कविता, साहित्य जे अर्थ, ध्वनी आणि लय यासाठी निवडलेल्या आणि व्यवस्थित केलेल्या भाषेद्वारे अनुभवाची केंद्रित कल्पनाशील जाणीव किंवा विशिष्ट भावनिक प्रतिसाद जागृत करते.
कवितेची व्याख्या करणे हे सौंदर्याच्या अमूर्त साराला पकडण्यासारखे आहे. ही साहित्याची एक शैली आहे जी पारंपारिक सीमांना आव्हान देते , ज्यामध्ये असंख्य शैली, रूपे आणि विषयगत शोधांचा समावेश आहे. कविता सरळ गद्याच्या मर्यादा ओलांडते, शब्द, लय आणि प्रतिमा एकत्र करून भावना, अनुभव आणि दृष्टिकोनांची एक छोटीशी रचना तयार करते.
२) - कविता म्हणजे काय' - (संकलित)
"कविता म्हणजे काय', असा प्रश्न वाचकांना पडतोच. मग तो या प्रश्नाचे उत्तर कुठे शोधत असेल? का नसेलच शोधत? की आपल्या अंत:प्रेरणेवर विश्वास ठेवून पुढ्यातल्या संहितेला कविता मानून मोकळा होतो. हे प्रश्न केवळ मराठी कवितेच्या वाचकांना पडणारे प्रश्न नव्हेत; हे जगभरातील सर्व काव्यरसिकांना पडणारे प्रश्न आहेत. कवितेची समीक्षा लिहिणाऱ्या समीक्षकांनाही "कविता म्हणजे काय', हा प्रश्न ऍरिस्टॉटलच्या काळापासून आजवर छळतोच आहे.
पौर्वात्य आणि पाश्चिमात्य दोन्ही परंपरांमध्ये कवितेची व्याख्या करण्याचे अगणित प्रयत्न झाले. परंतु कवितेची सर्वमान्य किंवा अंतिम अशी व्याख्या कुणालाही करता आली नाही. याचे मूळ "व्याख्या' या संज्ञेची जी व्याख्या दिली जाते त्यात दडलेले आहे. "व्याख्येत वस्तूचे किंवा संज्ञेचे व्यवच्छेदक लक्षण देणे (Unique Characteristic) म्हणजे व्याख्या.' कवितेच्या बाबतीत असे व्यवच्छेदक लक्षण किंवा एकच एक सत्त्व कुणालाही शोधता आले नाही. म्हणून व्याख्येच्या नावाखाली अनेक कवी-समीक्षकांनी कवितेची लक्षणे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
अभारतीय भाषांमध्ये अगदी ऍरिस्टॉटलपासून विलियम वर्डसवर्थ, टी. एस. इलियट, मिशेल रिफातेरी, रिचर्डस, हर्बर्ट रीड, टेरी ईगलटन आणि मराठीत अलीकडच्या काळात सुधीर रसाळ, रमेश तेंडुलकर, म. सु. पाटील, गंगाधर पाटील, वसंत आबाजी डहाके, चंद्रकांत पाटील, मिलिंद मालशे यांच्यासारख्या जाणकार समीक्षकांनीही हा प्रयत्न केलेला आहे. परंतु दोन्ही परंपरांमध्ये अपवाद वगळता बहुतेकांनी व्यवच्छेदक लक्षण देण्याऐवजी अनेक लक्षणे देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या "व्याख्यासदृश व्याख्या' अतिव्याप्त तरी होतात किंवा अव्याप्त तरी. म्हणूनच वाचक शेवटी त्याच्या भाषिक समजेच्या आधारावर, काव्यस्मृतीच्या आधारावर आणि कविता या साहित्य प्रकाराबद्दलच्या कल्पनांच्या आधारावर वाचलेली संहिता कविता आहे किंवा नाही हे ठरवतो. म्हणूनच वाचकाला जशी बा. भ. बोरकरांची, इंदिरा संतांची, शांता शेळके यांची कविता कविता वाटते तशीच बा. सी. मर्ढेकरांची, दिलीप चित्रेंची, अरुण कोलटकरांची आणि नामदेव ढसाळांचीही कविता कविताच वाटत असते.
कविता म्हटले की आपल्या डोळ्यासमोर तिच्या लक्षणांची एक यादी येते. अलंकार, प्रतिमा, प्रतीक, मिथक, आदिबंध आदींचा वापर करणारी छंदोबद्ध, वृत्तबद्ध किंवा मुक्तछंद-मुक्तशैलीत लिहिली गेलेली संहिता आपण कविता म्हणून स्वीकारत असतो. अलीकडच्या काळात सुधीर रसाळ यांनी प्रतिमेला केंद्रीभूत मानून "शब्दांनी घडविल्या गेलेल्या प्रतिमांची सेंद्रिय रचना म्हणजे कविता होय,' अशी एक व्याख्या केली. (कविता आणि प्रतिमा- सुधीर रसाळ) त्यांच्या मते, प्रतिमा हा घटक कवितेला काव्यत्व मिळवून देणारा प्राणभूत घटक आहे. परंतु ही व्याख्या स्वीकारली तर कथनपरतकडे झुकणाऱ्या बहुसंख्य रचना कविता म्हणून स्वीकारता येणार नाहीत. कथाकाव्य, आख्याने, पोवाडे यांसारख्या काव्यप्रकारांत प्रतिमांची संघटना नसते. मग हे काव्यप्रकार कविता म्हणून बाद करायचे काय? तसेच पु. शि. रेगे यांच्या काही कादंबऱ्या, गंगाधर गाडगीळ यांच्या काही कथा किंवा ग्रेस यांचे ललितबंध हे सारेच काव्यात्म आहे असे आपण म्हणतो, पण त्यांना कविता म्हणत नाही. या अंतर्विरोधाचे काय करायचे?
या पार्श्वभूमीवर, प्राचीन संस्कृत साहित्यशास्त्रात वक्रोक्तिजीवितकार आचार्य कुन्तक यांची व्याख्या मूल्यवान आहे. "काव्यमर्मज्ञांना आनंद देणाऱ्या सुंदर (वक्र) कवी-व्यापारयुक्त रचनेतील शब्द आणि अर्थ यांच्या समन्वित रूपाला काव्य म्हणतात.' त्यांच्या मते, वक्रोक्ती हा काव्याचा आत्मा आहे. या ठिकाणी ध्वन्यालोककार आनंदवर्धन यांच्या मते, "ध्वनी हा काव्याचा आत्मा असतो,' हे मत विचारात घेता येते. त्यांच्या मते, शब्दाचे "वाच्य' आणि "प्रतीयमान' असे दोन अर्थ असतात; "प्रतीयमान' अर्थ म्हणजे "ध्वनी'; ध्वनीमुळे भाषिक रचनेला "काव्यत्व' प्राप्त होते. या दोन्ही व्याख्या जर एकत्रितपणे वापरल्या तर आपण डहाके यांच्या व्याख्येकडे वळू शकतो. डहाके लिहितात, "नाद आणि अर्थ असलेल्या शब्दांची सममूल्यतेच्या तत्त्वानुसार केलेली मांडणी असलेल्या ओळींची; छंद, अक्षरगणवृत्त, मात्रावृत्त अथवा मुक्तछंद-मुक्तशैली यांतील लय-तालांत बांधलेली; अलंकार, प्रतिमा, प्रतीक, मिथक, आदिबंध यांच्या उपयोजनाचे अर्थसंपृक्त असलेली; वाच्यार्थ आणि वाच्यार्थातून स्पंदित होणारा व्यंगार्थ असलेली रचना, म्हणजे कविता, असे म्हणता येईल.' (काव्यप्रतीती- वसंत आबाजी डहाके)
या पार्श्वभूमीवर, मिशेल रिफातेरी याने "सेमिऑटिक्स ऑफ पोएट्री' या ग्रंथात कवितेच्या लक्षणांची केलेली चर्चा बहुमोल आहे. रिफातेरीच्या मते, अर्थाच्या पातळीवरील वक्रता (Indirection) ही प्रतिरूपणाला (Representation) वा अनुकृतीला (Mimesis) नकार देणारी असते. ती विचलन म्हणजे (Deviation), विरूपण (Distortion) व अर्थनिर्मिती यांनी साधलेली असते. रिफातेरी कवितेचा अर्थ (Meaning) आणि कवितेची अर्थवत्ता (Significance) यांत भेद करतो. (कवितेचा शोध- वसंत पाटणकर)
या पार्श्वभूमीवर आचार्य कुन्तक यांची व्याख्या व रिफातेरी यांनी सांगितलेली लक्षणे हाताशी घेऊन "यान्नीस रीत्सोस' या ग्रीक कवीच्या "डायरीज ऑफ एक्झाईल' (वनवासातील रोजनिशी) या प्रसिद्ध कवितासंग्रहातील एक कविता बघूया.
सिगरेटच्या पाकिटांत काही चिठ्ठ्या घेऊन
जोड्यांत खूप काही खरडलेले काही कागद लपवून
डोळ्यांत काही निषिद्ध स्वप्नं घेऊन
(जिथे गाडले गेलेत ते) त्या दगडांखालीच
रात्री, ते एकत्र येतात
नेमके त्याचवेळी
मोठे होत जाते आकाश
मोठे आणि खोल होत जाते आकाश
वाच्यार्थ किंवा काव्यार्थ सांगण्याच्या भानगडीत न पडताही आपण हे बघू शकतो, की एक कैदी तुरुंगातच मारल्या गेलेल्या, त्याच्या स्मृतीतल्या कैद्यांच्या एकत्र येण्याच्या काल्पनिक स्थितीचे वर्णन पहिल्या चार ओळींत करतो आणि नंतरच्या तीन ओळींत आकाशाच्या मोठे आणि खोल होत जाण्याची कल्पना मांडतो. मोजक्या शब्दांत कैद्यांचे दुःखं, भोगलेल्या यातना, जीवनातली परात्मता, जगण्याविषयीची आस्था सगळेच लीलया मांडतो. असे करत असताना रीत्सोस माणसाच्या हातातील आशेचा क्षीण धागा सुटू देत नाही.
=`=`=`=`=`=`=