Ramram नमस्कारRamram
बळीराजावर आपले स्वागत आहे.

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
बळीराजा डॉट कॉमवर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......
११ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, नाशिक
नियोजित संमेलनाचे प्रारूप, उपक्रम आणि गुरुकुंजाला कसे पोचावे याबद्दल इत्यंभूत माहिती देणारा व्हीडिओ.
शेतकरी साहित्य संमेलनाचे LIVE प्रसारण "शेतकऱ्यांची चावडी" या You Tube चॅनेलवर होणार आहे.
त्यासाठी आजच चॅनेल LIKE करा, SUBSCRIBE करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऍक्टिव्ह करा.
SUBSRIBE करण्यासाठी youtube.com/@chawdi किंवा www.shetkari.in या लिंकवर क्लिक करा.
***



अवकाळी विळखा एक आश्वासक कथासंग्रंह

लेखनप्रकार: 
समीक्षण
लेखनविभाग: 
गद्य पुस्तक समीक्षण

एक आश्वासक ग्रामीण कथासंग्रह : अवकाळी विळखा
                                - संदीप नाझरे

     भारत हा कृषिप्रधान देश. या आपल्या कृषी प्रधान देशातील शेतकरी निसर्गाशी जुगार खेळतो असे म्हणतात. पण शेतातल्या काळ्या मातीत सोनं पिकवण्यासाठी गुरावाणी राबणारा शेतकरी तो फक्त जुगार खेळत नसून आपलं सर्वस्व कसं पणाला लावतो हे सांगण्याचा प्रयत्न गेली कित्येक वर्ष आमचा एक साहित्यिक मित्र सचिन वसंत पाटील (कर्नाळ, ता.मिरज) करताना दिसतोय.
     आज शेती आणि शेतकऱ्यांच्या विषयी समाजात पसरत चाललेल्या नकारात्मक वातावरणाला छेद देणार्‍या साहित्य निर्मितीची गरज त्याने ओळखली आहे.
ह्या शेतात रक्त आटवणा-या शेतकऱ्यांच्या वेदनेची भळभळ या बळीपुत्राला गेली सतरा वर्ष अंथरूणावर खिळून असतानाही अस्वस्थ करतेय. हि शेतकऱ्यांची कष्टक-यांची व्यथा-वेदना तो फक्त आपल्या शब्दात माखून थांबत नाही. तर तो आपल्या कथांमधून त्या वेदनेला उपायांची फुंकर घालण्याचा प्रयत्नही करताना दिसतोय.
      स्वतःची कळ बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या कळा ग्रामीण कथेतून शब्दबध्द करण्याचा कथाकार सचिन वसंत पाटील यांचा प्रयत्न थक्क करणारा असाच आहे. वाचकांना प्रत्येक कथा वाचताना उर भरून येईल, अंतकरण जड होईल, डोळ्यातून धारा खळाळतील. तर कधी नवा आशेचा किरण दिसेल. प्रत्येक कथा आपल्या मनात शेतकऱ्यांच्या विषयी कृतज्ञतेची जाणीव पेरल्याशिवाय राहणार नाही. तसेच माझ्या शेतकरी बांधवांना या कथामधून नक्कीच काहीना काही सकारात्मक हाती लागेल असा विश्वास वाटतो.
स्वतःच्या प्रकृतीशी बंड करत आलेले सचिन पाटील यांचे 'अवकाळी विळखा' हे तिसरे पुस्तक असून इस्लामपूरच्या गवळी प्रकाशनाने ते वाचकांच्या भेटीला आणले आहे.
कथासंग्रहाच्या सुरवातीला लेखकाचे मनोगत भावनिक करणारे, उत्कंठा वाढविणारे तितकेच प्रेरणादायी आहे. तर मलपृष्टावर जेष्ठ साहित्यिक रंगराव बापू पाटील यांनी कथासंग्रहाविषयी आश्वासकता व्यक्त केली आहे.
       पुस्तकातील पहिलीच कथा  'घुसमट'. पिढ्यानपिढ्या चालत आलेली शेतकऱ्यांच्या जगण्याची घुसमट. जनवरासंगं जनावरं झालं, मातीत राबून माती झाली, तरी आमचं अठराविश्व दारिद्रय संपायचे नाव काढत नाही. या कथेतील शेतकरी नायक विलास. जेव्हा जग राहाटीशी आपली तुलना करतो, समवयस्क इतर व्यवसायिकांच्या जगातील डोळे दिपवणारा झगमगाट त्याला विस्तवावरील पापडासारखा डागत राहतो. आपल्या बांधापर्यंत पोचलेला शहरीकरणाचा राक्षस आता माझीही शेती गिळून खाणार ही धास्ती त्याला खायला उठते.आजचा चंगळवाद आणि मातीचं इमान यामध्ये चाललेले कथेतील नायकाचं द्वंद्व कथा वाचुन बाजूला झाली तरी मनातून बाजूला जात नाही. शेतातील भागभांडवलाचा प्रश्न आणि कर्जबाजारीपणा कथेत प्रकर्षाने मांडला आहे .शिक्षणाच्या पाट्या टाकल्यावर शेती व्यवसाय पत्करणा-या वाचकावर कथेतील संवाद आसुडासारखा बरसून जातो.
      'टांगती तलवार' ही कथा आहे लहरी निसर्गाची टांगती तलवार डोक्यावर पेलून मळणीची जुळणी करू पाहणाऱ्या नामा या शेतकरी नायकाची. शेतीत आयत्यावेळी भेडसावणारा कुशल कामगारांचा प्रश्न, ऐन सुगीत त्यांचा वाढलेला भाव, कथेचा बराचसा भाग व्यापून जातो. कथेच्या उत्तरार्धात येऊन नामाच्या पाठीशी धीरोदात्तपणे उभा राहणारं त्याच्या पत्नीचं अल्पसं पात्रही मनाला आधार देते. ऐन पावसाळ्यात सोयाबीन मळणीचा थरार डोळ्यासमोर उभा करणारी ही 'टांगती तलवार' कथा मानव आणि निसर्ग यातील श्रेष्ठत्वासाठीच्या  संघर्षाची चुणूक दाखविणारी आहे. चारच वर्षामागे हा थरार अनुभवला असल्याने कथा वाचताना कधी पाऊस पडेल ह्या धास्तीने मनाचं आभाळ भरून पापण्यांच्या कडा कधी ओलावल्या समजलंच नाही.
       'सुर्यास्त'  या कथेतील निरिक्षणं आणि बारकावे या कथेला एका वेगळ्याच उंचीवर नेवून ठेवतात.
कथा वाचताना प्रकर्षाने डोळ्यासमोर उभा राहते. 'सँम्युअल बकेट' चे आयुष्यातली निरर्थककता दाखवणारं 'एन्डगेम' हे नाटक.  दुसर्या महायुद्धानंतर जागतिक साहित्यात माणसाच्या आयुष्यातील निरर्थक पोकळी दाखणारा absurd drama हा नाट्य प्रकार आला. अगदी तशीच निरर्थक पोकळी 'सुर्यास्त' कथेतील म्हातारा शेतकरी तसेच आजूबाजूला असणार्‍या म्हैस, हत्तीगवत, विहिर लिंबाचं झाड, वाळलेला ऊस या सर्व घटकांच्या वर्णनातून दिसते. आज एकूणच दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या वाट्याला येणारी हतबलता, नैराश्य, निरर्थककता शेतकऱ्याला कशी खायला उठतेय. हे दाखवण्याचा प्रयत्न कथेतून होताना दिसतो. अगदी absurd drama प्रमाणेच कथेचे कथानक  फारसे पुढे सरकत नसले तरी  कथा वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवते. एकूणच ही कथा वयोवृद्ध शेतकऱ्यांच्या आयुष्यातील दयनीय वास्तव सांगून जाते. आजची पिढीच इतकी बेभरवशाची निपजल्याने ती वृध्द मातापित्याला संभाळण्याविषयी शंका वाटते.
तसेच 'अवकाळीचा विळखा' या कथासंग्रहास याच कथेला अनुसरून वृध्द शेतकऱ्याचे आशयघन मुखपृष्ठ चित्र कलाविश्व सांगलीच्या सत्यजित वरेकर यांनी रेखाटले आहे.
      'उद्रेक' ही कथा रासायनिक खताच्या कृत्रिम टंचाईच्या विषयाला वाचा फोडणारी आहे. ऐन पावसाळ्यात खताचा तुटवडा निर्माण होतो. याच चिंतेत असणारा जोतीबा गावकर्यांच्या मदतीने साठेबाजी केलेल्या खताचं गोडाऊन फोडतो. पण आश्चर्य म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रामाणिकपणाने कथेचा सकारात्मक शेवट होतो. कथेतील संवाद वाचताना एका मोर्चातील  खताच्या साठेबाजीवर जी. डी. बापू, व्ही वाय.आबा यांनी जोरदार भाषणं केल्याचा प्रसंग डोळ्यासमोर तरळला. आजही गगनाला भिडणाऱ्या खताच्या किमती पाहिल्यावर उद्रेकाची गरज प्रकर्षाने जाणवते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना संघटित उद्रेक दाखवल्या शिवाय वाचा फुटणार नाही. शेतक-यांनी वेळोवेळी आपलं उपद्रवमुल्य दाखवायलाच हवं असा सकारात्मक संदेश उद्रेक कथेतून दिसतो.
      'तुपातली वांगी' ही कथा शेतकरी कुटुंबाच्या नाजुक अर्थकारणापासून सुरू होते. मग दलाल, अडत्यांकडून शेतकऱ्यांच्या लुटीला वाचा फोडते. शेतीच्या व्यापारीकरणाची गरज व्यक्त करत शेतकऱ्यांनी आपला माल स्वतः विकल्यास शेतकऱ्याला चांगले दिवस आहेत, या सकारात्मक सकल्पनेने कथा बरेच काही शिकवून जाते.  न लाजता कष्ट करण्याची तयारी, सेंद्रिय शेती, रासायनिक खतांचा कमीत कमी वापर, आधुनिक मार्केटिंग तंत्रांचा अवलंब केल्यास शेतकऱ्यांची प्रगती निश्चित असल्याचा आशावाद कथेतून व्यक्त होतो.
       'वाट' ही ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊस लावण्यापासून तो घालवताना शेजारच्या कडून होणारी अडवणूक, कारखाना स्लिपबॉय कडून होणारी पिळवणूक, तोडवाल्यांकडून होणारी ऊसाची हेळसांड  अशा अडथळ्यांच्या शर्यतीचा पाढाच आहे. एक प्रश्न सोडवताना दुसरा प्रश्न समोर आवासून उभा राहतो. पांडबा हा कथेचा नायक ऊसतोडीसाठी हतबल दिसतो. गोठ्यातलं पशुधन विकुन वाटेचा प्रश्न सोडवतो, तोड मिळवतो . तरीही शेवटी बाका प्रसंग त्याच्या वर येतो. काबाडकष्टाने पिकवलेलं उभं पीक पेटवण्याचा प्रसंग डोळ्यात धारा आणतो. तो पांडबाचा तोडक-या बरोबरचा शेवटचा संवाद ह्रदय पिळवटून टाकणारा आहे. ऊस उत्पादक शेतकरी होणं म्हणजे, कुण्या जन्माचं पाप फेडणं आहे का? असा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही.
     'दिवसमान' ही कथा गावगाड्यातील अनेक कुंटुबातील आजच्या दशेचं चित्रण करते. आई-बाप काबाडकष्ट करून मुलांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी मरेपर्यंत झिजत राहतात. पण त्यांची मुलं शिकुन नोकरीला लागलीच तर शहराचा रस्ता धरतात. शहरी राहणीमानात मतलबी बनतात. आपल्याच बायकापोरात रमून आईबापाला विसरून जातात.  तर गावात राहून अर्धशिक्षित राहिलेली पोरं व्यसनाधीन होतात. वाईट संगतीला लागतात. हे महादेवबापू या वयोवृद्ध नायकाच्या घरातील चित्र सर्वत्रच पाहायला मिळते. सचिन पाटील यांच्या 'दिवसमान' कथेत गावाकडचं मीठ आळणी लागणारे गावगाड्यातल्या कुटुंबसंस्थेला हादरे देताना दिसते.
       ग्रामीण भागात घरातल्या कुत्र्या मांजरापासून गोठ्यातील जनावरांपर्यंत पशुप्रेम  असतं. ते प्राणी त्याच्या कुटुंबाचाच एक भाग बनुन जातात. त्यांना काही दुखलं खुपलं तरी कुटुंबाचा जीव तळमळतो. जुन्या पिढीत अंधश्रद्धेची पाळंमुळं अजुनही किती घट्ट आहेत, हे 'करणी' कथेतील विठाआईने विषबाधा झालेल्या म्हशीला पाहून घातलेला गहिवर दाखवून देतो. ग्रामीण भागात सुखदुःख वाटून घेणारा एकोपाही कथेत चित्रित झाला आहे. 'गर्दीत एक बिगारी, बाकीचे पुढारी' हे ग्रामीण स्वाभावातील बारकाव्याचं उपहासात्मक चित्रण 'करणी' कथेच्या प्रसंगातून रेखाटले आहे.
       'कष्टाची भाकरी ' ही कथा आहे विनायक पाटील या उमद्या तरूण शेतकऱ्याची. त्याचा प्रवास ऊस शेतीपासून सुरू होतो. सुखाचा घास सोन्याचा करण्यासाठी तो द्राक्षशेतीकडे वळतो. पण सलग तीनचार वर्षं रोगराई, नैसर्गिक संकटात, द्राक्षबाग फेल गेल्याने कर्जबाजारी होतो. कर्ज फेडण्यासाठी शेतीवाडी गमावतो. परिस्थितीनुसार वागायला पदवीचा कोरडा इगो आडवा येतो. त्यातच मटका, दारूचं व्यसन जडून  विनायकच्या प्रपंचाची वाताहत होते. डोक्यावरचं छत हरवून उपासमारीची वेळ येते. आता हा विनायक आत्महत्या करणार असं वाटत असतानाच, त्या प्रयत्नात असताना त्याला पत्नी मुलांच्या रूपात आशेचा किरण दिसतो. ती जबाबदारी ची जाणीवच त्याला 'कष्टाची भाकरी' कमविण्याची प्रेरणा देते. शेतकरी आत्महत्येसारखा गंभीर विषय हाताळताना सचिन पाटील यांनी आत्महत्येला कष्टाचा पर्याय दिला आहे. खचलेल्या शेतकऱ्यांच्या मानसिकतेला उभारी देण्याचा प्रयत्न कथेतून झालेला दिसतो. कथेचा सकारात्मक शेवट बरेच काही शिकवून जातो. पैसा, माणसं, संपत्ती, नाती,  कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी नाही.परिस्थितीप्रमाणे चालून आपल्याकडे जे आहे ते भंजुन खायला शिकले पाहिजे.
      'लढत'  ह्या कथेच्या पुर्वार्धात एका उताराला लागलेल्या पैलवानाच्या घराची हाल अपेष्टा अस्वस्थ करायला लावते. तर उत्तरार्ध कुस्तीच्या आखाड्याने अत्यंत उत्कंठावर्धक ठरतो.नाना पैलवानाचे , कुस्तीच्या फडाचे लढतीचे वर्णन डोळ्यासमोर चित्र उभा करते. आपण एखाद्या आखाड्यात बसून कुस्तीच्या डावपेचांचे हुबेहूब समोलोचन ऐकण्याचा आनंद लुटतोय असा आभास होतो. इतक्या ताकदीने या 'लढती'त सचिन पाटील यांनी आपलं शब्द आणि अनुभव सामर्थ्य एकवटले आहे. या लढतीचा शेवट वाचकांनी ठरवायचा आहे. एकूणच ही कथा मातीतल्या कुस्तीचा एक रोमांचक अनुभव देणारी आहे. कथेतून नाना पैलवान या लढाऊ व्यक्तिमत्वाचे व्यक्तीचित्रण पाहायला मिळते.विपरीत परिस्थितीत संघर्ष करताना ताकद आणि बुद्धीचा योग्य वापर, निकराचा प्रयत्न आपल्याला तरवून नेवू शकतो असेही कथा सांगते.
       नव्या पिढीत वाढत असलेली आळशी वृत्ती, झटपट श्रीमंतीचा हव्यास यावरील चिंतन 'मैत्री' कथेत येते. 'झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिए' या उक्तीप्रमाणे अनेक माणसं गांवागावात येवून जनतेला ठकवत असतात. अनेक साखळी योजनांचे पेव फुटलेलं असतं. गावात चांगलं वलय असणाऱ्या व्यक्तीला एजंट बनवून या योजना आणणारे नामानिराळे राहतात. व चागंला हात मारून पोबारा करतात. सामान्य हतबल माणसं मात्र त्यात फसवणारा एजंट जवळचाच असल्याने आक्कल विकत घेतली म्हणून गप्प बसतात. सतत अशा साखळी योजनांचे पीक सुरूच असतं. 'मैत्री' कथेच्या सुरवातीला अनेक फसव्या योजना व त्यातील फोलपणाचे विवेचन आहे. जुन्या नोटा-नाण्यांच्या संग्रह करणार्‍या नामदेव या नायकाला सुधाकर हा त्याचा मित्र इमोशनल ब्लैकमेल करत ठगवून स्वतः मालामाल होतो असे कथेचे कथानक आहे. कितीही जवळचा मित्र असला तरी भावनिक न होता त्याच्याशी सावधपणे व्यवहार करायला हवा असा संदेश 'मैत्री' कथा देते.
       'बुजगावणं' या कथेत गाव शिवारात येवून ठेपलेल्या सेझच्या संकटावर शेतकऱ्यांच्या घराघरात पेटलेला दोन पिढ्यांचा संघर्ष आहे. एक जुणी वयोवृद्धांची पिढी. जी मातीत राबताराबता मातीला माय मानून लळा लावून बसलेली. तर दुसरी शिकुन शहाणपण आलेली पिढी. जी आंगचुकार, कष्ट नाकारणारी, चंगळखोर, झटपट श्रीमंतीचा हव्यासाने रक्ताच्या नात्यांनाही आंधळी झालेली.कथेतील बाप-लेकाचा संवाद डोक्यात झिणझिण्या आणतो. जागतिकीकरणाच्या या संक्रमणाच्या दिवसांना सामोरं जाणं जुण्या पिढीला न झेपणारं ओझ झालयं. नानू करत कथेचा नायक शामुआण्णा सरतेशेवटी जमीन विकतो खरा पण, आईला विकल्याची वेदना त्याचं 'बुजगावणं' करून सोडते.
       रानातील मातीवर जिवापाड प्रेम करणारा गरीब सखाराम. गावाकडे दुष्काळ पडल्यावर शहराकडे धाव घेतो. एका वकिलाकडे ड्रायवरची नोकरी पत्करलेल्या सखारामला शहरातला झगमगाट परका वाटतो. पावसाळ्यात पावसाला सुरवात होते. तसं त्याला त्याचं 'रान' आठवून शहरात गुदमरल्यागत होतं.आपल्या गावाकडच्या मातीची ओढ काय असते, हे दाखवणारी 'रान' ही कथा मनात घर करणारी आहे.
       'सांभाळ रे' ही कथा विकास या कथेच्या शेतकरी नायकाबरोबर आपल्याला पंढरीच्या वारीला घेऊन जाते. नायकाच्या नजरेतून पंढरपूरच्या चंद्रभागेची झालेली गटारगंगा, मंदिरात बडव्यांच्या उच्छादाने तयार झालेली गरीब आणि श्रीमंत अशी आर्थिक विषमतेची दरी.त्यातून विकाला मिळालेली वाईट वागणूक यातून त्याच्या मनातील पंढरीच्या सोज्वळ कल्पनेला तडा जातो.
रागाने फणफणत आक्रोशत या बदललेल्या पंढरीला आता तुच 'सांभाळ रे' असे आवाहन विका विठ्ठलाला करताना दिसतो.
      कथा संग्रहाची शिर्षक कथा 'अवकाळी विळखा'. अवकाळी पावसानं झोडपल्याने गरीब-श्रीमंत सर्वच शेतकऱ्यांची झालेली दैना, सुगीतील सगळीच पिकं वाया जाण्याची धास्ती असं विदारक शिवारचित्रण करत ही कथा गाव चावडीतल्या च-हाट चर्चेला घेवून जाते.
रौद्र निसर्ग शेतकऱ्यांना रस्तावर आणतोय, पण सरकार भीक घालत नाही. अशा चौफेर चर्चेचं गुऱ्हाळ या अवकाळीची कारणमीमांसा करते.  निसर्गाचा ढासळत चाललेला समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण आणि संवर्धन हाच उपाय सुचवून कथेचा समारोप होतो. या कथेतून  सचिन वसंत पाटील यांची शेतकऱ्यांच्या विषयीची चिंता तसेच चिंतनशिलता पाहायला मिळते.
      हा कथासंग्रह बदलता गावगाडा, ग्रामीण संस्कृती, ग्रामीण लोकांचे स्वभाव यांचे चित्रण करणारा आहे. या कथांमधील ग्रामीण परिस्थितीचे चित्रण आणि संवाद कथेला जीवंतता आणतात.या पुस्तकातील बऱ्याच कथा सकारात्मक आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकरी साहित्यात हे दुर्मिळ आहे.सर्वच कथांमध्ये ग्राम संस्कृतीला मिळते जुळते विषय सचिन पाटील यांच्या कथांमध्ये दिसतात.या कथांमधील वयोवृद्ध शेतकऱ्यांच्या व्यथा काळजात घर करणाऱ्या आहेत. शेतकऱ्यांना चांगले दिवस चिंतना-या या कथासंग्रहास शुभेच्छा ! तसेच सचिन पाटील यांना यापुढील काळात उत्तम आरोग्य लाभो, त्यांच्या कडून उत्तमोत्तम दर्जेदार साहित्य निर्मिती होत राहो हिच सदिच्छा !

अवकाळी विळखा - कथासंग्रह
लेखक - सचिन वसंत पाटील
पाने- २०४ किंमत- ३१०

- संदीप नाझरे
मु. पो.आमणापूर
ता. पलूस, जि. सांगली.
आमणापूर -४१६३०८
मोबाईल ९७६६६८९४३३.

Share

प्रतिक्रिया