नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
कवितेचे रसग्रहण- प्रदीप देशमुख
शीर्षक -बायल्यावाणी कायले मरतं?
कवी- गंगाधर मुटे
प्रसिद्ध कवी, गीतकार, गंगाधर मुटे यांचे, बायल्यावाणी कायले मरतं? हे गीत वाचतांना किंवा ऐकतांना रक्त सळसळायला लागते. एखाद्या सेनापतीने, रणांगणावर हिंमत हारलेल्या आपल्या सैनिकांना प्रोत्साहित करण्यासाठी ललकारी ठोकावी, तसे हे गीत.
लढणाऱ्यांंच्या रंध्रारंध्रात प्राण फुंकून जाते. नागपुरी तडका या कवी गंगाधर मुटे लिखित काव्यसंग्रहातील हे एक प्रोत्साहनपर गीत आहे. विदर्भात नागपूरच्या परिसरात बोलल्या जाणारी जी वऱ्हाडी बोली आहे, त्या बोलीत हे गीत लिहिलेले आहे. बायल्यावाणी, धुळधान,फिट्टमफाट,खुटून, संग,म्हूनशान,बह्यरं,सह्यरं,गच्चीवर असे विशिष्ट वऱ्हाडी शब्द गीतात आलेले आहेत. कोणत्याही मोर्चातील कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी वीररसयूक्त हे गाणे नक्कीच असरदार ठरेल, यात शंका नाही.
मागील काही वर्षांत विदर्भातील शेतकरऱ्यांच्या आत्महत्यांंमध्ये बेसुमार वाढ झाली आहे. सरकारने आणि इतर अभ्यासकांनी या आत्महत्यांमागील कारणांची मिमांसा कशाही पद्धतीने केली असली, तरी शासनाची चुकीचे धोरणे आणि या कष्टकरी पण तितक्याच निरूपद्रवी असलेल्या समाजघटकाकडे सरकारांनी केलेले अक्षम्य दुर्लक्ष, हेच या मागील खरे कारण आहे,हे नाकारता येत नाही. मात्र शेतीकर्जाचा हा ज्वलंत विषय समकालीन साहित्यिकांनी पाहिजे त्या प्रमाणात हाताळला नाही. बोटावर मोजता येतील इतकेच चारदोन लेखक कवी ज्यांनी हा विषय समर्थपणे हाताळला आहे, त्यातील एक नाव म्हणजे गंगाधर मुटे. प्रस्तुत गीतातून कवीने शेतकर्यांचे ढासळलेले मनोबल उंचावण्याचा एक सक्षम प्रयत्न केला आहे.
*बायल्यावाणी. कायले मरतं?* या शिर्षकातच कवीने हतबल झालेल्या या लढवय्याला "बायल्या" ही शिवी हासडून, त्याला डिवचले आहे.कारण कोणत्याही आत्मसन्मान असलेल्या माणसाला जर कोणी शिवी दिली, तर तो पेटून उठतो, भांडण करण्यास किंवा लढण्यास तयार होतो. तो लढण्यास तयार व्हावा, हेच कवीला अपेक्षित आहे.
*बायल्यावाणी कायले मरतं मर्दावाणी मर।सरणावरून उठ अन् मशाल हाती धर*
कवी शेतकऱ्यांना आव्हान करतात, की असे नामर्दासारखे मरू नका. ह्या सरणाच्या आणि मरणाच्या बाता सोडा आणि क्रांतीची मशाल हाती घेऊन लढायला सिद्ध व्हा.
*तुह्यावाणी लाखो मेले काही फरक पडला?।येथे सारे निगरगट्ट काही बदल घडला?।त्यायच्यावाणी तू बी फुकट जाशील मरून।संसाराची धुळधान व्हईन आणखी वरून।लढल्याबिगर मोक्ष नाय कृष्ण वचन स्मर*
कर्जाच्या विळख्यात सापडलेला आजचा शेतकरी, व्यवस्थेकडून पूर्णपणे नागवल्या गेला आहे. या भयानक पाशात तो एकदा अडकला, की जन्मभर त्यातून स्वतःला सोडवू शकत नाही. आज अशी अवस्था आहे, की शेतकरी कर्ज घेतो, कर्जच पेरतो आणि कर्जच पिकवतो. अशा या चक्रव्यूहात अडकल्याने त्याच्याकडे मग आत्महत्या हाच एक पर्याय उरतो. पण कवी म्हणतात, की अशा आत्महत्यांनी काहीच साध्य होणार नाही. आज पर्यंत कित्येकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. काय फरक पडला? कारण इथली व्यवस्था निगरगट्ट आहे. या मुळे कुटुंबाची मात्र वाताहत होईल बायको मुले उघड्यावर पडतील. मर्दासारखे लढण्यातच खरा धर्म आहे. खरा मोक्ष आहे.इथे कवी कुरूक्षेत्रावर हतोत्साहित झालेल्या अर्जुनाला कृष्णाने दिलेल्या उपदेशाचा दाखलाही देतात. गीतेतील भगवान श्रीकृष्णाचे ते वचन
"क्लैब्यं मा स्म गमः पार्थ नैतत्त्वय्यूपपद्दते।
क्षुद्रं ह्रदयदौर्बल्य त्यक्त्वोत्तिष्ठ परंतप ।।
(हे अर्जुना,या नपुंसकतेचा अंगिकार करणे तुझ्यासाठी योग्य नाही.
तू तुझ्या ह्रदयातील ह्या तुच्छ दुर्बलतेचा त्याग करून ठामपणे उभा रहा) असे आहे.
*कर्जपाणी, घेणंदेणं आता चिंता सोड।आला दिवस तसा मानून घे तू गोड।कुणी आला यम दारी शब्द त्याचे छाट।"पिकलं तवा लुटलं झालं फिट्टमफाट।धमन्यामंधी बारूद भर आवाज मोठा कर।*
शेतीकर्ज किंवा इतर देणीघेणी यांची चिंता शेतकऱ्यांनीच का करावी? कारण तो जे काही अन्नधान्य पिकवतो तेच मुळी इतरांसाठी! शेतीत जे पिकते त्याचा उपभोग घ्यायला सगळेच तयार असतात. इतकेच काय, तर असली आणि शुद्ध माल हे ऐतखाऊ पांढरपेशेच हडपतात आणि खरा मालक,जो प्रत्यक्ष शेतीमध्ये कष्ट उपसतो त्याला मात्र उरले सुरले मातेरे शिल्लक राहते.मग कर्जाचा भार तरी त्याने एकट्याने का उचलावा? शेतीउत्पनाचा उपभोग घेणारे सर्वच त्या कर्जाचेही वाटेकरी आहेत. म्हणून व्यर्थ चिंता सोडून, उगवत्या दिवसाचे स्वागत करावे आणि कोणी घेणेकरी दारात आलाच तर, त्याला" जे पिकलं ते तूच लुटलं" असे ठणकावून सांगावे.आपल्या धमन्यांत वाहणारे रक्त हे मर्दाचे रक्त आहे, हे आता या व्यवस्थेला सांगण्याची वेळ आली आहे.कवीच्या या ओळी गालीबच्या एका प्रसिद्ध शेरासोबत कशा मेळ खातात बघा- महाकवी गालीब म्हणतो," रगोमे दौडते फिरनेके हम नही है कायल। जो आँख ही से न टपका तो लहू क्या है।
*जेव्हा पाय चालणारा रस्ता जातो खुटून।श्वासाभरल्या विचारांचा धागा जातो तुटून।तेव्हा तरी निग्रहाने विवेकाला स्मर।ज्यांनी केली दुर्गती त्यांची यादी कर।एकटा नको मरू संग दहा घेऊन मर*।
हवालदिल झालेल्या शेतकऱ्याच्या पाठीवर याठिकाणी कवी जणू मायेच्या ममतेने हात फिरवत आहे, असे चित्र या ओळींतून उभे होते. कधी सततच्या अपयशाने माणूस खचून जातो. काय करावे, कुठे जावे, त्याला सुचत नाही. अशावेळी मग तो काही अप्रिय आणि आत्मघातकी निर्णयाप्रत पोहचू शकतो. वास्तविक हा शेतकरी यापूर्वी असा लेचापेचा कधीच नव्हता. अनेकदा दुष्काळ पडले, नापिकी झाली, उपासमार घडली, पण अशा कठीण प्रसंगालाही त्याने धीराने तोंड दिले. पण आज त्याच्यावर कर्जाचा जो जीवघेणा पाश आवळल्या गेला आहे, त्यामुळे मात्र तो खचून गेला. आणि आपली जीवनयात्रा संपवायला निघाला. इथे कवी त्याला धीर धरण्याचा सल्ला देतात. आणि आपल्या विवेकाला स्मरून संयम बाळगायला सांगतात. एवढेच नव्हे, तर या दुर्गतीसाठी जे कोणी जबाबदार असतील, त्यांना आधी धडा शिकवावा, त्यांना त्यांच्या करणीची शिक्षा द्यावी असेही कवी आग्रहाने प्रतिपादन करतात.
इथे ओघानेच प्रस्तुत कवीच्या दुसऱ्या एका कवितेच्या ओळी आठवतात.
"कर्ज ठेऊन आजा मेला कशी ही कसोटी
कर्जाफेडीपायी जगला बाप अर्धपोटी
तरी नाही ऐसे कैसे कर्जपाणी फिटले
बरं झालं देवाबापा शरद जोशी भेटले"
आज्याने करून ठेवलेले कर्ज फेडतांना बापाचे आयुष्य गेले, आणि बापाने काढलेले कर्ज फेडतांना लेक मरणदारी पोचला अशी हल्ली गत झाली आहे. आणि अशा परिस्थितीत अगदी थट्टा करावी, अशी तुटपुंजी मदत शासनाकडून येते. तीला मदत म्हणावे की मानहानी, हे ठरवण्याची वेळ आता आली आहे.
*कायदा तुह्या विरोधात "अभय" नाही तुले।म्हूनशान लढले भाऊ शरद जोशी फुले।तुही हाक घेण्यासाठी सरकार मुकं बह्यरं।आपण सारे मिळून लढू करू त्याले सह्यरं।लुटारूंचे रचू थर आन नाचू गच्चीवर*
या देशातील कायदा हा कायम शेतकऱ्यांच्या विरोधात राहिला आहे. कुणीही कधीही शेतकऱ्यांना अभय दिले नाही.("अभय" हे कवी गंगाधर मुटेंचे उपनाम. याठिकाणी त्यांच्या या उपनामाचा योग्य वापर करून त्यांनी कवितेच्या आशयाला मुळीच बाधा न पोचवता एका अर्थपूर्ण ओळीची रचना केली आहे. मुटेंचे हे वैशिष्ट्य आहे. अभय हे त्यांचे उपनाम कित्येक कवितांच्या शेवटच्या कडव्यात ते चपखल बसवतात. असो.)
म्हणून महात्मा ज्योतीराव फुले आणि शरद जोशी यांच्या सारखे पुढारी या भुमीवर जन्माला आले. आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आजन्म लढले. हे मुके आणि बहिरे सरकार शेतकऱ्यांची फिर्याद कधीच ऐकत नाही. आता एकच उपाय आहे. फुले आणि शरद जोशी या महामानवांनी दाखवलेला एकीचा आणि लढ्याचा मार्ग आपल्याला पत्करावा लागेल. आणि या सरकारला वठणीवर आणावे लागेल. या व्यवस्थेमध्ये शेतकऱ्यांची अगदी लूट होत आहे. हे लुटारू एक एक करून आपल्याला ओळखावे लागतील. त्यांना नामोहरम करावे लागेल.
असा जोशपूर्ण संदेश कवीने प्रस्तुत गीतातून दिला आहे.कुणीतरी बुलंद चाल लावावी आणि उत्तेजक स्वरलयीत आळवावे, असे हे गाणे भविष्यात शेतकरी पुत्रांसाठी एक प्रेरणागीत म्हणून गाजेल.यात शंका नाही.
कवितेचे शिर्षक- बायल्यावाणी कायले मरतं?
कवी- गंगाधर मुटे, हिंगणघाट, वर्धा
कवितेचे रसग्रहण- प्रदीप देशमुख ,चंद्रपूर
संवाद- 9421814627
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
स्पर्धाविजेती प्रवेशिका.
स्पर्धाविजेती प्रवेशिका. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने