नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
तिच्या सावळ्या देहासाठी
पाऊस झालो
ती म्हणाली हिरवा हो
मी उगवून आलो
वारा झालो तिच्याच खातर
बिजली झालो
इंद्रधनुचे रंग तिच्यास्तव
उधळीत आलो
झाडामधूनी हास म्हणाली
हसलो इतका
हसता हसता सोसाटयांचा
आला ठसका
समुद्र हो अन् रहा म्हणाली
जवळ निरंतर
तुझ्या नि माझ्यातले नुरू दे
मुळी न अंतर
सृष्टीमधले होते नव्हते
ते ते झालो
शेवट तीचिया गाभ्यातच
आश्रयास आलो.
शशिकांत शिंदे, कोल्हार.
कवी शशिकांत शिंदे यांची आवडलेली रचना खूप दिवसापासून मनात रुंजू घालत होती. 10 व्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाच्या विश्वस्तरीय लेखन स्पर्धेच्या निमित्ताने मला आज व्यक्त काहोण्याची संधी प्राप्त झाली. कवी शशिकांतजी हे तसे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर पण साहित्याची ही गोडी त्यांच्या शिक्षणाच्या आड कधी आले नाही. आठवणींच्या कविता पासून सुरू झालेला त्यांचा लेखन प्रवास नंतर शरणागतांचे स्तोत्र, आनंदाचं झाड, ताटातुटीचे वर्तमान, इत्यादी कवितासंग्रहाने समृद्ध झाला. त्यांच्या कविता संग्रहांना अनेक राज्यस्तरीय पुरस्कार ही लाभले. महाराष्ट्राच्या साहित्यिक परिवारात जरी त्यांना एक चांगला कवी म्हणून ओळख असली तरी इयत्ता 7 वीच्या पुस्तकातील त्यांची कविता " माणूसपण गारठलय" या कवितेने त्यांना महाराष्ट्रभरात कोट्यवधी मुला माणसातही ओळख मिळवून दिली.
शेती मातीशी नाळ असलेला हा कवी जेंव्हा आपल्या प्रतिभेची थाप व्यक्त करण्यासाठी कवितेच्या पहिल्या ओळीतच म्हणतो
" तिच्या सावळ्या देहासाठी
पाऊस झालो
सुरुवातीला क्षणभर वाटले प्रेम कविता लिहिली आज मित्रवर्य शशिकांतजी यांनी. परंतु जसजशी कविता वाचत गेलो आणि मन सृष्टीच्या शृंगाराने भरून आले. अगदी सहज साधे शब्द असे चपखल पेरले गेले की निसर्गातले या प्रेमकाव्याने मनावर अधिराज्य गाजवले.
पुढच्या ओळीत ते म्हणतात
" ती म्हणाली हिरवा हो
मी उगवून आलो
वारा झालो तिचाच खातर
बिजली झालो
इंद्रधनुचे रंग तीच्यास्तव
उधळीत आलो
आपल्या प्रेयसीच्या इच्छापूर्तीसाठी जसा एखादा प्रेमवीर काय काय करू असा अगतिक होतो. तिच्या एक इच्छेसाठी अनेक ही स्वतः ला आवडतील त्या वस्तू ही घेवून येतो. जेणेकरून ती जास्तीत जास्त खुश होईल. तशीच भावना या ठिकाणी कवी प्रतीकात्मक अशा प्रेमी असलेल्या "भूमिसाठी" सृष्टिकडून आळवली जात असल्याचे दिसून येते. तिच्यासाठी मी काय काय झालो हे सांगताना तो म्हणतो " वारा झालो तिच्याच खातर बिजली झालो" मला आता एखादा प्रेमवीर मी प्रेयसीसाठी काय काय केलं हे मांडतांना जसे यादी वाचून दाखवतो. तशीच या प्रेमवीराची यादी काही संपत नाही.
झाडामधूनी हास म्हणाली
हसलो इतका
हसता हसता सोसाटयांचा
आला ठसका
कवी तिचे लडिवाळ हितगुज करतानाचे वर्णन टाकतात जसी एखादी प्रेयसी आपल्या प्रियकराशी प्रेममय होवून वार्तालाप करते, हास्यविनोद करते, प्रियकर तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत असतांनाच ती दूर पळून जाते, प्रियकराच्या चेहऱ्यावरील रुसल्याचे भाव पहातांनाच जेंव्हा झाडाआडून ती लडिवाळपणे हास म्हणते. त्याने रुसल्याचा केलेला अभिनय सोडून तो इतका हसतो की शेवटी त्याला ठसका लागतो. असा काहीसा रोमान्स यांच्यात होत असावा. कदाचित कवींच्या भावना याहून वेगळ्या ही असू शकतील.
समुद्र हो अन् रहा म्हणाली
जवळ निरंतर
तुझ्या नि माझ्या मध्ये नुरू दे
मुळी न अंतर
कवी भूमीच्या भावना व्यक्त करतांना आता म्हणतात की ही सृष्टी तिला इतकी जवळची वाटते की तिच्या थोड्याश्या विरहाचा विचार ही तिला तिला सहन होत नाही. म्हणून ती सृष्टीला म्हणते समुद्र जसा आपली जागा न सोडता एकाच ठिकाणी असतो. अगदी तसाच तू निरंतर माझ्याजवळ हवा आहे. तुझ्या नि माझ्यात आता मुळीच अंतर असू नये. अगदी अशाच भावना आजही एकदम खरे प्रेम करणाऱ्या प्रेमींच्या ही असतात.
सृष्टी मधले होते नव्हते
ते ते झालो
शेवट तीचीया गाभ्यातच
आश्रयास आलो
आपल्या प्रेमाची उत्कटता आणि समर्पण भावना कशी असावी हे कवींनी समारोपाकडे जातांना खूप छान आणि प्रेमवेड्या भावनेत सांगितली आहे की कविता वाचतांना प्रत्येकाला आपणच त्या दोघांच्या ठिकाणी दिसतो आहे. आणि आपल्यात ही तो बदल ही कविता वाचल्यानंतर झाल्याचे परिवाराच्या लक्षात येईल. अशी सुंदर रचना याठिकाणी पहावयास मिळाली.
शशिकांतजींचे प्रत्येक कवितेचे हेच वैशिष्ट वाचकांना पहावयास मिळते. म्हणून तर महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिक, कवी ना.धो. महानोर, विठ्ठल वाघ, राजन खान, संजीवनी तडेगांवकर, जगन्नाथ देविकर,प्रा. डॉ. कन्हय्या कुंदप, प्रा. डॉ. पृथ्वीराज तोर, प्रा. डॉ. सुनील शिंदे, सुमती लांडे, कविवर्य शंकर रामाणी, कवी खलील मोमीन, चित्रकार श्रीधर अंभोरे व रवींद्र सातपुते, हेरंब कुलकर्णी, प्रकाश घोडके, सदानंद डबीर, अनिल सहस्रबुध्दे, विलास गीते, प्रा. डॉ. महेंद्र कदम, भूषण देशमुख , दादासाहेब कोते व मी सुध्दा व अजून ही खूप मोठा वर्ग त्यांच्या कवितांचे प्रचंड चाहते आहेत. यातील अनेक जण त्यांच्या कवितेवर लिहीत असतात.
शेवटी कविवर्य ना. धो . महानोर यांच्या कवी शशिकांतजी शिंदे यांच्या लिखणाविषयी व या कविविषयी असलेल्या भावना त्यांच्याच शब्दात मांडतो.
" तुझा अनुभव सच्चा आहे. तू ज्या खेड्यामधल्या शेतीची , शेतकऱ्यांची व त्यांच्या तळतळाटांची कहानी लिहून बसलास ती फारच थोर आहे. संपूर्ण शेतीशी मातीशी व त्या जीवनातल्या सुखदुःखाची एकरूप झाल्याशिवाय असा अनुभव कवितेत उतरतच नाही. तू हे सगळे ताकदीने मांडण्याचा प्रयत्न करतोस म्हणून चांगली कविता लिहितो. तुला लाख लाख धन्यवाद."
अशा या ताकदीचा कवी असलेला शशिकांतजी शिंदे यांच्या कवितेचे रसग्रहण करण्याचा मी छोटासा प्रयत्न केला आहे. कदाचित रसग्रहणासाठी आवश्यक असलेले नियमांची पायमल्ली ही माझ्या लेखणीतून झाली असेल. पण मला जसे भावले तसे मी लिहिण्याचा प्रयत्न केला. वाचक मला समजून घेतील. अशी मी अपेक्षा करतो.
रासु
अहमदनगर.
मो. 7972107991.
प्रतिक्रिया
Goog
Goog
पाने