Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
शेतकऱ्यांची चावडी shetkari dot in

आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***

आजचे बाजारभाव

आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.




६ वे अ.भा.म.शे.सा. संमेलन : सिंहावलोकन

६ वे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन : वृत्तपत्र वृत्तांत

स्थळ : क्षात्रैक्य समाज सभागृह, कुरुळी-अलिबाग जि. रायगड  
दिनांक : ८ व ९ फेब्रुवारी २०२०
 
Ad  सिंहावलोकन  Ad
Share

प्रतिक्रिया

  • ravindradalvi's picture
    ravindradalvi
    गुरू, 20/02/2020 - 12:36. वाजता प्रकाशित केले.
    साहित्य संमेलन नव्हे, प्रशिक्षणार्थी शिबिर
     
             जेव्हा एखाद्या विषयाची माहिती करून घ्यावयाची असते तेव्हा आपल्याकडे एक पर्याय असतो तो म्हणजे त्या विषयाची ज्याला माहिती आहे अश्या व्यक्तीशी संपर्क साधून माहिती करून घेणे. त्या विषयावर चर्चा करून किंवा संबंधीत विषयाची पुस्तके वाचून आपण तेवढ्यापुरती भूक भागवू शकतो परंतू या प्रकाराला एक मर्यादा असते. जसे सांगणारा हातचे राखूनही सांगू शकतो किंवा ऐकणारा कसा आहे त्यावरही संवादाची फलश्रृती अवलंबून असते. पुस्तकाचे म्हणालं तर विषयाचा अवाका, लेखक किंवा लिहिलेले सर्वच काही समजणे हे ही व्यक्तिसापेक्ष असते, पुन्हा पुस्तकाची भाषा, विषयाची मांडणी याही मर्यादा आहेतच. जेव्हा तो विषय समजून घेऊन त्यावर परिणामकारक प्रत्यक्ष काम करायचे असते तेव्हा मात्र त्या विषयाच्या सर्वच पैलूवर प्रकाश पडणेही क्रमप्राप्त असते. अश्या वेळी ती गरज पूर्ण करण्याकरिता प्रशिक्षणाची आवश्यकता असते. अशा प्रकारचे प्रशिक्षण साधारणता एखाद्या बंद खोलीत काही समविचारी जिज्ञासू सहकाऱ्यासमवेत संबंधित विषयाच्या तज्ज्ञांद्वारे दिल्या-घेतल्या जात असते. परंतू जर विषयच लाखो करोडो जीवांच्या जगण्या-मरण्यासारखा संवेदनशील असेल, विषयाच्या आनुषंगिक काही ठोस निर्णायक भूमिका घेणे निकडीचे असेल, किंबहुना ती काळाची, समाजाची गरज असेल तर त्यावेळी विषयाशी संबंधित असंख्य कंगोऱ्याचा उहापोह जोपर्यंत जाणिवे-नेणीवेच्या पातळीवर होत नाही, तो पर्यंत त्या विषयाशी आपण खऱ्या अर्थाने भिडूच शकत नाही. अश्या वेळी मात्र अभ्यास, चिंतन, मननाकरिता प्रशिक्षणार्थ्याना मानसिकदृष्ट्या तयार असणे किंवा करणे अत्यंत आवश्यक असते. मानसिक दृष्ट्या तयार होणेकारिता सर्वप्रथम आपल्या मेंदूतील संबंधित विषयाच्या अनुषंगाने असलेल्या काही जुन्या बाबी समजुती-गैरसमजुती बाजूला सारून वस्तुनिष्ठपणे तर्कावर आधारीत विचार समजून घेऊन आकलनाकरिता मेंदूत नवीन जागा करून निर्माण करून देणे अत्यंत आवश्यक असते. असे मानसिकरीत्या तयार होण्याकरीत गरज असते आल्हाददायक वातावरणाची. निसर्गाचा सहवास मनुष्याला नेहमीच प्रेरित करीत देत असतो. अश्याच प्रकारची तंद्री शेतात काम करताना लागत असते. जसे निंदन सुरू असताना आपली नजर प्रत्येक गवतावर, तनावर असते, चुकूनही हातून कोवळे पीक कापल्या जात नाहीच कारण मन एकाग्र झालेले असल्याने नजर असते फक्त तनकटाच्या नाशावर. हीच अस्वस्था पेरणी, फवारणी अश्या प्रकारची कित्येक आनुषंगिक कामे करताना होत असते. याचे एकमेव कारण म्हणजे ते वावर, ते पिकं, झाडं झुडूप, काळी माती आणि सभोवार पसरलेला निसर्ग. अलिबाग येथे पार पडलेले सहावे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन मला एखाद्या निवासी प्रशिक्षण शिबिरासारखेच वाटले.
     
              दि. ७ फेब्रुवारीच्या सकाळपासूनच महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून प्रतिनिधी संमेलन स्थळी हजर होत होते. मी  प्रथम रेल्वे, बोट आणि बस असा आगळा वेगळा प्रवास करीत दुपारी २ वाजताच्या सुमारास माझ्या परिवारासह अलिबाग येथील शिवाजी चौकात पोहचलो. आजूबाजूला नजर टाकतो तर काय अगदी चौकाच्या दर्शनी भागात संमेलनाचे फ्लेक्स झळकत होते. रिक्शाचालकाला विचारले तर लगेच म्हणाला चला.. म्हणजे संमेलनाची प्रसिद्धी झालेली होतीच आणि स्थानिक जनतेत संमेलनाची उत्सुकताही प्रवासात रिक्शा चालकाशी बोलताना जाणवली. पुढच्या दहा मिनिटातच संमेलन स्थळी पोहचताच समोर प्रशस्त सभागृह, आजूबाजूला मोकळे मैदान सभोवार हिरवागार निसर्ग आणि फ्लेक्सच्या स्वरूपात गत पाचही संमेलनाचा चित्रमय वृत्तांत मला गत स्मृतीत घेऊन गेला. वातावरणात छान पैकी हवाहवासा गारवा असल्याने अतिशय उल्हाशीत झाल्याचे माझ्यासकट इतरही प्रतिनिधींच्या चेहऱ्यावर जाणवत होते. हळूहळू प्रतिनिधी येत होते, ज्यात महिलांच्या लक्षणीय सहभागासह तरुणांचाही तेवढाच प्रतिसाद होता. एव्हाना एकमेकाची आस्थेनं विचारपूस सूरु झालेली. वातावरण प्रसन्न होतच राहिले. अगदी रात्रीच्या भोजनापर्यंत. सर्व मिळून एकत्रित भोजन असल्याने एकमेकाला आग्रहाने वाढत होते. एक विशेष बाब म्हणजे कुणालाही आरामाकरिता वेगळी स्वतंत्र अशी व्यवस्था नव्हती. दोन हॉल मध्ये महिलांकरिता सभागृहाच्या पहिल्या मजल्यावरील प्रशस्त हॉल आणि पुरुषांकरिता प्रत्यक्ष कार्यक्रम ज्या व्यासपीठावर नियोजित होता, त्या मंचालगतची मोकळी ऐसपैस जागा. भोजनानंतर कुठल्याही सूचनेविना आपापली गादी अंथरून जो तो स्वयंप्रेरणेने झोपायची व्यवस्था करीत होता. असे एकत्र आल्याने विषय रंगत होते. कुणी गत पाच संमेलनाच्या आठवणी जागवत होते तर कुणी दोन दिवसाच्या विविध सत्र, वक्ते, प्रमुख पाहुणे, अध्यक्ष या बद्दल एकमेकाशी हितगुज साधत होते. तर कुणी आजूबाजूच्या निसर्गस्थळा बद्दल चर्चा करीत होते. अश्या मंतरलेल्या वातावरणात आपसूकच एक आपलेपणाची जाणीव मनाला भावत होती.
           सभागृहाच्या आतील बाजूस प्रासंगिक अश्या शेती विषयावरील अनेक मान्यवर साहित्यिकाच्या शेर वजा ओळी फ्लेक्स वर झळकत होत्या. पडल्यापडल्या वाचन सुरू होते, सोबतच सदरील शेराचा अर्थ, आशय, कवीबाबत चर्चाही रंगत होती. उदा. नागपूरचे प्रसिद्ध गझलकार अझीझखान पठाण यांच्या मनाला अस्वस्थ करणाऱ्या दोन ओळी......
     
    “शेत हतबल मज म्हणाले आर्जवाने!
    कासरे लपवून ठेवा पेरल्यावर”

    पुढील दोन दिवसाच्या वातावरणाची निर्मिती ह्या फ्लेक्स वरील शेरांनी केलेलीच होती. असं सर्व सुरू असताना संमेलनाचे कार्याध्यक्ष श्री. गंगाधरजी मुटे, संयोजक ऍड सतीश बोरूळकर यांचे समवेत प्रत्येक प्रतिनिधींना ग्रंथदिंडीच्या नियोजना बाबतीत सांगताना सकाळी ७ वाजता सर्वांनी तयार राहावे, अश्या प्रकारची सूचना करीत होते. दुसरे दिवशी पहाटे पाच वाजताच आख्खं सभागृह जाग होऊन तयारीला लागलेलं पाहून मला आश्चर्य वाटलं. मी वर नमूद केल्या प्रमाणे विशेष बाब म्हणजे कुणालाही आरामाकरिता वेगळी स्वतंत्र अशी व्यवस्था नव्हती, ती सामाईक होती ते यामुळेच. इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते कि, पैठण येथील पाचव्या संमेलनात प्रतिनिधीकरिता स्वतंत्र खोलीची व्यवस्था केलेली होती. मी स्वत: ग्रंथ दिंडीत उशीरा पोहचलो होतो. इथे मात्र चहा नाश्ता घेऊन आम्ही सर्व प्रतिनिधी ग्रंथदिंडीकरिता अलिबाग मधील शिवाजी चौकात हजर सकाळी ९ वाजता हजर होतो. वेळेच भान, शिस्त यातून जाणवत होती. स्थानिक कलाकारांच्या ढोल पथकासह अतिशय शिस्तबद्धपणे शिवाजी चौकातून ग्रंथदिंडी नियोजित संमेलन स्थळी वेळेतच पोहचली होती. प्रत्यक्ष संमेलनाचे उद्घाटन सत्र अगदी नियोजित वेळेत सुरू झाले. संमेलनाचे स्वागताध्यक्ष ऍड प्रदीप पाटील यांनी आपल्या ओघवत्या शैलीत उपस्थितांचे स्वागत करीत संमेलनाचा आस्वाद घ्यावा, कुठलीही अडचण आल्यास तसे सांगावे, अशी आपुलकीची भावना व्यक्त केल्याने आपसूकच जिव्हाळ्याचे वातावरण निर्माण झाले. संमेलनाचे कार्याध्यक्ष श्री. गंगाधर मुटे यांनी आपल्या बीजभाषणातून संमेलनाचा उद्देश-भूमिका स्पष्ट करताना अतिशय मौलिक असे वक्तव्य केले की “बोललेले हवेत विरून जात असते परंतू लिहिलेलं चिरंतन राहून ते अनेक पिढ्यांना दिशादर्शक ठरत असते” असे सांगताना संत तुकाराम, महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासह युगात्मा शरद जोशी, इंद्रजीत भालेराव, विठ्ठल वाघ अश्या अनेक साहित्यिकांनी निर्माण केलेले अस्सल शेतीमातीचे साहित्य आजही आपल्याला प्रेरणादायी ठरत आहे आणि हे केवळ लिहिल्यामुळे शक्य झाले. तेव्हा जास्तीत जास्त वास्तवाशी भिडून शेतीमातीच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचे आवाहन केले. संमेलनाचे संयोजक ऍड सतीश बोरूळकर यांनी कोंकण परिसराचा परिचय करून देतानी कोंकणाचा सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक, भौगोलिक दस्तऐवज काव्यमय स्वरूपात उलगडताना अलिबाग या ठिकाणी संमेलन आयोजनामागे असलेली भूमिका सांगतांना स्पष्ट केले की “आपण सर्वांनी यावे, कोंकणाचा हिरवागार निसर्ग बघावा आणि हे हिरवेपण आपल्या लेखणीत उतरावे”.
           संमेलनाचे उदघाटक आणि प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले मा. खासदार संजय राऊत व मा. खासदार सुनील तटकरे हे दोन्ही कोंकणचे पुत्र असल्याने आपल्या भागात संमेलन होत असल्याचा मनस्वी आनंद होत असल्याची भावना आपल्या भाषणातून व्यक्त केली. आपल्या उद्घाटकीय भाषणातून युगात्मा शरद जोशी यांच्या स्मृतींना उजाळा देतानी खासदार संजय राऊत यांनी युगात्मा शरद जोशी या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू अतिशय भावुकपणे उपस्थितासमोर मांडून शेतीप्रश्नाविषयी आजचे सरकार सकारात्मक पावले उचलत असल्याची  विशेषत्वाने ग्वाही देऊन हे शेतकरी संमेलन आता अखिल भारतील साहित्य संमेलनाच्या धर्तीवर राज्याच्या सीमारेषा ओलांडून जायला पाहिजे, असा प्रेरणादायी सल्लाही दिला. आ. खासदार सुनील तटकरे यांनीही आपल्या मनोगतातून शेतीप्रश्नाचा शासकीय पातळीवरून आम्ही पाठपुरावा करण्यास कटिबद्ध असल्याचे सूतोवाच केले. एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांनी आपल्या मनोगतातून संमेलनाचे कौतुक करत प्रसार माध्यमातून शेतीप्रश्न ऐरणीवर आणण्याकरिता संपूर्णपणे मदत करण्याची ग्वाही दिली. आपल्या अध्यक्षीय मनोगतातून आ. भास्कर चंदनशिव यांनी शेतीसाहित्य कृषीसंस्कुती अत्यंत व्यापक आढावा घेऊन उपस्थितांना अंतर्मुख केले. अध्यक्षीय भाषण म्हणजे आमच्या सारख्या नवागतासाठी पर्वणीच होती.

     
                उद्घाटन सत्र गाजले ते संमेलनाचे कार्याध्यक्ष श्री.गंगाधर मुटे यांच्या कवीमनाच्या अतिशय उद्विग्न अवस्थेतून आलेल्या या ओळी.... 

    कुणी तरी यांची आता, पडजीभ उपटली पाहिजे 
    नाटकी बोलतात साले, की गरिबी हटली पाहिजे

    संपूर्ण सातबारा कोरा करू म्हणाले,
    भूललेत भाडखाऊ दिल्लीत पोचल्याने

    हे दोन्ही शेर अनुक्रमे खासदार संजय राऊत आणि खासदार सुनील तटकरे यांनी वाचून दाखवत शेरातील आशय किती यथार्थ आहे याची कबुलीही एकमेकाकडे पाहत आपल्या खुसखुशीत शैलीतून उपस्थितासमोर दिली. संमेलनाच्या प्रथेप्रमाणे काही ठराव मांडले जातात आणि ते शासन दरबारी ठोस कार्यवाही करिता सादर केले जातात. यातून शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन अंमलबजावणी करावी ही अपेक्षाही असते. परंतू उघाटन सत्रातच या दोन्ही खासदार द्वयीनीं शेतीप्रश्नाशी असलेली बांधिलकी स्पष्ट केल्याने उद्घाटन सत्राला एका उंचीवर नेऊन ठेवले, ही संमेलन आयोजनाच्या दृष्टीने श्रम साफल्याची पावतीच होती. पुन्हा दुपारचे सामूहिक जेवण, दुपारच्या सत्रात अतिशय शिस्तबद्धपणे दोन सत्रात पार पडलेले शेतकरी काव्य संमेलन, सूत्रसंचालक कवी गझलकार मित्र अनंत नांदूरकर, नागपूर यांच्या अभ्यासपूर्ण आणि प्रासंगिक निवेदनातून बहरत गेले. परिसंवाद आणि "रात्री कोंकण किनार संगीत रजनी" हा अतिशय सुश्राव्य असा भावविभोर करणारा शब्दसुरांचा आविष्कार अनुभवायला मिळाला. रात्री पुन्हा दिवसभरातील कार्यक्रमावर सामूहिक चर्चा. संमेलनाचे दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात प्रा. डॉ. ज्ञानदेव राऊत यांनी घेतलेली ज्येष्ठ साहित्यिक प्रा. शेषराव मोहिते यांची मुलाखत ज्यातून उलगडत गेलेले मोहिते सर. एक निष्ठावंत कार्यकर्ता ते साहित्यिक असा विलक्षण प्रवास बौद्धिक देऊन गेला. विशेष बाब म्हणजे संमेलनात नव्यानेच कथाकथन या विषयाचा केलेला समावेश. ज्येष्ठ साहित्यिक डॉ भास्कर बढे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेले कथाकथन, ज्यात तीनही कथाकथनकार हे प्रथमच आपली कथा सादर करणार होते. अश्या प्रकारे नव्याने लिहू पाहणाऱ्या हातांना एखाद्या विषयाच्या अनुषंगाने मोठ्या व्यासपीठावर संधी देणे निश्चितच प्रेरणादायी होते. कथाकारासाठी आणि आमच्या सारख्या नवागतासाठीही. संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे शेतकरी गझल मुशायरा, ज्यात ज्येष्ठ गझलकार आ. मसूद पटेल सरांसमवेत सर्वच गझलकारांचे सादरीकरण आणि मुशायऱ्याचे संचालन करणाऱ्या राधिका प्रेम संस्कार, रायगड यांनी  प्रत्येक गझलकारांच्या रचनेवर समर्पक भाष्य करून यथोचित न्याय देत केलेल्या प्रभावी निवेदनाला उपस्थितांनी दिलेली उत्स्फूर्त दाद. यामुळे गझल मुशायरा अविस्मरणीय झाला. शेती साहित्याशी निगडित सर्वच साहित्यप्रकाराचे सादरीकरण, उजळणी, संघटन कौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास, लेखन कौशल्य आत्मसात करणे, सांघिक कार्यकुशलता, सामूहिक चर्चा, संवादाचे महत्त्व, स्वानुभवकथन, वेळेचे नियोजन, प्रत्येक सत्राची नियोजनबद्धपणे आखणी आणि ते वेळेत पार पाडण्याकरिता प्रत्यक्ष अंमलबजावणी. अश्या एखाद्या प्रशिक्षण शिबिरात ज्या प्रमाणे ह्या सर्व बाबीचा अंतर्भाव असतो तश्या प्रकारे मला हे संमेलन एखाद्या निवासी प्रशिक्षण शिबिरासारखे वाटले......!

     
    रवींद्र अंबादास दळवी नाशिक 
    ९४२३६२२६१५

    रवींद्र अंबादास दळवी
    नाशिक

  • sunil adhaukar's picture
    sunil adhaukar
    सोम, 24/02/2020 - 16:58. वाजता प्रकाशित केले.
    आठोनीतलं साहित्य संमेलन 
    { वऱ्हाडी बोली- लेख } 
     
          आता पर्यंत पाच शेतकरी साहित्य संमेलन लयच जबाबदारी अन् काटेकोरपणे कवी, गझलकार, लेखक, स्तंभ लेखक अन् हाळाचे कास्तकार गंगाधरजी मुटे ययनं आयोजक म्हणूनसन्या लयच साजरे थाटामाटात  पार पाळले.  अन् सहावं  अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमेलन समिंदराच्या पोटात म्हनजेचं अलिबाग, रायगड इथं तेयनं घेतलं.  विदर्भातले लोकं म्हनतात.. 'घर पाह्य  बांधून - अन् लगन पाह्य  करून.' मी त आता साहित्य संमेलनं पाहूनसन्या  अस् म्हनन की;  ' घर पाह्य  बांधून अन् साहित्य संमेलन पाह्य घेवून. ' लय ताकद, पैसा, मनुष्यबळ लागते राजेहो.... एक ते दिळ मयन्या पासून धावपय ,  बॅनर, पतरीका, अध्यक्षीय भाषन छापा,  सन्मानपतरं,  सन्मानचिन्ह,  नारयं, फुलं, हारं, तुरे, शाली, मांडव, खुरच्या, गाद्या, चादरी, ग्रंथ दिंडी, शाळेचे लेकरं, फटू,  समई, चा, पानी, जेवनं-खावनं, मोठ्या साहित्यिक लोकायले आना, सोळा, तेयची राहाची खाची - प्याची सोय हे  सारच करा लागते.  पन हे सारं अवघ सहज, लिलया  आपल्या घामानं , कष्टानं,  मेहनतीनं   गंगाधरजी मुटे हाताळतात. 
     
        मी अन् माह्ये आकोल्याचे कवी मैतर संदीप भौ देशमुख आम्ही दोघही ह्या साहित्य संमेलनाले गेलो.  मुंबई वरून थेट अलिबाग गाठलं. बस ईस्टॅन्ड,  कुलाबा बीच, चौकाचौकात जागोजागी शेतकरी साहित्य संमेलनाचे अथिसा  बॅनर  दिसले. मंग तथूनसन्या क्षात्रौक्य हाॅलच्या फाटका  जौळ आम्ही आलो.  भलीमोठी संमेलनाची कमानं गेट जौळ दिसली. लयच  हरिक झाला.  गेटच्या अंदरे आम्ही दोघानं  पावलं  टाकली.  आंधी झालेल्या साहित्य संमेलनाचे जोरदार फटू बॅनर रूपात मस्त ऊन्हात झयकत चमचम करत होते. मंग नाव नोंदनी करून एक किट देन्यात आली.  त्यात परमानपतरासह सारंच होतं... सारंच म्हनजे पतरीका, पेन, आयडी कार्ड, मा. अध्यक्ष महोदयाचं भाषन, जेवाचे अन् च्याचे कूपनं...आयोजन पाहूनसन्या लय हरिक झाला. मांडवात पाय ठुयला...जरा आम्हाले याले जरा ऊशिरच झाला होता. मा.अध्यक्ष महोदयाचं भाषन चाललं  होतं.  सभामांडवात म्या पाह्यलं...लयच अभायभर हरिक झाला.  पांड्या  शिप्पट् टोप्या घातलेले कास्तकार , कवी, लेखक, साहित्यिक, रसीक, अलिबागकरायनं  मांडव कचाकच अन् गचागच  भरलेला होता.  सारे लोकं भाषनं एकचितानं आयकत होते. 
     
        नैसर्गिक वर भेटलेलं अलिबाग लयच खास सर्वांग सुंदर असा स्वर्गच  हायं. तीथुल्ले समिंदराचे काठ एकदम स्वच्छ   ...ना. काळी कचरा, ना प्लास्टिकच्या पन्न्या,  ना गुटक्याच्या पुळ्या  ...समिंदराच्या किनाऱ्यावर घोळे, ऊट, बग्ग्या  लायन्या मोटारी हायेत.  कुलाबा किल्ला , जौळच जंजीरा किल्ला हाय .... कुलाबा बीच, वर्सोली बीच, अलिबाग बीच, अक्षई बीच, किहीम बीच, नागाओ बीच, मांडवा बीच....मले त अस वाटे दुसरं गोवा म्हनजे अलिबागच ....
     
          जसं वऱ्हाड प्रांतातले लोकं साध्याभोळ्या मानसाले "वाळेगांव वरून आला काय बे!" असं म्हनतात तसेच बंबईचे लोकं बंबईत  साध्याभोळ्या मानसाले .." अलिबाग से आया क्या..!" अस म्हनतात.  तर असे लयच साजरे, साधेभोळे, मनमिळावू, प्रेमळ, जीवाले जीव लावनारे   लोकं तथिसा हायेत. 
     
         तथुल्ली गुपचूप पाणीपुरी तं यादगार अशी हायं...तांदूयाची पांडीभक भाकरं अन् मस्त रस्सेदार  भाजी...लाजवाब खाद्यसंस्कृती....मस्त नारयाचे झाळं,  थंन्डीगार हवा, जिकडे तिकडे हिरवाई,  मासोयाचा व्यापार जौवळच  पेन...पेन म्हनजे लिवाचा नाही.   पेन नावाचं गाव.  अतिसा सुबक, सुंदर, रेखीव, देखन्या  गनपतीच्या मुरत्या घळवल्या जातात. अन अवघ्या भारतात मुरत्या जातात. 
           साहित्य संमेलन अटपलं.  मी अन् माह्या मैतर  संदीप देशमुख  अलिबाग पासूनं लाल डब्यात बसूनं दूर चाललो होतो. पन अलिबाग अन सहावे अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमेलन एक अनामिक गोळ घळीची आठोनं  कायजात ठेवूनं गेलं....आठवनं  ठेवून गेलं. .....
     
     - सु. पुं. अढाऊकर 
          मुंबई 
  • Ganesh Warpe's picture
    Ganesh Warpe
    मंगळ, 25/02/2020 - 14:57. वाजता प्रकाशित केले.
    जगण्याला प्रतिष्ठा देणारे संमेलन
     
    यंदाचे ६ वे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन अलिबाग येथे  यशस्वी पणे पार पडले, बळीराजा हा पिढ्यानपिढ्या न्याय व हक्कासाठी लढत आहे. भारत हा कृषिप्रधान देश आहे परंतु, ह्या देशातील शेतकरी हा नेहमी उपेक्षित वंचित घटक म्हणून जगत  आला आहे. चर्चा सत्रातून शेती विषयक वैचारिक चिंतनातून प्रखरतेने वास्तववादी भीषण समस्या, परिस्थिती समोर आली. शेतमालाला भाव आणि बळीराजाला समाजात वावरताना प्रतिष्ठा पुन्हा एकदा  मिळवून देण्यासाठी एल्गार पुकारला गेला. ह्या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून राज्यामधून मोठ्या प्रमाणात साहित्यिक, विचारवंत व शेतकरी दाखल झाले. संमेलनाच्या माध्यमातून जे काही महत्त्वाचे ठराव संमत झाले ते शासनाकडे पाठपुरावा करून शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न झाले ते निश्चित लाभदायी ठरेल.  
    कार्याध्यक्ष मुटे सरांनी केलेलं साहित्यातील कार्य-योगदान भविष्यात बळीराजाच्या सर्वांगीण विकासासाठी निश्चित लाभ देणारे ठरणार यातही माझे दुमत नाही. तसेच  शेतकरी गझल मुशायऱ्याचे जनक किंवा निर्माते, म्हणून मुटे सरांकडे भविष्यात बघितल्या जाऊ शकते कारण प्रारंभी पासून त्यांनी शेतकरी गझल लिहिल्या. त्या पूर्वी लिहिण्याचा अपवादात्मक प्रयत्न झाला असू शकते परंतु खऱ्या अर्थाने शेतकरी गझल लिखाणाला व्यासपीठ, प्रतिष्ठा, नावलौकिक मिळवून देण्याचे काम त्यांनी केले. शेतकरी साहित्य चळवळीद्वारे शेतकऱ्याच्या मालाला भाव आणि जीवन जगण्याला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी उपयोगी पडेल हे ही ह्या ठिकाणी नमूद करावेसे वाटते. साहित्यिक मंडळी कडून भविष्यात बळीराजाच्या दशा आणि दिशा लेखणीचा माध्यमातून जगण्याचे बळ तयार करण्यासाठी प्रयत्न करतील ही अपेक्षा व्यक्त करतो व शेतकरी साहित्य चळवळीला शुभेच्छा व सदिच्छा देतो. 
     
    - गणेश गंगाधर वरपे 
    जालना  मोब : ७३८५८५१६५०
     

    Ganesh

  • Krushna Ashok Jawle's picture
    Krushna Ashok Jawle
    मंगळ, 25/02/2020 - 15:13. वाजता प्रकाशित केले.
    व्यवस्थेचा खरा चेहरा दाखवणारे संमेलन

    सहावे अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमेलन 2020, अलिबाग येथे अगदी व्यवस्थित आणि उत्तमरीत्या पार पडले.  या सगळ्यांमागे असणाऱ्या नियोजनामुळे हे सगळं घडून आले.  त्यासाठी अथक परिश्रम घेणारे मुटे सर आणि त्यांचे सर्व सहकारी यांचा मोलाचा वाटा आहे. कितीतरी साहित्य संमेलने अलीकडच्या काळात होतात पण त्यामधून उच्चवर्गीयांच्या मनोरंजनासाठी साहित्य निर्माण होते. त्यामुळे समाजहिताचं, सामान्यांच्या व्यथा मांडणार साहित्य मांडल्या जात नाही.
     

    शेतकरी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून सामान्यांच्या, कष्टकऱ्यांच्या आणि सगळ्याच थरातील साहित्य निर्माण झालंय.  ही या संमेलनातील महत्त्वाची बाब आहे. साहित्याच्या क्षेत्रात कार्यरत काही संस्था साहित्याच्या जबर निकष मांडतात.  त्यामुळे सामान्यांना साहित्य निर्माण करण्यास, आपली व्यथा लोकांपर्यंत पोहचवणे शक्य नव्हते.  या शेतकरी साहित्य मंचामार्फत तेच लोक आता आपल्या मनातील भावना मांडण्यास तसेच व्यवस्थेचा खरा चेहरा दाखवण्यात सफल ठरलेत.  
     
           नवीन चेहऱ्यांना सातत्याने समोर आणण्याचे काम या मंचाच्या माध्यमातून होते.  सकस शेतकरी साहित्य निर्मिण्याच्या या ध्येयास यशस्वी करण्याचे काम आपणा सर्वांवर आहे.  सलाम या माणसांच्या कार्याला.

    - कृष्णा जावळे 
    बुलडाणा 

  • पाने