नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
चाटा
ज्याच्या त्याच्या घरावर झेंडे
आम्ही रंगई घेतलेत वाटून
सतरंज्या उचलन्यातच अर्ध्याईचं
आयुष्य जाते कटून
बुढईत घाम आमच्या जाते
तुमचा स्विस बँकेत साठा
अन् संसदेत बसून हानतात लेकाचे
निरानाम चाटा....!
आज्या पंज्या पासून शेतमालाचा
हमीभाव नाही वाढला
आमच्या जीवावरच तं तुमी
आलिशान मॉल काढला
टोपलंभर टमाट्याईपेक्षा
तुमच्या केचअपचा भाव मोठा
अन् संसदेत बसून हानतात लेकाचे
निरानाम चाटा....!
ऑनलाईन झालं सारं तरी
पिक उगवते मातीतंच
तुम्ही गेले चंद्र मंगळावर
आमचं जगनं मरनं शेतीतच!
आमच्या शेतमालाले ईचिबिहीन
सदानकदाचा घाटा
अन् संसदेत बसून हानतात लेकाचे
निरानाम चाटा....!
निवळनुकीच्या वाक्ती तुमी
छपरात यिवून जेवले
आमाले वाटलं एकदम
सारेच देव पावले
तुम्ही ठरले ब्रेकिंग न्यूज
आमचा अल्लादी काढला काटा
अन् संसदेत बसून हानतात लेकाचे
निरानाम चाटा....!
नासोळा सारा पैशाईचा
वदरुन दांगळो पा लागते
एका अधिवेशनाच्या खर्चावर तं
आमचा अख्खा तालुक्का जगते
तुमचं घर होते व्हाईट हाऊस
आमच्या सळकिवर ना गिट्टी गोटा
अन् संसदेत बसून हानतात लेकाचे
निरानाम चाटा....!
मल्ल्या निरव पऊन गेले
त्याईले झालं नाई काई
आमाले लोन देताखेपी तं घेता
शंभर जागी सई
घोटाये करता संगमंग
वदरून देशप्रेमाचा मुखोटा
अन् संसदेत बसून हानतात लेकाचे
निरानाम चाटा....!
तुमचं काईच चुकलं नाई
आमीच हाव येळे
जात धर्म भोंग्याईत गुंग हून
तुमच्या वाळदिशी वाट्टो पेळे
तुमचं पोट्टं बसते येशीत
आमच्या ढुंगनावर पोलीसाईचा सोटा
अन् संसदेत बसून हानतात लेकाचे
निरानाम चाटा....!
संविधान वाच बाबू
मंग मार उफाया
दट्ट्या दिऊन मांग खोट्याईले
हिसोब रुपया रुपया
शिक्षण घिऊन शायना व्हय
माग हक्काचा वाटा
संसदेत बसून हाननार नाईत
निरानाम चाटा....!
सारं गाव एक हून
माणुसकीनं जगा
नेत्याईमांगं फिरन्याआंदी
मायबापाकळं बघा
संमदे जण पेटून उठून
काढा भ्रष्टाचाराचा काटा
मग कोणताच नेता मारणार नाही
कधीच तुम्हाले चाटा!!
••••
श्री.अनिकेत जयंतराव देशमुख
(पाऊलखुणाकार)
गोपालखेड ता. जि. अकोला
MO. 9689634332
प्रतिक्रिया
एकदम बरोबर.. परखड कविता
एकदम बरोबर.. परखड कविता
पाने