नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
आता नोंदवावा पेरा...
ओल वाफसा जपूनं
दाना कुशीत घेताना
ओल्या चाहुलीच्या तिच्या
माती सावरते खुणा...१
ओठी दाबत हिवाळा
उबारल्या शब्दभेटी
तासी लागताना पेर
गेली रीती होत ओटी...२
सादसूर चाहुलीचा
वारा थांबला ऐकण्या
उरी जपले जे दाने
करी घाई कोंबाळण्या...३
डोळे होऊन काजवे
बोली तिची झपाटली
इशाऱ्याने एका मुक्या
रान उगवण झाली...४
भर रातीत चांदण्या
पाळी पाण्याची देताना
गहू पोटारला उरी
तिला मिठीत घेताना...५
दूध दाटले दान्यात
मिठी सैलावता जरा
हट्ट आभाळला तिचा
'आता नोंदवावा पेरा'...६
जसे हुरडले रान
मन मुके मुके झाले
खळी होताना आभाळ
खळे चांदण्यात न्हाले...७
रावसाहेब जाधव (चांदवड)
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत.
प्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....!
शेतकरी तितुका एक एक!
पाने