औंदाची शेती - २०१४
: २० जून २०१४ :
काल कोरडवाहू कपाशीची टोकण पद्धतीने लागवड केली आणि पावसाने रजेचा अर्ज दिला.
२९ जूनपर्यंत त्याला रजा हवीय. पावसोबाच्या रजेचा अर्ज मंजूर करावा कि नाही, मी गोंधळलो आहे. मानसोपचार तज्ज्ञांनी कृपया मदत करावी.
------------------------------------------------------------------------------------------------------------
: २७ जून २०१४ :
औंदाच्या शेतीमध्ये वरुणदेव चांगलेच रंग भरेल असे दिसायला लागले आहे.
दिनांक १७ जुनला पाऊस हजेरी लावून जो गेला तो अजूनपर्यंत कामावर काही रुजू झालेला नाही.
हवामानाच्या अंदाजाप्रमाणे ५ जुलैच्या आधी तो रुजू होण्याची शक्यता दिसत नाही.
अकस्मात पाऊस निघून गेल्यामुळे कपाशीची लावण बिघडली आहे. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी तातडीने तुषारसिंचन सुरू केले. काहींनी तडकाफ़डकी विकत आणले. पण यामुळे केवळ पिकाचे नुकसान कमी करता आले. आता हा वाढीव खर्च वाढल्याने पिकाचे नुकसान कमी होईल पण अतिरिक्त उत्पादन थोडेच वाढणार आहे? मग हा वाढीव खर्च कसा भरून निघणार? तो भरून निघणारच नाही आहे. सिंचनामुळे जेवढे पिकाचे नुकसान कमी झाले, मरणारे झाड वाचवता आले, त्यात सिंचनावर केलेल्या खर्चाची भरपाई होईल. म्हणजे सिंचन करूनही पळसाला पाने तीनच! यंदा कोरडवाहू शेतकर्यांची हजामत बिनापाण्याने होईल आणि सिंचन करणार्यांची हजामत पाणी लाऊन होईल....... हजामत होणार ही काळ्या दगडावरची रेघच!
------------------------------------------------------------------------------------------------------------
: २ जुलै २०१४ :
इच्चीबैन, पाऊस वेन्ट तर वेन्टच वेन्ट. अॅन्ड नॉट टेक नेम टू कम बॅक अगेन!
------------------------------------------------------------------------------------------------------------
: ०७ जूलै २०१४ :
१७ जूनपासून पावसाने सुट्टी घेतली. आज २२ दिवस झालेत पावसाचा थेंब देखील पडला नाही.
पण शेतकर्याला सुट्टी कुठे असते? तो आपल्या कामात व्यस्तच आहे. उत्पादन कमी होईल;
पण कष्ट मात्र वाढलेत. विदर्भाचा शेतकरी आळशी आहे म्हणणार्यांनी इकडे यावे,
मी त्यांचा कान धरून वस्तुस्थिती दाखवायला तयार आहे.
********
********
********
------------------------------------------------------------------------------------------------------------