![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
पुस्तक परीक्षण
शेतकरी व कष्टकऱ्यांचे जीवनवास्तव मांडणारी दीर्घ बालकविता
मराठी बालकवितेच्या प्रांतात एक वेगळ्या धाटणीची बालकविता परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील पुयनी गावचे रहिवासी असणारे कवी आत्तम गेंदे यांनी लिहिली आहे. 'बापाची कविता' हा एकाच दीर्घ बालकवितेचा संग्रह नवलेखक अनुदान योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या अनुदानातून पुण्याच्या सौ. प्रियांका प्रशांत पटवर्धन यांनी प्रकाशित केला आहे. जयश्री यादव यांनी समर्पक मुखपृष्ठ रेखाटले आहे. आत्तम गेंदे हे एक उत्तम गझलकारसुद्धा आहेत. अनेक गझल मुशायऱ्यांत त्यांनी गझलचे सादरीकरण केले आहे. सशक्त गझल लिहिणाऱ्या या कवीची बालकविताही तितकीच सशक्त आहे. "एका शाळकरी मुलाने त्याच्या घरातील सुख - दुःखाची कथन केलेली गोष्ट म्हणजे ही 'बापाची कविता' आहे." असे उमेश मोहिते यांनी प्रस्तावनेत म्हटले आहे. "आत्तम गेंदे यांनी 'बापाची कविता' या दीर्घ बालकवितेमधून सावकारी विळख्यामुळे कष्टकरी बळीराजाच्या आत्महत्येची मन पिळवटून टाकणारी कहाणी मांडली आहे." हे उमेश मोहिते यांनी या कवितेच्या बाबतीत केलेले विधान अगदी योग्य आहे.
या संग्रहातील कवितेची भाषा बालवाचकांना समजेल अशी सोपी, सहजप्रवाही, अल्पाक्षरी आणि मधुर आहे. मराठवाड्याच्या बोलीभाषेने या दीर्घ कवितेला माधुर्य प्राप्त झाले आहे. माळरानाच्या पोटाशी वसलेल्या कवीच्या छोट्याशा गावच्या वेशीवर गावाचे भले मोठे नाव कोरलेले आहे. मारुतीच्या पारामागे असलेल्या मातीच्या चार भिंतीच्या आपल्या छोट्या घराविषयी कवीला अतिशय प्रेम आहे. त्यातच त्याला सुख आणि समाधान मिळते. इनमिन तीन जीव त्या घरात राहतात. कवीची आई कवीला तिच्या घासातला घास भरवीत असते. वडिलांच्या बोटाला धरून चालताना, सोबत खेळताना कवीला आपले वडील आपले एक मित्रच आहेत असे वाटते. याविषयी लिहिताना कवी म्हणतो,
बोट धरून बापाचं
चालायला मी शिकलो
बाप वाटायचा दोस्त
संग खेळायला शिकलो
कवीच्या आजोबांवरही कर्जाचा भार होता. आणि त्याच कर्जापायी त्यांचा जीव गेला. याविषयी त्यांनी पुढील ओळी शब्दबद्ध केल्या आहेत.
बाप बापाचा बी म्हणं
व्हता कर्जानं वाकला
त्याच्या कर्जाचा डोंगर
जिवावरती उठला
या कवितेतील मुलाचे वडील नेहमीच इमानदारीने वागत. ते कधीच कुणापुढे झुकले नाहीत. बारा एकर शेती त्यांनी एकट्यानेच कसली. रोज पहाटे उठून शेतशिवार फुलविले. रात्रंदिवस शेतातील कामे केली. कवीचे शेतकरी वडील जणू रानाचे योगी आहेत, रानाचे साधू आहेत आणि ते सदैव रानाचेच चिंतन करतात. त्यांच्या संगतीने शेतात पक्षी कीर्तन करतात. ते शेतात दिसताच शेतातील बैलं त्यांना उभे राहून पाहतात. ते जवळ येताच मान हलवून लाडात येतात आणि त्यांचे हात चाटतात. कवीची आईसुद्धा वडिलांच्या अगोदरच उठते. घरादाराला सजविण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करते. लेकरावर माया करते. मास्तराच्या सरूसोबत लेकराला शाळेत पाठवते. म्हणजेच या कवितेतील मुलाच्या आई-वडिलांना शिक्षणाविषयीची आस्था असल्याचे दिसून येते. आपला मुलगा खूप शिकावा याची तळमळ त्यांना वाटते.
उन्हात पाऊस पडतो त्यावेळेस कोल्ह्याचं लग्न लागलं असं म्हणण्याची खेड्यात एक समजूत आहे. या ऊन - पावसाच्या खेळाविषयी, निसर्गचक्रात अचानक चमत्कारिक घडणाऱ्या गोष्टींविषयी लिहिताना आत्तम गेंदे यांनी खूप सुंदर शब्दांत मांडणी केली आहे.
आकशीदा पावसाच्या
अशा उन्हात पडल्या
झालं कोल्ह्याचं लगीन
कुठं चिमण्या दडल्या?
आत्तम गेंदे यांच्या 'बापाची कविता' या संग्रहातील दीर्घ कविता असूनही ती एका विशिष्ट लयीत बांधलेली आहे. तिला अंगभूत चाल आहे. ही संपूर्ण कविता एक कहाणी आहे. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील जीवनवास्तव चार-चार ओळींच्या कडव्यांतून सहज आणि योग्य यमकयोजना आखून लिहिलेलं एक महाकाव्यच आहे; असे म्हणायला हरकत नाही. सावकाराच्या कर्जामुळे बापानं आंब्याच्या झाडाला घेतलेली फाशी जीवाला चटका लावून जाते. बापाने फाशी घेतल्यानंतर काही दिवसांनी कुटुंबाला सावरून कवितेतील बालनायक पुन्हा नव्या जोमाने कामाला लागतो. घट्ट पाय रोवून तो पुढे चालायला लागतो. त्याचे आत्मबळ वाढवून तो नव्या बदलाची सुरुवात करतो. खूप शिकून स्वतःचं नशीब स्वतः लिहायला सज्ज होतो. यातून एक आशावाद पेरलेला दिसून येतो. याविषयी उमेश मोहिते म्हणतात, "ग्रामीण बोलीतील ही दीर्घ बालकविता गरीब कष्टकरी शेतकरी बापाचे कष्टाचे जगणे आणि त्याची सुख-दुःखे संवेदनशीलतेने टिपते आणि म्हणूनच शेतकरी बापाची ही करुण कहाणी मन पिळवटून टाकणारी आहे. पण याचा अर्थ ही कविता केवळ शेतकरी वर्गाची हलाखीची स्थितीच कथन करीत नाही; तर या परिस्थितीला तोंड देण्याचे सामर्थ्यही देते; लढण्याचे बळही देते." हेही तितकेच महत्त्वाचे आहे. या कवितेविषयी मलपृष्ठावर अभिप्राय देताना प्रा. केशव बा. वसेकर म्हणतात, "साहित्यातून समकालीन वास्तवाचे प्रतिभास्पर्शीत दर्शन घडते, याची सत्यता 'बापाची कविता'मध्ये पटते." याविषयी दुमत नाही. हे दीर्घ बालकवितेचे पुस्तक काल्पनिक परीकथा किंवा मनोरंजक कवितेला स्थान न देता सामाजिक वास्तवाला समोर घेऊन येते. हे एक वेगळेपण म्हणता येईल. ही कविता बालवाचकांना नक्कीच आवडेल. त्याबरोबरच सर्वच स्तरातील वाचक हीचे आनंदाने स्वागत करतील यात शंकाच नाही.
- केशव बालासाहेब कुकडे
क्वार्टर क्र. जुने डी-८, थर्मल कॉलनी,
परळी वैजनाथ-४३१५२०
जि. बीड.
मो.९८६०९८५९११
पुस्तक : बापाची कविता - आत्तम गेंदे
प्रकाशक : सौ. प्रियांका प्रदीप पटवर्धन, पुणे
पृष्ठे : ७२, किंमत : ३६ ₹
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!


शेतकरी तितुका एक एक!
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा
लेखन छान आहे पण "शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयाशी मिळतेजुळते वाटत नाही.
पाने