नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
फरपट (कथा)
रात्रीचे दहा वाजून गेले तरी मालक घरी कसं आल न्हाईत मनून सरू शंकरची वाट बगत बसली व्हती. तिची तिनी मुलं बापाच्या काळजीनं झोपत नव्हती. शंकरचा फोन सारखा कवरेज क्षेत्राच्या भाईर येत व्हता. ज्यंच्या जवळ त्यच उटणं बसनं आसतयं त्यन्ला समदयाला फोन करून इचारलं पर कुणाकडंच त्याचा पत्ता लागत नव्हता. आता मतर सरूला जराबी करमना. आपले धनी कुटं गेले असतील यचा आंदाज ती लावीत व्हती. रातभर सरूला झोप आली न्हाई अन शंकरबी रातीतून आलाच न्हाई.
सकाळ झाली, सूर्यनारायणानं आपला रथ वर आणला व्हता. बाया घरासमूर झाडझूड करीत व्हत्या.कुणी सडा टाकीत व्हत्या. कुणी सारवीत व्हत्या.साडेसातच्या एस.टीतून शंकर खाली उतरला. इतं तिथं कुटंच न थांबता सरळ घरी आला.
सरू गाईची धार काढत व्हती.शंकरनं पाय धुतले. मंजन हातावर घिऊन तो दातं घासु लागला. सरून त्यला बगून न बगितल्यासारखं केलं. सरू लई रागात हाय हे त्यन वळकिलं, अन तो सरूला मनाला, ""सरू आगं राती मी फोन करून तुला बोलणारच व्हतो पर मोबाईलची चारजिंग संपली अन तो बंद पडला. त्यच्यामुळ तुला सांगता आल न्हाई.'' सरू रागातच मनाली ""मंग दुसऱ्याच्या मोबाईलवरून लावता येत नव्हता का फोन तुमाला ? माणूस इकडं येड्यावनी वाट बगत असतयं आन आपुन हिंडत जा बिन सांगताच. बर गेलाव ती गेलाव, कुणाजवळ सांगायच तरी की ?'' सरू रागातच बोलत व्हती. ""व्हय गं, येवडा टाईम नव्हता, शेतातूनच पाचच्या एसटीनं बसलो अन रामवाडीला गेलो. पावन्याला भेटलो, चहापाणी अन बोलण्यात कसा येळ गेला समजलं न्हाई, माजी आठची मुक्कामी गाडी हुकली, लाईट गेल्याली आता काय ?पावणे मनले मुक्काम करा. थांबलो मुक्कामाला, तुजा नंबर मला पाट न्हाई मनून दुसऱ्याच्या मोबाईलवरून फोन करता आल न्हाई, समदा घोळ झाला.'' शंकरन भरभर सम्दं सांगून टाकलं. अंघूळ करून शंकर पुना घरा भाईर पडला.
शालूच लगीन जसजसं जवळ येऊ लागलं तस तसं शंकरच्या पायाला दम नव्हता. सारख ह्या पावन्याकडं जा, त्या पावन्याकड जा आस सुरू व्हतं. शंकर त्या दिवशी भावाच्या चुलत मेव्हण्याकडं साखरवाडीला आला. दुपारची येळ आसल्यामुळे घराला कुलूप व्हतं. यवढ्यात रामभाऊचं पोरगं शाळंतून घरी आलं अन् त्यनं शंकरला वळकिलं. ""मामा कवा आलावं,ही काय आत्ताच आलोय शंकरन उत्तर दिलं.'' सम्दे कुटं गेलेत ? कुणीच न्हाई घरी, रानात गेलेत. बरं बाळू सायकलवर जाऊन दादाईला बोलवून आण की लवकर, ये बरं जाऊन लवकर,""हिंग आत्ता आलोच'' मनून बाळू रानाकडं गेला. थोड्या येळानं रामभाऊ रानातून घरी आला. लिमलेट झालं, शंकर सरळ विषयावर आला ""रामभाऊ शालूचं लगीन ठरलयं, पुडल्या महिन्यातल्या इस तारकीला, काई दामाचं काम व्हईल का ?" रामभाऊ क्षणभर थांबून बोलला.'' पैसं हाईत पर म्या ती गीताच्या लग्नासाठी ठिवलेत. तुमी पदरात घेताव का माझ्या पुरीला ? पन्नास हाजार देतो आत्ता लगीच." शंकर इचार करीत मनाला, "रामभाऊ कस जमल आसं, पोरग कवळं हायं, त्यचं डी.एड. करून वरीसभर बी झालं नाय, नवकरीचं बी काय खर नाई, त्याला इचारून सांगतो तुमाला.'' शंकर तिथून निराशेन उठला व गावाकडं निगाला. त्यच्या मनात इचार येत व्हता रामभाऊची पोरगी शाम्यापेकशा वरसानं मोठी हाय. रंगानं बी डावी हाय, जोडीबी जमत न्हाई अन उगच पैशासाठी आपल्या पोराच्या आयुष्याच वाटुळ करायच नगं. आपुन काय तरी दुसरी यवस्था करू.
गेल्या दोन तीन वरसात शेतात काईच आलं नव्हतं. दोन वरीस दुस्काळानं रान पिकलं न्हाई. दुबार पेरणीनं बेण्याचा बी पैसा निगाला न्हाई अन गेलसाली पावसानं आल्याल्या पिकाचं नुकसान केलं. पिकइम्यामुळं थोडालई आदार मिळाला व्हता पर या वरसी काय व्हतय की मनून त्यला काळजी वाटत व्हती. त्याच्यात आता पोरीच लगीन जवळ आल व्हत. शालूच्या मैतरिणी तिला रूकवताच सामान घेतलं का मनून इचारीत व्हत्या. ती न्हाई मनून गप बसली व्हती. आपल्या बापाची परिस्तिती पाहून तिलाबी वाईट वाटायचं. सरू शालूला समजावीत मनाली. ""शालू आतापस्तोर तुज्या आण्णानं तुज्या मनन्या परमानं तुला शिकीवलं, तुजी हाऊस केली आता काय बी करतेल पर तुज्या लगनात समदचं देतेल. इतकी दिस त्यंचा यवहार चलला, ह्यच्याकून घिऊन त्यला द्यायचे. याजी उसनं पासनं करायचे पर आता कुनीच दिनाय मनून आवगड झालयं. पर तु काळजी करू नकूस करतेल ती सम्दं.'' हे ऐकल्यावर शालू सरूला मनाली ""आगं मी कुटं काय मागायलेव मला फिरीज, कपाट ,टीवी काय बी नगं आदीच आण्णाच्या डोस्क्यावर ताईच्या लगनाचं देणं हाय मी काय बी मागनार न्हाई.'' ""लई समजदार हाय गं माजी तायडी.'' आस मनून सरून शालूची दिष्ट काडली.
थोड्या येळात शंकर घरी आला त्यन जेवन केल.आन सरूला मनाला.""सरू म्या हानम्याकड जाऊन येतोय गं'' शंकरला त्यचा दोस्त हानमंत पन्नास हजार देतो मनला व्हता. शंकर त्यच्या भरूशावर बसला व्हता. हानमंत जेवन करीत व्हता. शंकरला बगताच तो मनाला. ""शंकर बस जेवायला ''शंकरन नकारार्थी मान हालवली अन तो मनाला. ""आताच जेवलो'' शंकर त्यच जेवन हुईपरयंत बसला गप्पा झाल्या शंकर मनाला, ""हाणमा आज पन्नास हाजार देणार व्हतास की ? काय झाल रं ? आरं ताईडीच लगीन पंदरा दिवसावर आलय, आणकीन भांडेकुंडे, कपडे लत्ते काय बी घेतले न्हाईत. दी की मंग पैसे ?''हाणमंत क्षणभर इचार करीत सांगू लागला.""शंकू आर मी लई परयत्न केला बगं पर कुनीच पैसे दिनाय बग, आरं माजे पैसे आसून टाईमाला इना झालेत. काय कराव ? बरं माज्याकडं आसते दाहा इस हजार तर लगीच दिले आसते. मी तुला देतो मनलो व्हतो पर माजाबी नाईलाज झालाय, मला बी वाटतय ताईडीच लगीन चांगल व्हाव पर मी काईच करू शकत न्हाई. येवडा येळ मला माप कर दोस्ता.'' शंकरन त्यच बोलन ऐकून सरळ घरचा रस्ता धरला.
सम्दया गावाला म्हाईत व्हत शंकरला लई देण झालय त्यचे आसे लई वायदे फेल गेले व्हते. पाडव्याला दामु सावकाराचा वायदा व्हता पर आता पोरीच लगीन आसल्यामुळे त्यो गप बसला व्हता. न्हायतर आता पस्तोर त्यन शंकरला आन खाऊ दिल नसतं. आता गावात अन पावन्यात कुणी बी त्यला मदत करायला तयार नव्हतं. दामु सावकारानं त्यचा बैनामा ठिऊन घेतल्यामुळे त्यला दुसऱ्या सावकाराकडून याजानं बी काडता येत नव्हते. पोरीच लगीन तर लई जवळ येत व्हतं.
रामभाऊ न मनल्या परमान त्यच्या डोस्क्यात एक आयड्या आली अन त्यनं त्याच्या मावस मेव्हण्याला फोन लावला. ""हालो दाजी मी शंकर बोलतोय, मी पुन्याला यायलोय आज संध्याकाळच्याला बसायलोय'' आस म्हणीत शंकरन फोन ठिवला. संध्याकाळची एसटी धरून तो पुन्याला हाडपसरला सकाळी सकाळी पोचला .आटोन बालाजी नगरला आल्यावर इचारीत इचारीत सुबासच्या घरी पवचला. अंगोळ आटपून जेवनं झाली अन विषय निगाला, शंकर बोलू लागला. ""दाजी तुमी दीपाच लगीन करणारेत मनून कळालं व्हत''""इचार हाय बगू की''सुबास मनाला. ""दाजी माजा शाम डी.एड. झालाय, गावातल्या सौंस्तेत तात्पुरता नवकरी करायलाय, जिला परिषदला जागा निगाल्या की त्याला परमनंट नौकरी लागल तवा मी मनीत व्हतो दीपासाठी इचार करा.'' सुबासनं क्षणभर इचार करीत उत्तर दिलं.""सगळ खरयं पर आता जिला परिषदीची भरतीच निगत न्हाई, चार वरसापासून तर नुसत्या सी.ई.ट्या निगाल्या भरती न्हाईच, कवा निगल ती बी काई खरं न्हाई तुमी मनताव ती इचार काई वाईट न्हाय पर थोडा इचार करून सांगतो.'' सुबासन सांगून टाकल. ""दाजी मी आताच लगीन करा आस मनीत न्हाई, लगीन पुडच्या वरसी करा फकस्त एकाद्या लाकाची तवर मदत करा. शालीचं लगीन आट दाहा दिवसावर आलयं मनून गरबड करायलोय.'' ""बरं बरं सांगतो एक दोन दिवसात तुमाला'' आस मनून सुबासन आंग काडून घेतल, रातच्या गाडीन शंकर पुन्याऊन वापस काडगावला आला.
दोन दिवस झाले तरीबी सुबासचा निरूप इना मनून शंकरन सुबासला फोन करून इचारल तर सुबासन दोन तीन वरीस लगन करायच न्हाई मनून सांगून टाकल. शंकरन समजून घेतल. इतबी कुणतरी काडी केली. सुबासला कुणतरी करजपपाण्याबद्दल सांगितल हे शंकरला कळून चुकलं, तो आता मनातुन खचत चाल्ला व्हता, त्यच कोणतच काम व्हत नव्हत, सरू शंकरला मनाली, ""काय मनले सुबास दाजी ?'' काय न्हाई इत बी डोस्क्यावरचं देणं पाणी आडवं आलं, कुणतरी त्यला भरीवलं आसल मनूनच त्यो नाई मनला. आपल सगळ नशीबच आस फुटकं, वाटलं व्हतं पोरायला नवकऱ्या लागत्याल, डोक्यावरच करजाच वझं उतरल, सगळ चांगल व्हईल पर काय, शाली दोन वरसापासून डी.एड. बेकार अनं शाम्या वरसा पसून. पोरीच्या लगनाच्या इचारान तर झोपच ईना. कवा न्हाई ती लई घायकुतीला आलोय. आतापस्तोर हात चलला पर आता काई चलना. लई जिवाची फरपट व्हाईल्याय.'' त्याच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं सरू त्यला धीर देत मनाली.""सम्द हुईल, आणकीन पाच सहा दिवस हाईत, देव काइना काइ करील. लगीन पैशा वाचून आडून ऱ्हाणार न्हाय, झोपा आता.'' शंकरला काई झोप येत नव्हती. तो पेपर चाळत चाळत त्यच्यातली वळनं वळ वाचून काडीत व्हता. सरूला कवा झोप लागली कळल न्हाई.
तांबडं फुटलं सरूला जाग आली, तीनं इकडं तिकडं बगितलं पर शंकर कुटंच दिसत नव्हता. दार उगडंच व्हत. तिला परश्नं पडला ""धनी मला सांगितल्या बगर कुटंच जात न्हाईत, कुट गेले आसतील ?'' तिन आंगणात पाहिलं तिथपण शंकर नव्हता. ती घराच्या पाठीमागं गेली तर लिंबाच्या झाडाला फासी घेतलेल्या शंकरला बगून ""धनी'' म्हणून तिनं हांबरडा फोडला. बगता बगता सम्दा गाव गोळा झाला. पोलीस आले. पंचनामा सुरू झाला. शंकरच्या खिशात पेपरचं एक पान घडी दुमडून ठेवलेलं सापडलं. त्यच्या एका बाजूला बातमी व्हती "आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्याच्या मुलाला सरकारी नोकरीत सामावून घेतले जाईल.' अन दुसऱ्या बाजुला बातमी व्हती "आधार फाऊंडेशनने केल दहा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलीच कन्यादान'.
सिध्देश्वर पांडूरंग इंगोले,
शिवछत्रपती विद्यालय, शिवाजी नगर,
परळी वैजनाथ,जि.बीड मो. ९५६१२०४६९१
प्रतिक्रिया
सुंदर कथा
अतिशय सुंदर कथा इंगोले सर !
मुक्तविहारी
धन्यवाद मुक्तविहारीजी
धन्यवाद मुक्तविहारीजी
फरपट
निःशब्द..
Dr. Ravipal Bharshankar
धन्यवाद सरजी
धन्यवाद सरजी
फरफट
हृदयस्पर्शी कथा.....
धन्यवाद सर
धन्यवाद सर
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
धन्यवाद सरजी
धन्यवाद सरजी
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-1
कळले, बाकी सब गल्लाभरु
"शेतकऱ्यांचा राजा बळीराजा" या विषयावरील समग्र
लेखन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
baliraja.com/srbali
***
हवे ते शोधा
वाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी
माझी वांगंमयशेती घाट्यात गेली परंतु माझ्या वाङ्मयशेतीला मात्र बरे भाव मिळत आहेत.
प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम मुदत : २४ सप्टेंबर २०२४
=-=-=-=-=
User Details
सदस्य खाते
सदस्य प्रवेश
सध्या साईटवर हजर सदस्य
सध्या बळीराजावर 4 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.
अंगारमळा - अंक - १७
अंक वाचण्यासाठी
www.baliraja.com/angarmala
लिंकवर क्लिक करा.
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-2
तुमचा बापही देऊ शकला नाही
शेतकऱ्याची चावडी - ताजा vdo-3
साहित्यिकांना सोलून काढणारे भाषण