नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
सरवा
या साहेब,....
हे शेत, हा सातबारा माझा आहे.
बोरी,बाभळी,हा धुरा माझा आहे.
ही बैलजोडी,ह्या गायी आणि गोवंश
त्यांच्या माझ्या सुखद:खाचा सारांश
एक आहे.
गोठा,गव्हाण, कडबा,कुटार,शेण,कुडा
गोचिड,गोमाशा,खरारा, खराटा,उकिरडा
माझा आहे.
नांगर,वखर,वैशाखी ऊन,तापलेला वारा
फनं, काशा, कुंदा, कष्ट, घामाच्या धारा
मिरूग आणि पाऊस माझा आहे.
ढगात नसला, तर डोळ्यात आहे.
तिफण,सरते,बियाणे,तणकटा सहीत
उगवून आलेलं तान्हुलं आगाईत
रोग-राई, किडा-किटकुल,फवारा जहर
पंपाचा वेताळ रुतुन बसलेला पाठीवर
फोफावलेलं पीक,फुटलेला कापूस
लोंबणा-या ओंब्या,भरलेली कणीस
सारवलेलं खळं, खळ्यातली मेढ
इरभर पात, जागरणाची रात माझीच!
आणि ही खळ्यात पडलेली रास
साहेब, ही मात्र तुमच्यासाठी खास
हे माते-यात सांडलेले काही दाणे
हा सरवा आहेना माझ्यासाठी....
प्रदीप बा.देशमुख
महेश नगर, तुकूम,चंद्रपूर
भ्रमणध्वनी 9421814627
प्रतिक्रिया
खूप छान रचना प्रदिप सर
तुमच्या शेतीविषयक ज्ञानाची खूप छान पद्धतीने मांडणी केली सर. अप्रतिम रचना
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने