नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
खाया उठली महागाई : नागपुरी तडका
नाकी तोंडी पाणी घुसले, जीव झकोले खाई
वेसण तुटली, स्वैर सुटली, खाया उठली महागाई...!!
आवतन नव्हते दिले तरी, वाजत-गाजत आली
एक तारखेस खिसा भरला, पाच तारखेस खाली
देवदर्शन दुर्लभ झाले, आता पायी पंढरीवारी
गहाळ झाल्या सोयी-सुविधा, परी कर वाढतो भारी
धान्यामधी खडे मिसळती, शासक टुकटुक पाही
वेसण तुटली, स्वैर सुटली, खाया उठली महागाई...!!
तेलामध्ये भेसळ होते, मिरची मध्ये गेरू
पाचक रसा दुर्बल करते, व्याधी पाहते घेरू
दवादारू महाग झाली,आतून काळीज पिरडी
गरिबाघरी कँसर आला, बांधून ठेवा तिरडी
मुक्ती मागे रोगी सत्वर,अन यमास नसते घाई
वेसण तुटली, स्वैर सुटली, खाया उठली महागाई...!!
नाही आवर महागाईला, मग कशास शासनकर्ते?
इच्छाशक्ती मरून जाता, औचित्य काय ते उरते?
लाल दिव्याचा हव्यास केवळ, केवळ सत्तापिपासा
घाऊकतेने भरडून खाती, हीन-दीनांच्या आशा
आमजनांना अभयदाता, ’विचार’ उरला नाही
वेसण तुटली, स्वैर सुटली, खाया उठली महागाई...!!
गंगाधर मुटे
---------------------------------------------------
ढोबळमानाने शब्दार्थ.
झकोले = हेलकावे, आवतन = आमंत्रण,
पिरडी = पिरडणे = पिरगाळणे
---------------------------------------------------
....................................................................
(रानमेवा काव्यसंग्रह - प्रकाशन दि. १०.११.२०१०)
....................................................................
प्रतिक्रिया
फेसबुक प्रकाशन लिंक
https://www.facebook.com/gangadharmute/posts/1815618735129473
शेतकरी तितुका एक एक!
पाने