नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
००विश्वलेखनस्पर्धा...
-कथा----------विभाग
***************************
[] शेतातल्या
करोनाची डायरी............
"""""""""""""""""
मांगेवाडीतल्या मुक्तामामी चार-पाच लेकीची अन् एका लेकाची आई.लेकीची लग्न झालेली.त्यांनाही चार-चार लेकरं.तर गेल्यावर्षी आजारपणाने मालकाने साथ सोडलेली.तरी एकटीच रोजगारीने जाऊन करुन खाऊ लागली.कधी रोजाने तर कधी गुत्यात कामं घेवून संसार चालू लागल्या.असः घडवूनसुध्दा.लेक-लेकींचा वेल वाढलेला.सर्व लेकी बेलापूरला जातात.बेलापूरची उचल घ्यायची अन् ऊसतोडीतून फेडायची.हा त्याचा धंदा.तर मामीकडे पाच-सहा शेळ्या.काम नसले की शेळ्यामागे जायचे.हे ठरलेले.यंदा पोरींनी उचली घेतल्या.आवराआवर केली.लेकरं घेऊन वाडीत आल्या..
"आई गं.उद्या सकाळूच निघायचय.सामानाची भराभर झालीय."
"सर्पाणाचं काय केलं गं पोरींनो"
"सरांच्या शेतातून आणलं.त्यांनी तसच दीलं,"
"पुरल का?नायतर पठाडावर हाये.घेऊन जावा"
"सर्पाणाचं भागलं..."
"मग आता काय?"
"यवढं वर्ष पोरं सांबाळ,ल्हानहेत सोबत न्यावा तर आमची तारांबळ होईल"
"त्वहे किती ठीवती?"
"दोन ठीवते.दोन नेते"
"बरं!त्या कालच येऊन गेल्यात त्यांची दोन-दोन लेकरं हाईत"
"बरं.काळजी करु नका.नवरे ताब्यात ठ्वा.लई दारु प्येऊ देऊ नका."
"बरं.बरं!"
"निघा.कामं करा.पैसे नासू नका."
लेकी बेलापुरला गेल्या.मुक्तामामीजवळ सांभाळायला दहा लेकरं झाली.त्यांची नावे त्या त्या गावच्या शाळेतल्या हजेरीपटावर होती.आणि आता ते आजीकडे कुरणावर राहायला आलेले.कुरण नावाचे मामीचे शेत,डोंगरावर असलेले.हंगामातच तिथे पाणी असते.जानेवारी फेब्रुवारीपर्यंत पाणी टिकते.यंदा फेब्रुवारीत पाणी संपले.तरी आठवडाभर वाडीतून हंड्याने पाणी कुरणावर न्यायचे.हे त्रासदायक काम होते.चार -पाच भांडे पाणी लागायचे.त्यामुळे पोरांना दोन-दोन दिवस आंघोळ्या नसत..म्हणून त्या वाडीत राहायला आल्या.
......आणि करोनाचे थैमान सुरु झाले.गावोगाव जमेल ती माहिती येऊन धडकू लागली.लाॕकडाऊन सुरु झाले.गाड्या.बस.रेल्वे.विमाने बंद...अन् मोठ्या शहरातून संचारबंदी सुरु.माणसं माणसापासून तुटली.माणूसच माणसाचा वैरी झाला...
माझ्या शेतातला गव्हू मशीनने काढला.भलती नासधूस झाली.पण मजूरांच्या खर्चाच्या मानाने परवडले होते.मशीन एका ऊंचीवरच्या ओंब्या कापून घेई,कमी उंचीच्या तशाच राहिल्या.शेतात हिंडून पाहिले तर खूपच ओंब्या राहिलेल्या.या वेचून काढाव्यात असे ठरवले.करोनाचा बोभाटा जोराने सुरु असल्यामुळे मजूरही बिथरले.कामावर येईना गेले.मला तर हे रान तयार करुन ऊस लावायचा ,एक एक दिवस वाया चालला.मजूराअभावी शेतीचे काम मागे पडू लागले.तरी मजूर मिळवण्यासाठी माझी धडपड सुरुच होती.सकाळीच मामीकडे वाडीकडे गेलो.
"सर या च्याs प्यायला"
"आलो,आलो.उद्या काय करताय?."
"काही काम होतं.."
"हा.गव्हाचा सर्वा यचायचा होता."
"कव्हा यचायचा?"
"आज,उद्या..."
"काय करता?त्या शेतात."
"ऊस लावतोय"
"चांगलंहे.."
ताटलीत चहा आला.पिलो.
"पोऱ्हं कपच फोडतेत.."
"चालतय..,मग कधी येताय."
"तिसरापहाराच येतोत,म्हंजी सकाळी उठलं की कामाला लागायला बरं.चौकातच आसल ना."
"हा.या मग.."
तिथून येऊन.पोते.वायर.बल्प.कुऱ्हाड,पहार घेऊन शेतात गेलो.दहाबारा लेकरासह मामी रानात मुक्कामाला येणार होती.मोट्रीच्या पेटीतून लाईट घेतली.पाण्याचा हंडा भरुन ठेवला.तिसरा प्रहारा तर शेळ्या.लेकरासह मामी चौकात हजर.लहान लेकरांच्या डोक्यावर झोपण्यासाठी लागणारे पांघ्रुण.आल्या आल्या सामान टेकलं.तीन दगडं गोळा करुन चुल बनवली.बांदावरच्या काट्याकुट्या गोळाकरुन आणल्या आन् चहा टाकला..
"सर तुम्ही काही म्हणा.आपल्याला च्या प्याल्याशिवाय कामाला हात लावावा वाटत नाही.."
"चांगलंहे की.माझे तसे काही.पिले तरी ठीक.नाही पिले तरी ठीक."
मामीने रिकामा ग्लास घेऊन शेळीचे दुध काढले.ताजे दुध चहात टाकले.चहा गरम झाला.घट्ट झाला.चहा पिलोत.शेळ्यांना चारापाणी केले अन् स्वयांपाला लागल्या.
"सर आज ईथच जेवा.बेसाण भाकरी न् आंड्याच्या पोळ्या करते"
"बरंय "
दगडाच्या चुल्हीवरच्या भाकरी,पोळ्या चवदारच लागतात.मला आवडतात.आम्ही सर्वजन जेवलो.मामीने तळवट अंथरला,पोऱ्ह अंतर ठेऊन.नाकाला फडके बांधून झोपले.माझ्या शेतात असल्यामुळे माझी जबाबदारी होतीच.मीसुध्दा चौकातच अंतरावर झोपलो.मोकळ्या रानात शुध्द हवेत कधी झोप लागली कळले नाही.तांबडं फुटता जाग आली.घराकडे गेलो.आंघोळ करुन पुन्हा चौकाकडे गेलो.तर ती दहाबारा लेकरं वाळलेल्या ओंब्या वेचत होती,प्रत्येक पोराच्या पाठीवर वटी बांधलेली,दोन्ही दोन्ही हाताने ती लहान पोरं ओब्या वेचून वटीत टाकत.वटी भरली की ताडपत्रीवर नेऊन टाकत.पोरांमधे वेचणीची स्पर्धा लागली होती. हे पाहून मला माझे बालपण आठवले.मीसुध्दा बालपणी शेतीतली आशी कामं केलीत.
"सर झालं का चहापाणी"
"हा.झालं"
"पोरं कवासीक जुपीले"
"सकाळूच.उठले की पीटाळले.उन्हातान्हाच्या आत.उन्हात आराम केला"
"बरं झालं.उर्कलतरी.."
"उंद्या सगळं स्याॕत व्हईल.दोन-दोन पाथा मनलं,तर ईस पाथा व्हत्यात."
"स्याॕत रिकामं झालं की,रोटा हाणून घेतो.मग लगीच सऱ्या पाडून घेतो.दोन तीन दिवसात तर ऊस लागून निघल"
"निघल ना"
दोन दिवसात सर्रा वेचून झाला.कोणी काही माहिती देत होते..
"ममईतून लोकं पायी निघालेत.ट्रकमधे बसून येतेत.दुधाच्या टँकरमधून चाललेत..मिळल तसं कुटुंबाला घेऊन गावाकडं निघालेत.फक्त कपड्यानिशी.ज्याच्याकडं पैसाहे,त्यांनी पाण्यासारखा पैसा खर्चून गाड्या करुन गावं गाठली....पण गावाकडं आली,,यका करोनाने माणसाचा शत्रू माणूसच केला.एक करोना,,,माणसाच्या मुळावरच घाव घालू लागला.शहरातून माणसांना त्याने भेडीले,..माणसं जमल तसं गावाकडे म्हणजे खेड्याकडे पळू लागले.शहरं ओस पडू लागली.शहरावर भुतांचं राज्य आलं...गावं माणसांनी फुलू लागली..."
करोनाच्या कहाण्या गावाकडे कानोकानी येत होत्या.लाईटच्या गतीने पोहोचत होत्या..म.गांधी म्हणत होते,"खेड्याकडे चला"पण त्यांचे पुढार्यांनी ऐकले नाही,,,शंभर टक्के ऐकण्यासाठी करोनाला जन्म घ्यावा लागला.एका करोनामुळे माणसांनी गावशिवार फुलून गेले...त्यासोबतच मरणाची भीतीसुध्दा दिली...
ताडपत्रीवर ओंब्याचा मोठा ढीग जमा झाला.पोतंभर गव्हू होतील असा माझा अंदाज होता.मुक्तामामीने मोगरीने ओंब्या कुटायला सुरु केले.दोन तासभर कुटनं सुरुच होते.तर पोरं सावलीला लाईनमधे अंतर ठेऊन आराम करत होती.प्रत्येकाच्या नाकातोंडावर फडके बांधलेले होते.तर भर दुपारी मामी पोरांना रांगेत उभे करुन तळ्यावर आंघोळीला न्यायची,त्यांच्या कपड्यांना साबण लावून भिजवायची.तोपर्यंत पोरं पाण्यात उड्या मारुन आनंद लुटत...मायबाप ऊस तोडायला गेलेले...तरी त्यांच्या चेहर्यावर हसू ओसंडून वाहायचं.मुक्तामामीच त्या पोरांची आई अन् बापसुध्दा...पाणी खेळले की प्रत्येकाच्या अंगाला साबण लावून खसाखसा चोळायची,.भिल्लाची पोरं काळी असूनही सुंदर दीसू लागायची.पोरांच्या आंघोळ्या झाल्या की पोरं पाण्याबाहेरच्या दगडावर बसत.मामीची आंघोळ झाली की पोरं अंतर ठेऊन चौकाच्या शेताकडे चालू लागायची.,,..ते पाहिल्यावर मलाही वाटायचं आपण लहान लहान व्हाव.
बोलल्यानुसार मामीने चौक रिकामा केला.ओंब्या बडून काढल्या.पोतंभर गव्हू झाला.,..
संध्याकाळी त्यांच्यातच जेवायला बसलो.मी एकदा भरलेल्या पोत्याकडे पाहू लागलो.तर दुसर्यांदा त्या दहा पोरांकडे पाहू लागलो....त्या पोरांनी दोन दिवस ऊन वाऱ्याला न जुमानता ओंब्या वेचल्या.खूप कष्ट करुन ऊस लावण्यासाठी चौकाचे शेत रिकामे करुन दिले.
सकाळी चहा पीताना मामी म्हणाल्या"सर पोतंभर झाले बगा.काय द्यायचं ते द्या आम्हाला.मह्या पोरांना तुमच्या शेतात घरच्यासारखं मोकळ्या हवेत.राहता आलं हेच मला खूप झालं."
"मामी.त्या लेकरांनी खूप कामं केलीत,ओंब्या वेचतानासुध्दा त्यांनी मास्क लावला.किती काळजी घेतली,,काय करा.त्यातले फक्त पायलीभरच गव्हू मला द्या.बाकी तुम्हालाच...लेकरांना खाऊ घाला.करोना उद्या काय काय खेळ दावतोय कायनू.हे गव्हू लेकरांना जगवायला कामं येतील.राहू द्या."
"पण हे लईच झाले..."
"माझ्या समाधानासाठी राहू द्या."
दुसऱ्यादिवशी मामी पोरांना घेऊन, वाडीत न जाता रानारानातून थेट त्यांच्या शेतात गेली,तिथं पोरांना ती सांभाळू लागली.महिनाभरात एकाही पोराला करोना होऊ दिला नाही.प्रत्येक लेकराला काळजाच्या तुकड्यासारखं जपली.
आठवडाभरानंतर सर्व काही बंद झाले.काही कुटुंबावर उपासमारीची वेळ आली..पण मुक्तामामीकडे गव्हू असल्यामुळे पोरांची उपासमार टळली.पोरं फुलासारखी टवटवीत दिसू लागली,करोना वाढत असूनसुध्दा!
००
(२)
दरवर्षी जूनमधे पाऊस पडणे बंदच झाले होते,त्यामुळे बऱ्याचदा जुले महिन्यात पेरणी व्हायची.कधीकधी तर दिंड्या परत आल्यावर परतीचा पाऊस पडलाय.यावर्षी तसे झाले नाही.मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादूर्भाव जगात सर्वदूर जाणवला.अनेक माणसं करोनाच्या विळख्यात सापली.त्याचा फैलाव जगभर वादळासारखा झाला.तो भारतातही आला.अन् लाॕकडाऊन झाले.सर्व यंत्रणा ठप्प.वाहतूक यंत्रणा जाग्यावर थांबली.,..धूर थांबला....प्रदूषण थांबले,ते थेट जूनपर्यंत.प्रदूषण थांबले.निसर्गाचे चक्र पूर्वीसारखे सुरु झाले,मृगाने सात जूनच्या अगोदरच हजेरी लावली.शेतीची कामे संपली नाहीत तोच पोटभर पाऊस पडला...एक नव्हे प्रत्येक नक्षत्र वेळेपूर्वीच पडू लागलेय.अगदी आता सप्टेंबर संपत आलाय तरी पाऊस धो धो पडतोय.
....लाॕकडाऊन झाल्याचा हा परिणाम.वेळेवर पाऊस...निसर्गाला असेच चालू ठेवावे.दरवर्षी मे -जूनमधे लाॕकडाऊन करुन वेळेवर पाऊस घेतला तर शेती आणि माणसांचे अनेक प्रश्न सुटतील...करोना तू हा रस्ता दाखवलास,मस्त केलस...लाॕकडाऊन झालेच पाहिजे!
**
(३)
यावर्षी ऊन्हाळा तीव्र राहिल.त्याचा उपयोग टरबूजासाठी करुन घ्यायचे गणूने ठरवाले.एकरभर टरबूजाची लागवड केली.बोअर आटला.टरबुजं चरविसारखी मोठाली झाली,अन् पाणी संपले.ताबडतोबीने टँकरने पाणी विकत घेऊन.टरबूज वाचवली, टरबूज तोडली.बाजाराला उद्या न्यायची ,तर लाॕकडाऊनमुळे बाजार बंद झाला.माल तोडलेला.कुठे विकणार...भरलेला पिकअप गावोगाव हिंडवला बऱ्यापैकी पैसे आले.
दुसऱ्या दिवशी माल भरुन गावोगावी हिंडला तेव्हाही बरे पैसे आले...
...आता आपला सगळा गावोगावी विकला जाईन.अन् नुकसान होणार नाही.असे वाटले..माल तोडला.पिकअप भरले.गावोगावी विक्रीसाठी पिकअप चालला तर,गावाचा संपर्क तोडलेला.रस्त्यावर जेसीबीने खड्डे केलेले.झाडे उपटून रस्त्यावर आडवे टाकलेले...गावात कोणतेच वाहन जाऊ शकत नव्हते...सकाळी भरलेला पिकअप संध्याकाळी जसाच्या तसा परत आणावा लागला,आता मार्केटच नाही.कालचा माल दिवसभर आदळून आपटून बिलबिला झाला...तो माल फोडून म्हशीसमोर दावणीत टाकला.बाकीचा माल शेतातच सडला....तेव्हापासून बडबड करणारा गणू,गप्पच झाला.अन् एकांतात असला की बडबड करीत आपलेच दातओठ करकचून चावतो.
**
(४)
नव्वद टक्के अनुदानावर ठीबक व तुषार संच घ्या अशा बातम्या वाचल्या.त्यानुसार मी तुषार संचाची फाईल केली,एजंटकडे पूर्ण पैसे भरून तुषार संच घेऊन गेलो.अनुदान माझ्या खात्यावर येईल असे एजंट व कृषीकार्यालयाने सांगितले ....
मार्चपूर्वीच अनुदान मिळायला पाहिजे होते.परंतु मिळाले नाही,अन् कोरोनाचा लाॕकडाऊन आला.पक्का आडकलो.साडेसत्ताविस हजार रुपये पाच महिन्यापासून अडकून पडलेत..
शेती करतोय.,,.अनुदान कधी मिळेल माहित नाही..पण कोरोनाने मला मात्र मातीत लोळवले.
कोरोना आणखी काय काय झटके देणार माहित नाही.
तोपर्यंत मी मात्र मातीवर उभाच राहणार आहे !
०डाॕ.भास्कर बडे........
तलाववस्ती.लोणी.ता,शिरुर का.
जि.बीड
मोबा.9422552279
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
प्रतिक्रिया
छान आहे
खूप छान सर
मुक्तविहारी
प्रवेशिकेचे स्वागत
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!