नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
मह्या घरावर आता बाबा फिरलाय येळू ,
लेकराची भूक मोठी ,सांगा कसा रंग खेळू ...?||धृ||
मिरगात पावसानं लई घातला धिंगाणा,
उभ्या पिकाच्या, देवानं..!आता मोडल्यात माना |
डोस्कं पेटलं आगीनं कुठं-कुठं बाम चोळू '
लेकराची भूक मोठी ,सांगा कसा रंग खेळू...?
रिन काढून पिकाला काळजात गोंजारलं ,
का रं कोपल्या देवा त्वां मव्हं नरडं धरलं..?
'लेकी-सुना'पोटरीत, डागटरा कसा घोळू ..?
लेकराची भूक मोठी , सांगा कसा रंग खेळू...?
आता डोळं बी रडनां सदा-कदा माही रडं ,
मह्या आवदसेलाही लाल रगाताची झडं |
काळ्या पोतीची कशी ही घरंधनीनं न्याहाळू ,
लेकराची भूक मोठी सांगा कसा रंग खेळू ...?
जखमेच्या तिडकीनं नशा दारूची चढनां ,
फाशी घ्यावी म्हणलं तं मव्हा पाय बी वढनां |
सरपा-इचवाचं इख सऱ्या अंगावर चोळू..?
लेकराची भूक मोठी सांगा कसा रंग खेळू ...?
ढवळ कापड घालून येती मोटारी बघाया ,
तळपायाची आग ही मस्तकात चढवाया |
वाटं, इळ्या-कोयत्यानं पुरा रगतात घोळू ,
लेकराची भूक मोठी ,सांगा कसा रंग खेळू...?
- दिलीप चारठाणकर
सेलू [परभणी]
------------------------------------------------