Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......

YFPCL


अधिक माहितीसाठी 
http://yugatma.sharadjoshi.in/  
येथे भेट द्या.बळीराणी कादंबरी समीक्षा

लेखनविभाग: 
पुस्तक समीक्षण
शेतकऱ्यांना स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग सांगणारी 'बळीराणी'
 
आजवर मराठी कादंबऱ्यांनी बळीराजाच्या वेदना प्रभावीपणे मांडल्या आहेत. लता अनिल बहाकार यांची 'बळीराणी' कादंबरी बळीराणी'च्या संघर्षाला प्रभावीपणे मांडत आहे. शेतकऱ्यांच्या संवेदनांची जाणीव लेखिकेला आहे. कादंबरीचा अवकाश मोठा असला तरी प्रसंगामधली गुंफण वाचकांना याची जाणीव होऊ देत नाही. कथानक गतीने पुढे सरकत जाते त्यात वाचक केव्हा समरस होऊन जातो त्यालाही कळत नाही. पहिल्या पानावरील सहाव्या सातव्या ओळीतच वाचक या कादंबरीच्या भावविश्वात रममाण होऊन जातो. "स्त्री लाचार झाली तरी चारित्र्य विकत नाही" असे विविध दमदार संवाद कादंबरीमध्ये आले आहेत. कादंबरीमध्ये काही प्रसंग असे येतात जे वाचून अक्षरशः वाचक निःशब्द व्हावा. 'बळीराणी' मधील कथानकात इतका सहजपणा आहे. संवाद अस्सल वऱ्हाडी मध्ये आल्यामुळे वऱ्हाडचं यथार्थ चित्रण कादंबरीमध्ये साकारण्यात लेखिका यशस्वी झाली आहे. 
 
बळी, बळीराणी, महादेव, नायिकेचे सासु-सासरे, आई-वडील, ननद, प्रताप, साहेब आणि अजय अशी पात्र कादंबरीमध्ये आपल्याला भेटतात. लेखिका पती आणि पत्नी यांच्या नात्यांमधील जाणिवा हळुवार उलगडते. त्यांच्यामधील समर्पण आणि विश्वासाला साकारते. सासू आणि सून यामधील परंपरागत भांडणाला फाटा देत ही कादंबरी या नात्यांमधील समजूतदारपणा अधोरेखित करते.  आई आणि मुलाच्या नात्याला वात्सल्याची नवी झळाळी देते. कुठलंही व्यसन नसलेला बळी आत्महत्या करतो, मुळात व्यसन हे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे कारण होऊ शकत नाही असे स्पष्ट प्रतिपादन पुष्पराज गावंडे यांनी प्रस्तावनेमध्ये अधोरेखित केले आहेच. केवळ व्यसनाच्या आहारी जाऊन शेतकरी आत्महत्या करत नाही. 
 
लेखकाच्या दृष्टीप्रमाणे आणि दृष्टिकोनाप्रमाणे कादंबरी आकार घेत असते. ही कादंबरी लिहतांना लेखिका ग्रामीण जीवनाशी एकरूप झाली आहे. शेती मातीचे भावविश्व रेखाटतांना प्रसंगी बोलीतील निवेदनामुळे कथा ओघवती आणि वास्तविक झाली आहे. कथानक, प्रसंग, निवेदन, मांडणी आणि पात्र अशा अनेक घटकांच्या प्रमाणबद्ध एकत्रीकरणामुळे ही कादंबरी परिणामकारक झाली आहे. नायिका प्रधान मराठी कादंबरीमध्ये यापुढे 'बळीराणी'चे नाव सन्मानाने घ्यावे लागेल. ही कादंबरी आजवरच्या शेतकरी महिलेच्या संघर्षाचे प्रतिनिधित्व करते. कादंबरीमध्ये आलेल्या पात्रांचे स्वभाव वैशिष्ट्ये लेखिकेने सूक्ष्मपणे टिपले आहेत. ग्रामीण आणि शेतीशी निगडित विषय असूनही लेखिकेने नाविन्य जपले आहे. कथानकाची कलात्मक  आणि भावरम्य गुंफण कादंबरीमध्ये आली आहे.
 
बाबा पद्मनजी यांची १८५७ मध्ये आलेली 'यमुना पर्यटन' असो किंवा १९९३ मध्ये नामदेव कांबळे यांची 'राघववेळ' असो, बदलत्या काळानुसार सामाजिक परिस्थितीचे केवळ स्वरूप बदलते मात्र परिस्थिती चे मूळ बदलत नाही. 'बळीराणी' ही परिस्थिती बदलण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. योगायोग बघा रा. र. बोराळे यांच्या पाचोळा ला प्रकाशित होऊन पन्नास वर्षे ज्या दिवशी झाले त्याच दिवशी 'बळीराणी' कादंबरीचे प्रकाशन झाले… ग्रामीण साहित्यामधले नवे संदर्भ नव्या जाणिवा आणि नवा विचार 'बळीराणी' च्या माध्यमातून सशक्तपणे पुढे आला आहे. याची दखल येणाऱ्या काळात कादंबरी समीक्षकांना घ्यावीच लागेल. 
 
या कादंबरीला समाजशास्त्रीय आधार आहे. बऱ्याच वेळा ग्रामीण वास्तव समजून घेण्यासाठी बहुतेक समाजशास्त्रज्ञ मुन्शी प्रेमचंद यांच्या 'गोदान'चा आश्रय घेतात. मात्र यापुढे पश्चिम वऱ्हाडातील ग्रामीण वास्तव समजून घेण्यासाठी 'बळीराणी' कादंबरी एक समर्पक संदर्भ ग्रंथ असणार आहे. शेतीचे नियोजन शेतकऱ्याला कोणीही शिकवू शकत नाही मात्र ही कादंबरी आधुनिक शेतीच्या संयोजनाची शेतकऱ्यांना जाणीव करून देते. 'बळीराणी' शेतकऱ्यांच्या वेदनांवर केवळ प्रश्न निर्माण करत नाही तर प्रश्नाच्या मुळाशी जाऊन जगण्याचा मार्ग सांगते. 
 
वैदर्भीय मातीमध्ये फार मोजक्या लेखिका नावारुपास आल्या आहेत असे म्हटल्यास अशी अतिशयोक्ती होणार नाही. मराठी साहित्य विश्वाला लता बहाकार ह्या सशक्त स्त्री कादंबरीकार 'बळीराणी' च्या माध्यमातून मिळाल्या आहेत. लता बहाकार यांची 'बळीराणी' कादंबरी नुसते मनोरंजन आणि प्रबोधन करणारी उत्तम कलाकृती नसून ती परिवर्तनाचे एक माध्यम बनली आहे. महिन्याभरात कादंबरी च्या ८०% पेक्षा जास्त प्रतींची विक्री होणे ही बाब मराठी साहित्य विश्वासाठी अत्यंत आश्वासक आहे. 'बळीराणी'ला वाचकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे याबद्दल लेखिका लता बहाकार यांचे विशेष अभिनंदन. 
 
कादंबरीला युवा कादंबरीकार महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई चे सदस्य पुष्पराज गावंडे यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना आणि डॉ. प्रतिमा इंगोले यांची पाठराखण लाभली आहे. कादंबरीचे प्रकाशन समीक्षा प्रकाशन पंढरपूर यांनी केले आहे. कादंबरीला साजेसे सूचक आणि बोलके मुखपृष्ठ आहे. शेतकऱ्यांना सकारात्मक संदेश देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी ही कादंबरी शेतकरी कुटुंब तसेच खास शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी वाचकांवर सोपवते. 
....... निलेश श्रीकृष्ण कवडे अकोला मो. 9822367706
Share

प्रतिक्रिया