Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



‘होऊ दे रे आबादानी’च्या निमित्ताने

नदी नाले तळे सारे भरूनी पाण्यानी
राशी भरल्या खंडीनं होवो आबादानी

ही आहे पावसाची प्रार्थना,
श्रीराम गव्हाणे नावाच्या कवीनं केलेली .त्याच्या कवितांची भाषा आणि शैली आपण सूक्ष्मपणे न्याहाळली तर चटकन आपल्या लक्षात येईल की हया कवितांमधून व्यक्त होणारं मन हे नागर नाही.
खेडया-पाडयाच्या, शेती-मातीच्या नांगर संस्कृतीनं हे मन पोसलं आहे. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हया मनानं जे सोसलं ते सहजपणे व्यक्त केलं. बीजातून अंकुर उगवावा इतक्या नैसर्गिकपणे ते शब्दांतून उगवलं आहे.
म्हटलं तर हया कवितांची भाषा ग्रामीण आहे. पण तिचं वेगळं अस्तित्व जाणवणार नाही इतकी ती अनुभवाशी एकजीव झाली आहे. ती आपल्या ग्रामीणतेचा बडेजाव मिरवत नाही की वाचकांचे लक्ष वेधून घेण्याकरिता अनावश्यक विभ्रमही दाखवत नाही. व्यक्त होतांना कवितेला तिची स्वतःची भाषा सापडली पाहिजे असे आपण जे म्हणतो त्याचा तरी अर्थ याहून वेगळा काय असतो ? कोणतीही प्रमाण भाषा मुळात बोलीच असते.नंतर तिच्या विविध बोलींनी, त्यांच्या प्रादेशिक रूपांनी ती अधिक समृद्ध होत जाते. हे जरी खरे असले तरी कवितेसारख्या ललित वाङमय प्रकारातील बोलीचे अस्तित्व अर्थवहनात अडसर ठरणार असेल तर ती कामाची गोष्ट नाही. कवितेतील मुळ अनुभवद्रव्य हे शरीरासारखे असते. शब्दांच्या परिधानाने ते आवश्यक तेवढेच झाकल्या गेले पाहिजे; झाकोळून टाकता कामा नये. ‘शब्दांची आशयास तंग विजार’ ही मर्ढेकरांच्या कवितेतील ओळ आधुनिक मराठी काव्यशास्त्रातील‘ग्यानबाची मेख’ आहे हे मर्ढेकर गेल्यानंतर अर्धशतक ओलांडल्यावरही आपल्या ध्यानात आलेले फारसे कुठे दिसत नाही.
या संदर्भात सन्माननीय अपवादांच्या परंपरेचे पाईक होण्याच्या वाटेवर श्रीराम गव्हाणे आपली पहिली वहिली पावले टाकतात; ही जेवढी आनंदाची गोष्ट आहे तेवढीच आश्वासकही.पण हा घाट सोपा नाही; चांगलाच दुस्तर आहे! याचे सजग भान त्यांनी आणि त्यांच्या सारख्या अनेकांनी जपलं पाहिजे.
काव्यरचना आणि निबंधलेखन यात मूलतःच भेद आहे याची जाण अंगभूतपणे असणे हे श्रेष्ठ कवींचे लक्षण श्रीराम गव्हाणेत आढळते ही आणखी एक समाधानाची गोष्ट म्हटली पाहिजे.
खेडी-पाडी,शेती-माती,ऊन-वारा,पीक-पाणी,बाई-माणूस,
सुख-दुःख,जगणं-मरणं, हे घटक त्यांच्या कवितेत अनुभव म्हणून येतात; विषय म्हणून येत नाहीत.तसे ते आले असते तर त्यांच्या कवितांचे केव्हाच निबंध झाले असते.
अनुभवद्रव्य आणि त्याच्या अभिव्यक्तीची भाषा हया दोन्ही अंतर्बाहय अंगांनी त्यांची कविता आपले शील सांभाळते; म्हणूनच ती सुशील आहे.
‘आबादानी’या श्रीराम गव्हाणेच्या कविता संग्रहाला पावसानं भावचिंब केलं आहे. शेतीवर पोटं असलेल्या कुणब्याच जगणं मुश्किल करणा-या पावसाची विविध रूपं अनेक त-हा या संग्रहाला गच्च वेटोळे घालून आहेत. पाऊस-पाऊस आणि पाऊस अशी त्रिवार अनुभूती त्यांच्या शब्दाशब्दातून आपल्याला भिजवत राहते.
वेदकालीन वरूणसूक्ताशी नातं सांगणारी त्यांची ‘होऊन जाऊ दे एकदाचा पाऊस’ ही कविता वाचली की ते आपल्या आर्ष काव्यपरंपरेचे वंशज वाटतात.

‘दनदनानून फुटून जाऊ दे आमची कौलारू उद्ध्वस्त
होऊन जाऊ दे डोळया देखत
उभे आडवे सारे पिकं
खसून जाऊ दे कमरगत
आमची उभी पिकाची शेतं
होऊन जाऊ दे एकदाची जीवहानी
नदीकाठाच्या मंदिराच्या कळसाला
शिवू दे एकदाचे पाणी
माजू दे वा-याचे तांडव
पडू दे मुळासह बांधावरची भल्ली भल्ली झाडं
भुईसपाट होऊन जाऊ दे उद्ध्वस्त मळा, खोपा
माजू दे पाखरांचा कालवा
होऊन जाऊ दे सगळीकडंच नुसता शुकच्चुकाट
पडू दे गावावर एकदाचे सुतक
अन्‌ सळसळणारा पिंपळपारही वाटू दे
एकदाचा सुनासुना.’

हे सारं सोसण्याची तयारी आहे पण-

‘ पण येऊ दे आमच्या अंगणात एकदाचे
अंगण उजळून येणारं मुठभर सुख
जे कधी नांदलंच नाही आमच्या दारी लक्ष्मी होऊनी
गाई-बैलांच्या गोठयात साजेसं दिसून
दारावरच्या चौकटीवरचे घवघवणारे तोरण होऊन.’

ही पावसाची प्रार्थना सबंध संग्रहाला पुरून पुरूषभर उरते. वाचकांच्या संवेदनक्षम मनात हळूच शिरते आणि तिथे कायम घर करते.
चांगल्या कवितेची व्याख्या शब्दांच्या चिमटीत येत नाही. चांगली कविता कशी असली पाहिजे; हे आपल्याला सांगता येणार नाही पण तिचा मासला पेश करता येतो तशा हया कवितेच्या ओळी आहेत.
व-हाड-मराठवाडयात अलीकडच्या काळात कुणब्यांच्या आत्महत्यांनी लोकमानस हादरून गेलं. मराठी कविता-कथा-कादंबरीतून हे वास्तव आपापल्या परीनं उमटलं. तो या कालखंडाचा सामाजिक-ऐतिहासिक दस्तावेज आहे.
‘राख राख झालेला त्याचा देह’ या कवितेत आलेलं हे वास्तव विस्तवासारखं आपल्याला चटका लावतं-

‘तो भडकला खोल खोल मनात तडकला
तुडवले कोसभर त्याने पायदळी रान
झाडांच्या फांदीला लावला कासरा
गळफास नरडीला लागताना
फांदी हालली एकदा
झाड उभे स्तब्ध तसे बांडया गाईचा आडला हंबर
दूर उतानीच्या रानात
सम्दे रान अंगावरती ओरबडताना दूरवर वनात
एकाएकी त्याच्या मौतीची खबर
पसरत गेली रानोमाळ
शिवपल्याड बारा कोस, बारागाव.

कुंकासाठी डोळे सांडणारी त्याची बायको, तरण्यापोरी
आक्रोसाच्या कल्होळाने
सम्दा आसमंत ढवळून निघताना
शेतावरच्या बांधावरची पेटती चिता जळताना
अंतःकरणातून लोक कळवळताना...’

वरील कवितेतील ही ओळ पहा-

‘कुंकासाठी डोळे सांडणारी त्याची बायको,तरण्यापोरी,

‘कुंकासाठी डोळे सांडणारी’ या शाब्दप्रतिमेत (verbal image) ‘सांडणे’या क्रियापदाने ओतलेले नावीन्य आपल्याला प्रतीत होते. कवितेच्या आशयाशी असलेली अशा प्रतिमांची सेंद्रियता कवी मनाच्या नेणीवेतूनच येऊ शकते. अन्यथा नव्या प्रतिमा जाणीवपूर्वक घडविणारा कवी कितीही थोर असला तरी तो बि-घडल्याचंच कालांतराने सिद्ध होतं.
शाब्द प्रतिमांची सेंद्रियता घेऊन आलेली ही आणखी एक कविता-

‘पड पड रे पावसा
कशी तुला नाही कीव
तुह्याईन आज आला
आता नरडीला जीव

पड पड रे पावसा
होऊ दे रे वल्ली माती
गाईच्या रं चा-यासाठी
कुणबी आला काकुलती

पड पड रे पावसा
तुह्यासाठी रे नवस
पाड गर्जु गर्जु पाणी
तुह्या नावचा उपास

पड पड रे पावसा
पिक जोमानं पिकल
तुह्या आशीर्वादानी
चिल्ले पिल्ले जगतील’

लोकभाषा, लोकछंद, लोकसंकेत, लोकशैली, असे लोकऐवज आपल्या हृदयाच्या तळाशी जपणारं लोकमानस कवीच्या मनात निर्व्याजपणे नांदत असल्याशिवाय कवितेतला हा जोरकस थेटपणा येत नाही.
‘पाऊस मागावा देवाला’, ‘कुठं गेला तुझा जने’, ‘कशी जाऊ शेजी बाई’ ,‘जनीचा अभंग’या कवितांतून झिरपणा-या अस्सल मराठमोळया काव्यपरंपरेने कवीमन पोसल्याचं आपल्याला जाणवतं.‘पहाटच्या गं पारी’ हया कवितेत कवीचे ‘भाऊबंद' आपल्याला भेटतात.
आणि-

टीलीम s टीलीम s
खुळ s खुळ
ढण्‌मन्‌ ढण्‌मन्‌
गुबू sगुबू s

या नादप्रतिमांनी आपल्या भावबंधांना कान फुटतात.
एखाद्या कवीने त्याच्या संपूर्ण आयुष्यात किती कविता लिहिल्या? त्याचे किती काव्यसंग्रह निघाले? त्याला किती मोठमोठे पुरस्कार मिळाले? कोणकोणत्या विद्यापीठात त्याच्या कविता अभ्यासक्रमाला होत्या? इ.इ. गोष्टी कवीचा तपशील फुगवणा-या गोष्टी असतात. हया पेक्षा त्याच्या किती कविता लोकसंस्कृतीने स्वीकारल्या; जतन केल्या आणि पुढच्या अनेक पिढयांच्या हवाली केल्या; हीच खरे तर कवीच्या अस्तित्वाला परंपरेने बहाल केलेली मान्यता असते. उरलेल्या कवितांना काळाची वाळवी सावकाश खाऊन टाकते.
तेव्हा श्रीराम गव्हाणे सारख्या तरूण कवीला जगण्याच्या आणि अभिव्यक्तीच्या सर्व पातळयांवरील संघर्षाकरिता मनःपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो.

- डॉ. श्रीकृष्ण राऊत

Share

प्रतिक्रिया