युगात्म्याची कविता
वर्ष २०१० : युगात्मा शरद जोशी हे तसे सार्वजनिक जीवनात गद्य स्वभावाचे होते. हे जसे मला व इतरांना आढळून आले तसेच त्यांनी अनेकदा तसे स्वतःहून कबूलही केले. त्यांनी त्यांच्या भाषणात, निवेदनात अथवा लेखनात कधीही फारच तुरळक अपवाद वगळता पद्याचा वापर केला नाही. पण व्यक्तीगत खाजगी जीवनात मात्र त्यांना पद्य फार आवडायचे. त्यांना संस्कृत श्लोक मोठ्या प्रमाणावर मुखोद्गत होते. अनेक कविता पाठांतर होत्या. काही वेळा आंदोलनात्मक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर त्या कार्यक्रमाचा गर्भितार्थ म्हणून किंवा कार्यक्रमाच्या पोस्टरवर त्यांनी कवितांच्या ओळीचा वापर केला आहे. उदाहरणार्थ, "अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली" किंवा "आम्ही मरावं किती?" असे असले तरीही एकंदरीत त्यांची शैली गद्यच होती.
माझ्या पहिल्यावहिल्या काव्यसंग्रह
रानमेवाला त्यांनी प्रस्तावना लिहावी किंवा अभिप्राय द्यावा, अशी जेव्हा मी त्यांना विनंती केली, तेव्हा त्यांनी ती चक्क नाकारलीच. त्यांनी त्यापूर्वी कधीही कुठल्या काव्यसंग्रहाला प्रस्तावना लिहिली नव्हती आणि मोठमोठ्या प्रस्थापित कवींच्या काव्यसंग्रहाला अभिप्राय सुद्धा देण्याचे स्पष्ट शब्दात नाकारले होते, काही कवींच्या कवितांवर त्यांच्याच तोंडावर त्यांनी ताशेरे ओढले होते. त्यामुळे मला तशी फारशी आशाही नव्हती. परंतु एक निर्णय मी घेतला होता की, त्यांची प्रस्तावना किंवा अभिप्राय किंवा माझ्या कवितांविषयी त्यांचे मत मिळणार नसेल तर रानमेवा काव्यसंग्रह प्रकाशित करायचाच नाही.
त्यानंतर दोन महिने उलटून गेले. मला खात्री होती की साहेब प्रस्तावना लिहिणार नाहीत किंवा अभिप्राय देणार
नाहीत किंवा कवितेविषयी आपले मतही व्यक्त करणार नाहीत. पण अचानक एक दिवस प्रा. सुरेशचंद्र म्हात्रे सरांचा फोन आला आणि मला विचारले कि, "तुझ्या काव्यसंग्रहाचे काम कुठपर्यंत आले आहे?, प्रिटींगला गेला आहे का?" मी म्हटले की "सर, अजून काव्यसंग्रह छापायचा की नाही हाच निर्णय मी घेतलेला नाही." त्यावर ते म्हणाले, "तुझ्या काव्यसंग्रहाला शरद जोशींनी आता प्रस्तावना लिहिली तर तुला चालेल का? पण त्याला वेळ लागू शकेल" त्यावर मी उडालोच. मी म्हटलं "सर, वेळेचा काय प्रश्न आहे? मी आयुष्यभर थांबायला तयार आहे त्यांची प्रस्तावना मिळत असेल तर!" त्यानंतर एक दिवस मला
प्रस्तावना प्राप्त झाली.
त्यानंतरचा प्रसंग वर्ध्याचा. ते वर्ध्याला आले असताना श्री रविभाऊ काशीकर यांच्या घरी मी गेल्यागेल्या ते मला म्हणाले, "कशी वाटली माझी प्रस्तावना?" त्यावर काय उत्तर द्यावे हे मला कळतच नव्हते. लगेच ते म्हणाले, "बरी वाटली ना? आवडली ना?" आता मी पुरता गोंधळलो होतो. काय बोलावं तेच कळत नव्हतं पण त्यांनी माझ्या चेहरा वाचला आणि ते समजायचे ते समजले. मग म्हणाले, "मी त्या प्रस्तावनेवर बरीच मेहनत घेतली आहे. बेडच्या उशीखाली मी ते हस्तलिखित/टंकलिखित ठेवून घेतले होते आणि दररोज रात्री झोपण्यापूर्वी दोन कविता वाचायचो..... म्हणून मला प्रस्तावना लिहायला वेळ झाला" आता मी आणखीच गोंधळलो. काव्यसंग्रहात एकूण ८५ कविता आहेत. म्हणजे तब्बल दीड महिना. हे माझ्यासाठी कल्पनातीत तर होतेच पण मी माझ्या कवितेसाठी त्यांचा इतका वेळ वाया तर दवडला नसेल ना? अशी अपराधीपणाची भावना सुद्धा क्षणभर माझ्या मनात डोकावून गेली. माझ्या पुस्तकाला त्यांची प्रस्तावना मिळणे ही माझ्या आयुष्याची फार मोठी कमाई होती, याची मला जाण होती आणि आजही आहे.
=========
प्रसंग ३ सप्टेंबर २०१५ चा : स्थळ पुण्याजवळील चाकण येथून ९ किमी अंतरावरील महाळुंगे येथील हॉटेल पॅराडाझज, निमित्त युगात्मा शरद जोशींच्या ८० व्या वाढदिवसाचे. त्यांच्या हयातीत झालेला हा शेवटचा वाढदिवस. कार्यक्रम संपवून सज्जनगडला जाण्यासाठी गाडीकडे निघालो असताना चालताचालताच युगात्मा शरद जोशी मला म्हणाले, "तू मला शेतकरी संघटनेसाठी एक कविता लिहून दे" मी लगेच तत्परतेने हो म्हणालो पण कविता कशी हवी? असा लागलीच उलट प्रश्न मी त्यांना विचारू शकलो नाही. त्यांची प्रकृती अस्वास्थ्यता बघता त्यांना एक-एक शब्द उच्चारणे कठीण जात होते. चालताचालता बोलणे तर फारच कठीण जात असल्याने मी स्वाभाविकपणे विचार केला की त्यांना या विषयी जरा निवांतपणे विचारूयात. त्यांनी "तू मला शेतकरी संघटनेसाठी" असे वाक्य वापरल्याने त्यांना कशी कविता हवीय, थीम काय असावी, आशय काय असावा, रस कोणता असावा.... इत्यादी त्यांच्या कल्पना काय आहेत, हे कळणे गरजेचे होते. सज्जनगडला आम्ही एकत्र असून सुद्धा मला त्यांना विचारणे शक्य झाले नाही. नंतरच्या काळात तर त्यांची प्रकृती आणखीच खालावत गेली. त्यानंतर दोनदा भेटी होऊनही विषय काढताच आला नाही.
१० नोव्हेंबर २०१५ : १० नोव्हेंबर २०१५ ला दुपारी ते अत्यवस्थ असल्याचा संदेश आल्याने रवीभाऊ काशीकर, सरोजताई काशीकर, सुमनताई अग्रवाल, शैलजाताई देशपांडे, पांडुरंग भालशंकर आणि मी लगोलग रात्रीच्या फ्लाईटने पुण्याला पोचलो. रुबिया हॉस्पिटलमध्ये पोचल्यावर तशा अवस्थेत त्यांना काही विचारणे शक्यच नव्हते.... याची पूर्व कल्पना आलीच होती. मी त्यांना भेटायला रूममध्ये गेलो तेव्हा ते गाढ झोपेत असावे, असे वाटले. त्यांना आवाज देऊन जागवण्याचा किंवा त्यांची विचारपूस करण्याचेही प्रयोजन नव्हते. एखाद्या आराध्य दैवतासमोर निस्तब्ध व निश्चल उभे राहावे तसा मी उभा राहिलो. भेटीची निश्चित वेळ संपल्याने माघारी वळलो. दाराकडे निघत नाही तोच पुसटसा आवाज आला. मागे वळून बघितले तर ते “माझी कविता आणलीस का?”असे पुटपुटले. डोळे मिटलेलेच होते. मी लगेच उत्तरलो “होय साहेब, कविता लिहून तयार आहे. तुम्ही ठीक झाले की तुम्हाला ऐकवतो. तो पर्यंत एखाद्या योग्य संगीतकाराकरवी छानशी चाल वगैरे लावून घेतो.” त्यावर पुन्हा ते काहीच बोलले नाही आणि डोळेसुद्धा उघडले नाही.
मी निखालस असत्य बोललो होतो, कारण मी कविता लिहिलेलीच नव्हती. मी निखालस असत्य बोललो याची मला खंत नाही कारण त्याक्षणी जे बोलायला हवे होते तेच मी बोललो होतो. मी असत्य बोललो असलो तरी योग्य वेळी योग्य तेच बोललो होतो. पण बोच आणि शल्य हे आहे की यातून आता उतराई कसे व्हायचे? कशी लिहायची “त्यांची” कविता? त्यांना काय हवे होते याचे अंदाज आणि आराखडे बांधायचे तरी कसे? मी आतापर्यंत मला सुचल्या तशा ५०० पेक्षा जास्त कविता लिहिल्या आहेत. त्यापैकी बहुतांश कविता त्यांनी वाचल्याच होत्या. “रानमेवा” काव्यसंग्रहाला तर त्यांनी प्रस्तावनाच लिहिली होती. तिन्ही पुस्तकांचे प्रकाशन त्यांचेच हस्ते झाले होते. मी आजवर लिहिलेल्या कवितांपेक्षा काहीतरी वेगळे त्यांना हवे होते आणि त्यांच्या कल्पनेतील कविता मी शेतकरी संघटनेसाठी लिहू शकेन, एवढी माझी योग्यता आहे हे त्यांनी जाणले असल्यानेच ही जबाबदारी त्यांनी माझ्यावर सोपवली असणार, हेही उघड आहे.
१२ डिसेंबर २०१५ : पण आता सारेच संपले आहे. त्यांच्या कल्पनेतील कविता लिहून काढणे ही बाबच इतिहास जमा झाली आहे. मात्र मी त्यांच्या कल्पनेतील कविता लिहू शकणार नसलो तरी दिलेल्या शब्दातून उतराई होण्यासाठी शेतकरी संघटनेसाठी एक कविता लिहून देणे, एवढी नैतिक जबाबदारी तर माझी आहेच आहे.
२ ऑक्टोंबर २०१६ : पण; गेल्या काही महिन्यापासून प्रयत्न करूनही ’ती’ कविताच सुचत नाही आहे. जोपर्यंत ही कविता लिहून होत नाही तोपर्यंत दुसऱ्या कुठल्याही कविता लिहायच्या नाहीत, असे बंधन मी स्वतःवर लादून घेतले आहे पण काहीच उपयोग होत नाही आहे. स्पर्धेच्या निमित्ताने तरी लिहिणे होईल असे प्रयत्न केले पण निष्फळ गेले आहेत. प्रतिभेला कड येत नाही आणि शब्द काही स्फुरत नाही, अशी स्थिती झाली आहे.
=======
प्रसंग दिनांक ०१-१०-२०१६ : रात्रीचे १ वाजून ३४ मिनिटे झाली आहेत. विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१६ मध्ये सहभाग नोंदवण्याची घडी उलटून गेली आहे. या स्पर्धेत मला एक शेतकरी गीत द्यायचे होते पण प्रतिभाच हतबल झाल्याने स्फूर्ती येऊन शब्द सुचायलाच तयार नाहीत. नको तेव्हा वारंवार उतू जाणारी प्रतिभा गेल्या काही महिन्यापासून पदरामध्ये मान खुपसून निवांत पडली आहे. स्वेच्छेने हवी तशी मुक्त विहरणारी प्रतिभा एका ध्येयपूर्तीच्या चाकोरीत शिस्तबद्ध चालून कसोटीच्या टोकावर आव्हान स्वीकारायची वेळ आल्यावर कशी असहाय आणि दीनवाणी होऊ शकते, याची मी आज पुरेपूर अनुभूती घेत आहे.
=======
दिनांक १६-११-२०१६ : हे काव्यफ़ूल युगात्म्याच्या चरणी वाहून शेतकरी संघटनेला अर्पण करून दिलेल्या वचनमुक्तीतून उतराई होण्याचा प्रयत्न.
ये तू मैदानात : शेतकरी गीत
ये तू मैदानात, ये तू मैदानात
ये तू मैदानात, पाईका ये तू मैदानात
काळ्या आईचा एल्गार
बिगूल फुंकण्या हो तय्यार
उलवून फेकू गुलाम बेड्या
जगण्या स्वातंत्र्यात
जगण्या स्वातंत्र्यात, जगण्या स्वातंत्र्यात
जगण्या स्वातंत्र्यात, पाईका ये तू मैदानात ||धृ||
गोरे गेले, काळे आले
शस्त्राचे रंगांतर झाले
काळी आई खितपत पडली
विझल्या अंधारात
विझल्या अंधारात, विझल्या अंधारात
विझल्या अंधारात तेवण्या, ये तू मैदानात
ये तू मैदानात, तेवण्या ये तू मैदानात ||१||
झोन बंदी, निर्यातबंदी
साठेबंदी, प्रदेशबंदी
आयातीचा दोर खेचतो
कंठाचा गळफास
कंठाचा गळफास, कंठाचा गळफास
कंठाचा गळफास सोडण्या, ये तू मैदानात
ये तू मैदानात, सोडण्या ये तू मैदानात ||२||
हात बांधती, पाय बांधती
डोळ्यावरती टाय बांधती
आणिक म्हणती स्पर्धा कर तू
विद्वानांची जात
विद्वानांची जात, ‘ती’ विद्वानांची जात
‘ती’ विद्वानांची जात ठेचण्या, ये तू मैदानात
ये तू मैदानात, ठेचण्या ये तू मैदानात ||३||
शेतीला गिळणार कायदे
हिरवळीला पिळणार वायदे
सुगीशिखरावर श्वापदं झाली
नांगी रोवून स्वार
नांगी रोवून स्वार, नांगी रोवून स्वार
सरावलेली नांगी चेचण्या, ये तू मैदानात
ये तू मैदानात, चेचण्या ये तू मैदानात ||४||
रणकंदनाची हाळी आली
नीजप्रहरावर पहाट झाली
दे ललकारी अभय पाईका
हाती घेत मशाल
हाती घेत मशाल, हाती घेत मशाल
मशाल हाती घेत झुंजण्या, ये तू मैदानात
ये तू मैदानात झुंजण्या, ये तू मैदानात ||५||
- गंगाधर मुटे ’अभय’
=======
ही कविता युगात्मा शरद जोशी आणि त्यांच्या शेतकरी संघटनेला अर्पण.
=======
आज युगात्मा शरद जोशी यांची ८४ वी जयंती. त्यांच्या पावनस्मृतीस विनम्र अभिवादन!
प्रतिक्रिया
युगात्मा शरद जोशी यांना
युगात्मा शरद जोशी यांचा शेवटचा वाढदिवस
दिनांक : ३ सप्टेंबर २०१५
स्थळ : हॉटेल पॅराडाझज, महाळुंगे, चाकण, पुणे
शेतकरी तितुका एक एक!
पाने