![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
शेतकरी कुटुंबाची ही बैठक आहे. एका बाजूला, कालिदासाच्या शब्दात सांगायचं झालं तर,
निसर्गभिन्नस्पदमेकसंस्थम
अस्मिन द्बयम श्रीश्व सरस्वती च॥
म्हणजे, ज्यांच्यावर सरस्वती प्रसन्न आहे आणि श्री काही फारशी अप्रसन्न नाही अशी मंडळी आणि दुसर्या बाजूला, लक्ष्मी आणि सरस्वती दोघींपासून फारकत झालेली मंडळी अशी ही एका कुटुंबातील माणसं जमली आहेत. मला जेव्हा या साहित्य संमेलनाचं निमंत्रण मिळालं तेव्हा मी फारसा काही उत्साही नव्हतो हे खरं, पण मी 'हो' म्हणालो त्याचा आज आनंद होतो आहे. गेली वीस वर्षे अनेक सभा केल्या. पण, तिथं पोहोचलो की कार्यकर्त्यांनी पटकन मंचावर घेऊन जायचं, बोलत्या वक्त्याला बाजूला सारून मला बोलायला उभं करायचं आणि भाषण संपलं की पुढच्या सभेची वेळ झाली म्हणून धावत पळत निघून जायचं. गेले दोन दिवस, मधे एक लहानसा प्रश्न विचारला ते सोडलं तर नुसत्या ऐकण्याचा आनंद घेत होतो. दोन दोवस फार आनंदात गेले याबद्दल तुम्हा सर्व साहित्यिकांना आणि संमेलनाच्या संयोजकांना धन्यवाद देऊ इच्छितो.