नमस्कार !
बळीराजावर आपले स्वागत आहे. |
आजचे बाजारभाव पाहण्यासाठी https://www.baliraja.com/node/3024 या लिंकवर क्लिक करा.
दुःख वावराचे
देश शेतकऱ्यांचा हा
याची वेगळी कहानी
बळीराजाच्या हातात
फक्त उरतात नाणी
साऱ्या जगाचा पोशिंदा
त्याचं मातिमोल जिनं
त्याच्या हृदयात वसे
राष्ट्रभक्तीचं रे लेणं
शेत पंढरी रे त्याची
पिकामंदी रे विठ्ठल
साऱ्या पृथ्वीचं पाणी
त्याच्या डोळ्यात आटलं
टोपी गहाण पडूनी
सावकाराच्या त्या घरी
सरकार दलालांचं
कशा उजवाव्या पोरी
तडा काळजाला देई
भेगाळलेला दुष्काळ
एका चितेसंग फूटे
साऱ्या कुटुंबाचा भाळ
त्याच्या डोळ्यांत बघून
लेक लपवितो दोर
लढू धैर्याने म्हणतो
लावू नका जिवा घोर
लेक आसवं गिळते
कधी मागे ना ती काही
शेतीमातीशी रे नातं
तिच्या रक्तामध्ये वाही
काय गुन्हा असा केला
जन्म कुणब्याचा दिला
त्यांच्या नशीबाचा कारे
खेळ दैवाने मांडला
देवा शेतकऱ्या पोटी
जन्म एकदा तू घेरे
दुःख डोंगराएवढे
थोडे सोसून पहारे
शेतकऱ्यांच्या जातीला
नाही कुणीच रे वाली
फाटलेली काळीजं रे
केली तुझ्याच हवाली.....
••••
©:-अनिकेत जयंतराव देशमुख (अनु)
(पाऊलखुणाकार )
(कवी, निवेदक व लेखक)
रा- गोपालखेड , पो- गांधीग्राम ,
ता. जि. अकोला 444006
mo-9689634332
©®Aniket J. Deshmukh
Email - anudesh25488@gmail.com
प्रतिक्रिया
प्रवेशिकेचे स्वागत
प्रवेशिकेचे स्वागत
शेतकरी तितुका एक एक!
पाने