![]() ![]() बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
शेतकरी साहित्य संमेलनाने शेतकरी साहित्यिक घडवले
दिनांक 8 व 9 फेब्रुवारी 2025 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन हे शरद कृषी महाविद्यालय व यड्रावकर शिक्षण व उद्योग समूहामार्फत मा.आमदार श्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी यड्रावकर नाट्यगृहात घेतले. दोन दिवसांचे हे संमेलन आमदार साहेबांच्या आदरातिथ्यातील स्वादिष्ट भोजन, साहित्यिकांसाठी राहण्याची उत्तम व्यवस्था व नेण्याआणण्याची स्वतंत्र बस आणि शेतकरी साहित्याची रेलचेल यामुळे अतिशय बहारदार झाले.
या संमेलनात शेतकरी संघटनेच्या नामवंत पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावून शेतकरी हिताच्या अनेक गोष्टीबाबत मार्गदर्शन केले. श्री. गंगाधरजी मुटे यांच्या संकल्पनेतून शेतकरी नेते शरद जोशी यांच्या हस्ते त्यांनी पहिले संमेलन भरवले. या पहिल्याच संमेलनात प्रेमकाव्याच्या गझलेला फाटा देवून शेतकरी गझलेचा जन्म झाला. तीच परंपरा आजही कायम चालू आहे. आज शेतकऱ्याविषयी वाढलेले लिखाणासाठी साहित्यिक घडवण्याचा मोठा वाटा हा अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचा आहे. आजच्या या 12 व्या तपपूर्तीचे संमेलनात शेतकरी हिताचे 3 परिसंवाद, एक निमंत्रितांचे कविसंमेलन व एक शेतकरी गझल मुशायरा व मुंबई येथील अक्षांशस्वर दिव्यदृष्टी कलाकारांचा "शेतकरी भक्ती प्रभात" हा सुंदर गीतांचा कार्यक्रम घेण्यात आला. शेवटी विश्वस्तरीय लेखनस्पर्धेतील 14 लेखन प्रकारातील 31 विजेत्या स्पर्धकांचे बक्षीस वितरण करण्यात आले.
या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनात मला शेतकरी नमनगीत आणि मराठी भाषा गौरवगीत म्हणण्यास संधी मिळाली. कविसंमेलनाचे अध्यक्ष श्री. गंगाधरजी मुटे यांचा सन्मान करण्याचा योग आला. निमंत्रित कवींचे कविसंमेलनात कविता सादर करण्याचा बहुमान मिळाला. विश्वस्तरीय लेखनस्पर्धेचे स्पर्धेचे संयोजक होण्याचा सन्मान मिळाला. स्पर्धा संयोजक या नात्याने पारितोषिक वितरण समारोह व समारोप समारंभात प्रमुख मान्यवर यांचेसोबत व्यासपीठावर उपस्थित राहाता आले आणि सर्वात महत्वाचे म्हणजे माझ्या "शेतकऱ्यांचे भाव एक स्वप्न" या कवितेला प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले. तो सन्मान घेण्याचा बहुमान मिळाला.
अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य परिषदेने या संमेलनात मला इतके सन्मान दिले त्याबद्दल मी आयोजक श्री. गंगाधरजी मुटे, मुंबई हायकोर्टाचे वकील ॲड. श्री. सतीशजी बोरुळकर व टीम यांचा कायम ऋणी आहे.
- राजेंद्र फंड
राहाता, अहिल्यानगर