ते मला सांगत नव्हते. हे सर्व समाजव्यवस्थेचं गुह्यतम गुह्य आणखी उग्र तपस्येने माझे मलाच शोधावे लागणार होते.
"तुमची सगळ्यांची जमिनीवर राहायला जायची तयारी झाली, म्हणजे मला निरोप द्या." असं म्हणून मी भुमिपुत्रांचा निरोप घेतला. एक धडा शिकून. यापुढे लोकांचे भले करण्याचे प्रयत्न बंद. भिकेच्या आणि मदतीच्या प्रकल्पातून गरिबीचा प्रश्न सुटत नाही. वर्षानुवर्षे गावागावातील गरिबी संपण्याबद्दल जो मार्ग मनात शंकासुद्धा न आणता मी मानला होता, त्याबद्दलच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. पुन्हा एकदा शून्यावर आलो होतो. स्वित्झर्लंडला परत जाण्याचा मोह मी कसा टाळला कुणास ठाऊक?
- शरद जोशी
(युनिकोडीकरण - शंकरराव ढिकले, नाशिक)
(सा. ग्यानबा, १२ सप्टेंबर १९८८)