
|  नमस्कार !  बळीराजावर आपले स्वागत आहे. | 
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
                  मायबोली या संकेतस्थळावर मला एक प्रश्न विचारण्यात आला की "एखाद्या माणसानं कधीच शेती केली नसेल - आणि त्याला शेती करायची असेल तर कुठले मुद्दे विचारात घ्यावेत? म्हणजे, आर्थिक, मानसिक, शारीरिक आणि कायदेशीर सर्व बाबींबद्दल तुमचा अनुभव/मते सांगा - प्लीज! "असा प्रश्न विचारला आहे. अशा तर्हेच्या प्रश्नाला उत्तर तरी काय द्यावे?.
             कारण या प्रश्नाचे उत्तर माझ्यासाठी फारच अवघड आहे. असा प्रश्न मला आजवर कोणी विचारलाच नव्हता. "इधरसे बाहर निकलनेका रस्ता है, अंदर आनेके लिये रस्ता तो हैही नही".
शेती सोडून जे अन्यत्र गेले त्यांच्या आयुष्याचे सोने झाले याउलट जे बाहेरुन शेतीत आले ते गेले, कामातूनच गेले, मातीमोल झाले.
               हे जर मला माहीत असेल तर मी काय माहिती द्यावी? आम्ही कवी माणसं. कविता करताना पतंगाला सहज अग्निज्योतीवर उड्डाण घ्यायला सांगतो आणि प्रेमाच्या आहुतीची महती गातगात कविता पूर्णं करतो. पण जित्याजागत्या जीवाला शेती करायला लावणे म्हणजे खोल डोहात बुडण्यासाठी आमंत्रीत करण्यासारखे आहे, हे मला पक्के ठाऊक आहे, तरीपण मी उत्तर द्यायचा माझ्यापरी प्रयत्न करणार आहे.
.
या प्रश्नाचे दोन विभाग पडतात.शेती कशासाठी करायची ?
अ) हौसेखातर शेती. (उपजीविकेसाठी अन्य सोर्स आहेत अशांसाठी.)
हौसेखातर शेती करायची असेल तर कशाचीच अडचण नाही. घरात दोन पिढ्या जगतील एवढी संपत्ती असेल, पुढारीगिरी करून माया जमविता येत असेल किंवा घरातले कोणी सरकारी नोकरीत असून पगाराव्यतिरिक्त माया जमविण्याचे अंगी कौशल्यगूण असेल तर त्यांच्यासाठी काळ्या पैशाला पांढर्यात रूपांतरित करण्यासाठी शेती एक वरदानच ठरत आली आहे.
ब) उपजीविकेसाठी शेती.
उदरभरणासाठी शेती ( उदरभरण हाच शब्द योग्य. लाईफ बनविणे, करिअर करणे, जॉब करणे सारखे शब्द सुद्धा येथे फालतू आहेत.) करायची असेल तर मग गंभीरपणे विचार करावा लागेल.त्यासाठी कायकाय हवे आणि कायकाय नको अशा दोन याद्या कराव्या लागतील.
१] प्रथम आर्थिक खर्चाची यादी करू.अंदाजे किमतीसह.
१) १० एकर शेतजमीन.........२०,००,०००=००
२) बांधबंदिस्ती : ....................२०,०००=००
२) विहीर पंप :.....................१,५०,०००=००
३) शेती औजारे :................... ३०,०००=००
४) बैल जोडी :....................... ६०,०००=००
५) बैलांचा गोठा :............... १,००,०००=००
६) साठवणूक शेड :..............१,००,०००=००
-----------------------------------------------
एकूण अंदाजे भांडवली खर्च : २४,६०,०००=००
-----------------------------------------------
सर्वसाधारणपणे अंदाजे २५,००,०००=०० एवढी भांडवली गुंतवणूक करावी लागेल.
शारीरिक गरजा :
१) त्वचा जाडी भरडी असावी.सहजासहजी काटा रुतायला नको.
२) रंग घप्प असावा.शक्यतो डार्क ब्लॅक.
३) गोरा,निमगोरा,गव्हाळी वगैरे रंग इकडे घेऊन येऊ नये.चार-सहा महिन्यातच रंग बदलण्याची हमखास शक्यता.त्यासाठी एक उन्हाळा पुरेसा आहे.
४) पायांना चपलेची आदत नसावी.चिखलात चप्पल चालत नाही.
५) शरीरात रक्त जास्त नको,जेमतेम असावे कारण काटा रुतला तर भळभळा वाहायला नको.
६) हाडे कणखर आणि दणकट असावी.
७) शरीरात चपळता असावी.बैल पळाल्यास धावून पकडता येणे शक्य व्हावे.
८) ५०-६० किलो वजन २-४ किलोमीटर वाहून नेण्याची क्षमता असावी.
मानसिक गरजा :-
१) बिपीचा आजार नकोच.नाहीतर शेतीत पहिल्याच वर्षी जर घाटा-तोटा आला तर लगेच " रघुपती राघव राजाराम" हे गीत घरासमोर वाजंत्री वाजविण्याची शक्यता......राम नाम सत्य है...
२) हांजीहांजी करण्याची सवय हवी.कारण इथे पुढार्यावाचुन बरीच कामे अडतात.आर्थिक पाठबळ नसल्याने जागोजागी हांजीहांजी केल्यावाचून गत्यंतर नसते.
३) मिनतवारी करणे हा अंगीभूत गुण असावा कारण प्रत्येक ठिकाणी उधारीपाधारी शिवाय इलाज नसतो.
४) आत्मसन्मान वगैरे वगैरे अजिबात नको.हमालानेही अरे-कारे,अबे-काबे म्हणून दोन शिवा हासडल्या तर वैषम्य वाटायला नको.शेतकर्यासोबतची सर्वांची बोलीशैली ठरली आहे.७० वर्षाच्या शेतकर्याला १२ वर्षाचा व्यापारी पोरगा सुद्धा याच भाषेत बोलत असतो.
५) मुलाबाळांना उच्चशिक्षण द्यायच्या महत्त्वाकांक्षा नकोत.नाहीतर अपेक्षाभंग व्हायचा.
६) चांगले जीवनमान जगण्याची हौस नसावी.अनेक पिढ्या उलटूनही तसे शक्य होत नाही.
७) थोडाफार मुजोरपणा हवा.
सावकार - बँका कर्जवसुली मागण्यास आल्या तर - पुढच्या वर्षी देतो, होय देतोना, पळून गेलो काय, होईन तवा देईन, नाही देत जा होईन ते करून घे. अशी किंवा तत्सम उत्तरे देता आली पाहिजेत.तरच चार वर्षे पुढे जगता येईल.
८) मनाचा हळवेपणा अजिबात नको. जर का तुम्ही संवेदनाक्षम-हळव्या मनाचे असलात तर चार लोकात झालेली फटफजिती सहन न झाल्याने गळफास लावून घ्यायचे.म्हणून मुजोरपणा हवा हळवेपण अजिबात नकोच.
९) पंखा,कूलर,फ्रीज,टीव्ही वगैरेची आवड नको. दिवसभर शेतात काम झाले की आलेला शीण-थकवा एवढा भारी की खाटेवर पडल्याबरोबर ढाराढूर झोप लागत असते.
१०) विचार करण्याची प्रवृत्ती नको नाहीतर चिंतारोग व्हायची भिती.
कायदेशीर गरजा:-
कायदेशीर ज्ञान नसले तरी चालते. खिशात पैसे असेल तर हवा तेवढा सल्ला वकील मंडळीकडून घेता येतो.
माझ्या मते जर कोणाला नव्याने शेती करायची (गावरानी भाषेत जिरवून घ्यायची) हौस असेल तर त्यांनी एवढा विचार नक्कीच करायला हवा.
देशाच्या पोशिंद्याची ही चार प्रश्नांची कहाणी अठरा उत्तरी सुफळ संपुर्णम.....!
पोशिंद्याचा विजय असो....!!
                                                                गंगाधर मुटे
===========================================
(पूर्वप्रकाशित - शेतकरी संघटक)
 
      
    
      
प्रतिक्रिया
सुंदर लेख.
सुंदर लेख.
जय गुरूदेव
फेसबुक लिंक
फेसबुक लिंक
https://www.facebook.com/gangadharmute/posts/1940707599287252
शेतकरी तितुका एक एक!
पाने