अस्वस्थतेकडून अस्वास्थ्याकडे : कोरोना माहात्म्य ||१२||
अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या प्राथमिक गरजा मानल्या गेल्या असल्या तरी त्या सजीवाच्या मूलभूत प्रेरणा नाहीत. स्वसंरक्षण, पोषण आणि प्रजनन ह्याच मनुष्य जातीच्याच नव्हे तर संबंध सजीवसृष्टीच्या प्राथमिक, मूलभूत व नैसर्गिक प्रेरणा आहेत. त्यातील स्वरंक्षण ही अत्यंत मूलभूत गरज. स्वतः समोरील रक्षणाचा धोका संपल्याखेरीज पुढचा टप्पा सुरूच होत नाही. समोर वाघ तोंड उघडून उभा असेल तर मनुष्य खाणे-पिणे पूर्णपणे विसरून जातो. एकदा स्वसंरक्षण निश्चित झाले कि नंतरच उदरभरणाची मागणी शरीराकडून माणसाच्या मेंदूपर्यंत पोचवली जाते. पोट भरून झाले कि मग शांतचित्ताने झोपायला निवाऱ्याची गरज भासते. खरंतर निवाऱ्याची गरजच मुळात स्वसंरक्षणासाठीचे कुंपण या कारणाने झाली. जंगली श्वापदे हेच मनुष्याचे जीविताला धोका पोचवणारे शत्रू नसून ऊन, वारा, वीज, वादळ, पाऊस हे सुद्धा मनुष्याच्या जीविताला धोका पोचवणारे नैसर्गिक शत्रूच आहेत.
पण मनुष्य जसजसा मनुष्य प्रगत होत गेला तसतसे त्याने नवनवीन उपाय शोधत स्वसंरक्षणाचा प्रश्न सहज सोडवून घेतला. माणसाने साधनांची निर्मितीची कला अवगत केली आणि त्याच कलानैपुण्यातून त्याने स्वतःसाठी निवारा उभा केला. निवाऱ्याचा उपयोग ढालीसारखा झाल्याने त्यापूर्वीचे माणसाचे सर्व नैसर्गिक शत्रू ऊन, वारा, वीज, वादळ, पाऊस हे त्याचे मित्र झालेत. मग याच मित्रांचा खुबीने पोषणासाठी उपयोग करत माणसाने स्वतःचे जगणे समृद्ध केले.
उत्क्रांतीच्या प्रवाहासोबत साधनसंपत्तीच्या निर्मितीमुळे मनुष्य इतका प्रगत होत गेला की त्याच्या मूलभूत प्रेरणांचा क्रम बदलणे सुरु झाले. मजबूत निवाऱ्याने व वस्त्रांच्या वापराने स्वसंरक्षणाचा प्रश्न मिटला. अन्नाच्या निर्मितीने पोषणाचा प्रश्न सुटला आणि मनुष्य इतका निश्चिन्त झाला कि स्वसंरक्षण आणि पोषण ह्याच आपल्या मूलभूत गरजा असल्याचा त्याला पूर्णपणे विसर पडला. अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या प्राथमिक गरजा मानल्या गेल्या असल्या तरी अन्न म्हणजे केवळ उदरभरण असते; पोषण नसते, लोकांना दाखवण्यासाठी वस्त्रे परिधान करायची नसतात तर शरीर संवर्धनासाठी व शरीराच्या रक्षणासाठी वस्त्रांचा उपयोग करायचा असतो. निवाऱ्याने कधीकाळी स्वसंरक्षणाचा प्रश्न सुटला असेल पण स्वरक्षणासाठी केवळ निवारा पुरेसा ठरू शकत नाही, हेच माणसाच्या ध्यानीमनी न राहिल्याने निदान सांप्रतकाळात तरी पुन्हा एकंदरीतच मनुष्यजातीसमोर अस्तित्वाचे प्रश्न नव्याने निर्माण झालेले आहेत. माणसाच्या जीविताला धोका पोचवणारे एकेकाळचे त्याचे शत्रू म्हणजे हिंस्त्र पशु-पक्षी यापासून माणसाची पूर्णपणे सुटका झाली असली तरी नव्या युगात त्याच शत्रूंची जागा जिवाणू-विषाणूंनी घेतली आहे.
" सुरवातीचे २८ दिवस जरी प्रत्येक भारतीयाने आपापले राजकारण खुंटीला लटकावून ठेवले असते तर पहिल्या २८ दिवसातच करोना संक्रमणचक्र खंडित होऊ शकले असते व नंतरच्या काळात फक्त "हॉटस्पॉट" एरियात कोरोनाला बंदिस्त करणे सहज शक्य झाले असते पण तसे झाले नाही. स्थलांतर करणाऱ्या मजुरांबद्दल लॉकडाऊन काळात देशभर दिसून आलेला आत्यंतिक उमाळा ना कधी त्यापूर्वी दिसला होता ना लॉकडाऊन संपल्यावर दिसून आला आहे. लॉकडाऊनचा अर्थ संचारबंदी असा असताना स्थलांतराचे समर्थन जेव्हा घाऊकपणे सुशिक्षित, सुजाण, सभ्य व सुसंस्कृत समाज करायला लागतो तेव्हा तो समाज मानसिक अस्वस्थतेने ग्रासलेला असल्याचे स्पष्ट होऊन जाते. "
आज माणसाच्या गरजा खूप वाढल्या आहेत. पण त्यापैकी अनेक गरजा पूर्ण करणे अनिवार्य झाल्याने अन्न, वस्त्र, निवारा, प्रजनन यासोबतच मोबाईल, शुद्ध पाणी, शिक्षण, आरोग्य, व्यक्तित्व, सौंदर्य याखेरीज अनेक प्राथमिक गरजांची त्यात भर पडलेली आहे. प्राथमिक गरजांचे महत्व असे कि प्राथमिक गरजांचे पूर्णपणे निवारण झाल्याशिवाय मनुष्यमात्राला आनंद व समाधान प्राप्त होत नाही. असे समाधान प्राप्त न होणे ही मानसिक अस्वस्थतेची प्राथमिक पायरी असते आणि मग एकेक पुढील पायरी चढत मनुष्य अस्वस्थतेकडून अस्वास्थ्याकडे वाटचाल करायला लागतो.
पारंपारिक नैसर्गिक शत्रूवर माणसाला सहज मात करता आली आणि नेमके हेच पथ्यावर पडले. शत्रूवर व नैसर्गिक आपत्तीवर विजय मिळवण्याच्या नादात ज्या उपाय योजना करण्यात आल्या त्यातूनच आणखी नव्याने कृत्रिम संकटे निर्माण झालीत. या कृत्रिम संकटावर मात करणे तितके सहजसाध्य ठरले नाही जितके नैसर्गिक संकटावर मात करणे सोपे ठरले. आता वाघ, सिंह, विंचू , साप, सूर्य,चंद्र, तारे, डोंगर, वारा, वादळ, पाऊस यांनी मानवतेच्या अस्तित्वासमोर संकट उभे राहिले नसून एका सूक्ष्मशा विषाणूने मानवजातीसमोर अस्तित्वाचे भयावह संकट निर्माण केले आहे.
एक सूक्ष्मसा निर्जीव विषाणू जगभर हाहाकार माजवतो आहे. जो मानवनिर्मित आधुनिक तोफा, लढाऊ विमाने, अण्वस्त्रे यांना हरवून जगाला आपल्या इशाऱ्यावर हवे तसे नाचवतो आहे. आज ना उद्या प्रतिबंधक लस निघून कोरोनावर मात करता येईल, इतका एक आशेचा किरण सोडला तर कोरोनासमोर मनुष्यजात हतबलच नव्हे तर चक्क पराभूत झालेली आहे. असे का झाले? ह्या छोट्याशा प्रश्नाचे उत्तरही फार सोपे आहे. कोणत्याही सजीवाची स्वसंरक्षण हीच प्राथमिक गरज असते; स्वसंरक्षण संपल्यावर बाकी गरजा सुरु होतात, हेच प्राथमिक तत्व उत्क्रांतीच्या प्रवाहात मनुष्य विसरल्यानेच एका निर्जीव विषाणूंसमोर सफशेल पराभूत होण्याची वेळ मानवजातीवर ओढवली आहे.
कोरोना भूतलावर प्रकट झाला तेव्हाच स्पष्ट झाले होते की, कोरोनावर रामबाण इलाज नाही. त्याची संक्रमण शक्ती प्रचंड गतिमान असल्याने त्याला आहे तिथेच थोपवणे व त्याला इतरत्र शिरकाव करू न देणे याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय उपलब्ध नसल्याचे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट झाले होते. पण तरीही कोरोना चोरमार्गाने नव्हे तर अगदी राजरोसमार्गाने जगभर पसरला. महानगरातून उपनगरात आणि शहरी भागातून ग्रामीण भागात पोचला. असे का व्हावे? एका सूक्ष्मशा विषाणूला शिवेबाहेरच का थोपवता येऊ नये? उत्तर अगदीच स्पष्ट आहे कि सजीवाची मूलभूत गरज अन्न. वस्त्र, निवारा, मोबाईल, संपत्ती नसून "जीवाचे रक्षण" हीच मूलभूत गरज असल्याचा संबंध मानवजातीला विसर पडला. जीव वाचवणे आधी आणि ऐहिक सुखे त्यांनतर असे वातावरण देशातच काय; जगातच तयार झाले नाही त्यामुळे ऐहिक भोगविलासी वृत्ती प्रथमस्थानी राहिल्याने संचाराच्या माध्यमातून कोरोनाला देशाच्या कानाकोपऱ्यात पोचविण्याचा कार्यक्रम सर्वत्र सुरूच राहिला.
स्वतःच्या व कुटुंबियांच्या जीविताच्या रक्षणापेक्षा याच एका कारणाने राजकारणही भारी पडले. एरवी कोरोना रोखण्यासाठी पहिलाच लॉकडाऊन कडाक्याने व कठोरतेने पाळणे आवश्यक आहे इतकी प्राथमिक समज प्रत्येक भारतीयाला असायला अजिबात हरकत नव्हती. पण माणसाची प्राथमिक व मूलभूत जीविताचे रक्षण असल्याच्या जाणिवेचा विसर पडल्याने प्रत्येक भारतीय माणसात जी गंभीरता यायला पाहिजे होती, ती आलीच नाही. पहिल्याच लॉकडाऊनच्या काळात जिथला मनुष्य तिथेच थांबला असता तर करोना संक्रमणचक्र खंडित व्हायला 28 दिवसाचा लॉकडाऊन सुद्धा पुरेसा ठरला असता. पण इकडचा माणूस तिकडे जात राहिल्याने ७०-८० दिवसाचा लॉक डाऊन व्यर्थ गेला. लॉकडाऊनमुळे जरी रुग्णाची गती मंदावली तरी त्यापेक्षा जास्त काळ लॉकडाऊन वाढवणे अशक्य झाल्याने फक्त आजचे मरण उद्यावर ढकलणे, इतकेच साध्य झाले.
"करोना आपत्तीकालीन लॉकडाऊन" म्हणजे काय, हेच अनेकांना कळलेले नसल्याने अगदी आणीबाणीच्या काळात घाऊक प्रमाणात स्थलांतराला खतपाणी घालण्याचे काम बुद्धिवाद्यांकडून झाले. लॉकडाऊन म्हणजे "जिथला मनुष्य तिथे" इतका सोपी अर्थ असताना इतका कोलाहल तेव्हा बुद्धिवाद्यांनी व राजकारण्यांनी का माजवला, हाही एक अनुत्तरित प्रश्न असला तरी त्याचेही उत्तर फारसे अवघड नाही. लॉकडाऊनच्या काळात जिथे आहे तिथेच मजुरांना थांबवण्यासाठी सर्व समाजाने प्रयत्न करायला हवे होते. त्यांना तिथेच थांबवून त्यांची भोजनाची व निवासाची व्यवस्था करणे सहज शक्य होते पण अनेकांना पुळका दाटून आला. गरिबांबद्दल ओसंडून वाहणारा इतका प्रचंड पुळका यापूर्वी मी कधीही पाहिला नव्हता. एकदम माणसे माणूसकीत वगैरे आल्यावाणी अचानकच संतसज्जनासारखी जाणवायला लागली. मात्र ही सारी पुळकेबाज मंडळी निव्वळ बोलघेवडी निघाल्याने मजुरांचे खाण्यापिण्याचे वांदे कायम राहिले. गरिबांबद्दल पुळका दाखवणारे करोडो लोक देशात पावलोपावली दिसत असताना मजुरांचा भुकेचा प्रश्न सहज मिटायला हवा होता पण मनुष्य ढोंगी असेल तर त्याचा पुळका सुद्धा ढोंगी असतो, हे सुद्धा या उदाहरणाने आणखी एकदा अधोरेखित केले. बुद्धिजीवी लोक आपापले इसिप्त साध्य करण्यासाठी व आपापला छुपा एजेंडा रेटण्यासाठी नेहमी शेतकऱ्यांचे किंवा गरिबांचे नाव पुढे करत असतात. हा बुद्धिजीवी लोकांचा पूर्वापार चालत आलेला कपटनीतीचा कुटिलडाव असतो पण हा डाव शेतकरी, मजूर व सर्वसामान्य जनतेच्या कधीच लक्षात येत नसल्याने ते अशा जाळ्यात बेमालूमपणे फसतात व आपलाच आत्मघात करून घेतात.
सुरवातीचे २८ दिवस जरी प्रत्येक भारतीयाने आपापले राजकारण खुंटीला लटकावून ठेवले असते तर पहिल्या २८ दिवसातच करोना संक्रमणचक्र खंडित होऊ शकले असते व नंतरच्या काळात फक्त "हॉटस्पॉट" एरियात कोरोनाला बंदिस्त करणे सहज शक्य झाले असते पण तसे झाले नाही. स्थलांतर करणाऱ्या मजुरांबद्दल लॉकडाऊन काळात देशभर दिसून आलेला आत्यंतिक उमाळा ना कधी त्यापूर्वी दिसला होता ना लॉकडाऊन संपल्यावर दिसून आला आहे. लॉकडाऊनचा अर्थ संचारबंदी असा असताना स्थलांतराचे समर्थन जेव्हा घाऊकपणे सुशिक्षित, सुजाण, सभ्य व सुसंस्कृत समाज करायला लागतो तेव्हा तो समाज मानसिक अस्वस्थतेने ग्रासलेला असल्याचे स्पष्ट होऊन जाते.
आपत्तीकाळात स्वसंरक्षण ही मूलभूत गरज असूनही तिचाच विसर पडल्याने माणसाची मती अन्न, वस्त्र, निवारा व ऐहिक भोगवादी सुखचैनीच्या जीवनशैलीवरच केंद्रित राहिल्याने नकळत मानसिक अस्वस्थता निर्माण झाली. मानसिक अस्वस्थतेमुळे मती कुंठित होऊन त्याचा परिणाम निर्णयक्षमतेवर होऊन निखालस चुकीचे निर्णय होऊन माणसाने आपल्याच हाताने आपले स्वास्थ्य अस्वास्थ्याकडे ढकलून आपल्याच समोरील छोट्याशा संकटाला भयावह महामारीत रूपांतरित केले. निदान कोरोनाचा वाढता प्रकोप तरी तोच धडा मानवतेसमोर ठेवत आहे.
- गंगाधर मुटे आर्वीकर
(क्रमशः)
=============
==============
(मासिक "नवे-गाव आंदोलन" सांगली मध्ये प्रकाशित)