नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
शरद जोशींचे चारित्र्य अभ्यासक्रमात लावा : नाना पाटेकर
Vdo लिंक >>> https://www.youtube.com/watch?v=-losJ8M-imo
रसरशीत साहित्य कशाला म्हणतो आपण. पु. ल. देशपांडे हे आमचे दैवत. इतके सुंदर, अप्रतिम लिहिणारे पण ज्या वेळी त्यांनी रामनगरी वाचली, राम नगरकर हे अशिक्षित पण त्यांनी जे लिहिले ते फक्त लिखाण नाही, त्यांनी जे जगलंय त्याच पुस्तकं आहे ते. आणि जगण्यातला जो विसंगतीतला, वेदनेतला, अवहेलनेतला, भुकेतला तो विनोद आहे. पु. ल. म्हणत की रामच्या लिखाणातील विनोद माझ्या विनोदापेक्षा केव्हाही श्रेष्ठ असेल त्यामुळे राम हा जास्त मोठा आहे. कारण त्याला वेदनेची किनार होती ती वेदनेची किनार पु. ल. च्याही लेखनात येते, मग तो अंतू बर्वा असेल, "आता लाइट आली तर त्या लाइटमध्ये दिसणार काय? आमचे दारिद्र्यच ना? त्याच्यापेक्षा तो काळोखच बरा" असं म्हणणारा अंतू बर्वा. पण त्याच्या पलीकडचे अजून कोणते तरी दुःख आहे ते रामनगरी मध्ये तुम्हाला दिसते. रामनगरी नंतर रामभाऊने दुसरी पुस्तकं लिहिली नाही. त्यांचा जो निचरा होता तो एका पुस्तकात संपला, ते साहित्यिक नव्हते, ते साहित्यिक नसताना त्यांनी जे लिहिले होते ते त्यांच्या रक्ताचे होते, ते शाईने लिहिलेले नव्हते. त्यामुळे ते माझ्या पर्यंत जास्त पोहोचले, तुम्ही या साहित्य संमेलनातून घडलेले जे लेखक आहात ते लिहीत असताना कुणाचीही कणव नको. गोंजारलेले दुःख नाही आम्हाला दाखवायचे, आम्हाला आमच्या आतून, धमन्यांतून जे वाहते ते रसरशीत मांडायचे, ते किती जणांना पोहचते, नाही पोहचत याचा विचारच करायचा नाही.
मी हा चेहरा घेऊन पन्नास वर्ष वागतो आहे. आमच्या इंडस्ट्रीमध्ये आमच्या येथे अतिशय गोरीगोमटी, छान, सुंदर दिसणारी मुलं आहेत आणि त्यांच्यामध्ये माझा असा हा खडबडीत चेहरा घेऊन पन्नास वर्ष टिकून राहणे हा तुमच्या आतमध्ये स्वतःचं रसरशीत असले पाहिजे. रोज नवी दुःख पाहायला पाहिजे, एकाच पद्धतीचे दुःख जर मी वर्षानुवर्षे तुम्हाला दाखवत राहिलो तर कंटाळा येईल, ज्या वेळी एका शेतकऱ्यांच्या घरामध्ये जातो, दुसऱ्या शेतकऱ्यांच्या घरात जातो, तेव्हा दुःखाची व्याख्याच बदलून जाते, मला हे दुःख माहितीच नव्हते, नटसम्राट आज मला करायला सांगितले तर मी वेगळ्या पद्धतीने करेन, माझे नटसम्राटाचे दुःख जे आहे ते चार भिंतीमधले आहे. गोंजारलेले दुःख आहे. आम्ही आमचे सगळे आयुष्यच आभाळाखाली ठेवलेले आहे, आमच्या पिकाला तिजोरी नसते, कुणीही या, पाखरे येऊन खातात, वानरे येऊन खातात, वानोळा म्हणून त्यांनी तो खायचाच असतो, उरलेले आम्ही खातो, पण त्याचा जो रास्त भाव आहे तोच द्या ना. याच्या पलीकडे आम्ही काही मागत नाही. आमची आई सांगायची आमच्या काळात सोने सोळा रुपये तोळा होते, आज काय भाव आहे मला माहिती नाही, मला सोन्यासारखी माणसं मिळाली, त्यामुळं सोन्याकडे पाहत सुद्धा नाही, पण सोन्याचा भाव इथून इतका झाला, आमच्या तांदुळाचा भाव, गव्हाचा भाव काय पटीत वाढला ते तुम्हाला माहिती आहे.
सरकार कडे मागू नका, कुठलं सरकार करायचं ते ठरवा. मला राजकारणामध्ये जाता येत नाही कारण माझ्या आतमध्ये पोटात आहे तेच ओठावर येते, मला दुसऱ्या दिवशी त्या पक्षांतून काढून टाकतील! महिन्याभरात माझ्यासाठी सगळे पक्ष संपलेले असतील, कशाला जायचे तिथे? इथे आल्यावर मनापासून ते बोलता येते. सगळयांत महत्त्वाची गोष्ट कधी कळणार यांना की आपण मरणार आहोत! किती संचय करायचा? मृत्यू अटळ आहे हे तुम्हाला माहिती नाही का? अमर असल्यासारखे का वागता तुम्ही? काय बोलता, कुठले आदर्श ठेवता तुम्ही नवीन पिढीसमोर? काय चाललेले आहे? कशाच्या आशेवर आम्ही जगायचं? रोज आम्हाला अन्न देणारा जो आहे त्याची जर तुम्हाला पत्रास नसेल तर आम्ही तुमची पत्रास का ठेवायची? शेतकरी कधीच तुमची अडवणूक करणार नाही. तो कितीही चिडला, काहीही झाले, आत्महत्या केली तरी पुन्हा जन्मून मी पुन्हा शेतकरीच होणार अशा पद्धतीने जगणारी जात आहे ही. पुढचा जन्म कोणता हवा रे? असे विचारलं तर मला शेतकऱ्यांचा जन्म नको असं कधीच शेतकरी म्हणणार नाही. जनावराची भाषा आम्ही जाणतो, तुम्हाला आमची भाषा कळत नाही का? आणि हे कधी संपणार आहे? वर्षानुवर्षे! कसले स्वतंत्र झालो आम्ही? एका गुलामीतून दुसऱ्या गुलामीत, अजून काय? आणि मग त्याला वाचा फोडण्यासाठी हे फार गरजेचं आहे ते लिहा. लिखानात ते यायला हवे,
संमेलन नव्हे हा यज्ञ
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ या संमेलनाला दरवर्षी अनुदान देत नाही ना? यावर्षी आम्ही देतो. निर्मला गजानन फाउंडेशन मधून दोन लाख आम्ही या संमेलनाला देऊ! या साहित्य संमेलनाला.पुढच्या वर्षी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ बांधील आहे. त्याच्या पुढल्या वर्षी परत देऊ, मधल्या दरम्यान जमलं तर महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने दरवर्षी जमतं का बघावे. तुमचेच पुढे रेटतोय बरं, पण काळजी करू नका. अशा कार्यक्रमाला पैशाची काही ददात नसते कारण हा कार्यक्रमच नव्हे हा यज्ञ आहे आणि यज्ञामध्ये या समिधा असतात. यज्ञामध्ये आहुती नसते, समिधा असतात.
माझ्या नशिबाने काय झाले, माझ्या कळत्या नकळत्या वयापासून. आता मला कधी कळायला लागले देव जाणे. पण बाबा आमटेंशी माझा पन्नास वर्षाचा संबंध आला, प्रकाश, विकास, भारती हे थोरल्या भावंडासारखी आहेत. कुठे काही नाही तरी तो एक गुण नाही तरी वाण लागतोच, तसं ते कुठेतरी आलेलं असेल, काहीतरी झिरपत असणार, माझी फार इच्छा होती बाबा आमटेच्या इथे राहून तेथे काम करावे. ते म्हणाले, "अरे तुझा कलावंताचा पिंड आहे, तू इथे राहून काय करशील, तू जा बाहेर. काम कर. एखादं-दोन पैसे मिळाले तर आनंदवनला दे," त्यावेळी त्यांना खात्री असेल की याला कितपत यश मिळेल, नाही मिळेल पण ज्या कन्वीक्शनने त्यांनी सांगितले होते, बाहेर गेलो, त्यानंतर जे काही यश असेल ते पदरी पडले, पण अजून मला तेच आठवते, तो जो प्रवास आहे, म्हणजे मी ज्यावेळी आनंदवनला पहिल्यांदा गेलो, त्यावेळी प्रकाश हेमलकशाला निघाला होता.
प्रकाशची भूमिका करताना मला प्रकाश काय आहे हे समजून नाही घ्यावे लागले. प्रकाश माझ्यामध्ये झिरपलेला होता. प्रकाश चालतो कसा, बोलतो कसा याची मला नक्कल करायची नव्हती. प्रकाशच्या आतला जो माणूस आहे तो समोर आणायचा होता. माझ्या परीने मी तो प्रयत्न केला. बायोपिक करत असताना, गांधीजी करत असताना, बेन किंग्सले ते चालतात कसे, दिसतात कसे, याचा प्रयत्न करायचे. कारण गांधीजी सर्वांच्या मनावर ठसलेले आहेत. त्यांची मूर्ती होती ती एक लोकांच्या मनात व्यक्तिरेखा होती, मला तसे प्रकाश करत असताना काही करायचे नव्हते. त्यातला जो गाभा आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता. तो जो शेतकऱ्यांचा गाभा आहे तो तुमचा सगळ्या या चळवळीतून पोहोचला पाहिजे. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून काम करत असताना, तुम्हाला खरं सांगतो ज्या पद्धतीने ही मुले काम करतात गणेश आहे, चंद्रशेखर आहे, जे आता नाम फाउंडेशन सांभाळत आहे, मी आणि मकरंद ही आम्ही बुजगावणे आहोत, पाखरं घाबरतात म्हणून आम्ही शेतात उभे असतो. ज्यावेळी कुठेतरी काम करायचे आहे, मोठ्या लोकांना कुठे भेटायचं आहे, हात जोडायचं, सांगायचं.
मी कुठल्याही पक्षाचा नाही. पण तिथे अतिशय जाणीवपूर्वक जाऊन हे काम व्हायला पाहिजे, शेतकऱ्यांसाठी किंवा दुसऱ्या कुणासाठी हात जोडताना मला कधी लाज वाटत नाही. माझ्यासाठी मी काही मागितले नाही, खरं तर त्यांच्यासाठी मागतो म्हणजे माझ्यासाठीच मागतो पण ते मागून मी माझे इमले चढवलेले नाही. देवाने खूप दिले हो. तुम्ही इतके 50 वर्षे प्रेम केले अजून काय लागतं? माणूस म्हणून जगायला मला हे खूप आहे, अप्रतिम आयुष्य तुम्ही मला दिलेले आहे. तुमच्यामुळे मी आज येथे उभा आहे. तुम्ही जो मान दिला, नाव दिले, पैसे दिले. पण मला नाही वाटत. कायम मला असे वाटते की, मी तिथला आहे. त्यामुळे मी तिथेच राहील. जमिनीवर राहिल्यानंतर पडण्याची भीती नसते. इथे आल्यावर पडलो तर पाय मोडेल, तिथल्या तिथे मोडत नाही. त्यामुळे मी जमिनीवर राहणे पसंत केले. आनंद वाटतो.
तुम्हाला खरे सांगतो, कारण ते दुःख मला त्या भूमिकेत नव्याने पेरता येते आणि ते पेरल्याशिवाय.... जोपर्यंत तुम्हाला तो परकायाप्रवेश करून आज तुम्हाला भेटलो, याला भेटलो, त्याला भेटलो, प्रत्येकाची चेहरे वेगळे, प्रत्येकाची विवंचना वेगळी, ती ज्या दिवशी लक्षात येते त्यावेळी ते मी त्या पद्धतीने तुमच्यासमोर मांडत जाईल मग तुम्ही म्हणता, व्वा! नानाने काय काम केले, नानाने काम केलेले नसते ते दुःख कुणाचं तरी उधार घेतो आणि ती तुमच्यासमोर मांडतो. मग तुम्हाला वाटते बापरे! किती छान आणि प्रत्ययकारी होते, प्रत्ययकारी काही नाही. ते खरे होते म्हणून ते तसे छान वाटले. मी अतिशय स्वार्थी माणूस आहे. ते सगळं गोळा करण्यासाठी मी फिरत असतो. आज मी येथे गोळा करायला आलो. मी तुमच्यासाठी अजिबात झालो नाही. मी स्वतःसाठी आलेलो आहे. मला इथे आल्यानंतर मला आनंद मिळाला म्हणून मी इथं आलो. तुम्हाला आनंद मिळाला का नाही ते मला माहीत नाही. जिथे आवडेल तिथे राहावं. जिथे आवडत नाही तिथून लगेच निघून जावं. सगळ्यात सुंदर जगण्यासाठी कालच तुमचं दुःख, उद्याचं काय असेल माहीत नाही. आताचा हा क्षण माझा आहे. याच्यावर माझा पूर्ण हक्क आहे. भानू काळेच्या बाजूला मला कधी बसता आले असते? शरद जोशीजीवर केव्हढे मोठे पुस्तक लिहिले आहे! मी त्यांना म्हटलं, चार दिवसात संपवून मी तुम्हाला फोन करतो.
मला बोलावले त्याबद्दल अतिशय आभारी आहे. कधी सामोरे जाता आले असते तुम्हाला, सगळ्यात आनंद कुठला असेल माहीत आहे ज्यावेळी येथे असा यातून एकही माणूस मला म्हणत नाही की तुम्ही कुठला तरी डायलॉग म्हणा, कारण मी नट म्हणून नाही आलो हे तुम्हाला माहीत आहे आणि डायलॉगचा माझा अजून एक गोंधळ आहे जोपर्यंत तुम्ही तिकीट काढत नाही तोपर्यंत माझ्या नरड्यातून ते डायलॉग बाहेर येतच नाही. पण छान. माझ्या आधी त्यांनी एक मच्छर आदमी को.... म्हणून त्यांनी उल्लेख केलेला आहे. पण छान.
टू बी आर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. जगावं की मरावं? मी एवढेच सांगेन जगावं आणि मानाने जगावं, मनामध्ये कुठलाही प्रश्न पडू देऊ नका. छान मानाने जगायचं, सुंदर! चांगले दिवस येतील.... नाही.. आणायचे.आणि आपण आणू धन्यवाद..!
शब्दांकन : निवृत्ती कर्डक , नाशिक
============
माझी गझल निराळी या गझलसंग्रहाचे विमोचन करताना नाना पाटेकर
नाना पाटेकर यांना कणसातील माणसे हा शेतकरी कवितासंग्रह सस्नेह भेट देताना डॉ. मनीषा रिठे
नाना पाटेकर यांना अंगारवाटा सस्नेह भेट देताना गणेश मुटे
प्रतिक्रिया
नाना भाऊ
नाना भाऊ खरेच बोलले. ज्यांचं अख्खं आयुष्य शेतकऱ्यांसाठी खर्ची पडलं त्यांना अभ्यासक्रमात स्थान हवं.
पाने