नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
विश्वस्तरीय Online लेखनस्पर्धा-२०२४ : वर्ष ११ वे
(अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम)
लेखनाचा विषय : शेतमालाचे भाव
प्रवेशिका सादर करण्याचा कालावधी - ०३ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर २०२४
गद्यलेखन स्पर्धेसाठी - ब) कथा
गुजरी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
" अमित sss ऐ अमित ss ऐ बापू sss उठणं मा जरासा! जाणं अजच्या दिस भेदरं घेऊन!" जानकी मोठया काकुळतीनं पोराले विणवत होती. सकाळचं उजाडायले अजून वेळ होता. टिनाच्या छताखाली असलेल्या तकसपकावरचा बुढा धनी भीमराव तोंडासमोर समांतर हात जोडून गुरुदेवाची प्रार्थना करत होता. भीमराव जवळपास सत्तरीच्या टोकावर पोहचला असावा. पण, तरीही मुलगा किसनाच्या मागं मागं राहून वावरातलं काही ना काही काम केल्यावाचून त्यास करमायचं नाही. रामप्रहरीच शेत शिवारात जाणाऱ्या किसनाची न्याहारी, चाय घेऊन जाणं भीमाच्या मागं असायचं. आज तसं वावरात जायचं नसल्यानं भीमा तकसपकावरच गेल्या वर्षीच्या सल्फेटच्या बोरीचे दोन भाग करून त्यात बारीक सारीक कापड, वाचलेला कापूस टाकून जानकीनं बनवलेल्या उशीलेच टेकून बसला होता. त्याचा लेक किसना बहिणीले आणायले तिवशाले गेला होता. काल दुपारच्या एसटीनं तिवशाले जाण्या अगोदर वावरातले दोन डागा भेदरं त्यानं अन् जानकीनं तोडून ठेवले होते. आज सकाळी ते गुजरीत ( मंडीत ) रहमान सेठच्या गुत्त्यावर नेऊन टाकायचे होते. त्यासाठी बापाच्या खांदाभर वाढलेल्या पोरास जानकी आवाज देत उठवू पाहत होती. "ऐ बापू sss उठणं रे अजच्या दिस!" जानकी पुन्हा काकुळीतनं म्हणाली. सातरीत पसरल्या पसरल्याच अमित बोलून गेला, " बा कुठं गेला वं? त्यायलेच जा म्हणा नं!" " अरे बह्याळा, ते काल तुया आत्याले न्याले न्हाई गेले काय, तिवशाले! कालच तं वावरातून दोयपारी गेले नं लेका!!" जानकी . जानकीचे हे शब्द कानी पडताच अमित एकदम चमकून उठला. " आई! पिंकीच्या घरी गेला काय बा ! " अमितनं झालेला आनंद ओठात दाबत जानकीस विचारलं. "हो ...! मांगं पिंकीचा बाप न्हाई का मेला बिल्डिंगवर काम करता करता पडून! तं तुया आत्याले आणा लागते लेका चोळी बांगडी कराले!" इति जानकी. "आई, पिंकी बी येईन का वं ? " अमितचा प्रतिप्रश्न. " मंग ती एकली कुठसा राहीन तं बह्याळा? " जानकीनं घरात झाडू मारता मारताच उत्तर दिलं. तरण्या देहाच्या अमितच्या मनात पटकन कुणी हसल्या सारखं झालं.
" आई! त्या भेदरातले पन्नास रूपे देजो बरं मले, माह्यी चप्पल पार तुटून गेली." अंगणात सल्फेटच्या बोऱ्या लावून केलेल्या न्हानीतल्या नांदीतला टीनपटाचा डबा घेऊन तोंडावर पाणी मारता मारता अमितनं जानकीस म्हटलं. " मले म्हाईत हाये कायले पाह्यजे तुले पैसे तं! जा घेजो... पर तुया बा ले नको सांगजो!" गालातल्या गालात हसत जानकीनं म्हटलं. अमितनं टमरेल घेतलं अन् बाहेर जाता जाताच त्यानं मायले चाय ठेवण्यास सांगितलं. पिंकीचं नाव काढताच अल्लड अंगात शिरलेला त्याचा आळस कुठच्या कुठं पळून गेला होता. पोरं वयात आले की, त्यायचं एक वेगळच जग असते.
पिंकी त्याच्यापेक्षा दोन वर्षानं लहान असलेली त्याची आतेबहीण. दोघांनाही एकमेकांविषयी आपुलकी होती.
जानकीनं काळा चहा बुढ्या धन्यासमोर ठेवला. वयानं बरेच दुष्काळ सोसलेल्या भीमरावास आता ऐकायला कमी येत होतं. फक्त झोपतांना निघणारी त्याची भगवी टोपी दिवसभर मात्र महादेवाच्या जटेतील गंगेसारखी चिपकून राहायची. अमितनं हातपाय धुतले अन् पट्कन चहा घेतला. काल रातच्यानच भीमराव अन् जानकीनं निवडून ठेवलेल्या भेदरायच्या डागा अमितनं एकेक करून सायकलवर एक मागं अन् एक मधात अशा ठेवल्या. तोपर्यंत जानकी सायकल पकडून राहिली. काल रातच्यानं भेदरं निवडतांना डागीजले... फुटले भेदरं घरच्यासाठी वेगळे काढून ठेवले होते. सायकलच्या खराब झालेल्या ट्यूबनं मागची पाटी बांधून अमितनं चप्पल घातली. गळ्यात बा चाच मळका दुपट्टा घालत अमितनं पैदलच सायकल दमटवली. जेमतेम सकाळ व्हायला लागली होती. बरेच लोकं टमरेल घेऊन देशमुख वाडीच्या दिशेनं चालले होते. शासनानं गोदरीबंद मोहीम राबवली तरी बोरीतल्या लोकांना याचं काही एक सोयरं सुतक नव्हतं. मातामायच्या निंबाजवळ अमितले त्याचा सोबती रंग्या भेटला. त्याच्याही डागेत भेदरच होती. समोरच्या लेंडी पुलाजवळ नाही जात तर, अमितच्या चपलेचा पट्टा निसटला. सीटचा सांगाडा झालेली सायकल उभी करून त्यानं पट्टा बसवून घेतला. " लेका अम्या, त्वा जोडा कावून न्हाई घातला बे? तिकडं टाईम व्हईल न गड्या तुयी चप्पल अशीच तुटत जाईन तं! " रंग्या उभ्या उभ्याच बोलून गेला. तेवढ्यात मागून कुणीतरी झुम sss झुम sss असा आवाज करत नवी कोरी दुचाकी दमटवत पुढं निघून गेला. समोर कुपाटी जवळ गाडी लावून त्यानं आपला खासगी कार्यक्रम सुरू केला. " कोण होता बे अम्या तो? लेका लईच खेटून गाडी नेली लेकानं!" रंग्यानं तावात येऊन म्हटलं. " अबे तो श्याम्या न्हाई का लेका दूधवाल्याचा ... तो व्हय नं राज्या. इची बिन इथं आपल्या खेटरायले चिंध्या लागल्या अन् लोकायले हागासाठी बी गाड्या लागल्या लेका.! अमितनं ओठावर उसणं हसू आणत म्हटलं. " लेका रंग्या, वावर इकलं म्हणते त्याच्या बापानं. पण, शाम्याचं खूप जमलं म्हणावं. पैसे भरून शाळेत लागला लेका तो. चपराशी झाला म्हणे. न्हाई तं पाह्यलं न्हाई तो आपल्या वर्गात मागच्या बेंचवर कसा बसत होता." अमित सहज बोलून गेला. " इची बिन आपली किस्मतच खराब हाये लेका अम्या, जाऊ दे! चाल लौकर... न्हाई तं थांबा लागन गुजरीत धा वाजेस्तोवर. " इति रंग्या. अमितच्या मनातून पिंकी मात्र अजूनही गेली नव्हती. त्यानं घाई घाईनं तंगड्या टाकणं सुरु केलं तसं रंग्यालेही त्याच्या मागं पळावं लागलं. अंगकाठीनं धडधाकट असलेल्या अमितनं मागच्या वर्षीच बारावी काढली अन् आता मिलिटरी, पोलीसच्या भरती मागं त्याचं मेहनत घेणं सुरू होतं. सध्या जास्त दव पडत असल्यानं जरी मेहनत बंद असली तरी, अमित वर्षभर भरतीच्या नादात बेभान होत होता.
आसपासच्या गावातली बरीच मंडळी आपापल्या वावरातलं काढलेलं ओलीत घेऊन गुजरीत चालली होती. कुणी बैलबंडीनं तर, कुणी गाडीच्या मागच्या सीटवर गाठोडं बांधून. सायकलवालेही बरेच होते. आपली सायकल बाहेर भिंतीलेच टेकवून अमितनं डागा उतरवल्या. रंग्यानही आपलं भेदराचं कॅरेट उतरवलं. डोक्याचं मफलर काढून गळ्यात घातलं. गुजरीत सर्वत्र गोंधळच गोंधळ असल्यासारखं वातावरण होतं. अमित अन् रंग्या दोघांनाही हे चित्र काही नवं नव्हतं. यापूर्वी पण त्यांची गुजरी परिक्रमा अनेकदा झालीच होती. पण, त्याचा बा माल टाकत असलेल्या रहमान सेठ सोबत अमितचं कधी पटलंच नाही. त्यामुळं तो त्याच्याशी जास्त बोलायचा नाही. मधातच " च्या sss च्या sss " करत चायवाल्याचं हापपँट घातलेलं बारकं पोरगं हातात कॅटली घेऊन इकडून तिकडं फिरत होतं. त्याच्या कॅटलीस लागलेल्या माशा पाहून रंग्यानं नाक मुरडलं तसं अमितनं म्हटलं, " लेका आपल्या परीस जास्त कमवते लेका तो, कायले नाक मुरडतं !" गुजरीत सर्वत्र गोंधळच गोंधळ होता. कोण काय बोलतं याकडं लक्ष न देता, आपला माल सलटवून निघाची हरेकास घाई होती. भिंतीच्या मागं टाकलेल्या सडक्या भाजीचा वास अजून तसाच घुमत असला तरी ताज्या कोथिंबीरीचा वास गुजरीभर घुमत होता. इलेक्ट्रॉनिक्स काटे आले असले तरी, मधातच तागडी पारड्याचा... त्यावर मोजण्यासाठी ठेवणाऱ्या वजनांचा...दगडांचा आवाज खणखणत होता. अधून मधून गावातल्याच ओळखीच्या कास्तकारायले हात दाखवत अमित रहमान शेठच्या गुत्त्यावर बसला होता. त्याच्या भेदराच्या डागा अजून तशाच ठेवल्या होत्या. वरूडवरुन कुणीतरी संत्र्याचा मेट्याडोर आणला तसा लोकायचा लोंढाच्या लोंढा त्याकडं वळला. नारंगी... पोपटी रंगाची संत्री दुरूनच आपल्या वासाचा फवारा उडवून बाजारात आल्याची पावती देत होती. आतापर्यंत पसरलेल्या कोथिंबीरीनं गुजरीत संत्र्यायले रान मोकळं करून दिल्यासारखं झालं होतं. आज गुजरीत एक वेगळंच चित्र होतं. कित्येक दलालांच्या गुत्त्यावर भेदराच्या डागा दिसत होत्या. ते पाहून अमित अन् रंग्याच्या मनात मात्र काहूर उठलं होतं. त्यातल्या त्यात अमरावतीच्या होलसेल मधून दोन मेट्याडोर भरून भेदरायचे कॅरेट भरून आल्यानं चिंतेचं सावट अधिकच गहिरं झाल्यासारखं झालं होतं. रंग्यानं
आपला माल त्याचा बा टाकत असलेल्या रामा दलालाकडं टाकून तोही तिथल्याच एका पत्र्याच्या घमेल्यावर बसून कोणी आपली भेदरं विकत घेते काय... बोली लावते काय, याची वाट बघत होता. सर्वत्र घोंघवणाऱ्या माशा डोक्यावर उडू लागल्या की, हाकलत होता. मधातच रामा दलाल अन् त्याचा पोऱ्या एखादया नवख्यानं घाबरून जावं अशा आवाजात ओरडत होता, " ये ताजा ताजा माल.. ये काश्मिरी टमाटर ... आज का नंबर वन ... आज का नंबर वन...! " अगदी बेंबीले ताण पडेपर्यंत... वगैरे... वगैरे... गुजरीच्या पुढ्यातच असलेल्या चहाच्या टपरीवर चारपाच मंडळी जमली होती. माल वाहून नेणाऱ्या अन् भांगेत कुंकू भरलेल्या डवकीनी मोठमोठ्या डागा डोईवर घेऊन, पदर कंबरेला खोचून इकडून तिकडून धावत होत्या. शेवटी त्यायचंही पोट याच्याच भरवश्यावर. बराचवेळ बसलेला अमित उठला अन् रंग्याकडं गेला. " चाल बे रंग्या, एकेक कट मारू! इचि बिन अज काई बराबर दिसून न्हाई राह्यलं राज्या. भेदरायले भावच न्हाई! " खाली मान घातलेला अमित बोलून गेला. " हो इचि बिन ... येवढ्या थंडीत आणले भेदरं... वावरात लावा... बाया माणसायची मजूरी द्या... पाणी द्या... निंदण खुरपं करा... जागणीले जा... काढा... निवडा अन् इथपर्यंत आणून पाहा तं शेतमालाले भावच न्हाई! न्हाई मरण वावरवाले फास घेऊन? " रंग्या मात्र जरासा उदासीनतेनं बोलून गेला. अमितनं एक कट चहा घेतला. रंग्याच्या डोळ्यापुढं मघाशी चाललेला कॅटलीवाला अन् माशा तरंगल्या. तसं त्यानं चहा घेण्यास नकार दिला. चहावाल्याचे पाच रुपये देत नाही तोच रहमान सेठचा मुकादम दुरूनच जोरानं हाक मारू लागला." ऐ किसनाच्या पोऱ्या sss, ये इकडं लौकर... गिऱ्हाईक आलंय...!" अमित लगबगीनच तिकडं गेला. " सांग भाऊ कितीले सोडतं डाग? " भाजीपाल्याचा व्यवसाय करणाऱ्या अन् गिऱ्हाईक असलेल्या एका स्थूल बाईनं विचारलं. अमितनं रहमान सेठकडं बघितलं. " लेके जाव न लंकाबाई, तुमको किसने मना किया हैं! लाव तुम्हारा बोरा इधर!" रहमान सेठ हात दाखवत म्हणाला. " आरं पण भाव गी सांगशील का न्हाई!" हे सारं बघत असलेल्या अमितनं तावानच विचारलं. " ऐ पोऱ्या, तेरा बाप किधर गया रे आज? तेरे को दिखता नहीं क्या, आज मंडी में भाव नहीं हैं तो! दे दो सौ रूपये में दोनो डाग!!" पोटाचा घेर वाढून टोपल्याशी स्पर्धा करू पाहणाऱ्या पोटाला सावरत रहमान सेठनं हातवारे करत म्हटलं. अमितच्या डोक्यावर कुणीतरी घन आदळावा असे त्यास वाटून गेले. " सालं दोन डागा भेदरं शंभरीत! सालं हे तं कास्तकारायच्या कष्टाचा भावच करणं झालं. इचि बिन कास्तकारायच्या घामाची ही किंमत! " तो स्वतःशीच विचार करत असता आणखी दोन चार गिऱ्हाईक जमा झाले. " ओ शेठ sss शंभरही कायले देता, फुकटच देऊन टाका नं तिले!" अमित जरा रागातच बोलून गेला. " ये देख पोऱ्या तेरेको समजता नहीं. तू कायको आता रे सुबह सुबह कटकट करने को? देना हैं तो दे, नहीं तो उठा अपना माल और रस्ता नाप ले!" असं तावातावात बोलून रहमान सेठनं आपला मोर्चा गावातल्याच यशवंत शेंड्यानं आणलेल्या वांग्याच्या बोऱ्यायकडं वळवला. " इचि बिन एवढ्या मेहनतीनं आणलेले भेदरं पुन्हा तसेच न्यावे लागल. जावू दे... देऊन देवू आजच्या दिस. असा विचार करत त्यानं मुकादमास होकार दिला. तशीच मुकादमनं बोली लावली. " सौ रुपये एक... सौ रूपये दो...!" कुणाला तरी दया यावी तसं त्यानं मधातच जोरात म्हटलं, " एक सौ तीस रुपये!" मुकादमनं पुन्हा एक... दोन... तीन करत डागा त्याच्या हवाली केल्या. त्या माणसानं आपल्यासोबत आणलेल्या काळपट कॅरेटमध्ये भेदरं भरली अन् रहमान सेठच्या हातात काही नोटा ठेवल्या. त्यात दलालीही आली. अमित मात्र उदास होता. " सालं आपण अधून मधून येत असल्यानं आपल्याले कास्तकारायच्या कष्टाचा भाव समजला. सालं सर्कार कावून न्हाई समजत ? आपला बा तं हप्त्यातून दोन तीनदा इथं येतो. त्याले कसं वाटत असन लेकाचं! पण, त्यानं तं कधीच न्हाई दाखवलं घरी!" बराच वेळ त्याच्या मनाची घालमेल तशीच सुरु होती. अर्ध्या पाऊण तासानं हिशोब करून मुकादमनं त्याच्या हाती पैसे ठेवले. त्यानं काही न म्हणता शर्टाच्या खिशात टाकले. " मोजून घे रे पोऱ्या... शंभरी हाये लेका!" मुकादमनं त्याच्याकडं पाहत म्हटलं. " का मोजाचं हाये भाऊ! खूप दौलतच देल्ली सेठनं! दलाली तं कापलीच असन! " आपल्या डागा उचलत अमितनं म्हटलं अन् सरळ सायकलचा रस्ता धरला.
रंग्याच्या भेदरायलेही भाव नव्हता. म्हणून त्यानंही भेटन त्या भावात भेदरं सलटवत तो अमितच्या अगोदरच सायकलजवळ येऊन थांबला होता. अमितच्या उदासवाण्या तोंडाकडं बघताच तो सारं ताळतंत्र समजून गेला होता. काही न बोलता आपली सायकल काढली. पडलेली चैन त्यानं पुन्हा बसवली. बोटं सीटच्या कव्हरला पुसले. दोघेही मुकाट्यानंच रस्त्यानं निघाले. मधातच एका ठिकाणी फेकलेल्या भेदरायवर मोकाट जनावरं भिडली होती. निदान फेकण्यापरीस काहीतरी भेटलं हेच खूप. याच विचारानं रंग्या सुखावला. चपलेचा पट्टा पुन्हा निघाल्यावर अमितले ती चप्पल फेकून द्यावीशी वाटली. पण, त्यानं पट्टा पुन्हा बसवून चप्पल पायात घातली. त्याचं मन खूप खोल विचाराच्या तळाशी गुंतलं होतं. बराचवेळ चिडीचूप राहिल्यानंतर अमितनं आपलं मौन सोडलं. " रंग्या काई राम न्हाई राह्यला लेका कास्तकारीत. माह्या तुह्या बा पाह्य बरं कसा राबते जनावरावानी... अन् हातात पाह्य बरं किती टीकुल्या भेटते ह्या! पिकलं तं इकत न्हाई अन् न्हाई पिकलं तं सरून जाते!" " काय करतं राज्या, सालं नशीबच आपलं फुटकं हाये " इति रंग्या. अमितच्या डोळ्यांपुढं सकाळी आईनं सांगितलेली पिंकी... बा...तो हातात कागद अन् कानाले पेन खोचलेला मुकादम... रहमान सेठ... फेकलेली भेदरं... सारं काही विचित्रपणे फिरत होतं. तरंगत होतं. परिस्थिती त्याच्यावर विक्राळ हसल्यासारखी वाटत होती. लाल भेदरायचा रंग डोळ्यांत उतरू लागला होता.
घरासमोर येताच सायकल त्यानं भिंतीजवळ टेकवली. रागातच पायातली तुटकी स्लीपर एका कोपऱ्यात भिरकावली. घराच्या ओसरीत बसलेला भीमराव उगामूगा सारं बघत राहिला. " आई sss ओ आई sss हे घे पैसे!" खिशातले पैसे आईसमोर धरत अमित उभा राहीला. " आला का मा तू! आंगपाय धू अन् खाऊन घे काई माह्या राज्या ! अन् आज भाव नव्हता का रे भेदरायले? शंभरच हायेत लेका! तूनं घेतले का रे बापू?" जानकी उतरल्या चेहऱ्यानं बोलून गेली. " न्हाई वं आई, म्या न्हाई घेतले अन् वाहान बी आताच न्हाई घेत. हाये तीच चालते काई दिवस!" अमित दाटल्या आवाजात बोलून गेला. न्हानीघरातून धुतलेले हातपाय पुसत येत अमित जरा दबकतच म्हणाला. " आई! त्या दहिवाल्याचा श्याम्या पैसे भरून शाळेत लागला म्हणे! सकाळी पाह्यलं त्याच्याकडं नवी कोरी गाडी होती. आई...! बा ले सांग नं ती दीड एकराची डुंगी काढून मले बी लावून दे म्हणा एखादया जागी!" अमित काळजाला चिरून जाईल असा बोलून गेला. तरण्या पोराच्या मनातली घालमेल जानकी समजली होती. ती काहीच बोलली नाही. चुलीवर असलेली भाकर जळाल्याचा बहाणा करत आत निघून गेली. इकडं अमितच्या मनातून त्या भेदराच्या डागा... श्याम्याची गाडी... मुकादम.. रहमान सेठ... शंभरी... पिंकी...जो राबतो त्याला गृहीत न धरता शेतमालाचे भाव ठरवणारी गुजरी अन् कास्तकारायच्या कष्टाची किंमत नाकारून त्याच्या आयुष्याच्या चिंध्या चिंध्या करून टाकणारी गुजरी... काही केल्या जात नव्हती. अगदी अंगावर चढलेल्या मुंगळ्यासारखी... कीतीही हाकला परत आपल्याकडच येत राहील्यासारखी.... कास्तकारायची लचके तोडणारी गुजरी... दलालायच्या ढेऱ्या फुगवणारी गुजरी... कास्तकारायच्या स्वप्नांचा भाव लावणारी गुजरी...
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*लीलाधर रामेश्वरजी दवंडे*
मुक्काम पोस्ट - आजनी ( रडके )
तालुका -कामठी, जिल्हा- नागपूर
मुख्य पोस्ट - कन्हान पिंपरी
441401
संपर्क - 8412877220
प्रतिक्रिया
खूप छान कथा!
खूप छान कथा!
मुक्तविहारी
मनस्वी आभार सर
मनस्वी आभार सर
पाने